Monday, November 24, 2014

बिदाई का दिन….

मेरी एक प्यारीसी दोस्त है.… ऑफिस में हम लोग साथ में काम करते है.… उसका घर भुवनेश्वर में है और वो पुणे में जॉब करती है.… घर इतना दूर है तो बार बार जा नहीं सकती इसीलिए हर ६ महीने में एक बार घर जाती है लंबी छुट्टी लेके.…
और हर बार वापस आते वक्त कुछ यही समां होता है घर पे.…
उसकी बिदाई का ये दिन मेरी जबानी.…
वह दिन तो काफी सुहाना लग रहा था.…
हमेशा की तरह सूरज खुशियाँ बरसा रहा था.…
लेकिन घर में एक अजीब सा सन्नाटा छाया हुआ था.…
हर कोई बिटिया के वापिस जाने के गम में डूबा हुआ था.…

माँ की लाड़ली, पापा की प्यारी बिटिया है वो.…
छोटी की बेस्ट फ्रेंड, इस घर की खुशियाँ है वो.…
घर से दूर किसी शहर में.… लड़ो नौकरी करती है.…
६ महीने में बस एक ही बार.… घर वापस आ पाती है.…
ना कोई बंधन है यह.… और ना ही कोई मज़बूरी.…
पर बेटीका इंडिपेंडेंट होना है बहुत जरुरी.…
इसीलिए.… घर से इतनी दूर वो रह लेती है.…
जुदाई का गम.… माँ-बेटी हर दिन सहती है.…

आज भी.… बिटिया का वापसी का दिन था.…
इसीलिए सुबहसे.… घर में सन्नाटे वाला सीन था.…
पॅकिंग वगैरा सब कुछ.… कब की हो गयी थी.…
फिर भी माँ एक एक चीज़.… याद दिला रही थी.…
१५ दिन कब निकल गए.… पता ही नहीं चला था.…
फिर एक बार जुदाई का वो पल.… चुपकेसे आ गया था.…

मुश्किल हो जाते है पल.… जैसे दिन बढ़ता जाता है.…
आसुओं का समंदर.… पलकों के पीछे रुक जाता है.…
वक्त से काफी पहले.… घर से सब निकल गए.…
अगली मुलाकात तक के चंद पल.… साथ बिताने चले.…
माँ-पापा से बिटिया.… नजर नहीं मिला रही थी.…
अपनी आँखों की सच्चाई.… बयान नहीं कर पा रही थी.…
हमेशा की तरह.… माँ अपनी लाड़ली को निहार रही थी.…
सँभाल न पाती खुदको.… तो चुपके से आसू बहा रही थी.…
पापा की हालत भी.… कुछ अलग तो नहीं थी.…
उनकी प्यारी बेटी.… आज फिरसे बिछड़ रही थी.…

फ्लाईट का इंतजार करना.… सजा सा लग रहा था.…
हर कोई झूठी हसी के पीछे.… अपने आँसुओ को छुपा रहा था.…
इंतजार ख़त्म हुआ.… अब तो फ्लाईट भी आ गयी.…
बिना पीछे मुड़े.… बिटिया अंदर चली गयी.…
यूँही कुछ देर.… माँ-पापा बेटी को देखते रहे.…
अब बिना पूछे आंसू.… पलकों से बेहते रहे.…
इधर बिटिया का  भी हाल.… कुछ ऐसा ही हो रहा था.…
घर पे बिताया हर पल.… आंसू बन के बह रहा था.…
कुछ इस तरहसे.… बिदाई का दिन हर बार गुजरता है.…
बिटिया की अगली छुट्टी का.… सारा घर इंतजार करता है.…

- टिंग्याची आई 
स्पेलिंग मिस्टेक के लिए माफ़ी चाहती हूँ.… और ग्रामर भी संभाल लेना :)
भावनाओं को समझो :)

