Friday, August 23, 2013

आज एवढंच शिकलो…

Based on a true incident with one of my IT Friend... 
बंद पडली होती कार आजच… 
म्हणून बस धरावी लागली होती… 
बरच Uncomfortable फील झालं… 
कारण बसची सवयचं आता मोडली होती…

बस stop वर उभा असताना… 
माझा स्मार्ट फोन माझी सोबत करत होता… 
कळलचं नाही कधीपासून… 
एक उमदा तरुण माझ्या बाजूला उभा होता… 

काहीच महत्वाचं करत न्हव्हतो तरी… 
attitude ने टच्च भरलेली एकच Smile दिली…
पण त्याला तेवढीच पुरेशी होती… 
न विचारताच त्याने बोलायला सुरुवात केली…

नवखाच होता नक्कीच शहरात… 
बऱ्याच गोष्टींची चौकशी करत होता…
नुकताच PassOut झालेला… 
अन आता जॉब च्या शोधात फिरत होता…

"Fresher" नावाचं लेबल… 
गळ्यात घेऊन हिंडत होता…
कोणास ठाऊक रोज उठून… 
किती कंपन्यांचे उंबरे झिजवत होता…

मीही एक IT Professional… 
So Called Sophisticated कोशात गुरफटलेला…
माझं लाईफ.. माझं Tension.. माझी Achievements… 
सगळं माझं माझं करत… माझ्यातच पूर्ण बरबटलेला…

कधी हिशोबातही न बसणारा एक रुपया… 
माझ्यासाठी कवडी मोलाचा होता…
आणि तू मात्र त्याचं रुपयासाठी… 
कंडक्टरशी जीव तोडून भांडत होता…

बरंच काही सांगत होता… 
जणू पहिल्यांदाच कुणीतरी त्याचं ऐकत होतं…
पाहत होतो स्वतःलाच मी त्याच्यात… 
भूतकाळाच एक पान पुन्हा समोर उभं ठाकलं होतं…

का धाडस केलं नाही मी… 
आपलं कार्ड किंवा मेल ID शेअर करायचं…?
विसरलोच असतो नक्कीच… 
तरीही मदतीचा हात पुढे करायचं…?

'स्व'भीमान कि 'अ'भीमान नक्की माहित नाही… 
पण क्षणात गळून गेला…
जेव्हा जाता जाता तो बिचारा… 
माझ्याकडे आशाळभूत नजरेने पाहून गेला…

आज एवढंच शिकलो…
स्वतःची जागा आता नेहमी लक्षात राहील… 
दुसर्याच्या मदतीला हात सदा सज्ज राहील…
कमवलेल्या पायी पायीचा पुरेपूर मान राखीन… 
अन अशाच एखाद्या तरुणाची नक्कीच वाट पाहीन… 

- टिंग्याची आई

Wednesday, August 21, 2013

देव करो…

हवा होता कोणाचातरी हात…
नेमकं तेव्हा निराधार सोडलंस…
तुझ्या कुशीत मनमोकळ रडायचं होतं…
त्या क्षणी आपलं असूनही परकं मानलस…

जिथे सोडायला नको होतंस…
नेमकं तिथेच एकटीला सोडलंस…
जेव्हा खरंच जवळ घ्यायला हवं होतंस…
त्यावेळीसुद्धा नको इतकं दूर लोटलंस…

विनाकारण आपल्या प्रेमाला…
नको त्या बंधनात अडकवलस…
माझ्या निरागस प्रेमाला…
दर वेळी का बर आजमावलस…?

तुझ्या मनातल्या भावनेला…
मनातच खोलवर गाडून टाकलस…
अन माझ्यासगळ्याच भावनांना…
नकळत पायदळी तुडवलस…

तुझ्या डोळ्यांत साठलेलं पाणी…
मला कधीच दाखवलं नाहीस…
माझ्या डोळ्यात उभी आसवं पुसायची…
तसदी कधीच घेतली नाहीस…

तुझ्या प्रेमाच्या चार शब्दांची वाट पाहत…
मी प्रत्येक दुखं पापण्यांच्या आड जपावं…
पण…
देव करो… चुकून जरी कधी मला हाक मारशील…
त्या हाकेला ओ द्यायला मी तुझ्या जवळ असावं…

