Tuesday, May 14, 2013

एक नाजूक कळी…


एक नाजूक कळी…
बालपणाच्या ऊबदार कुशीतून…
नुकतीच बाहेर पडत होती…
एक निरागस बाहुली…
आत्ता कुठे हसायला लागली होती…

गोड गुलाबी स्वप्नांच्या गर्दीत…
रोजची पहाट जागी होत होती…
पाकळी पाकळी बाजूला सारत…
ती उमलायचा प्रयत्न करत होती…

खुलली न्हवती अजून तोवर…
त्या नाजूक कळीला चिरडलं गेलं…
एका विकृतीच्या निर्दयी पायाखाली…
बिचारीचं अस्तित्वच तुडवलं गेलं….

अवघ्या दोन क्षणांच्या पाशवी आनंदासाठी… 
इतकं भयंकर कृत्य का करावं…?
माणूसपण पुरून उरलेत… 
त्यांना माणूस तरी कसं म्हणावं…?

नराधम हा शब्द सुद्धा… 
त्यांच्यासाठी पुरत नाही… 
एक निष्पाप फुल कुस्करताना… 
ज्यांना थोडीसुद्धा लाज वाटली नाही… 

कुठल्या दरी न्याय मागवा… 
तिने अब्रूची लक्तरं सांभाळत… 
चौका चौकातल्या चर्चेतून… 
पुन्हा पुन्हा होणार्या बलात्काराला तोंड देत… :'(

पण… 
फक्त या एका प्रसंगाने… 
ती खरंच कलंकित होईल का…?
तिच्या सगळ्या स्वप्नांना… 
तिलांजली दिली जाईल का…?

भेदरलेल्या त्या जीवाला… 
आपणच जवळ घ्यायला हवं… 
अन त्या राक्षसांना… 
सरळ फासावर द्यायला हवं… 

आपलीच मदत हवीये… 
तिचं अस्तित्व नव्याने फुलवायला… 
आपलाच आधार हवाय… 
तिला पुन्हा एकदा उभं रहायला… 

त्या काळोखातून बाहेर पडून… 
तिला एक हसरी पहाट दिसेल…. 
कोमेजलेली ती कळी… 
कदाचित पुन्हा एकदा नव्याने फुलेल…. 
जेव्हा तिला आपली साथ लाभेल…. :)

- शिल्पा 

Wednesday, May 8, 2013

टिंग्याचे बाबा…


असं काय रे बाबा…
सारखं कित्ती काम काम करतोस…
दिवसभर ऑफिसमध्ये…
आणि घरी आल्यावर अभ्यास करत बसतोस….

कामाशिवाय दुसर काहीच…
तुला सुचत कसं बर नाही…?
दिवसभर एवढा दमून येतोस…
मग माझ्याशी खेळत सुद्धा नाहीस… :(

ढिश्शुम ढिश्शुम वाले पिक्चर…
तुला कसे बरे आवडतात…?
WWE मह्डले सगळे फायटर्स…
सगळं तुझंच कसं काय ऐकतात…? (बाबाने आधीच नेट वर result पाहिलेले असतात ;)

तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं…
आता मला तोंड पाठ झालीआहेत …
तुला द्यायची कोणती आणि बाकीच्यांची कोणती…
मी अगदी बरोबर लक्षात ठेवली आहेत…. :P

बाबा… मला खरच खूप भीती वाटते…
जेव्हा तू माझ्यावर रागवतोस…
आणि खूप खूप मज्जा येते…
जेव्हा माझ्यासोबत आईला मम्माई म्हणतोस…

बाबा… एक दिवस माझ्यासाठी सुट्टी घे ना… 
मग आपण दिवसभर मस्त खेळूया… 
आईच्या सगळ्या कविता…. 
आपण दोघे मिळून वाचूया…. 

दिवसभर आपल्या T.V. वर… 
छोटा भीम आणि Tom & Jerry बघूया… 
LapPop वर गाणी लावून… 
मस्त चिंता ता ता करूया… :) आमचं Favorite Song…

संध्याकाळी फक्त आपण दोघेच… 
रिक्षातून बागेत खेळायला जाऊ… 
परत येताना बाप्पाच्या इथे… 
छान छान पाणीपुरी खाऊ… 

चिनू दादा आणि काका-काकीलाही… 
त्या दिवशी बोलवायचं का?
ऑफिसमुळे तू मिस केलेला माझा Happy BDay… 
आपण पुन्हा Celebrate करायचा का…?

मग सांग बाबा… कधी सुट्टी घेणार…?
तुझ्या लाडक्या पोप्यासाठी… तुझा किती वेळ देणार…?
promise कर आधी…. आता आज्जीबात विसरायचं नाही…

विसरलास तर कट्टी… पुन्हा कध्धी कध्धी कडेवर चढणार नाही… :P 

- टिंग्या (ची आई)

Friday, May 3, 2013

अर्ध्यावर सोडून मला…


सखे अर्ध्यावर सोडून मला… त्या भिंतीवरच्या फोटोत जाऊन बसलीस…. 
आजवर सांभाळलंस… अन अचानक निराधार करून गेलीस… 
आता पापणीही न लवता…. अखंड आपल्या घराकडे पाहत असतेस… 
आजही इथल्या कणा कणात… फक्त तूच जाणवतेस… 

त्या फोटोतल्या खांद्यावर डोकं ठेऊन… मला आता रडता येत नाही…. 
धावत येउन तुला… घट्ट मिठी मारताही येत नाही… 
पण मी समोर आल्यावर… तुझा हसरा चेहरा अनुभवता येतो… 
तू पाहत असशील नक्कीच… म्हणून मीही माझी आसव लपवतो… 

तुझ्या त्या निरागस चेहऱ्याला आता… कुरवाळता येत नाही… 
तुझ्या कुशीत शिरून दोन क्षण…  मला विसावताही येत नाही… 
किती खोल पाहिलं तरी… त्या डोळ्यांत फक्त मीच दिसतोय… 
हरवलेलं माझं मन… तुझ्या पर्यंत पोचेल का ते पाहतोय… 

तुझ्या काळ्याभोर केसांत हात फिरवत… आता रात्र घालवता येत नाही… 
स्वप्नात येउन भेटतेस रोजच… म्हणून मी जागा सुद्धा राहत नाही… 
पहाटेची तुझी गोड हाकच… मला आजही जाग आणते… 
पूर्वी तासनतास न जाणारी झोप… हल्ली क्षणात नाहीशी होते…. 

डोळ्यात साठलेलं सगळं पाणी… हल्ली बाप्पासमोरच कोसळतं… 
न चुकता रोज माझी… त्याच्या देवळापर्यंत सोबत करतं… 
तुझा फोटो आणि बाप्पा… आता दोघांसमोर हात आपोआप जुळतात… 
जबाबदारीच्या सगळ्या गोष्टी… तुझ्या या वेड्याला अगदी व्यवस्थित कळतात…. 

जमलच तर परत ये… बघ मी कसं सावरलंय आपलं घर… 
तुझ्याविना अर्धवट या आयुष्याला… फक्त एकदाच येउन पूर्ण कर… 
मागणार नाही कधीच काही… तुझ्या लाडक्या बाप्पाकडे… 
सांगून बघ… घेतोय का…? मला कायमचं बोलवून तुझ्याकडे…. प्लीज… :(

- शिल्पा