Tuesday, November 18, 2014

रामरक्षा…

'तानी' आपल्या सुखी संसारात रमलेली एक मुलगी… छोटंसं कुटुंब आहे तिचं… जीवाला जीव देणारा नवरा, आई-बापाची माया देणारे सासू-सासरे आणि गोंडस पिल्लू… सगळे सुखाने राहतात तिच्या घरकुलात… तानी शिकली सवरलेली, नोकरीसुद्धा करते… तशी अगदीच फॉरवर्ड वगैरे नाहीये पण बऱ्यापैकी बदलत्या जगासोबत पावलं टाकते आहे… आपल्या छोट्याशा संसारात चं रमलिये… देवाची भक्ती करायचा फार नाद आहे तानीला… पण हल्ली घर, ऑफिस आणि पिल्लुच्या नादात जमतच नाही तिला… कशीबशी रोजची नेमाची ५ मिनिटे देवासमोर शांतपणे टेकते बाकी दिवसरात्र धावपळ सुरूच असते… :) मनात खंत तर आहेच पण तरीही जमेल तशी पूजा अर्चा सुरु असते तिची… :)
सगळं काही ठीक ठाक सुरु असताना परवा तानीचा छकुला अचानक आजारी पडला… ताप चढत होता आणि पिल्लू मलूल होत चाललं होतं… डॉक्टर झाला, औषधं झाली पण गुण येईना… पोराच्या अन तानीच्या दोघांच्याही पोटात घास जाईना झाला… दर ५-६ तासाला पिल्लाचा ताप चढत होता… जरा कमी झाला म्हणावं तर परत वाढत होता… दिवसरात्र तानी आणि तिच्या सासूबाई त्याची काळजी घेत होत्या… चार दिवस होऊन गेले तरी काही फरक पडेना… देवालाही १० वेळा हात जोडून झाले होते… पण जणू तो हि काहीच ऐकत न्हवता… पाचव्या दिवशी परत दवाखाना झाला… डॉक्टर ने एक दोन औषधं बदलून दिली… पोराला घेऊन तानी घरी आली औषध वगैरे दिलं… ताप अजूनही होताच… 
दिवेलागनीची वेळ होती… देव्हाऱ्यात नंदादीप शांतपणे तेवत होता… तानीला आता देव बाप्पाचाही राग यायला लागला… :( पिल्लूला बरं वाटावं  म्हणून तिने बऱ्याचदा त्याला हात जोडले होते… त्या नंदादीपाकडे बघता बघता न जाणो कुठून तानीला रामरक्षेची आठवण झाली… रामरक्षेचे मंद सूर तिच्या कानात घुमू लागले… तिची आजी लहानपणी तिला सांगायची रामरक्षेत खूप शक्ती आहे… कुठलही संकट आलं तर एकदा मनापासून रामरक्षा म्हण… प्रभू श्रीराम धावत येतील तुझ्या मदतीला… आणि याचा अनुभवही बऱ्याचदा तानीने स्वतः घेतला होता… आपल्याला हे आधी का बर सुचलं नाही हेच तिला कळेना… एक अनामिक शक्ती तिला साद घालत होती… 
तानी शांतपणे उठली… तापलेल्या पोराला मांडीवर घेतलं आणि देवापुढे बसली… हातात थोडासा अंगारा घेतला… आणि जमेल तितक्या मोठ्या आणि स्पष्ट आवाजात रामरक्षा म्हणायला सुरवात केली… जणू ती रामरायाला ऐकू जावी अशी तिची इच्छा होती… इतकी वर्षं म्हटली न्हवती तरीही रामरक्षेतला प्रत्येक स्तोत्र तिच्या तोंडून जणू आपोआप निघत होता… मिटल्या डोळ्यासमोर श्रीरामाचा शांत आणि सुखद चेहरा दिसत होता… आणि तिचा जीव मुठीत पकडलेल्या रक्षेमध्ये एकवटला होता… एक एक शब्द सगळं वातावरण राममय करत होता… कधी न्हवे ते पिल्लूसुद्धा आईकडे बघत शांतपणे मांडीवर बसलं होत…. 
रामरक्षा म्हणून होताच तिने शांतपणे डोळे उघडले… हातातला अंगारा पिल्लुच्या कपाळाला आणि अंगाला लावला…. समाधानाने देवाला नमस्कार केला… तिला खात्री होती कि आता तिच्या बाळाला नक्की बरं वाटणार… 
त्या रात्री पोराला चांगली झोप लागली आणि ताप बऱ्यापैकी कमी झाला… आईने भक्तिभावाने म्हटलेल्या रामरक्षेचा गुण आला…. :) तानीने धावत जाऊन देवासमोर डोकं टेकलं… आजीने सांगितलेल्या एका प्रभावी अस्त्राचा तिला आज पुन्हा एकदा अनुभव आला होता…
खरं सांगायचं तर… हा गुण नक्की डॉक्टरने बदलून दिलेल्या औषधाचा होता कि खरंच रामरक्षेचा…  हे त्या श्रीरामालाच ठाऊक… :)
तानीचा मात्र ठाम विश्वास आहे… "रामरक्षा" हेच खरं गुणकारी औषध तिच्या लाडक्या पिल्लूला लागू पडलंय…. आता पिल्लू छान खेळतंय बागडतंय… अन तानीच्या मनात रामरक्षेच पठण अखंड चालू झालंय… तिच्या पिलाच्या अखंड रक्षणासाठी… :)
जय श्री राम…!!!!
- टिंग्याची आई

