Tuesday, November 26, 2013

साखरपुडा ते लग्न…

प्रिय शरी आणि प्रभा….
Congratulations… लग्न ठरलंय ना तुमचं… :) शरीच्या आईंनी कळवलं होतं मला पण तुमच्या साखरपुड्याला यायला काही जमलं नाही… टिंग्याची शाळा आणि माझं ऑफिस दोन्हीकडे सुट्टीचा नेहमीचा प्रॉब्लेम… असो… तुमच्या लग्नाला अजून २ महिने अवकाश आहे असं कळलं…. त्यामुळे आम्ही आधीच सुट्टी काढून तयार आहोत…. आम्ही येतोय… :)
साखरपुडा ते लग्न… खरंच खूप महत्वाचा आणि गोजिरवाणा काळ असतो हा… लव-मेरेज असो वा अरेंज दोन्हीच्या बाबतीत हा मधला काळ अगदी वेगळा आणि सुखद असतो… अवघ्या एका कांदेपोह्याच्या कार्यक्रमात निवडलेल्या आपल्या जोडीदाराला ओळखून, जाणून घेण्याचा हा काळ तर हेच Love Marriage मध्ये म्हणाल तर आपण आधीच ओळखत असलेल्या आपल्या माणसाला नव्याने ओळखण्याची एक संधी…. एकमेकांना केले जाणारे अगणित फोन कॉल्स… रात्र-रात्रभर मारलेल्या गप्पा… रंकाळ्यावर बसून घालवलेली एखादी किंवा अनेक रम्य संध्याकाळ… I hope तुमचं हे सगळं सुरूच असणार आहे… ;)
छान एन्जॉय करा… हीच वेळ आहे तुमच्या या नव्या नात्याला छान रुजवण्याची आणि गोंजारायची…. या नवख्या प्रेमाचा आनंद घेता घेता अनेक जबाब्दार्यांचीही जाणीव अपोआपच होईल तुम्हाला आणि एकमेकांना साथ देत त्या पार पडायलाही तुम्ही मागे हटणार नाही याची खात्री आहे आम्हाला… :)
           एखादं बी कसं पेरलंय यावर अवलंबून असतं तो अंकुर कसा उमलेल किंवा अगदीच उमलेल कि नाही… ते किती खोलवर ठेवलं गेलंय… कडेची माती किती हळुवार दाबलीये…. माती किती भुसभुशीत केलीये… आळ कसं छान बांधलय… यावरच सगळं निभावलेलं असतं… तुमच्याही नात्याचं बीज तुम्ही आत्ता पेरताय… सगळ्या गोष्टींची अगदी नितांत काळजी घ्या… हा अंकुराचच पुढे एका वटवृक्षात रुपांतर होईल… आणि त्याच्याच सावलीत आयुष्याची गोड संध्याकाळ तुम्हाला अनुभवायची आहे… 
         साखरपुडा ते लग्न हि वेळ असते एकमेकांना समजवून घ्यायची… एकमेकांना ओळखायची… कधी एखादी गोष्ट न सांगता समजते… कधी नकळत आवडी निवडी कळतात त्या याच काळात मारलेल्या गप्पांमध्ये… कधी उगीचंच काहीतरी बोलून किंवा करून त्याला राग कधी आणि किती लवकर येतो हे पहावं… तर कधी एखाद्या छोट्या मुलासारखं हट्ट करून पहावं आणि दुसर्याने तो हौसेने पूर्णही करावा… कधी त्याच्या काळजीने तिने हळवं व्हावं तर त्यानला तिचं हे प्रेम पाहून स्वतःचाच हेवा वाटावा… सगळीच गणितं नव्याने मांडली जातात आणि चक्क सगळ्यांची उत्तरही सापडतात आणि तीही अगदी बरोबर… :) ती व्यक्ती आपलं आयुष्य बदलून टाकते अन तिच्यामुळेच प्रेमाची रोज एक नवी परिभाषा कळत राहते….