आजही गुंफले आहेत हातात हात…
अन गुंतले आहेत श्वासांत श्वास…
सोडून देशील का हा वेडेपणा…? नाही बघवत मला…
कणाकणाने होत चाललेला आपल्या गोड नात्याचा ऱ्हास…
आजही या वेड्या मनाला लागलाय…
फक्त तुझ्याच प्रेमाचा ध्यास… 

- टिंग्याची आई

Sunday, August 18, 2013

संशय…When you are doubted


विनाकारण जेव्हा जेव्हा… तुमच्यावर संशय घेतला जातो… 
संशयाचा भयाण अंधार… चारी बाजूंनी वेढतो… 
जीवाच्या आकांताने…  मन आक्रोश करून सांगत असतं
पण जगाला त्या क्षणी… काहीच ऐकायचं नसतं… 
बोलणार्याचा प्रत्येक… शब्द नको इतका बोचतो 
उघड्या पडलेल्या जखमेला… पुन्हा पुन्हा उकरून जातो… 
बघणाऱ्याची नजर… नुसताच संशय घेत राहते… 
तोच नको असलेला प्रश्न… दर वेळी विचारून जाते
भीती वाटते देवाला हात जोडताना… नेहमीसारखं त्याला कळलच नाही तर..!!
मी घातलेलं साकड… त्याने यावेळीही ऐकलंच नाही तर…!!
तुम्ही नसतच काही केललं… तरीही मनात हजार प्रश्न उठतात…
स्वतःवरच संशय घेत… त्याचाच पाठपुरावा करतात
सगळे वार झेलायला लढायला… कणा ताठ उभा असतो…
तरीही संशयाचा एक किडा… आतून अखंड पोखरत असतो…
का असं होत…? आपण इतके हतबल का बर होतो?
या जगाला तोंड देताना… अगदीच निर्बल का होऊन बसतो?
अशाच वेळी हवा असतो… एक सावरणारा हात…
तुमच्यावर विश्वास ठेऊन… तुम्हाला बळ देणारा हात…
तो हात हातात असता… प्रत्येक प्रश्न नक्कीच सुटेल…
संशयाचा घोर अंधार… अगदी क्षणार्धात मिटेल…
सगळ वादळ शमल्यावर… विजयाचा एक किरण आकाश फाटून येईल…
अन त्याच्या कुशीत शिरून… तुम्हाला मनमोकळ समाधानाने रडता येईल…
:) तोवर बेस्ट ऑफ लक

- शिल्पा

Friday, August 16, 2013

एक गोष्ट "त्या"ची आणि "ती"ची…

बऱ्याच दिवसांनी आज दोघेही खूप खुश होते… त्याला ऑफिसमध्ये Promotion मिळालं होत आणि तिने घरी आईला त्याच्या बद्दल सांगितलं होतं…

तो : काय झालंय राणी सरकार आज भलत्याच खुश दिसताय…
मघापासून सारख्या गालातल्या गालात हसताय…
ती : होय राजे… आज खास कारणच तसं आहे…
आज आईला तिच्या जावईबापूंच नाव कळवलं आहे… :)

तो : कोण बर आहे हा नशीबवान प्राणी?
आम्हाला पण त्याचं नाव सांगेल का आमची राणी?
ती : (थोडी चिडूनच) पुरे झाली थट्टा… आजचा दिवस Celebrate करायचा का?
ऑफिसला दांडी मारून एक मस्त Bike Ride करायची का?

त्याला भारी हौस होती बाईक चालवायची… तिला मागे बसवून जग जिंकल्याचा आव आणत मिरवायची… त्या दिवशीही दोघे निघाले बाईक राईडला पहिल्यांदाच तिच्या सांगण्यावरून… :)

तो : कसा ग खेळतोय तुझ्या केसांशी हा खट्याळ वारा…
आपल्याच आनंदात चिंब झालाय जणू आसमंत सारा…
ती : (मिठी थोडी जास्त घट्ट करून)
तुझ्या या आनंदात मलाही आज चिंब भिजायचंय…
संसाराचं गुलाबी स्वप्न… तुझ्या प्रेमानेच रंगवायचंय…