Monday, November 17, 2014

राजकारण…

आमचा एक नवीन मित्र आहे… राजकारणावर खूप गप्पा मारतो… त्याला बरंच काही माहिती आहे… रोज काही न काही सांगत असतो… बऱ्याचदा राजकारणातले पेच आम्हाला समजत नाहीत पण तो ते असे काही सांगतो कि समोरचा थक्क होऊन जातो… 
आम्ही अडाणी माणसं… आपल्याला त्यातलं काही कळत नाही म्हणून सोडून देतो… :) पण हे सुद्धा किती चुकीचं आहे हे हि तो मस्त पटवून देतो… तर असं हे राजकारण, शब्दांत बांधायचा एक प्रयत्न… मला न समजलेलं राजकारण… 
Specially Dedicated to him... :)
"राजकारण…" किती साधा आणि सरळ शब्द आहे…
पण याचा नेमका अर्थ सांगायला… शब्दकोशही निशब्द आहे…
कसाही पाहिला तरी… हा शब्द बरबटलेलाच दिसतो…
इथे उभा प्रत्येकजण… त्या चिखलाने माखलेला असतो…
पिढ्यान पिढ्या चालत आलंय… म्हणे याचा इतिहास खूप मोठा आहे…
जमेल तिथे मूळं रोवत आलंय… याचा पसारा फार मोठा आहे…
कधी सत्तेसाठी कधी पैशासाठी… तर कधी नुसता सूड घेण्यासाठी…
राजकारण खेळलं जातंय… जनतेचा जीव घेण्यासाठी…
राजकारण कसं खेळावं… याला कुठलेच नियम नसतात…
काय मिळालं काय गमावलं… याची गणितच निराळी असतात…
आई-बाप, काका-मामा… इथे प्रत्येकजण वैरी असतो…
एकट्यानेच जगतात सगळे… इथे जिवाभावाचा कोणीच नसतो…
नाती म्हणजे वर चढायला… वापरलेली फक्त एक शिडी असते…
एकदा वर पोचल्यावर… जिची पुन्हा कधीच गरज नसते…
बुद्धिबळाचा हा खेळ… यातलं कोडं कधीच सुटत नाही…
माणसं अशीही वागू शकतात… हेच आमच्या मनाला पटत नाही…
चांगला हेतू चांगले विचार… इथल्या जगाला मानवत नाहीत…
इतरांना होणाऱ्या पिडा… यांच्या कठोर मनाला जाणवतच नाहीत…
विरोधात उठणारा आवाज… सोयीस्कररीत्या दाबला जातो…
अन आवाज उठवणारा… accident मध्ये मारला जातो…
राजकारण करायला… कुठलंही कारण लागत नाही…
दगडाचं कठीण मन हवं… मग डिग्री सुद्धा कुणी मागत नाही…
कोणाचीही असो चित-पट… सामान्य माणूसच भरडला जातोय…
राजकारणाच्या वरवंट्याखाली… वर्षानुवर्षे चिरडला जातोय…
राजकारण म्हणजे चिखल… याला कुणी बर साफ करावा…?
वाटतं… जनतेच्या हितासाठी एकतरी महारथी यात उतरावा…
राजकारणाचा खरा अर्थ… कदाचित तेव्हाच आम्हाला कळेल…
अन दूर जाणारं आमचं पाऊल… स्वतःहून या राजकारणाकडे वळेल… 

