Friday, July 26, 2013

शाळा...

बालवाडीत जाईपर्यंत आम्हाला… पुस्तक काय असते ठाऊक न्हवतं… 
आणि आता Nursery चं पुस्तक पण… म्हणे कव्हर घालूनच लागतं… 

नुसत्या पाटी-पेन्सिलवर… आमचं पाचवी पर्यंत सहज चालायचं… 
आजकाल पहिल्या वर्गातच पोरावर… दप्तराच भलं मोठं ओझं लादायचं… 

मळ खाऊन खाऊन दमलेली चड्डी… आम्ही पुन्हा धुवेपर्यंत वापरायची… 
अन हल्ली अगदी स्वच्छ धुतलेल्या Uniform ला… म्हणे इस्त्री सुद्धा मारायची… 

आमची आजी म्हणायची… मला फक्त ग म भ न कळतो… 
 आणि इथे नातू आजीला… ABCD म्हणायला लावतो… 

शाळेतले एकुलेते एक मास्तर… सगळ्या विषयांत Expert असायचे… 
आता प्रत्येक subjectला separate teacher… तरीही पोरांना Extra Tutions लावायचे… 

मास्तरांच्या छड्यांनी… आमचे हात रोज सुजलेले असायचे… 
इकडे शिक्षकांना कडक Warning… आता वांदे झालेत नुसते ओरडायचे… 

कसेही असले मास्तर तरी… पोरांवर त्यांचा खूप जीव होता… 
आज शिक्षक  पोरांचा संबंध… उरलाय तो फक्त शाळेपुरता… 

दिव्याच्या उजेडात जागा मिळेल तिथे… आमचा अभ्यास चालत असे… 
अन घरी दोन वर्षांचा चिमणा… Study Table घेऊनच अभ्यासला बसे… 

कशी होती आमची शाळा… आता अशी कशी झाली आहे…?
ज्ञानार्जन साफ विसरून… अर्थार्जनाच्या मागे का बर धावते आहे…??

उज्ज्वल भविष्याचं शिखर गाठायला… शाळा म्हणजे आमचा आधार होती… 
पण आता तिथे मिळते फक्त… पोरगं निरक्षर नसल्याची पावती….

- टिंग्याची आई

Tuesday, July 23, 2013

आजची एक संध्याकाळ....



आजची एक संध्याकाळ तुझ्या dear सौ साठी दे… 
विचार तिला घ्यायची का आज एक नवी साडी…?
साडीला maching होणारी एखादी चपलांची जोडी…!!
तिची एक खट्याळ Smile … तुला सगळ काही सांगून जाईल… 
अन तुझ्या हातातले पैसे… ती घराच्या EMI साठी जमा करून घेईल… 
कॅलेंडरची पान पालटत… पुन्हा एकदा दिवस मोजेल… 
कधी मिळणार आपलं घर?? नुसत्या डोळ्यांनीच तुला विचारेल… :)

कितीही नाही म्हणाली… तरी तिला एका छान दुकानात घेऊन जा… 
हिशोबाचा कागद तिचा… आज मुद्दाम घरीच ठेऊन जा… 
बाहेरूनच दिसलेली एखादी साडी… तिच्या पटकन मनात भरेल… 
price tag दुरूनच न्याहाळून… लगेचच दोन पावलं मागे सरेल… 
असू देत थोडीशी महाग… पण तीच साडी खरेदी कर… 
तिच्या नेहमीच्या नकाराला… आज थोडंस Ignore कर…. 

नको करू तू आज उगीच… लवकर घरी पळायची घाई… 
नेहमीची हि धावपळ तुझी… तिला मूळी आवडतच नाही…
तिच्या खांद्यावर  हात ठेऊन… जरा चार पावलं चालून बघ… 
टच्च भरलेल्या तिच्या डोळ्यातले… दोन थेंब ओंजळीत झेलून बघ… 
घेऊन जा आज तिला… तुमच्या त्याच favorite जागेवर… 
चांदोबा वाट पाहत असेल… चांदणं पसरून आकाशभर… 

