Saturday, March 19, 2016

भांडी…

भांडी…आम्हा बायकांचा जिव्हाळ्याचा अन जीव घेणारा विषय… :) भांडी घ्यायची भारी हौस असते आम्हाला आणि तीच भांडी घासायचा जाम वैतागही येतोच …. भांडी झाली म्हणजे निम्म काम आवरल्या सारखं वाटतं आम्हाला… भांडी घासणे हे दिवसातलं किंवा रात्रीचं शेवटचं काम आणि मग आम्ही निवांत होतो… :)

तर आता भांडी हा काय लिहिण्यासारखा विषय नक्कीच नाहीये… पण काय करणार प्रत्येक गोष्टीत काहीतरी इंटरेस्टिंग शोधायचं आणि नावडतं काम सुद्धा आवडीने आणि चोख करायचं हा आमचा स्वभाव गुणधर्मच आहे मूळी… थोडासा भाव खाऊन बघावं म्हटलं… ;)

हल्ली प्रत्येक घरकामाला बाई म्हणजे कामवाली मिळते तशी भांड्यालाही मिळतेच पण तरीही आहेत अजूनही माझ्यासारख्या काही हौशी मेंबर ज्यांच्यासाठी भांडी घासणे हे दिवसातलं सगळ्यात शेवटचं काम आहे… 
परवा रात्री खूपच जास्त कंटाळा आला होता कामाचा आणि मेन म्हणजे भांडी घासायचा… न्हवतेच घासणार आजीबात पण पुन्हा सकाळी उठून तीच भांडी घासायची म्हटल्यावर डबल वैताग… मग म्हटलं जाऊ देत तिकड घासून टाकू एकदाची… तेव्हाच भांडी घासता घासता एक विचार डोक्यात चमकला, या भांड्यांवरच म्हणजे या विषयावर काही लिहिलं तर….!!! आणि मग लिहून टाकला एक मस्त action सिनेमा रोज प्रत्येक घरात घडणारा…. :)
एन्ट्री…. भल्या मोठ्या घरात एक छानसं किचन… सुंदर फर्निचर, छान छान भांडी, छोटी मोठी बरीच कपाटात ऐटीत बसलेली… अन घरातल्या प्रत्येकाचं चहा पाणी, खाणं-पिणं, नाश्ता-जेवण या अन अशा हजार कामात… हळू हळू सिनेमाच्या पाट्या पडाव्यात तशी दिवसभर एकामागोमाग एक भांडी पडत राहतात…. सगळ्या पाट्या पडल्या कि मग बेसिनवर फोकस येतो आणि मोठ्या मोठ्या अक्षरांत स्क्रीनवर नाव पडतं आणि सुरु होतो रोजचीच संघर्षगाथा…. 

"गराडा…. 

भांड्यांचा…. एक संघर्ष गाथा…"

मग होते आपल्या हिरोईन ची एन्ट्री… नाही होय करत करत एकदाची ती भांडी घासायला तयार होते… आणि मग सुरु होते action… भांडी म्हणजे जणू व्हिलन्स… ते पण एवढे सगळे ज्यांच्याशी आपली हिरोईन एकटी लढणार असते… कुणी चिवट… कुणी तेलकट… कुणावर साचलेले थरच थर तर कुणी करपलेलं खंडीभर… या सगळ्यांशी टक्कर द्यायला ती एकटीच समर्थ असते… निव्वळ साबण आणि घासणी या दोनच हत्यारांच्या मदतीने ती या सगळ्या दुश्मनांचा फडशा पाडते… जसा साऊथ इंडियन सिनेमाचा हिरो एका दमात १०० गुंडांची वाट लावतो अगदी तस्सं… धिश्शूम ढीश्शुम आणि घसाघस…. एक एक  करून सगळी भांडी हरून बेसिन मध्ये एकामागोमाग एक admit होतात… आणि उरलेलं शेवटचं भांडं घासून झाल्यावर आपल्याच विजयात स्वतावरच खुश होते आपली लाडकी हिरोईन… अन इतक्यात होते इंटरवल… एवढा मोठा संघर्ष केल्यावर थोडा ब्रेक तर हवाच ना… :)
पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… 