- टिंग्याची आई

Sunday, November 16, 2014

ती 'येते' म्हणाली होती…

ही आपली शेवटची भेट… असंच ती म्हणाली होती…
आणि खरंच त्या दिवशी… ती शेवटचीच भेटली होती…
त्या दिवसानंतर तिने… कधी मागे वळून पाहिलं न्हवतं…
परतीच्या वाटेवर… तिचं पाऊल कधीच वळलं न्हवतं…
भरल्या डोळ्यांनी… निरोपाची ती रात्र सरली होती…
त्यातला प्रत्येक क्षण… ती जाणून बुजून विसरली होती…
सगळं काही मागे सोडून… तिने नव्याने सुरुवात केली…
मनात उठणाऱ्या वादळावर… कशीबशी मात केली…
इतक्या वर्षांनी… तसं तिचं सुरळीत चाललं होतं…
भविष्याची स्वप्न बघण्यात… मनही चांगलं रमलं होतं…

तिला ठाऊक न्हवत…
आजही कुणीतरी… तिची मनापासून वाट बघत होतं…
शेवटची भेट आहे सांगूनही… पुढल्या भेटीची आस धरून होतं…
त्याचंही आयुष्य पुढे सरकलं… पण त्या क्षणांच्या अवतीभवती फिरत राहिलं…
त्या निरोपाच्या आठवणीने… आजवर डोळ्यांत पाणी दाटत राहिलं…

न चुकता आजही तो… त्याच  जागी तिची वाट पाहतो…
ती लवकर यावी म्हणून… बाप्पाला रोज दुर्वांची जूडी वाहतो…
इतकी वर्षं वाट पाहूनही… त्याचे डोळे अजून थकले नाहीत…
तिच्या वाटेवरचे आठवणींचे सडे… अजूनही सुकले नाहीत…

न राहवून कुणी विचारलंच… 
तोडलेले बंध जोडण्याचा… कशाला व्यर्थ प्रयत्न करशील…?
परत न फिरणाऱ्या पावलांची… आणखी किती दिवस वाट पाहशील…?

त्यावर तो म्हणतो…
ठाऊक होतं मलाही… ती आमची शेवटचीच भेट होती…
पण जाता जाता नेमकी… ती 'येते' म्हणाली होती…
म्हणूनच मी आजही… तिच्या येण्याची वाट पाहतोय… 
आठवणींचे सगळे थेंब… मनाच्या ओंजळीत साठवून ठेवतोय…

- टिंग्याची आई

ठसका…




जेवता जेवता आज अचानक…

त्याला जोरात ठसका लागला…
पाण्याचा घोट घेइतोवर…
जीव कावरा बावरा झाला…

कुणीतरी आठवण काढली असेल…
एकजण सहज म्हणून गेला…
अन त्याची टिंगल उडवायला…
मित्रांना तो ठसका पुरेसा झाला…

डोळ्यातलं पाणी लपवत…
त्याने सहज सगळं सोडून दिलं…
खोलवर दुखलेलं काहीतरी…
मुद्दाम हसण्यावारी नेलं…

'त्या' शेवटच्या भेटीला…
आजच वर्ष झालं होतं…
तिनेच आठवण काढली असणार…
त्याला पक्कं माहिती होतं…

त्याला ठसका लागताच…
ती उगीच चिऊ-काऊ दाखवायची…
अन तो पाणी घेईपर्यंत…
तीच कासावीस व्हायची…

तिचं हसणं, तिचं बोलणं…
त्याच्या आजही लक्षात होतं…
तीही काही विसरली नसणार…
त्याला मनापासून वाटत होतं…

बरीचशी कारणं होती…
तो शेवटचा निर्णय घ्यायला…
पण मन अजून तयार न्हवतं…
तिच्याशिवाय आयुष्य जगायला…

त्या भेटीचा प्रत्येक क्षण…
त्याला जसाच्या तसा आठवत होता…
आयुष्यातला तो एक दिवस…
खोडून टाकावासा वाटत होता…