तुझं घर सांभाळताना… बघ कशी मलूल झालीये तिची कांती… 
तुझ्या खांद्यावर डोकं टेकून… आज घेऊ दे तिला थोडीशी विश्रांती…
एकटीनेच सांभाळेल हे ओझं… पाठीशी तुझा हात असू दे… 
सगळी सुख-दुखं हसत पदरात घेईल… फक्त तुझी अखंड साथ असू दे… 
मिठीत घेऊन सांग तिला… Thanks for being my sweet Wife....
तुझ्या डोळ्यांत डोळे घालून म्हणेल कशी… My Heart is beating only for you My dear Life.... :)


- टिंग्याची आई

Monday, July 22, 2013

दिल्या घरी तू सुखी रहा...


         तू निघताना डोळ्यात पाणी भरून उभी असलेली आई… कावरे बावरे होऊन एकटक तुझ्याकडे पाहणारे बाबा… डोळ्यातलं पाणी लपवायचा व्यर्थ प्रयत्न करणारा दादा… आणि एकाच वेळी आनंद आणि दुःख अनुभवणारी तू… जड अंतकरणाने तो क्षण सगळ्यांनीच निभावून नेला… तुझ्या माहेराला नेहमीच तुझी ओढ लागेली असेल… दारातली तुळस, देव्हार्यातला बाप्पा, सगळेच तुझी वाट पाहतील… या घराने पाहिलेलं तुझ्या सुखी संसाराचं स्वप्न आज सत्यात उतरतंय… भरल्या डोळ्यांनी अन हसऱ्या ओठांनी या घराने आज तुला निरोप दिलाय… "तुझ्या घरी तू सुखाने रहा" असा आशीर्वाद दिलाय…. 
        उंबऱ्यावरच माप ओलांडून तुझ्या घरात पाहिलं पाउल टाकशील… त्याच क्षणी सासूबाईची लाडकी लेक होशील, नंदेची जिवलग मैत्रीण होशील, धाकट्या दिराची लाडकी वाहिनी होशील, सासरेबुवांची समजूतदार मुलगी होशील, जाऊबाईची जिवाभावाची बहिण होशील… अन तुझ्या लाडक्या राजाची राणी होशील… 
        सगळी नाती कशी नव्याने भेटतील… माहेरच्या मायेची उणीव  काढतील… तुझ्या बोलक्या स्वभावाने सगळ्यांना आपलस करून घेशील… क्षणात त्या घराचं चैतन्य होशील… हौसेन सासूबाई तुकडा ओवाळून टाकतील… आपल्या लाडक्या सुनेला उराशी कवटाळतील… सासरेबुवा हळूच कोणाच्याही नकळत डोळ्यातला थेंब लपवतिल… तुझ्या लक्षात आलंय हे उमजून मनापासून हसतील… आशीर्वाद देताना म्हणतील "पोरी… हवं ते माग…" तेव्हा एवढंच सांग… "योग्य त्या वेळी आमचा कान धरा, पण धरू नका तुमच्या मुलीवर कधी राग…" :) खळखळून हसत सहज तथास्तु म्हणतील… "माझ्या मुलीची नीट काळजी घे" असा दम तुझ्या अहोंना देतील… :)
         या सगळ्या नात्यांना तुला जीवापाड जपायचंय… एक एक धागा प्रेमाने बांधायचाय… या रेशीमगाठीत तुझं नव जग घट्ट विणायचंय… त्या  क्षणी तुझा पती तुझ्यासोबत असेलच… त्याचा हात हातात घेऊन, पावलाला पाऊल जुळवून संसाराचं गोड गुलाबी स्वप्न सत्यात उतरवायचं आहे… 
        माहेरी आजही तुझी तितक्याच आतुरतेने तुझी वाट पाहिली जाईल… भरल्या ओटीने तुझी पाठवणी केली जाईल… या दोन कुटुंबांना जोडणारा दुवा तू आहेस… तुलाच सांभाळायची आहेत  दोन्ही घर… तू समर्थ आहेस… आणि तुला या दोन्ही घरांची मायेची साउली अखंड लाभेलच… या आनंदाच्या क्षणी इतकंच म्हणावस वाटतंय… 
दिल्या घरी तू सुखी रहा… :)

- टिंग्याची आई 
Specially dedicated to my dearest friend सौ. अस्मिता राजेंद्र साळोखे 
:)

Thursday, July 18, 2013

वारी...

