आजी म्हणायची.. माणूस अप्पलपोटी झालाय...
काळत न्हवतं तेव्हा... पण आता त्याचा अनुभव यायला लागलाय ....
कोरोना नावाचा हा रोग... जगभर थयथय नाचत आलाय...
माणसातला माणूस अन राक्षस सुद्धा दाखवू लागलाय.. माणूस खरंच अप्पलपोटी झालाय ..
एकीकडे आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर आणायला धावतोय ...
तर दुसरीकडे पाच हजारांचं सिलेंडर पट्ठ्या पन्नास हजाराला विकायला लागलाय.. माणूस अप्पलपोटी झालाय ...
कुणी औषध इंजेक्शन साठी जीवाचा आटापिटा करताना दिसतोय..
आणि त्याच औषधांचा खुलेआम काळाबाजार होताना आम्ही पाहिलाय... माणूस अप्पलपोटी झालाय...
बेड मिळेना ऍडमिट व्हायला म्हणून पेशंटला हातावर घेऊन वणवण फिरतोय ...
अन एकाच बेडवर २-३ पेशंट ठेवून त्यातून बक्कळ पैसे काढायलाय ... माणूस अप्पलपोटी झालाय ...
मरण आलं पण सरणाशिवाय २-२ दिवस देह पडून राहायला लागलाय ...
अन त्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाताना माणूस मागं पुढं बघाना झालाय ... माणूस अप्पलपोटी झालाय ...
एकीकडे मतदान करणाराच एक एक करून कमी होत चाललाय...
अन सत्तेसाठी राजकारण्यांचा जीव मात्र निवडणुकीतच अडकायलाय... माणूस अप्पलपोटी झालाय...
आपल्यातलंच कुणीतरी अचानक चालता बोलता कायमचं सोडून चाललंय...
शेवटची भेट नाही... निरोपाचा अंतिम क्षण नाही .. डोळ्यातलं पाणीही आता आटलंय...
पण या सगळ्यांचं भांडवल करणारा मात्र आपली खळगी भरत बसलाय ... माणूस अप्पलपोटी झालाय...
पण तरीही ....
बेघरांना घर देणारा हात आजही पुढे येतोय ...
भुकेल्या जीवांना कुणीतरी चार घास भरवतोय ....
कधी डॉक्टर नर्स बनून पाठीशी उभा राहतोय ...
तर कधी पोलीस, सफाई कामगार बनून आधार देतोय ...
आपला जीव धोक्यात घालून कुणी जीव वाचवतोय ...
तर कुणी आपल्याला शब्दांनीच मोलाचा आधार देतोय ....
माणसंच आहेत हि सुद्धा... पण यांच्यामुळेच माणसांवरचा विश्वास पुन्हा दृढ होत चाललाय....
अप्पलपोटी माणसांच्या जगात यांच्या रूपाने प्रत्येकाला देव भेटायला लागलाय...
पुन्हा देव भेटायला लागलाय...
- टिंग्याची आई (शिल्पा कुर्ले )