         प्रेम जडतं ते "आपल्या माणसावर" आणि आपण अपोआप प्रेम करायला शिकतो ते त्याला जोडून आयुष्यात आलेल्या "आपल्या माणसांवर"…. या आपल्या माणसांना जाणून घेण्याची हीच वेळ असते… आपल्या जोडीदाराच्या नजरेतून… जे घर आपलं होणार आहे त्या घरातल्या माणसांना जाणून घ्यावं… दोघांनीही…. सासूबाई, सासरेबुवा, नणंद, दीर, भावजय… सगळ्यांनी प्रेमाने तुमचं स्वागत केलंय त्या प्रेमाची परतफेड तुमच्या प्रेमानेच होईल… तुमच्या सप्तपदीची खरी सुरुवात इथूनच आहे… प्रत्येक पाऊल एकमेकांच्या आधाराने टाकत रहा… आणि आयुष्यातल्या प्रत्येक लढ्यात विश्वासाने एकमेकांची साथ द्या… 
         आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तुम्हाला या नात्याला जपायचंय … एकमेकांना जपायचंय… येतील अनेक वादळ… त्यातही एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवायचाय… सुख-दुःखाचा प्रत्येक क्षण समाधानाने ओंजळीत घ्यायचाय… या नात्यातला प्रत्येक शब्द आयुष्यभर जगायचाय… 
काळजी घ्या दोघेही… छान एन्जोय करा हे गोल्डन डेज… :)
बाकी सगळ निवांत… तुमच्या लग्नात भेटूच आपण… 
कळावे…. 

- टिंग्याची आई

Wednesday, November 20, 2013

देव रिटायर होतोय….