सुराला सूर जुळवत दोघेही निघाले होते… गाडीचं स्पीड आज तिलाही जास्त वाटलं नाही… नेहमीसारखी हळू चालवायला ती ओरडली देखील नाही…समाधानाच्या नशेत दोघेही बेधुंद झाले होते… अगदी आकंठ बुडाले होते…
बोलता बोलता सहज त्याने हेल्मेट काढून तिच्याकडे दिले… फील घ्यायचाय थोडा एवढेच कारण सांगितले… जास्त काही न विचारता तिनेही मग ते स्वतः घातले अन पुन्हा दोघे स्वप्नांच्या दुनियेत हरवले…
पुढच्याच क्षणी अचानक काहीतरी झालं… जणू सगळ काही त्या एका क्षणात हरवलं… स्वप्नांचा बंगला खळकन तुटून पडला… एका भयंकर Accident ने सगळाच खेळ संपवला… तिला एकटीला मागे ठेऊन तो देवाघरी निघून गेला…
हॉस्पिटलमध्ये शुद्ध आल्यावर तिला सगळ चित्र स्पष्ट झालं… तिला हेल्मेट घालायला लावून त्याला कोणता फील घ्यायचा होता हे क्षणात कळून चुकलं…

ती : फक्त एकदाच सख्या माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होतास… 
त्या क्षणी माझा हात एकदा हातात घ्यायला हवा होतास… 
माझा जीव वाचवून कदाचित तुला समाधान मिळालं असेल… 
कदाचित माझ हे दुख तेव्हा तुला लक्षात आलं नसेल… 

ती : जाणवलं होत आधीच पण मला कळू दिलं नाहीस… 
एकट्यानेच झेललस संकट… मला झळ सुद्धा लागू दिली नाहीस… 
इतकं प्रेम केलंस… मग एकटीला असा सोडून का गेलास?
ठाऊक होत ना तूच माझा आधार… तरीही हिरावून का बर नेलास?

ती : तुला कळल नाही… पण माझ्या बाप्पाने माझ्यावर कृपा केली… 
तुला पाहू शकले नसते पुन्हा… म्हणून त्याने हि दृष्टीच काढून घेतली… :)
तुलाच पाहून मिटले होते हे डोळे… आता दुसर काहीच पाहू शकत नाहीत… 
साठवलेलं तुझ प्रतिबिंब… हरवू नये म्हणून अश्रू सुद्धा ढळत नाहीत… 

पुन्हा तीच : आता फक्त वाट पाहतेय… या देहाचा प्रवास संपायची… 
पुन्हा एकदा तुझ्याशीच… कायमचं एकरूप व्हायची… 

- टिंग्याची आई

Thursday, August 8, 2013

आज खूप वर्षांनी...

असंच काहीतरी लिहायचा प्रयत्न…
आज खूप वर्षांनी तिला कोणीतरी तिच्या जुन्या नावाने हाक मारली… नकळत तिचं मन हळवं झालं… खूप दिवसांनी मन पुन्हा जुन्या आठवणीत हरवलं… 
त्या हाकेसोबत मनाच्या जमिनीत अगदी खोलवर गाडून टाकलेली एक एक आठवण जमीनीच पोट फाडून वर आली… त्या अंकुराला गोंजारावं खुडून टाकावं… काहीच कळेना… उगीचच लहान झालेल्या मनाला वाटत होत… पुन्हा हा अंकुर वाढू द्यावा… जीवापाड जपावं… आकाशाला भेदेपर्यंत मोठ करावं… पण ठेच लागून दुखावलेलं कि शहाण झालेलं मन आतून जाग होतं… कधी एकदा  पुन्हा एकदा मुळासकट खुडून टाकावं ह्या तयारीत… पण छे…!!! काहीच नको… हे प्रेम नको कि  राग मत्सर काहीच नको…
ठरवलंय आज या एकाच मनाच्या दोन्ही बाजूंनी मिळून… जाणून बुजून त्या अंकुराला  खत पाणी घालायचं नाही अन दुर्लक्ष तर मुळीच करायचं नाही… तळ हातावरच्या फोडासारखं जपायचं नाही कि अगदीच नकोशा झालेल्या कुरुपा सारखं कापूनही टाकायचं नाही… वाढू द्यायचं त्याला त्याच्या परीने… मोठ होऊ द्यायचं… पण… इतकं अंतर ठेऊन कि पुन्हा त्याची मुळं कधीच माझ्या जमिनीत गुंतणार नाहीत… माझा वटवृक्ष उन्मळून पडणार नाहीत… माझ्याच साउलित पुन्हा एकदा हे वाढेल का बर? वाटत तिथेच वाढवावं… अगदी लेकरासारखं सोबत त्याला पाखरासारखं उडूही द्यावं… स्वच्छंद मनाने त्याला हवं तसं… स्वतःची जमीन स्वतः शोधत गेलेली मुळं का गेली याचं दुखं होणार नाही… वाईटही वाटणार नाही… 
मन नेहमीच तयार असेल अशा अचानक आलेल्या हाकेला "ओ" द्यायला… तितक्याच प्रेमाने प्रतिसाद द्यायला… :)