आषाढी एकादशीच्या निमित्ताने… 
बोला पुंडरीक वरदे… हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… 
कशी थाटात निघाली… ही पंढरीची वारी…
विठू नामाच्या गजरात… न्हाली धरित्री सारी… 
कुठे वाजे मृदुंग… कुठे मंजुळ ती टाळ… 
माउलीच्या दर्शनास… व्याकुळल हे तान्ह भक्त बाळ… 

इथे भेटणाऱ्या प्रत्येकाला… सहज म्हणावं माउली… 
उन्हा पावसात साथ देई… विठूच्या भक्तीची साउली… 
इथे कुणा भेटे ज्ञानेश्वर… कुणा तुका,कुणा नामा… 
भला संत असो कि राकुस… इथे सर्वा मिळे फक्त क्षमा… 

दिसभर दमल्या भक्ताचे… देई पाय तो चेपून… 
साऱ्या भक्तांना आणतो… चंद्रभागेच्या तीरी जपून… 
कुणी चिंतेने ग्रासला… कुणा माथी कर्ज आहे… 
सर्वा सोबत असूनी एकटे… मन दर्शनाची वाट पाहे… 

डोळ्यातली सारी आसवं… जातील का बर पुसून…?
परतेल का वारीतला जीव… क्षणभर समाधानाने हसून…?
विठ्ठलमय होईल कसा… वारीतला क्षण क्षण…
चिंता आपसूक विरेल… जेव्हा वाहू त्याच्यापायी कण कण… 

तुझ्या वारीला या आलो… भाग्य लाभले आम्हास… 
तुझ्या दर्शनाने मिळेल… मनशांती या पतित देहास… 
तोच एक क्षण तुझा माझा… त्यात आयुष्य मज जगू दे… 
माऊली तुझी सावळी मूर्ती… मला डोळाभरून पाहू दे… 

-टिंग्याची आई

...की समजावं…


तिचे पाणावलेले डोळे पाहिले की समजावं…
त्याचही नुकतंच रडून झालंय… 
आईच्या मायेने कुशीत घेऊन… 
आज पुन्हा एकदा तिने त्याचं सांत्वन केलंय… 

खूप चिडलेला तो… अचानक शांत झाला कि समजावं… 
नेहमी सारखी तिनेच माघार घेतली आहे… 
त्याच्या रागाचं एकुलत एक माणूस बनून… 
पुन्हा एकदा त्याचं मन जिंकलं आहे… 

Difficult Situation मधेही त्याचं smile दिसलं की समजावं… 
त्याच्या पाठीशी ती एकटीच खंबीर उभी आहे… 
देव्हाऱ्यातल्या नंदादीपाइतकीच पवित्र ज्योती…
वादळातही त्याच्यासाठी अखंड तेवते आहे… 

तिच्या काळ्याभोर डोळ्यात समाधान दिसलं की समजावं… 
खूप दिवसापासूनच, त्याचं एखाद स्वप्न पूर्ण झालंय….
पावला पावलाला त्याची साथ देत… 
त्याचं प्रत्येक स्वप्न तिने आपलस केलंय… 

एकमेकांचा हात हातात घेऊन… 
असाच त्यांना पुढचा प्रवास करायचा आहे… 
जीवापाड प्रेम अन अतूट विश्वास… 
हाच त्यांच्या नात्यातला खरा अर्थ आहे… 

- टिंग्याची आई

Monday, July 15, 2013

आजी आजोबांची खोली…

आजी आजोबांची परवानगी न घेता हि कविता लिहिल्याबद्दल क्षमस्व… 

औषधाच्या रिकाम्या बाटल्यांचे… 
मनोरे जागोजागी रचलेले… 
कशाला हवीये दुसरी शोभा… 
त्यांनीच तर घर सारे सजलेले… 

बसल्याजागी आडवं व्हावं… 
अशी  सोय मुद्दामून केलेली… 
ऐस पैस सोफ्याची जागाही… 
नव्या व्हील चेयरने घेतलेली… 