"सचिन रमेश तेंडूलकर…"
नुसतं हे नाव लिहून जरी पोस्ट टाकली असती तरी चाललं असतं असंच काहीसं सचिनचं वर्चस्व आणि प्रभाव आहे… आज हि पोस्ट इथे टाकताना मला आणि माझ्या ब्लॉगला धन्य झाल्यासारखं वाटतंय… :)
पोस्ट टायटल वाचताच समजलं असेल तुम्हाला कि कोणाविषयी लिहिलंय… खरतर सचिनविषयी लिहावं इतकी माझी लेखणी मोठी झालेली नाहीये पण तरीही हा एक छोटासा प्रयत्न सचिन काय आहे हे स्वतःलाच पुन्हा एकदा अभिमानाने सांगण्याचा… :)
"सचिन" नुसतं नाव घेतलं तरी छाती अभिमानाने फुलून येते आणि डोळे आदराने झुकतात… मी क्रिकेटची Die-Hard fan नसले तरी मी सचिनची fan नक्कीच आहे… क्रिकेट म्हणजे सचिन खेळतोय आणि शॉट वर शॉट मारतोय हीच काय ती आमची लहानपणापासून क्रिकेटची व्याख्या… गल्लीत मुलं क्रिकेट खेळायची तेव्हा आमचा रोल जास्तीत जास्त फिल्डरचा तोही Boundary पार जाणारा बॉल अडवायला… आम्हाला आयुष्यात कधी एखादा कॅच जमला नाही कधी चौकार जाणारा बॉल अडवायला जमलं नाही मग मुलं बोलिंग करून द्यायचा तर चान्सच नाही… त्या पोरखेळातूनच सचिनच्या गुगली शी आमचा परिचय झाला…. कधी चुकून अंधळा शॉट लागला आणि कोणाची बोल्ड उडालीच तर सचिनची गुगली तात्पुरती आमच्या नावावर रजिस्टर… :) हा कदाचित आपल्या सगळ्यांचाच अनुभव असावा… :)
C for Cricket आणि S for Sachin हे गणित कायमचं ठरलेलं… एकमेकांना पूरक अशी हि विधाने जणू एखाद्या प्रमेयाची सिद्धता… (ही गणिताची भाषाच मेली अवघड… ;)
 पण आता या गणितातून सचिन वजा झाला तर काय होणार? क्रिकेटच्या Equation ची दुसरी बाजू अशी अधांतरी राहून कशी चालेल…? मग आमचा क्रिकेटचा देव रिटायर होऊन कसं बर चालेल? पण सचिनने निर्णय घेतला….  आणि आमचा देव रिटायर होतोय…………
आता सचिन नाही तर सगळीच समीकरणं बदलतील… आता इंडियाची batting चालू असताना लोक ऑफिसमध्ये चक्क काम करतील… सकाळी batting पाहायला अर्ध्या दिवसाच्या सुट्ट्या टाकल्या जाणार नाहीत… सचिनने किती केल्या? हा प्रश्न विचारला जाणार नाही… सचिनची Century व्हावी म्हणून उपास-तापास केले जाणार नाहीत… तो बरा होऊन खेळायला लवकर परत यावा म्हणून बाप्पाला कोणीही पाण्यात ठेवणार नाही… सचिन खेळतोय म्हणून गल्ल्या, रस्ते सुनसान दिसणार नाहीत… एखाद्या छोट्याशा दुकानातला छोटासा TV असो नाहीतर CCD मधला LCD असो… सचिनची batting पहायला त्यांच्यासमोर गर्दी होणार नाही…. दुसऱ्या टीमचे प्लेयर्स Batsman खेळायला आल्यावर आनंदाने स्वागत  करणार नाहीत…. एखाद्या Batsman चा कॅच घेतल्यावर फिल्डारला इतकं वाईट कधीच वाटणार नाही… Winning match नंतर परत जाताना असा Guard Of Honor कोणालाही दिला जाणार नाही…. आणि कोणाच्याही स्पीच नंतर बघणाऱ्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत असं पाणी येणार नाही… ही सगळी समीकरणं पुन्हा बरोबर होतील ती फक्त सचिनमुळेच आणि सचिनसाठीच….
Needless to say… Yes…. Hats Off To You Dear Sachin…….
नुसताच खेळला असता तर कदाचित एवढा मोठा झाला नसता… कारण नुसतं खेळ खेळ खेळून माणूस मोठा खेळाडू होईल पण "मोठा माणूस" होत नाही… लहानपणापासून त्याने जसा आपल्यातला खेळाडू जपला त्याच चिकाटीने आणि जिद्दीने स्वतामाध्ला "माणूस" त्याने जपला…. हेच एकमेव कारण आहे ज्यामुळे आज तो आपल्या प्रत्येकाच्या घरातला हिरा आणि हिरो बनला आहे… आयुष्यात कधीही त्याने shortcut घेतला नाही… अगदी स्वच्छ चारित्र्याने जितक्या निरागसपणे त्याने या खेळात पदार्पण केलं त्याचं निरागसपणे तो आज रिटायर होतोय…. पण त्याच्यावर टीका झाल्याच नाहीत असंही नाही….
खुद्द श्रीरामावर लोकांनी टीका केल्या तिथे सचिनला कोणी कसं बर सोडेल? त्याच्यावर जमेल तेव्हा तेव्हा टीका झाल्या आणि दर वेळी त्याने आपल्या खेळातूनच योग्य ते उत्तर दिलं… तो खेळला ते खेळासाठी, आपल्या टीमसाठी आणि आपल्या देशासाठी…. I wish कि सचिन असाच खेळत रहावा lifetime… ;)
तो शेवटचा कसोटी सामना… आम्हीही पाहिला, तेही ऑफिसमध्ये allowed नसताना…. कसोटी सामन्याला खचाखच भरलेलं स्टेडियम आणि सचिनसाठीचा जल्लोष…. ह्या match मध्ये पहिल्यांदाच आपला प्लेयर आउट झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या कारण त्यांचा लाडका सचिन येणार म्हणून…. आणि तो आउट होणाराही आनंदाने pavilion मध्ये परतला… सगळंच अप्रतिम… झालंय का बर याआधी असं काही?
त्याच्या आगमनावेळी WI टीमने केलेलं त्याचं स्वागत आणि त्याच्या प्रत्येक स्ट्रोकला प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद…. सगळं कसं सोन्यासारखं, अगदी दृष्ट लागावी असंच…. शेवटच्या सामन्याचं आणि चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं सगळं व्यवस्थित सांभाळत तो खेळला…
हा हा म्हणता ७४ धावा केल्या…. अन तो शेवटचा बॉल ज्यावर Sammy ने कॅच घेतला आणि सचिन आउट झाला… :( आमच्या देवाचा एक अवतार संपला… Sammy सुद्धा हा कॅच Celebrate करू शकला नाही… Out होताच देवाने Pavilion चा रस्ता धरला…. तो आउट झाल्याचं डोंगराएवढं दुखं प्रत्येकालाच होतं… पण आज हे दुखं, तो आउट झाल्याचं न्हवतं… त्याचं शतक झालं नाही म्हणून पण न्हवत…. हे दुखं होतं क्रिकेटचा देव आपल्याला पुन्हा खेळताना दिसणार नाही याचं…देवाचं हे batting साठी सज्ज असलेलं रूप पुन्हा कोणत्याही मैदानावर उतरणार नाही याचं… त्याच्या bat चा चमत्कार पुन्हा बघायला किंवा ऐकायला मिळणार नाही याचं… एक एक पाऊल टाकत तो निघाला होता…. भरल्या डोळ्यांनी आणि जड पावलांनी… आज म्हणावसं वाटत होतं… "सचिन थांब… नको रे जाऊ आम्हाला आणि क्रिकेट ला सोडून…." वाटत होतं अम्पायरने निर्णय बदलावा आणि काहीतरी चमत्कार होऊन देवाने पुन्हा खेळावं… पण छे…!!!

