Thursday, January 29, 2015

तिळगुळ घ्या गोड गोड बोला….

थोडा उशीर झाला पोस्ट टाकायला… :) मकर संक्रांती दिवशी टाकयची होती पण वेळच नाही मिळाला… :) म्हणून आज वेळ मिळताच टाकली… गोड मानून घ्यावी… ;)
आजचा दिवस मकर संक्रांतीचा… एकमेकांशी गोड बोलण्याचा… नात्यांमधल प्रेम आणखी घट्ट करणारा… तिळगुळाच्या काटेरी स्पर्शाने नवी नाती जोडणारा… 
मकर संक्रांतीचा सण म्हटलं कि आठवते भोगीच्या दिवशीची शेंगसोल्याची भाजी आणि भाकरी… गल्लीतलं एकही घर न चुकवता सगळ्यांना भाजी-भाकरी पोचवायचं काम आम्हा मुलाचं असायचं… संक्रांतीच्या दिवशी मग मस्त पुरण-पोळी… आणि दुसऱ्या दिवशी झणझणीत किंक्रांत… ;) क्रम ठरलेला… 
सकाळी सकाळी संक्रांतीची पूजा करायची म्हणजेच बुन्डूकली पुजायची प्रथा… ती चुन्याने रंगवायची, त्यात भरायला भुईमुगाच्या शेंगा, ऊस, गाजर सगळ गोल करायचं… हि सगळी काम आम्ही आवडीने करायचो… फार मजा यायची तेव्हा… आणि संध्याकाळी तीळगुळाचा डब्बा घेऊन नटून थटून आख्ख्या कॉलनीत 'तिळगुळ घ्या गोड बोला' करत हिंडायचं काम तर सगळ्यात फेवरेट… :) मोठ्यांना तिळगुळ तर द्यायचेच पण त्यांच्या कडून परत मिळेपर्यंत तिथून हलायचं नाही असा आमचा नेम… :) आईचीही हळदी-कुंकवाची गडबड असायची… तिच्या कितीतरी मैत्रिणी घरी येत आणि आईही जात असे… घरी येईपर्यंत तिची ओटी वाण गोल करून जवळ जवळ फुल झालेली असायची… मग पुन्हा आमची धडपड आपल्यासाठी काही मिळतंय का पहायची… :) 
तर असा काहीसा हा सण साजरा करायचो आम्ही… पण आता खरंच यातलं काही राहिलंय का…???
आपण सगळे कामात आणि स्वतःच्याच आयुष्यात इतके बिझी झालोय कि गोड तर राहिलंच पण आपण साध बोलणं सुद्धा विसरलोय… flat सिस्टीम, नोकरी-व्यवसाय, मोबाईल, इंटरनेट या सगळ्यात आपण नको इतके गुंतून गेलोय… काय तर म्हणे आमच्याकडे इतका वेळच नाहीये… अगदी आपल्या शेजारी-पाजारी कोण राहतंय कि नाही हे सुद्धा ठाऊक नसत… रोज लिफ्ट मध्ये भेटणारी माणसं सुद्धा फक्त त्या बदलत्या आकड्यांकडेच लक्ष देतात… पण त्या ४ फुटाच्या जागेत उभ्या असलेल्या इतरांना साधा hi-hello (नमस्कार :) सुद्धा करत नाहीत… ऑफिसमध्येही अशीच काहीशी अवस्था… जिथे काही मोबदला असेल तिथेच फक्त आम्ही (गोड) बोलतो… नाहीतर साधी स्माईल देणं सुद्धा आम्हाला जड जातं…. नातेवाईकांना पण काही काम असल्यासच फोन किंवा गाठीभेटी होतात नाहीतर त्यांनाही watsapp किंवा facebook वरच भागवलं जातं… कधी काळच्या जिवलग मैत्रिणी देखील watsapp वर देखील hi-bye शिवाय फार काही बोलत नाहीत… 
जिथे आपलं बोलणच कमी झालंय तिथे हा संक्रांतीचा सण तरी कितपत यशस्वी ठरेल आपल्या तोंडून गोड बोलवायला… साजरा तरी कसा होणार आपल्या बिझी शेड्युल मधून… 
हल्ली भोगीची भाजी सुद्धा घरच्यांपुरतीच बनते आणि तीही available असतील तेवढ्याच भाज्यांची… संक्रांतीच्या पोळ्याही लिमिटेड आणि तिळगुळ सुद्धा… इन मीन २ घरात तिळगुळ वाटायला जाणे… :(
वाईट वाटतंय विचार करून कि आपण इतके संकुचित विचारांचे झालोय… खरंच वाईट वाटतंय… 
म्हणूनच आज ठरवलंय हा सोन्यासारखा दिवस साजरा करायचा गोड बोलायचं… आज ठरवलंय बोलायचं… :) काटेरी तिळगुळ देऊन प्रेमळ नात पुन्हा जोडायचं… भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मायेने बांधायचं… जुन्या प्रत्येक नात्याला पुन्हा एकदा प्रेमाने साद घालायची…. तिळगुळाच्या गोडीने मैत्रीची हरवलेली गोडी परत मिळवायची… आणि संध्याकाळी टिंग्याला हाताशी घेऊन सगळ्यांना तिळगुळ दयायचे आणि म्हणायचं… 
"तिळगुळ घ्या गोड गोड बोला….
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…"