छोटी मोठी सगळीच कपडे… 
कपाटाच्या बाहेरच डोकावणारी… 
जमेल तसं… आमची आजी दिसे… 
थरथरणाऱ्या हातांनी आवरणारी… 

आजीला लागतो कधी Fan… 
तर आजोबांना वार अजिबात चालतच नाही… 
२४ तास चालू त्याचं T.V. च दुकान… 
तिला मुळी पसंतच पडत नाही… 

सावरून थकलीये आता काठी… 
पण आज्जी आजही तरतरीत आहे…. 
व्हील चेयर कितीही कोरी असेना का… 
आजोबांची उभं राहायची उमेद तिच्याहून नवी आहे… 

परतुंडाच्या साखळ्यांच्या नादावर… 
आनंद घरभर दुडू दुडू धावतोय… 
आयुष्याच्या अतिजीर्ण झालेल्या वटवृक्षालाही… 
पुन्हा एकदा नव्याने फुलायला लावतोय… 

सगळ्या घरात जाणवत असल्या जरी… 
The End च्या बर्याचशा खुणा… 
क्षितिजावर झुकलेल्या सुर्यालाही इथे… 
नव्या उमेदीने उगवायचं असतं पुन्हा…. 

Ever Smiling आजी आजोबांना पाहून… 
खरंच खूप समाधान वाटत… 
आजही ताजतवान त्याचं मन पाहून…आम्हा लहानांना… 
सगळी Tensions विसरून रोज नव्याने जगायचं सामर्थ्य मिळतं… 
Hats  Off to आजी-आजोबा…. :)

- टिंग्याची आई
Specially dedicated to someone... :)

बाबाची आई कुठाय…??

 
बरेच दिवस झाले आई… 
तुला एक प्रश्न विचारायचा आहे… 
सगळे आहेत आपल्या Family मध्ये…
पण… आपल्या बाबाची आई कुठे ग आहे…?

बाबा एकदा म्हणाला होता… 
आजी बाप्पाच्या घरी गेलीये… 
सगळ सगळ मंदिर शोधलं मी परवा… 
पण तिचा कुठ्ठे कुठ्ठे पत्ता नाहीये… 

तुझ्यापेक्षाही खूप सुंदर आहे ती… 
मी पाहिलाय ना फोटो तिचा… 
दिसतो ना मी Ditto तिच्यासारखा… 
मग… आहेच मी नातू तिचा… :P

तुझ्या डोळ्यात पाणी आलंच… 
तर आईआजी तुला लगेच कुशीत घेते… 
पण बाबाला कित्तीही रडू आलं तरी…
त्याची आई कधीच जवळ नसते… :(

इतकं छान आहे बाप्पाचं घर… 
आजीला इकडे यावस वाटतच नाही का?
तिचा लाडका चिमणा वाट पाहतोय… 
बाप्पाने कधी तिला सांगितलच नसेल का?

खूप वाटत ग आई मला… 
आपल्या आजीच्या कुशीत शिरावं… 
रोज नवीन नवीन गोष्टी ऐकत… 
तिच्याच ऊबदार गोधडीत निजावं…
 
खर खर संग आई… तुलाही वाटत ना?
आपल्या आजीने लवकर परत यावं…. 
तुझी आई जवळ नसताना… 
बाबासोबत तिने तुलाही आपल्या कुशीत घ्यावं…?

स्वप्नात तर दिसतेच ग रोज… 
पण मला खर खर भेटायचंय… 
School मधलं एक एक गाण… 
तिला मोठ्ठ्यांदा म्हणून दाखवायचय… 

सांगितलंय कालच मी बाप्पाला… 
फक्त एकदाच तिला पाठव माझ्याकडे… 
Chocolate, खेळणी, लाडू अन बाबासाठी सुट्टी… 
यातलं कध्धीच काही मागणार नाही तुझ्याकडे…. 
Please बाप्पा…. :(

आई… एकदा आजी आली ना कि… 
मी रोज तिला बागेत नेईन… 
मग तुला आम्ही देऊ थोडी विश्रांती… 
कारण खाऊ पण मी फक्त तिच्याच हातून खाईन…

- टिंग्याची आई

Wednesday, July 10, 2013

आठवतात का ग त्या पायऱ्या तुला…?