match पुढे खेळली गेली… सचिन पुन्हा मैदानावर दिसला खरा पण त्याच्या Bat शिवाय… आपण match जिंकलो… झालं… आता फक्त प्रतीक्षा होती ती त्याच्या बोलण्याची… काय बोलणार कसा बोलणार कोणालाच ठाऊक न्हवतं… पण कान तरसले होते त्याचे शब्द ऐकायला…. त्यानेही तसंच साजेसं स्पीच दिलं…. कोणालाही विसरला नाही…. त्याच्या प्रत्येक वाक्याला पडणाऱ्या टाळ्या एवढंच म्हणत होत्या… "तू जाऊ नकोस…"
त्याचा शब्द न शब्द प्रत्येक चाहत्याच्या काळजाला भिडला… आणि हसत-रडत आणि आम्हाला रडवत सचिनने क्रिकेटला निरोप दिला… त्याच्यासोबत डायरेक्ट क्रिकेटला निरोप देणारेही पाहिलेत मी… काय म्हणावं बर या प्रेमाला…!!! खरंच आज देव रिटायर होताना माझ्याही डोळ्यांत आपसूक पाणी आलंय…
खर सांगू…? किती लिहू आणि किती नाही असं झालय… थांबायची इच्छा नाहीये पण थांबलं तर पाहिजेच… म्हणून शेवटी इतकंच म्हणावसं वाटतंय….
झाले बहु…  होतील बहु… परी या सम हाच…!!!

माझी हि छोटीशी शब्दांजली त्या देवाच्या चरणी मनापासून अर्पण…
काही चूक-भूल झाली असल्यास क्षमस्व…
- टिंग्याची आई
And to complete the post... The best of his sentences....
"I left my 24 yrs in 22 yards pitch "

सचिन बद्दल बऱ्याच दिग्गजांनी म्हटलेली काही निवडक वाक्य इथे शेयर करतेय…

Peter Roebuck 
"On a train from Shimla to Delhi, there was a halt in one of the stations. The train stopped by for few minutes as usual. Sachin was nearing century, batting on 98. The passengers, railway officials, everyone on the train waited for Sachin to complete the century. This Genius can stop time in India!!"
Dennis Lillee
If I've to bowl to Sachin, I'll bowl with my helmet on. He hits the ball so hard.

Glenn McGrath
I still think Tendulkar is the best batsmen in the world ahead of Steve Waugh and Lara.

Brian Lara
Sachin is a genius. I'm a mere mortal.