अन आता भरलेल्या बेसिनवर फोकस टाकत पुन्हा सुरु होतो पुढचा सिनेमा… 
व्हिलनला नुसतं मारलं म्हणजे सिनेमा कसा संपेल… आपली हिरोईन म्हणजे नुसती गुणीच न्हवे तर सद्गुणी आहे म्हणूनच त्या सगळ्या दुष्ट व्हिलन्सना धुवून स्वच्छ सुद्धा करते…. क्योंकी दुश्मन को भी इन्सान समझते है हम… डायलॉग… ;) तर अशा तऱ्हेने ती सगळी भांडी ती स्वच्छ धुवून छानपैकी जाळ्यात भरून ठेवते…. 

पण अजूनही काम संपलेलं नाही बर… एका सृजन योद्ध्या प्रमाणे तिला युद्धभूमी म्हणजेच तिचा किचन ओटादेखील स्वच्छ करावा लागतो… पिक्चरच्या शेवटी जसं सर्व काही छान आणि सुंदर घडत तसंच ती न विसरता सगळा ओटा चकचकीत करते… :)
आपल्या सिनेमाचा शेवटचा सीन तरी काय वर्णावा… सगळ आवरून पदराला हात पुसत ती किचनची लाईट बंद करते… आणि आता थोडीशी निवांत झोप घ्यायला ती समाधानाने बेडरूमकडे जाते…. आणि जाळ्यातली, कपाटातली सगळीच भांडी तिचं टाळ्यांच्या कडकडात अभिनंदन करत असतात पण आता तिला मात्र कशाचंच भान राहिलेलं नसतं… 
आणि शांतपणे बेडरूमकडे जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर झळकत आमचं The End चं पोस्टर…. 

शेवट… पुन्हा उद्याची सुरुवात करण्यासाठी…


तर असाच काहीसा सिनेमा रोजच तिच्या किचनमध्ये रंगतो… :)
ती भल्या पहाटे उठते जेव्हा घराला सुद्धा जाग आलेली नसते… पण सूर्यही तिने  मारल्याशिवाय उगवत नाही यात ती आनंद शोधते… 
घरातल्या माणसांची सगळी कामं ती करते, अगदी न कंटाळता सगळ्यांच्या हाकेला ओ देते…. अन तिच्याशिवाय घरात कुणाला करमत नाही ह्यातच ती खुश होते…. 
आपल्या पिल्लांची सगळी कामं, खाऊ-पिऊ, न्हाऊ-माखू, रडणं-खेळण सगळंच ती न थकता प्रेमाने करते… आणि आपल्या पाखरांची माउली व्हायचं भाग्य मिळालं ह्यातच समाधान मानते…. 
पतीदेवांचही प्रत्येक काम… अगदी डबा, रुमाल, पेन सगळ काही हातात देण्यापासून सर्वकाही ती हक्काने आणि प्रेमाने करते… अन तिच्याशिवाय त्याचं पानही हलत नाही म्हणून स्वतःचाच हेवा करते… :)
घर अन घरातल्या माणसांसोबत त्यांच्या मनाचीही काळजी ती सतत घेत असते… अनआपल्या माणसांच्या मनात एक हक्काची जागा निर्माण करता आली याच भावनेत ती तृप्त होते… :)
तसं पाहिलं तर ती कुठल्याच कामाला नाही म्हणत नसते… पण कधी कधी अशाच एखाद्या कंटाळवाण्या कामातसुद्धा ती आनंद शोधते… 
Hats Off to Her.... :)

- टिंग्याची आई
त्या दिवसापासून रोज रात्री भांडी घासताना मीही हा सिनेमा जगते आणि the end झाल्यावर समाधानाने झोपी जाते… :)

Thursday, March 3, 2016

म्हातारी व्हायचं नाही...