आठवतात का ग त्या पायऱ्या तुला…?
तिथेच बसून आपण… कितीतरी क्षण वेचले आहेत…
आठवणीतली बरीचशी पानं… त्याच क्षणांनी भरली आहेत… 
एकमेकांची सगळी Secrets… आपण तिथेच फोडली होती… 
कणा कणाने वाढत मैत्री… तिथेच तर घडली होती… 

सुख-दुःखाचे सगळे क्षण… आपण त्याच जागी Share केलेत… 
म्हणूनच त्या पायऱ्या पाहून… नकळत डोळे भरून आलेत… 
मैत्री आपली निखळ होती… ती आजही तितकीच पवित्र आहे… 
एका अतूट नात्यात रंगलेलं… ते एक  चित्र आहे… 

आठवतंय…? तिथेच बसून तू मला तुझ्या लग्नाची बातमी दिलीस… 
अन नात्यामध्ये आपल्या… एक अस्पष्ट सीमारेषा आखून गेलीस… 
तू सोडून दिलेलं नात… त्या पायऱ्यांनी आजही जपलंय… 
तुझं खळखळून हसणं… त्यांच्या गूढ शांतेत लपलंय… 

आजही त्या शांतपणे… हातात हात गुंफून उभ्या आहेत… 
मैत्रीच्या एका गोड भेटीची… अजूनही वाट पाहत आहेत… 
मैत्रीवर या आपल्या… एकदाच विश्वास दाखवायला हवा होतास… 
शेवटचा निरोप घेण्याआधी… आजवर का जपलंस? याचा थोडातरी विचार करायला हवा होतास… 

आजही तुझी आठवण आली… कि मी तिथेच जाऊन बसतो… 
पुन्हा ते गोजिरवाणे क्षण आठवून… तुझ्या साउलीसोबतच मनसोक्त गप्पा मारतो…. 
येशील कधीतरी फिरून परत… म्हणून आजही तुझीच वाट पाहतो… :)

- शिल्पा

Friday, July 5, 2013

माझ्यातली थोडीशी "मी"... जर तुला देता असती…


माझ्यातली थोडीशी "मी"…  जर तुला देता असती…
पुढच्याच क्षणी ओंजळ तुझी ओसंडून वाहिली असती…. :)
थेंबभर समाधान… दोघांच्याही डोळ्यांतून सांडलं असतं….  
आजवर जपलेलं आपलं नात… एकदा मनापासून हसलं असतं…. 
मलाही लाभलं असतं समाधान… क्षणभर का होईना तुझी साथ दिल्याचं… 
एकमेकांना घातलेली शपथ… आजही न मोडल्याच… 

मीच आहे असं समजून… काळजाच्या अगदी जवळ ठेवलं असतंस… 
तुझ्या श्वासातला एक श्वास बनवून… मला जीवापाड जपलं असतंस…
कौतुकाने ठेवलं असतंस… नजरेसमोर प्रत्येक क्षणी… 
एक एक आठवण जिवंत होऊन… भूर उडून गेलं असतं पापण्यामधलं पाणी… 
ठाऊक आहे मला… सगळ अगदी अस्सच केलं असतंस… 
दोघांमधलं अंतर… थोडंसुद्धा जाणवू दिलं नसतंस… 

वाईट एवढंच वाटतं… प्रत्यक्षात असं काहीच करता येत नाही… 
पुढे गेलेल्या प्रत्येकाला… परत फिरून येता येतच असं नाही… 
मायेच्या माणसाला… आठवणीशीवाय दुसर काहीच देता येत नाही…
इथे प्रत्येक "का…?" ला… उत्तर मिळतच असं नाही…. 
म्हणूनच आज ठरवलंय… बाकी काही नाही पण थोडासा वेळ तुला द्यायचा…. 
त्या निरागस भेटीतला प्रत्येक क्षण… मनाच्या कूपीत सांभाळून ठेवायचा… :)

- शिल्पा