The best one is here... :)
Mathew Hayden:
"I have seen God, he bats at no. 4 for India"

Thursday, November 14, 2013

बोगनवेलीची ही फुलं…

एक मित्र आणि त्याची मैत्रीण… हल्ली दोघेही खूप Busy झालेत आपापल्या ऑफिस आणि संसारात…. भेटणं तर दूरच पण हल्ली कॉल सुद्धा होत नाहीत… आज मैत्रिणीने ठरवलं भेटायचं… म्हणून त्याच्या डेस्कलाच गेली डायरेक्ट…. त्याला यायला नेमका उशीर झाला आणि तिला उशीर झाला होता म्हणून तीही निघून गेली वाट पाहून… जाता जाता मग त्याच्यासाठी आणलेली बोगनवेलीची फुलं ठेऊन गेली…. 
भेट झाली नाही पण आठवणी पुन्हा जाग्या झाल्या… म्हणूनच 'बोगनवेलीची ही फुलं' त्या दोघांसाठी… :)
बोगनवेलीची ही फुलं… तू आली होतीस हे सांगून गेली…
भेटली नाहीस तरी… तुझा आभास देऊन गेली…
अग रोज लवकर येतो… पण आज नेमका उशीर झाला…
आपल्या भेटीचा आणखी एक क्षण… माझ्या हातून मिस झाला…
थोडा जरी अंदाज असता… तर पहाटेच आलो असतो…
और मेरा बस चलता… तर रात्री घरी सुद्धा गेलो नसतो… ;)
तू येणार नाही ठाऊक असूनही… रोज तुझी वाट पाहतो…
आज कधी न्हवे ते आलीस… आणि मीच इथे न्हवतो…
मी उद्या येईन इकडे… एकदातरी म्हणायचं होतंस…
पुन्हा भेटायचं गेल्यावेळच प्रॉमिस… निदान आत्ता तरी पूर्ण करायचं होतंस… :P 

असो… 
बराच वेळ थांबली असशील ना…  माझी वाट बघत…
सगळ्या आठवणी नाचल्या असतील… तुझ्या भोवती फेर धरत…
इतका वेळ एकटी बसून… चिडली असशील माझ्यावर…
आला असेल मोठाला राग… तुझ्या एवढूशा नाकावर…
अथ पासून इति पर्यंत… सगळं आठवत बसली असशील…
अन निघताना रागारागाने… चार शिव्या पण घातल्या असशील…  ;)
बर झालं निदान… ही फुलं तरी ठेवलीस…
जाता जाता तुझा आभास… या फुलांमध्ये सोडून गेलीस…
कळलचं नसतं नाहीतर मला… तू येउन गेल्याचं…
जुन्या आठवणींच्या तारा… माझ्या नकळत छेडून गेल्याचं…
ठेवेन जपून हीच फुलं… आपल्या पुढल्या भेटीपर्यंत…
नाही भेटलीस पुन्हा तरी… तू परत इथे येईपर्यंत…
सुकून जातील पाकळ्या कदाचित… पण आठवणी ताज्याच राहतील…
त्या आधीच आलीस चुकून… तर पुन्हा दोघांभोवती फेर धरतील…
ठाऊक आहे ग येशील नक्कीच… तोवर तुझी वाट बघेन…
बोगनवेलीची हीच फुलं… आपल्या मैत्रीची आणखी एक आठवण म्हणून… मनापासून जपून ठेवेन…. 

येशील पुन्हा… :)