"तू म्हातारी व्हायचं नाही हं आजीबात…."
इतका वेळ कशाततरी मग्न असलेला माझा टिंग्या अचानक मला म्हणाला… ऐकून तशी चमकलेच मी पण म्हटलं ठीक आहे करूया थोडीशी गम्मत लेकाची आपल्या… ;)
मी विचारलं… "का रे बाबा…?"
"नाही म्हणजे नाही… मला नाही आवडत तू म्हातारी झालेलं…" अगदी चिडून बिडून उत्तर दिलं त्याने…
मग मी आपला नेहमीचा समजवायचा सूर धरत म्हटलं… "अरे बाळा…. सगळेच म्हातारे होतात… मी आधी तुझ्यासारखी लहान होते मग आता मोठी झाले आणि हळू हळू म्हातारी होणार… बाबा, मी सगळेच म्हातारे होणार…"
"मग आजी आणि आजोबा…???" टिंग्याचा पुढचा प्रश्न…
"ते आणखीन म्हातारे होणार… " आणखी एक उत्तर… :)
"कुणीही झालं तरी चालेल पण तू म्हातारी व्हायचं नाही म्हणजे नाही…." टिंग्या आता केविलवाण्या स्वरात बोलत होता….
त्याला जवळ घेत मी पुन्हा विचारलं…. "का रे बाळा… मी का बर व्हायचं नाही म्हातारी….??"
त्या निरागस जीवाचं उत्तरही अगदी त्याच्या इतकंच निरागस होतं… रडवेल्या स्वरात टिंग्या म्हणाला… "मग…. मी जर पडलो…. धडपडलो…. माझा पाय अडखळला… तर… मला कोण सांभाळणार………?????"
काय उत्तर द्यावं क्षणभर मला सुचेनासं झालं… ते बोल ऐकून गलबलायला झालं…
त्या चिमुकल्या जीवाला कदाचित हे लक्षातच आल नसावं कि आई म्हातारी होईल तेव्हा तोही मोठा होणार आहे… अगदी बाबासारखा…

टिंग्याला उराशी घट्ट कवटाळत मी म्हणाले… "अरे बाळा… आई इथेच असेल तुझ्या जवळ कुठेही जाणार नाही… आणि तोवर तू पण छान मोठ्ठा होशील कि नाही बाबासारखा… मग स्वतःच सांभाळून चालशील… स्वतःच पडताना तोल सावरशील…."
आणखीनच कुशीत शिरत टिंग्या म्हणाला… "नाही हं… तरीही तू म्हातारी व्हायचं नाही… प्रॉमिस….????"
आता मात्र पंचाईत झाली ना राव…. मी कशी म्हणणार होते यावर … "पक्का प्रॉमिस…!!!" म्हणून विषय वळवला… ;) कात्रीतून पटकन सुटायची हि पद्धत  फार सोपी आहे….
"अरे टिंग्या… माझे केस पांढरे झाले आणि मी म्हातारी झाले तर घेशील का रे मला तुझ्या घरात ??"
"हो तर… का नाही…. घेणार कि मी तुला घरात…. " सगळ विसरून आता स्वारी खुशीत बोलत होती…. चला निदान त्या विचारातून टिंग्याला बाहेर काढण्यात आई यशस्वी झाली… :) पण हो स्वतः दुसऱ्याच विचारात हरवून गेली…. नेहमीसारखी….

टिंग्याला सांगावंसं वाटत होतं… तू मोठा होशील… तुझ्या नव्या जगाच्या शोधात या आईला सोडून कुठेतरी भूर उडून जाशील… पंखात बळ आलं कि पाखरं भूर उडून जातात… नव्या क्षितिजांच्या शोधात… नवीन घरटं बांधायला… स्वतःच… मग मागे राहिलेल्या घरट्याच काय होत असेल याचं पिल्लांना भान राहातच नाही…. मुलं मोठी होतात पण आई-बाबा कधीच मोठे होत नाहीत…." :)
खरंतर आपण म्हातारे होईपर्यंत जिवंत राहणार कि नाही कोण जाणे पण तरीही आपलं प्लानिंग चालूच असतं… मला उगीचंच बरं वाटलं… म्हटलं निदान म्हातारपणी पोरगा घरात घेईन म्हणतोय… सध्या तेवढं पुरे… :)
परवा फेसबुक वर एक पोस्ट वाचली…. आपल्या बाबांना अनाथ कम वृद्धाश्रमात सोडायला आलेल्या मुलाची… त्या आश्रमाच्या मालकाशी बाबांना गप्पा मारताना पाहून त्याने विचारलं "तुमची जुनी ओळख आहे का?" आणि त्यावर त्या मालकाने त्या मुलाला निरुत्तर करणारं दिलेलं उत्तर…. "हो… ३० वर्षापूर्वीची ओळख… ३० वर्षापूर्वी ह्यांनी इथूनच एक मुलगा दत्तक घेतला होता…."
वाचून जीवाला चटका लागला… सत्य आहे हे आजकालच… एक विदारक सत्य… :(
पण खरंच आपले म्हातारे आई बाप आपल्याला इतके जड झाले आहेत का? 