घासागणिक एक एक आठवण…
त्याने मनात नसताना गिळून टाकली…
मिणमिणती तिची छबी…
फुंकर मारून विझवून टाकली…

आठवण तर रोजच असते…
पण ठसक्याने सगळं ढवळून काढलं…
कळलंच नाही दोघातलं अंतर…
नक्की कमी झालं कि वाढलं…

न जाणो कोणत्या बंधनापायी…
दोघे एकमेकांशिवाय जगतात…
अन असा एखादा ठसका लागताच…
आठवणींचे ढग दोघांच्याही डोळ्यांत दाटतात…

- टिंग्याची आई

Thursday, November 13, 2014

एका जुन्या ठिकाणी…

एका जुन्या ठिकाणी… आज चुकूनच जाणं झालं… 
आठवणींच जुनंच वादळ… पुन्हा एकदा धावून आलं… 
पावला पावलाला एकेक आठवण…  जणू कधीची वाट बघत उभी होती… 
मला परत आलेलं पाहताच… धावत येऊन बिलगत होती… 

सगळं काही जसच्या तसं होतं असंही नाही… 
पण पावलांनी वाट ओळखलीच नाही असंही नाही… 
तो चौक, तो कट्टा, ती चहाची टपरी…
तिथे घालवलेले क्षण… आणि तीच जुनी मी…
सगळेच जणू त्या क्षणाला… जिवंत झाले होते…
flashback मध्ये जाऊन… तेच जुने क्षण पुन्हा अनुभवत होते…
एकटीच होते आज मी… सोबत फक्त आठवणी होत्या…
एकाकी रस्त्यावर… जुन्याच पाऊलखुणा सापडत होत्या…

जास्त वेळ नाही अगदी थोडाच वेळ थांबले…
आठवणीत गुंतलेले श्वास जरा लांबले…
मनात खोलवर दडलेलं काहीतरी… उफाळून वर येऊ पाहत होतं…
सांगायचं राहून गेलेलं… आज ओरडून सांगू बघत होतं…
पण… 
ऐकायला आज तिथं कोणीच न्हवतं…
मागे पडलंय ते पान आता… मन हेच नेमकं विसरलं होतं…
शेवटी त्या जुन्या ठिकाणाचा… 
न राहवून निरोप घेतला…
आठवणींचा पेटारा तिथेच बंद करून…
पुन्हा नव्या जगाचा रस्ता धरला…

- टिंग्याची आई

टमटम...