- शिल्पा

Tuesday, August 6, 2013

सुगरणीची कविता…

कमरेभोवती नेसलेल्या साडीत पदरासोबत…
लेखणीसुद्धा असते सतत खोवलेली…. 
किचन कट्ट्यावरच्या सगळ्या पसाऱ्यात… 
कवितांची वही देखील असते कुठेतरी लपलेली… 

पहाटेच्या मधुर चहासारखी सकाळच्यापारी… 
एखादी गोड कविता सुचून जाते… 
कवितेच्या नादात  रमलेली असताना… 
लक्ष न दिलेल्या दुधासारखी फसकन उतू जाते… 

कधी चर्र्कन बसलेल्या फोड्नीसारखी… 
एखादी जबरदस्त ओळ सुचावी… 
अन कधी अगदीच मिळमिळीत आमटीसारखी…
पूर्णच्या पूर्ण कविताच फसावी… 

अगदी पूर्ण होता होता मोडलेल्या भाकरीसारखी… 
एखादी कविता विस्कटून जाते… 
तर कधी टम फुगलेल्या भाकरीसारखीच… 
मनाला उगीचच समाधान देऊन जाते… 

मधूनच हातावर अचानक आलेली वाफ … 
डोळ्यांत टचकन पाणी आणते… 
अशीच कधीतरी एखादीच ओळ… 
जीवाला कायमचा चटका लावून जाते… 

कधी मस्त कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या सारखी… 
एखादी कविता झणझणीत बनते… 
अन कधी पिल्लाच्या मऊ वरण-भातासारखी… 
अलगद ओठातच विरघळते… 

तिच्या नेहमीच्या स्वयंपाकाच्या गडबडीत…
एखादी सुचलेली ओळ हरवून जाते… 
तर कधी त्या कवितेच्या नादातच… 
कधी मीठ तर कधी साखरच नेमकी विसरते… 

आंबट गोड तर कधी खारट तिखट… 
कितीतरी चवींनी तिचा स्वयंपाक रंगलाय… 
सुख दु:ख अन कधी भांडण विरह… 
प्रत्येक रंग तिने आपल्या कवितेत मायेने भरलाय… 

तिने प्रेमाने रांधलेला स्वयंपाकासारखी… 
सगळ्या घराला समाधान देऊन जाते… 
संसारात गुंतलेली ही अन्नपूर्णा… 
जमेल तशी कवितेमधून सरस्वतीची सेवा करते… 

कधी जमला तर कधी फसलाय… 
आजवर प्रत्येक पदार्थ घराने गोड मानून घेतलाय… 
या सुगरणीच्या कवितेतला प्रत्येक भाव… 
तुम्ही वाचकांनीही तितक्याच चवीने चाखलाय… :)

- टिंग्याची आई
I am really thankful to all of you... :)

Friday, August 2, 2013

आज शंभरी गाठली…

आज ब्लॉगवर १००वी पोस्ट टाकतेय… असंच काहीतरी… :) तुमच्या आशीर्वादानेच एवढा प्रवास करू शकले… माझ्या ब्लॉगच्या प्रत्येक वाचकाची मी मनापासून आभारी आहे… 
:)
 
आपल्या लाडक्या चांदोबाच्या प्रेम पत्रातून सुरुवात झाली… 
बऱ्याच विषयांना हात घालत… आज शंभरी गाठली… 
कधी सुटत जाणारी वीण सावरायचा प्रयत्न केला… 
तर कधी ओसंडून वाहणारा आनंद आवरायचा प्रयत्न करून पाहिला… :)

घातला होता बांध मी स्वतःच जाणून बुजून… 
ठेवलं होतं सगळं मनात अगदी खोलवर दाबून… 
ठाऊक न्हवतं… हे सार अडवून अडणार न्हवतं… 
कवितेचा आधार मिळताच वाहायचं थांबणार न्हवतं…
 
एका मैत्रिणीने साथ दिली म्हणून ब्लॉगची सुरुवात केली… 
थांबली होती लेखणी ती पुन्हा एकदा बोलकी झाली… 
शिल्पा आता टिंग्याची आई बनून लिहायला लागली… 
तुमच्याच आशीर्वादाने बहरतेय… ही "एक छोटीशी शब्दांजली…"