ज्यांनी पहिलं पाऊल टाकायला आपल्याला आधार दिला त्यांच्या अखेरच्या प्रवासात आपण सरळ सरळ त्यांना निराधार करायचं हा कुठला न्याय…?
हल्ली आम्हा वर्किंग लोकांना फारतर गरज आहे म्हणून या म्हाताऱ्या आई-बाबाला so called आमच्या घरात जागा मिळते… आमची मुलं लहान आहेत तोवरच त्यांना सांभाळायला आम्हाला आजी-आजोबा हवे असतात… म्हणजे आम्ही निर्धास्तपणे ऑफिसची काम करायला रिकामे अगदी पार्ट्या सुद्धा…. आणि हो काही चुकलंच त्यांचं तर मनसोक्त ओरडायलाही माही मोकळे….
एकदा का आमची मुलं मोठी झाली म्हणजे फारतर फुल टाईम शाळेला जायला लागली कि मग मात्र आम्हाला या म्हातार्यांची अडचण व्हायला लागते… ते बिचारे मात्र आपली आयुष्यभराची कमाई आम्हा लेकरांवर उधळून रिकाम्या हाताने फक्त आमच्या मायेचं मागणं मागतात आमच्या दारी लाचारपणे उभं राहून…. पण आम्हाला कुठ जमतंय तेवढं….!!! आपल्याच व्यापात नको इतके गुरफटलेले आम्ही… पुरवतोय न पैसा आजारपणाला मग आणखी काय हवंय…??  पण फक्त पैसा पुरवला कि सगळ संपतं का? रोज नव्याने येणाऱ्या त्यांच्या दुखण्यांना अंत नसेलही पण तुम्ही आपुलकीने केलेली चौकशी सुद्धा पुरेशी असते त्या बिचाऱ्यांना…
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं असं म्हणतात…. मग आपण त्यांचे आईबाप व्हायचं सोडून साधी उसनी माया सुद्धा त्यांच्या पदरात घालू शकत नाही….????? अरे ज्यांच्याकडे हे मायेचं छत नाहीये ना त्यांना विचारा आईबापाची किंमत….


जिने नऊ महिने स्वतःच्या उदरात आपल्याला वाढवलं… तिला आपण साधं नऊ तासही सहन करू शकत नाही…!!!
ज्यांनी स्वतःच्या मजबूत खांद्यांवर आपलं ओझं आयुष्यभर वाहिलं… त्या खांद्यांना आपण साधा आधारही देऊ शकत नाही…!!!
जिने डोळ्यात तेल घालून आपली काळजी घेतली… ती आई आपल्याला डोळ्यासमोरही नको झाली आहे…!!!
ज्यांनी आजारपणात आपल्यासाठी रात्री जागून काढल्या… त्यांच्याच आजारपणात आपण मात्र फक्त पैसा पुरवून हात वर करतोय…!!!
जिने हाताचा पाळणा करून आपल्याला वाढवलं… त्या आईच्या थरथरत्या हातात हात द्यायलाही आपल्याकडे वेळ नाहीये…!!!
ज्यांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर न थकता काम केलं… त्या बाबांच्या थकलेल्या पावलांची आपण चार क्षण सुद्धा सोबत करू शकत नाही…!!!
ज्या आई-बाबाने पोरांच्या सुखातच आपला संसार धन्य झाला असं मानलं… त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांना नव्याने संसार थाटायला मजबूर करतोय…!!!
ज्यांनी आपल्याला समृद्ध आयुष्याची वाट चालायला मदत केली… आज आपण त्यांची सोन्यासारखी मुलंच त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट दाखवतोय…!!!