या वर्षीच्या b'lated आणि पुढच्या वर्षीच्या in advance…. ;)

-टिंग्याची आई

Thursday, January 1, 2015

संदीप आणि सलिल….

संदीप खरे सारख्या मस्त कविता….
आपल्याला बाप जन्मात जमणार नाहीत….
आणि सलिल सारखी झकास गाणी….
आपल्याच्याने कधीच होणार नाहीत….
एक एक कविता…. एक एक ओळ….
मनाला नकळत स्पर्शून जाते….
हलकी फुलकी चाल सहज ओठांत बसते….

दमलेल्या बाबाची कहाणी ऐकून…. बाप-लेकीचे डोळे टच्च भरून येतात….
अन दूरदेशी गेला बाबा कवितेचे शब्द…. घरी एकट्या पिल्लूची सोबत करतात….
अग्गोबाई ढग्गोबाई च्या तालावर चिमुरडी फेर धरतात….
अन पप्पांचा घेऊन फोन बाप्पाला डायरेक्ट फोन लावतात….
एकटी एकटी घाबरलीस ना म्हणत…. पिल्लू आईला धीर देतं….
आई बाबा झोपा जरा गात…. तिच्याच कुशीत झोपी जातं….
साऱ्या विचारांनी आईला कसं गलबलायला होतं….
मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही म्हणताना प्रत्येक आईला भरून येतं….

स्वप्न परीचं वेड लागलेलं मन…. देवाकडे रोज एक अपघात मागतं….
माझ्याविना कसे सरतील दिस…. व्याकून होऊन तिला विचारतं….
स्टेशनवर "ती"ला सोडायला गेलेल्या त्याला कळते हे भलते अवघड असते….
अन ती गेल्यावर "नसतेस घरी तू जेव्हा"…. आमच्या एकटेपणाची सोबत करते….
सरीवर सर झेलत…. आयुष्याचे पावसाळे उन्हाळे आम्ही बिनधास्त झेलतो….
अन असाच कधीतरी आलेला ब्लँक कॉल…. चांगलाच जिव्हारी बसतो….
दिवस असेही येतात…. जेव्हा आम्ही कोणाचे नसतो….
पण एवढंच न म्हणून…. आम्ही खुशाल एकटेच जगतो….
दुःख येते…  दुःख येतेच आणि त्याचे हसतच स्वागत करतो….
हजार चिंता आहेत…. पण रूळ सोडून डब्बा सुटू दिलेला नाही….
प्रत्येकाची रात्र थोडी सांगते…. मित्रा आयुष्यावर बोलू काही….

कशा सुचतात ओळी…. अन कविता कशा बर सुचतात…?
बघता बघता नकळत…. आम्हाला आपलंस करून टाकतात ….

सुरुवात केलीये आम्हीसुद्धा…. आता कविता लिहायला….
एखादा काळजाला भिडलेला प्रसंग…. किंवा टिंग्याची एखादी गोष्ट सांगायला….
शब्दांच्या जादुई दुनियेत…. आत्ता कुठे शिकलोय रांगायला….
हि तर सुरुवात आहे…. अजून बराच पल्ला गाठायचा आहे….
रसिकांचं बोट धरून…. हा प्रवास पूर्ण करायचा आहे….

आभाळाला गवसणी नाही…. पण इवलीशी भरारी नक्की मारायची आहे….
एखादी काळजाला भिडणारी कविता…. मलाही लिहायची आहे….

-टिंग्याची आई

एका लग्नाची अनोखी गोष्ट….