- टिंग्याची आई

Tuesday, November 12, 2013

एक दिवस रागाचा…

सकाळी सकाळीच आज… दोघांचं काहीतरी बिनसलं होतं…  
काही झालं तरी बोलायचं नाही… दोघांनी त्याच वेळी ठरवलं होतं…
गुपचूप पणे दोघांनीही… आपापली कामं आवरून घेतली…
कधी न्हवे ते आज… तिचीही सगळी कामं अगदी वेळेत आवरली…
रोजचीच त्याची होती सवय… पण आज किल्ली विसरला नाही…
तीही मग गाडीवर बसताना… ओड्नी सावरायला विसरली नाही… :)
रोजच्याच फास्ट स्पीडने… त्याने आजही गाडी चालवली…
घाबरली होती नेहमीसारखी… पण एकदाही त्याला हळू चालव नाही म्हणाली…
तिला ऑफिसच्या दारात सोडून… तो तसाच पुढे निघून गेला…
आज चक्क गप्पा न मारता तिनेही… त्याला नुसताच Bye केला…
न्हवतंच लक्ष दोघांचंही… ऑफिसच्या कुठल्याही कामात…
दोघांचा डबाही घ्यायचा विसरली होती… ती रागाच्या भरात…
रोजचे दिवसभरात १० calls… पण आज कुणीच call केला नाही…
एकमेकांच्या Call ची… साधी वाट सुद्धा पाहिली नाही…
मैत्रिणीसोबत तिचा दिवस… वरवर तरी मजेत गेला…
काहीही न घडल्यासारखा तोही… मित्रांच्यात नेहमीसारखा मिसळला…
क्षणाक्षणाला दोघांचाही राग… कणाकणाने वाढत होता…
त्याच्या मते ती 'हट्टी'… आणि तिच्या नजरेत तोच चुकीचा होता…
संध्याकाळी निघताना… तिने फक्त मिसकॉल दिला…
नेहमीसारखा लेट न होता… तोही अगदी वेळेवर पोहोचला…
परतीचा प्रवासही आज… एकही शब्द न बोलता झाला…
लग्नानंतर प्रथमच… त्यांचा दिवस असा अबोल्यात गेला…
मग कामाच्या नावाखाली… त्याने laptop मध्ये तोंड खुपसलं…
आणि तिला busy व्हायला… स्वयंपाकाच कारण सापडलं…
रागारागात तिने… जमेल तेवढेच जेवण करून ठेवले…
रोजच्यापेक्षा थोडं लवकरच… आज दोघे जेवायला बसले…
न मागताच सगळं काही… ती त्याच्या पुढयात देत होती…
अन त्याची नजर मात्र… TV वर Match पाहण्यात गुंतली होती…
जेवता जेवता अचानक… त्याला जोरात ठसका लागला…
राग बीग सगळा तिचा… क्षणात कुठल्या कुठे पळाला…
काय करावं काय नको… काहीच सुचेनासं झालं तिला…
राहिला होता घ्यायचा नेमका… दोघांचाही पाण्याचा पेला…
रुसवा फुगवा सगळं विसरून… ती त्याच्या जवळ गेली…
पाणी देऊ कि आणखी काही… भरल्या डोळ्यांनी विचारू लागली…
तिचा केविलवाणा चेहरा पाहून… त्याचा ठसका आपोआप शांत झाला…
उरला सुरला रागही… तो तिच्यासाठी विसरून गेला…
न राहवून अलगद… ती त्याला जाऊन बिलगली…
सकाळपासून हरवलेली त्याची सखी… पुन्हा त्याच्या कुशीत परतली…
हसू येत होत त्याचं त्यालाच… तिच्या केसांत हात फिरवत म्हणाला…
अग वेडे क्षणभर तरी सांभाळायचं होतंस तुझ्या खोट्या रागाला…
त्याला लागलेल्या एका ठसक्याने… सगळं चित्र क्षणात पालटलं…
नवरा-बायकोच्या नात्यातलं निरागस प्रेम… त्या दोघांना आज नव्याने जाणवलं…
परत नाही करायचा असा वेडेपणा… दोघांनीही पक्कं प्रॉमिस केलंय…
तिची अखंड बडबड आणि त्याचं न कंटाळता ऐकून घेणं… आता पुन्हा एकदा सुरु झालंय…
-टिंग्याची आई

Thursday, November 7, 2013

काकीचा बडे… ३ नोव्हेंबर....

टिंग्याची आई त्याच्या लाडक्या काकीचा बडे विसरली…. २ दिवसांनी लक्षात आल्यावर विष करावं म्हटलं तर आमची काकी रागवली आमच्यावर…. आपल्या रुसलेल्या काकीला मनवताना टिंग्या म्हणतोय…. 

I am really Sorry काकी….
आई तुझा बडे विसरली….
लावून दे म्हटलं होतं मला फोन….
पण कामाच्या नादात ते सुद्धा विसरून गेली…. 

अग आदल्या दिवशी पर्यंत….
मलाच आठवण करून देत होती….
आमच्या मेघा काकीचा बडे आहे….
म्हणून सगळ्यांना सांगत होती….