"टमटम", "सिक्स-सीटर"… आपल्या ओळखीचं एक नाव… अगदी रोजच दिसणारं किंवा वापरावं लागणारं आणि बिलकुल न आवडणारं वाहन…
आता हा काही लिहिण्यासारखा विषय आहे का? असंच म्हणाल तुम्ही… पण तरीही लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं… :)
मी पुण्यात जॉब करते… म्हणजे हिंजवडीत… रोज मी माझ्या गाडीनेच ऑफिसला जाते… २ व्हीलर बर का… ;) गाडी असल्यामुळे दुसऱ्या कोणत्या पब्लिक ट्रान्स्पोर्ट ची गरज सहसा लागत नाही… पण जाता-येता बऱ्याच वाहनांच्या गर्दीतून वाट काढत जावं लागतं… त्या गर्दीतलच एक वाहन म्हणजे ही टमटम… टिपिकल काळ्या-पिवळ्या रंगाची… आमच्यातले बरेचजण टमटमनेच ऑफिसला येतात-जातात… मलाही कधी कधी जावं लागतं… तर आमच्या निरीक्षणाचे अन अनुभवाचे हे बोल…
टमटम… एक काळी-पिवळी गाडी… कळकट्ट रंगाची… अन बऱ्यापैकी खिडक्या दरवाजे गायब असलेली… प्रत्येक गाडी अशी असते जणू सेकंड किंवा थर्ड हँडच मिळते बाजारात, नवीन मिळतच नाही… रंग रुपासारखाच तिचा तो टिपिकल डुग डुग आवाज… अगदी कर्णकर्कश… या गाड्यांना कसलेच नियम नसतात… PUC नावाचा प्रकार तर यांच्या आसपास सुद्धा फिरकत नाही… हवा तितका धूर सोडत त्या खुशाल धावत असतात… स्पीड लिमिट माहीतच नसतं जणू चालवणाऱ्याला… तीन चाकी असूनही तिला कुठेही कसेही कट मारायची पूर्ण मुभा असते… ६०-७० च्या स्पीडमध्ये असतानाही काचकन ब्रेक दाबायची परवानगी असते… आणि हो टमटमला प्रश्न किंवा जाब विचारलेला बिलकुल आवडत नाही… तसं केल्यास दुसऱ्याच दिवशी आपल्या सगळ्या मैत्रीणीना घेऊन ती संपावर जाते… टमटममध्ये किती लोकांनी बसावं यावर कोणतही बंधन नाहीये…. १० तिथे २० माणसं बसली तरी ती तितक्याच वेगाने आणि बेजबाबदार पणे धावते…माझ्यासारखे बरेच २ किंवा ४ चाकी वाले या टमटमला रोज शिव्या घालतात… पण बऱ्याच लोकांसाठी ते एक महत्वाचं प्रवासाचं साधन आहे… रोज हजारो लोकांना हीच टमटम वेळेत ऑफिसला पोचवते आणि घरी संध्याकाळी घरी परत नेते… एखादेवेळी टमटम बंद असेल तर पहा कशी होते या लोकांची अवस्था… कसं बसं मिळेल ते वाहन पकडून अन कधी कधी बसच्या दाराला लटकून त्यांना ऑफिसला पोहचावं लागतं… तेव्हा आपल्यातला कोणी थांबणारा, त्यांना लिफ्ट देणारा गाडीवाला विरळाच… तेव्हा वाटतं अरे यार कशी का असेना पण खरंच असावी टमटम… 
खरंतर बरंच धोकादायक आहे यातून प्रवास करणं… पण जर योग्य काळजी घेतली आणि नियम पाळले तर हीच टमटम खूप मोलाची ठरेल आणि त्यातून प्रवास करायला सगळेच उत्सुक असतील… 
तर अशी ही टमटम… समाजाचं एक महत्वाचं पण दुर्लक्षित अंग… बघू कधी मनावर घेतात लोक आपल्या लाडक्या टमटमला… 
बेस्ट ऑफ लक टमटम… :)
NOTE: टमटम शी माझं कोणतही वैयक्तिक वैर नाही… ;)

- टिंग्याची आई

Tuesday, November 11, 2014

खाटकाचं पोर… पुन्हा…

हि कविता वाचण्याआधी तुम्ही 'खाटकाचं पोर…' हि कविता वाचावी असं मला वाटतं, कारण या कवितेवरून मला 'खाटकाचं पोर… पुन्हा…' हि कविता लिहावीशी वाटली… 

खाटकाचं पोर… पुन्हा…

बाचं घर सोडलं… आज दहा वर्षं झाली…
परतीची वाट… मी आजवर नाहीच पाहिली…
एक वेगळं अन चांगलं… जग शोधायला निघालो होतो…
पण इतक्या वर्षांत… मी स्वतःच कुठेतरी हरवलो होतो…
बकरी मारावी लागली… म्हणून खाटकाचं घर सोडलं…
अन इथे… माणसाचा जीव घेणाऱ्या माणसांना पाहिलं…
'जनावराचा जीव घेणं बरं…' बाचं वाक्य आजही आठवतंय…
त्या अडाणी खाटकाचं म्हणणं… आज मनाला पटतंय…

स्वतःचा स्वार्थ सोडून… इथे लोकांना काहीच दिसत नाही…
माणुसकी नावाचं काही… यांच्या गणितातच बसत नाही…
पैसा असो वा सत्ता… प्रत्येकाला कशाची ना कशाची हाव आहे…
पायाखाली माणसं चिरडणाराच… इथे रयतेचा राव आहे…
न्यायदेवताही डोळ्यावर पट्टी… सत्य दिसू नये म्हणूनच बांधते…
गुन्हेगाराच्या हातातलं… ती रोजंच बोलकं बाहुलं बनते…
गरिबाला जगण्यासाठी… ह्यांचेच पाय धरावे लागतात…
पोटाची खळगी भरायला… कधी कधी स्वतःचेच लचके तोडावे लागतात…
रक्तबंबाळ झालेली मनं… मी जेव्हा पावलोपावली बघतो…
हि माणसंच आहेत ना नक्की…? असा प्रश्न जीवाला पडतो…