सर्व प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो…. :)
आता ह्या पोस्ट बद्दल… वहीत तशा बऱ्याच कविता लिहून झालेल्या आहेत ब्लॉगवर यायची वाट पाहताहेत… पण म्हटलं नवीन वर्षी काहीतरी खास टाकूया म्हणून ही गोष्ट निवडली… :)
या वर्षी आपल्याला डबल सेंच्युरी मारायची आहे ना त्यातल हे पहिलं पाऊल… ;)
खूप वर्षांनंतर आज एक मैत्रीण भेटली… तशा काही खास मैत्रिणी न्हवतो आम्ही पण दोघींना बांधणारा एक धागा आजही मैत्री टिकवून होता… खूप दिवसांच्या गप्पा एकदम सुरु झाल्या… एवढी वर्ष कुठे कशी गेली, काय झालं कसं झालं… वगैरे वगैरे… एकमेकींच्या लग्नाच्या बातम्या तशा दोघींनाही वाऱ्यावरून उडत उडत मिळाल्या होत्या पण आज सांगणं झालं अगदी डिटेल मध्ये… :) त्याच गोड मैत्रिणीच्या लग्नाची हि अनोखी गोष्ट… अगदी हल्लीच कळलेली आणि माझ्या मनाला भावलेली….
एक होती गोंडस मुलगी अन एक गुणी मुलगा… विशेषणं अगदी हुबेहूब लागू पडतात बर… :) मित्र मैत्रिणीशी भेटी गाठी होत त्यातच त्या दोघांची भेट झाली… ती तशी शांतच पण ज्यांच्याशी बोलायची ते अगदी मनमोकळ तोंडभरून… तोही असाच काहीसा… दोघेही सुसंस्कृत घरातले… सुशिक्षित कुटुंबातले… दोघेही कमवत होते त्यामुळे बऱ्यापैकी independent…
भेटी गाठी होता होता मनबंध कधी जुळले आणि रेशीमगाठी कधी बांधल्या गेल्या कळलच नाही… मग एकदा त्यानेच धाडस करून तिला सरळ विचारून टाकलं… आता निर्णय तिचा होता… आईच्या लाडक्या लेकीनं "घरी विचारून सांगते" असाच छान रिप्लाय दिला… अन घरी सगळ सांगून टाकलं… आणि अपेक्षेप्रमाणे विरोध हा झालाच… पण आई बाबांच्या एका वाक्यानं गणित थोडं बदललं… "तुला जो योग्य वाटतो तो निर्णय घे…."
मुलगी शिकली-सवरलेली, विचार करून निर्णय घेणारी… आणि तिने योग्य तोच निर्णय घेतला… आणि त्याला "हो" म्हटलं… मग काय… ऐन उन्हाळ्यात पावसात चिंब भिजल्यासारखा बेभान झाला… 
प्रेम वाढत गेलं… नात आणखी घट्ट झालं… अन आता वेळ आली लग्नाची…