हल्लीच नाना पाटेकर यांचा नटसम्राट सिनेमा पाहिला…. पोरांना जड झालेल्या म्हाताऱ्या आईबापाची अन त्यांच्या स्वाभिमानाची करुण कथा किंवा व्यथा म्हणावी… बघताना माझ्याही डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होतं… नानांचा एक एक शब्द जिव्हारी बसत होता… पण प्रत्यक्षात असं काही वागणाऱ्यांना खरंच फरक पडला असेल…????

का झाली आहेत आपली मनं इतकी खुरटी…? कशाचाच फरक पडत नाही आपल्याला… धड आपल्याला मनमोकळ रडताही येत नाही आणि हसताही येत नाही… गुरफटलोय आपण स्वतामध्येच नको इतके…. आणि नको इतका गुंता झालाय… स्वतःचाच… अरे जिथे आपण जन्मदात्या आईबापाचे होऊ शकलो नाही तिथे दुसऱ्या कुठल्या नात्याचे कसं काय होऊ शकणार…?
असं म्हणतात कि सगळ्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात…. मग तुमची मुलही आहेतच कि… होतील तीही मोठी कधीतरी आणि मग कदाचित या सगळ्याचा हिशोब करतीलही… 


पण खरं सांगू… मला वाटतं… आईबापाला असं वाऱ्यावर टाकणार्यांच्या बाबतीत असं होऊ नये…. हो… नकोच व्हायला… कारण त्यांच्यामध्ये एवढं मोठं दुखं सहन करायची कुवतच नाहीये… ज्यांचे डोळे आईच्या वेदनेने पाझरत नाहीत ती मानाने कमजोरच असली पाहिजेत… कदाचित त्यांच्या मुलांनी त्यांना म्हातारपणी प्रेमाने वागवलं तर त्यांना आपली चूक तरी कळेल… भले ती चूक सुधारता येणार नाही…. 


याउलट….
आजच सकाळ मध्ये एक लेख वाचला…. ज्यामध्ये स्वतः एक वृद्धा आपल्या वृद्धसदनातील वास्तव्याबद्दल सांगत होत्या… हो वृद्ध सदन… त्यांनी मुद्दामच आश्रम असा उल्लेख टाळलाय… वृद्धसदन किंवा ओल्ड एज होम्स मध्ये तिथले वृद्ध स्वतःच्या मर्जीने वास्तव्य करतात… त्यांना उपयोगी किंवा गरज असणाऱ्या सगळ्या सोई इथे छान उपलब्द्ध करून दिल्या जातात… सोबत १-२ डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय सुद्धा असतात… गरज पडल्यास अम्बुलन्स सुद्धा हजर असते दारात…
घरी हे आजी-आजोबा दिवसभर एकटे असताना काही मेडिकल इमर्जन्सी आलीच तर खरंच आपण वेळेवर पोहचू कि नाही हेही आपल्याला सांगता येणं कठीणच आहे… मग वाटतं कि अशी वृद्धसदनं असणं गरजेचं आहे… हा झाला एक वेगळा विचार… पण आपल्या सोयीचा आहे म्हणून वेगळा विचार करणारेही लोक आहेतच कि… :)


फक्त इतकंच वाटतं… ज्या आई-बाबांनी आयुष्यातल्या प्रत्येक वादळाला तोंड देत आपलं संरक्षण केलं त्यांना आयुष्यातल्या शेवटच्या अंकात असं वाऱ्यावर सोडू नका…. 


असो…. 
माझं हे असंच होतं… एका विचारातून कधी दुसऱ्या विचारात गुंतत जाते माझं मलाच कळत नाही… :)
सध्या मी ह्याच आनंदात आहे कि म्हातारपणी माझं पोरगं मला घरात घेणार म्हणतंय…
टिंग्या अजूनही सांगतो मला अधून मधून अगदी रोज… "तू म्हातारी नाही व्हायचं…"
आणि मीही मग खुश होऊन म्हणते…. "अरे बाळा…. अभी तो मैं जवान हुं……!!!" :)

- टिंग्याची आई