एकटं राहून खूप शिकलो… पण या दुनियेची रीत मला जमली नाही…
दुसऱ्याच्या मुखातला घास घ्यायची… माझी हिम्मतच कधी झाली नाही…
पटलंय आता मनाला… हे जग आपल्यासाठी नाही…
माणसं मारून जगायला… या खाटकाच्या पोराला जमणे नाही…
म्हणूनच… 
खूप सोसलं रणरणत ऊन… आता मायेच्या सावलीत चाललंय…
घराबाहेर पडलेलं खाटकाचं पोर… आज पुन्हा घराकडे निघालंय… 

- टिंग्याची आई

Monday, November 3, 2014

खिडकीतला पाऊस...

विहान… मधुरा मावशीचं छोटुसं पिल्लू… सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून रोज पावसाशी खेळत असतो… त्याला असं खेळताना बघूनच सुचलेलं हे काहीतरी…. 
खास मधुरा साठी तिच्या पिल्लू कडून… :)
खिडकीतला पाऊस... तू कधी पाहिलाएस का ग आई...?
हल्ली रोज येतो मला भेटायला... पण आजी त्याला आतच घेत नाही...
आणखी किती रे पडशील...?? म्हणत सारखी त्याला ओरडते...
जर मोठा पाऊस आला... कि लग्गेच खिडकी लावून घेते...
तूच समजाव तिला... खिडकीतला पाऊस मला आवडतो...
त्याच्या सरींशी अन थेंबांशी... मी रोज गप्पा मारतो...

आपले आबा म्हणतात... पाऊस ढगातून येतो...
ब्रीज खालच्या नदीला... तोच पाणी आणून देतो... 
एवढ्या उंचावरून उड्या मारतो... मग त्याला लागत कसं ग नाही...?
पकडायला पाहिलं हातात... पण तो सापडतच नाही... 

दुपारी आजी झोपल्यावर... मी हळूच खिडकी उघडतो... 
अन खिडकीतल्या पावसाशी... मस्त मस्त खेळतो... 
हात लांब करून थेंब झेलायला... खूप खूप मज्जा येते... 
अन पावसात अस भिजल्यावर... मला कुड कुड थंडी वाजते... :) 
तू नि बाबा ऑफिसला जाता... अन मी घरी बोर व्हायचं... 
त्याच त्या खेळण्यांसोबत... किती दिवस खेळायचं...?
कुणीच नसतं ग खेळायला... खूप एकटं एकटं वाटतं... 
म्हणून तुझं लाडकं पिल्लू... पावसाच्या थेंबांशी खेळतं... 
ये रे ये रे पावसा म्हटलं... कि तो लग्गेच धावत येतो... 
अन मला झोप आली... कि पटकन निघून सुद्धा जातो...

बाबासारख घरी यायला... तो कध्धीच उशीर करत नाही... 
मला हवं तेव्हा खेळतो...  कधीच नाही म्हणत नाही...
तुझ्यासारखं सोडून मला... तो कुठेसुद्धा जात नाही... 
लग्गेच परत येतो रे... असं खोटं सुद्धा बोलत नाही... 
सगळं ऐकतो माझं... म्हणून तो खूप आवडतो मला...
तुझी दुपारी आठवण आलीच... तर हा पाऊसच हसवतो मला... 

आई... पुरे झालं घर आता... मला तू शाळेत घाल... 
रोज संध्याकाळी पावसात भिजत... तूच मला घरी आण...
मग रोज शाळेत येत-जाता... मी या पावसाला भेटेन...
खिडकीतून सापडत नाही... पण बाहेर दोन्ही हातांनी घट्ट धरेन... 

असा आहे बघ फ्रेंड माझा... आपल्या 'खिडकीतला पाऊस'... 
घेशील उद्या सुट्टी...? मग दोघे मिळून एन्जॉय करू हा 'खिडकीतला पाऊस'…... :)
- टिंग्याची आई