एवढं लक्षात ठेवूनसुद्धा….
कशीकाय विसरली कोणास ठाऊक….?
वेड्यासारखी वागते बघ अशी….
माझ्याविना हिचं कसं होईल बाप्पालाच ठाऊक… :)

विसरली ते विसरली….
अन विचार करत बसली….
नुसतंच कसं म्हणायचं Sorry….
म्हणून ही कविता लिहायला घेतली…. (म्हणजे अजून २ दिवस उशीर :)


आजी-आजोबा, काका-मामा….
अगदी सगळ्यांचे बडे लक्षात ठेवते….
तिचा कोणी करो ना करो….
पण सर्वांचे बडे छान सेलिब्रेट करते….

यावेळी आईला माफ करून….
तिच्या बडे विशेस Accept कर ना ग….
तिच्याकडून मोठ्ठी Cad-bury घेऊ आपण….
आता तरी थोडीशी हस ना ग….

काकी… 
घड्याळाचे काटे उलटे फिरवून….
पुन्हा मागे जाऊयात का….?
एकदाच Reverse Gear टाकून….
तुझा बडे सेलिब्रेट करूयात का….? :)

Promise करतो काकी… 
next time मी नक्की विश करेन….
आई-बाबा सगळ्यांच्या आधी….
मीच तुझ्या बडे ला पहिला फोन करेन….

करशील ना ग एकदा माफ….
तुझ्या लाडक्या टिंग्याच्या आईला….?
मीच तिला आठवण करून देत जाईन….
तुझ्या येणाऱ्या प्रत्येक बडेला…. 

Belated Happy B'day Megha Kaki.... :)