कधी ऑफिस कधी कॉलेज कधी मैत्रीची मंजुळ गाणी… 
कुणाची आत्महत्या… अन कधी दुष्काळाची कहाणी… 
कधी सांजवेळी कंठ दाटून आणणाऱ्या आठवणी… 
तर कधी कुणाच्याही नकळत डोळ्यांत उभं राहिलेलं पाणी… 

कधी खाटकाच्या पोराने डोळ्यांत पाणी आणलं… 
तर कधी शरी आणि प्रभा ने वाचणाऱ्याच मन जिंकलं… 
कधी सख्या बहिणी बनून कडकडून भेटलो… 
अन जिवाभावाच्या मैत्रिणी असून सुद्धा भांडलो… 

केला होता कधी प्रयत्न हिंदीमध्ये लिहायचा… 
मोडकं तोडकं इंग्लिश कवितेत उतरायचा… 
कुणी न सांगताच कळलं तो आपला प्रांत नाही… 
हे इंग्लिश विंग्लिश आपल्याच्यान जमणार नाही… :)

कळलंच नाही कधी या लेखणीतून… 
माझा लाडका टिंग्या बोलायला लागला… 
त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण कवितेतून… 
सगळ्या ब्लॉगभर हिंडायला लागला… 

खंत एकच… कवितांनी आज शंभरी गाठली… 
पण अजून यातली त्याने एकही नाही वाचली… 
वाटतं… कधी ना कधी तो एखादी शाबासकी देईल… 
अन त्याच दिवशी या Century चं खर चीज होईल… ( Waiting for that golden day)

होतं न्हवतं तेवढं सगळं तुमच्यासमोर मांडलंय… 
अगदी थोडसंच माझ्यापुरतं… राखूनसुद्धा ठेवलंय… 
आजवर प्रेम दिलंत… पुढेही मिळत राहील अशी आशा आहे… 
मनापासून दिलेली एखादी Comment सुद्धा पुरेशी आहे… 

Thanks To All of You for This Support and Inspiration…. Cheers.... 
- टिंग्याची आई
:)

 

Thursday, August 1, 2013

ButterFly.. Tingya's first poem... :)

टिंग्या आणि आईचा रोज संध्याकाळी अभ्यास चालू असतो … रोज एक नवीन गाण शिकवतो टिंग्या आईला… हि कविता लिहिली आहे आईने खास टिंग्यासाठी… आणि कवितेची पहिली ओळहि टिंग्याचीच आहे… :)
ButterFly... ButterFly...
कुठे चाललास… ?
फुलांवर उड्या मारून… 
तू किती दमलास…?

रंग तुझे किती सुंदर… 
अन डोळे छान छान… 
इटुकले दोन antena… 
पण कुठे गेले तुझे कान… ?

इकडून तिकडे तिकडून इकडे… 
सारखा उडत असतोस… 
अभ्यास बिभ्यास आहे कि नाही… 
कि नुसताच हिंडत बसतोस…?

चिमुकल्या अळीमधून… 
म्हणे एवढा मोठा होतोस… 
सगळ्या फुलांचा Honey… 
एकटाच फस्त करतोस… 

देशील का रे तुझे पंख मला?
मग मी पण उंच उडेन… 
ढगातल्या त्या बाप्पाला… 
मी रोज जाऊन भेटेन… 

सूर्य नारायणाच्या पायाला… 
हात लावून नमस्कार करेन… 
मोठ्ठ्या मोठ्ठ्या ढगांना… 
मी ढीश्शुम ढीश्शुमकरून पळवेन… 

हेलीकॉप्टर, येरोप्लेन… 
मी सगळ्यांच्या वर जाईन… 
कावऱ्या बावऱ्या झालेल्या आईला… 
धावत येउन मिठी मारीन… 

भागलेल्या त्या चांदोबाला… 
त्याच्या घरी जाऊन आणेन… 
चांदण्यांशी गप्पा मारत… 
आईच्या कुशीत निजेन… 

गोड गुलाबी स्वप्नांच्या गर्दीत… 
मी गाढ झोपलेलो असताना… 
घेऊन जा तुझे पंख परत… 
या टींग्याचं लक्ष नसताना… :)
नाहीतर मी नेऊ देणार नाही बर का…!! :)

- टिंग्याची आई