तिने घरी लग्नाचा विषय काढताच चित्रं विचित्रपणे पालटू लागली… सहा महिन्यापूर्वी दिलेला होकार आता सपशेल नकारात बदलून गेला… आई-बाबा नाही म्हणाले… आपण दुसरं स्थळ बघूया…. याहून चांगलं पण हे नको…!!
एक मोठ्ठ प्रश्नचिन्ह धाडकन तिच्यावर कोसळलं… स्वप्नांचा बंगला खळकन तुटून पडला… काय कराव काहीच तिला समजेना… हर तऱ्हेने तिने आई बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला… पण ते अढळ राहिले… आशीर्वादासाठी डोक्यावर कायम असलेला हात अचानक बाजूला सरला आणि तिला परक वाटू लागलं… पण त्याचा हात अजूनही हातात होता तिला अखंड साथ द्यायला… 
आपल्या माणसांबरोबर तिने वर्षभर लढा दिला पण तोही माय लेकीच्या नात्याचा व्यवस्थित मान राखून… अन शेवटी एक निर्वाणीचा फैसला कानावर पडला… 
"तुला हे लग्न करायचं असेल तर खुशाल कर… पण आमची कोणत्याही बाबतीत मदत होणार नाही… लग्नाला आम्ही येऊ अशी अपेक्षा सुद्धा करू नको… आम्ही या लग्नासाठी एकही पैसा देणार नाही…"
खरतर हे सगळ अनपेक्षित होत…  ती उभ्या उभ्या कोसळली… डबडबल्या डोळ्यांनी आपल्या जन्मादात्यांकडे पहात राहिली… 
हातात धरलेला त्याचा हात कधीचा सांत्वनासाठी पाठीवर फिरत होता… तिला आता निर्णय घ्यावाच लागणार होता… आई-बाबांशिवाय स्वतःच स्वतःचा लग्न समारंभ उरकायचा होता… त्यांची कोंडी तिला जाणवत होती कदाचित ते हेल्पलेस होते आणि हे तिला काळात होतं… म्हणूनच ती आजही त्यांच्यावर रागवली नाहीये… 
त्याच्या घरच्यांचा तसा काहीच प्रश्न न्हवता… ते हसत हसत त्या दोघांच लग्न लावून द्यायला तयार होते… पण त्याला ते पटलं नाही… तिचे आई-बाबा नसताना आपले आई-बाबा लग्नाला हजार असणे त्याला पसंत नव्हत… कारण तिला कोणत्याही प्रकारे दुखं होऊ नये वाईट वाटू नये असं त्याचं मत होतं… हेच खर प्रेम… आपल्या डोळ्यातला न ओघळणारा अश्रूही अलगद पुसून टाकणारं काळजाजवळच माणूस… आता आणखी काय हव होतं त्याच्या प्रेमाची कसोटी घ्यायला…? खरतर काहीच नाही… तोच तिच्यासाठी योग्य जोडीदार होता आणि आहे…
लग्नाची तयारी सुरु झाली… काय काय करायचं… काय काय नाही… बरेच प्रश्न होते दोघांसमोर… जमेल तसे मित्र मंडळींचे सल्ले घेत एक एक कार्य पार पाडणं सुरु झालं… मैत्रीच्या धाग्याने घट्ट बांधलेले मित्रच मदतीला धाऊन आले… आजवर नोकरीतून साठवलेल्या पैशातूनच खरेदी चालू झाली… तिचा शालू, मंगळसूत्र, कपडे, पत्रिका, हॉल बुकिंग… सगळ काही ते एकमेकांत गुंतलेले हात करत होते…
हॉलवाल्या काकांना त्या दोघांनी स्पष्ट कल्पना दिली… "काका, लग्न आमच आम्हीच करतोय… आम्हाला काहीच माहिती नाही यातलं… तुमची मदत हवी आहे…"
खरतर हे सगळ करताना तिला यातना होत होत्या… आईची सारखी आठवण येत होती… पण काय करणार… या मार्गावर तिला त्यांच्या मदतीशिवाय पुढे जायचं होत… त्याच्या साथीने त्याची साथ आयुष्यभर मिळवण्यासाठी… 
अगदी बाप्पाने पाठीवर हात ठेवावा तसे हॉलवाले काका त्यांच्या मदतीला धावत आले…. सगळ काही आपल्या मुलांसारख त्यांनी करून दिलं… सगळी व्यवस्था अगदी चोख… पत्रिका वाटल्या गेल्या… अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मनात कुठेतरी आशा होती कि आई-बाबा येतील आपल्या लाडक्या लेकीला कुशीत घ्यायला… मायेने, पाणावल्या डोळ्यांनी तिची पाठवणी करायला… पण असा काहीच झाल नाही…
लग्नाचा दिवस उजाडला… कधीच घडला न्हवता असा आगळा वेगळा लग्न सोहळा… नवरा-नवरी सोबतच आले… सगळी व्यवस्था बघतच लग्नाला उभे राहिले… अन मंगलाष्टकाच्या मंजुळ नादात… गोरज मुहूर्तावर लग्नाला आलेल्या अवघ्या ३०-३५ मित्रांच्या हातून त्यांचा डोक्यावर अक्षता पडल्या… आणि ते एका अतूट बंधनात कायमचे बांधले गेले… लग्न पार पडलं… जो विडा उचलला उचलला होता तो दोघांनी मिळून पूर्ण केला…
पण खरी कसोटी इथून पुढे होती… लग्न करण सोप आहे पण ते निभावण महाकठीण हे दोघेही जाणून होते… :)
सुनबाईच सासरी थाटामाटात स्वागत झाल सगळे विधी व्यवस्थित पार पडले… पुन्हा एकदा आशीर्वादाचा हात त्या दोघांच्या डोक्यावर मायेने टेकला होता… पाखरं जणू घरट्यात परतली…

आज त्यांचा संसार सुखाने सुरु आहे… दोघाही खूप प्रेम करता … त्यावेळी जसा हातात हात होता तसाच आजही घट्ट धरलेला आहे…
घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यात आनंद असा कधीच न्हवता पण योग्य जोडीदार निवडल्याच समाधान तिला लाभलं आहे…
हा सुखी संसार असाच आनंदाने चालत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
"नांदा सौख्यभरे…"
अशी हि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण…… ;)
- टिंग्याची आई