- टिंग्याची आई

Wednesday, November 6, 2013

बाप होताना…

       आई होणं हा जगातला स्वर्गीय अनुभव आहे असं बऱ्याच जणांनी म्हटलंय……… पण बाप होणंही तितकंच सुखद आणि स्वर्गीय असतं नाही का ? 
       ज्या दिवशी पिल्लाच्या येण्याची चाहूल लागते अगदी तेह्वा पासूनच तो पिलुच्या स्वागताच्या तयारीला लागतो……. आईची सगळेच काळजी घेतात……. काय हवं…काय नको …असं कर… असं  करू नको सगळे Instructions  देतात आणि वर बाबालाही ताकीद …. "काळजी घे बरं का हिची…… अजिबात त्रास देऊ नकोस हं"…. :) त्या सगळ्या Instructions लक्षात ठेवणारा बाबाच असतो ……. आईचं खाणं पिणं…… उठणं बसणं ……. हसणं खेळणं …… सगळं सगळं नीट सांभाळत असतो.… 
        आई होताना जसा एका स्त्री च्या मनात जसा बदल होत असतो तसाच बदल बाबा होताना पण चालू असतो……. आपल्या  छकुलीच्या येण्याची वाट येण्याची वाट पहात बाबाचा प्रत्येक दिवस आणि रात्र सरत असते…. आईच्या पोटात वळवळ करणारी छकुली कशी असेल…… कशी दिसेल… मला काय म्हणेल? …… असे कितीतरी बालिश प्रश्न त्याच्या मनात नकळत घोळून जातात…… आपल्या लाडकीचा स्पर्श जाणवावा म्हणून कित्येकदा आईच्या गर्भाचा कानोसा घेणारा बाबा…… जितक्या निरागस पणे तो आपल्या येणाऱ्या पिल्लासाठी सगळ करत असतो ……. तितक्याच जबाबदारपणे त्या पिल्लाच्या भविष्याची तरतूद करायच्या आतापासूनच मागे लागतो……. स्वतःच्या जास्तीच्या खर्चावर आपोआप नियंत्रण घालतो…… LIC ची कुठली policy जास्त चांगली आहे ते अगदी कुठल्या school मध्ये admission  करायला हवं वगैरे  वगैरे… 
           या सगळ्यातच ९ महिने कसे सरतात दोघानाही  कळत नाही.… बाळंतपणासाठी आई माहेरी जाणार असते… तेव्हा तर तिच्या आणि पिल्लाच्या काळजीने बाबा कावरा बावरा होऊन जातो…… आजपर्येंत आईपासून लांब रहायची सवय आणि इच्छा दोन्हीही नसताना देखील तो तयार होतो …अगदि दर आठवड्याला आईला भेटायाला आपल्या  सासुरवाडीला येतो…… त्यालाही वाटतच असेल…… का हि सगळी बंधनं?…… सरळ office ला दांडी मारून आपणही पिल्लाची वाट पाहत घरी जावं … पण सगळा मनांतच…. 
             अखेर तो दिवस उजाडतो ……. आई-बाबांच्या आयुष्यातला सोनेरी  दिवस…पिल्लाचं आयुष्यातलं सोनेरी आगमन…
             आपल्या चिमुरडीची भेट घ्यायला बाबा अगदी सात- समुद्र पार करून यायलाही मागे पुढे बघत नाही……. पिल्लाच्या जन्मावेळीच्या त्या घटिका सरता सरत नसतात …… आईला होणारा त्रास , अन पिल्लाची काळजी … प्रत्येक क्षण डोंगराएवढा मोठा होऊन बाबाला भीती दाखवत राहतो … पण पिल्लाचे बाबा एकदम धीट ……:)  सगळ tension क्षणात जातं ……. जेह्वा अखं Hospital दणाणून टाकणारी किलकारी बाबाच्या कानाचा वेध घेत येते  आणि सगळ्यांनाच सुखावून जाते… आईच्या कुशीत तोः चिमणा  जीव आपले पहिले वहिले मोकळ्या हवेतले श्वास घेत असतो……. आणि इतके दिवस ज्याची वाट पाहिली त्या आपल्या पिल्लाला बाबा भरल्या डोळ्यांनी न्याहाळत असतो…… 
          आजी आजोबा , काका काकू , मामा मावशी सगळ्यांच्या घोळक्यात बाबाचा मात्र शेवटचा नंबर… :) 
पण आई आणि बाबांचा डोळ्यातच काय तो संवाद चालतो …… 
"थकली असशील ना ग ?" 
"नाही हो , बघा ना तुमची छकुली बोलावतेय तुम्हाला …. "  
"अगं , तुझ्यामुळेच हे सुखं आयुष्यात आलंय …… "
"आणि तुमच्यामुळे  सुखं हेच माझं आयुष्य झालंय …… " 
शब्दांच्या बाबतीत आईपुढे नेहमीच हरणाऱ्या बाबांचं यावर फक्त एकच उत्तर आणि ते म्हणजे हरूनही जिंकलेलं त्याचं गोड हास्य…… :)
          आजवर येवढ्या लहान बाळाला घ्यायची सवय नसतानाही बाबा आपल्या छकुलीला अगदी अलगद उचलून घेतो… आणि त्या नाजूक परीचा तो प्रथम स्पर्श अनुभवतो…… बाबांच्या कुशीत आल्यावर त्या चिमुरडीलाही कळतच की लगेच …… अगदी आरामात ती त्याच्या कुशीत विसावते … हातातल्या धडपडणाऱ्या बाळजीवाकडे पाहताना बाबा उगीचच हळवा होतो……. अन त्याचे डोळे त्या जीवावर वात्सल्याची मूक बरसात करतात…. आपल्या लाडकीचा तो प्रथम स्पर्श बाबाच्या आयुष्यभर लक्षात राहतो…… 
          पुढे प्रत्येक वळणावर बाबा आपल्या लेकी साठीच जगतो…तिला आधार देतो…… तिची काळजी घेतो…. तिच्यावर जीवापाड प्रेम करतो…… तिचे सगळे हट्ट पुरवतो…… वेळ प्रसंगी आधार,  मार्गदर्शन अन मदतही करतो …….सासरी चाललेल्या लेकीला निरोप देताना रडतोही ……… आणि नंतर तिच्या पिल्लानाही त्याच वात्सल्याने न्हाऊ घालतो…… 
        आयुष्य पुढे सरकत राहत……. पण "बाप होताना" अनुभवलेले  हे मंतरलेले क्षण मात्र कूपीतल्या अत्तरासारखे अगदी आयुष्यभर दरवळत राहतात …………

-----टिंग्याची आई