Monday, October 28, 2013

Manager नको ग बाई....

नवरा नको ग बाई - या भारूड वर आधारीत आहे… :)
Manager नको ग बाई मला Manager नको ग बाई

Windows server आणि Windows XP… 
(मग असं ना का… )
आवं पर code करायला मशीनच न्हाई 
मला Manager नको ग बाई…

ढीगभर काम अन वर Client करी बदनाम…
मेला सुट्टी पण देतंच नाही…
मला Manager नको ग बाई…

एवढासा पगार आणि जबाबदाऱ्या हजार…
(अग असू देत Skillset वाढेल तुझा…)
आवं पर Promotion मिळतच नाही…
मला Manager नको ग बाई…

Early Morning येणे आणि Late Night जाणे…
(अग Average वाढेल… चांगलं आहे की…)
पण पार्टीचा फंड पण मिळत नाही…
मला Manager नको ग बाई…

एका जनार्दनी Go Live जहाले… 
अग झालं ना Go Live एकदाचं…?

अरे हो…
पण Bug आल्याशिवाय राहणार नाही…
मला Manager नको ग बाई…

Manager नको ग बाई मला Manager नको ग बा……. :)
- कवीचे नाव गोपनीय ठेवण्यात आलेले आहे… उगीच Manager ने वाचलं तर वांदे नको… ;)
Dedicated to all the Software Engineers and IT Professionals.... Enjoyy Madi... :)  

Sunday, October 27, 2013

आज ती सहज म्हणून गेली…

आज आमच्या टीममधली आणखी एक मेंबर जॉब सोडून जाणार असल्याचं कळलं…. दुसरं तिसरं कोणी नाही तर माझी प्रिय मैत्रीण कांचन जाणार आहे… तिच्यासाठी हे थोडंसं काहीतरी माझ्याकडून...

Specially Dedicated to one of my Dearest Friends KanPat..... bole to Kanchan.... :)
आज ती सहज म्हणून गेली… "उद्यापासून मी नाही यायची इकडे..."
नवं ऑफिस, नवे मित्र... आता सगळंच नवीन असेल तिकडे...

नेहमीसारखं हेही तिने... हसत हसतच सांगून टाकलं...
आम्हालाही लागली होती सवय... कुणी तिला सिरीयसली नाही घेतलं...
 
मौज मस्ती बरीच झाली... पण ती खरंच जाणार होती...
उद्यापासून आमच्या Team मधली... आणखी एक Member कमी होणार होती...

सगळ्यात फास्ट बोलायचं रेकॉर्ड... लवकरच हिच्या नावावर होणार आहे...
आणि online shopping चं Patent सुद्धा... कदाचित हिलाच मिळणार आहे...
 
अग पण… 
Online Shopping चे धडे आता... मला कोण बरं देणार...?
कितीही काम असलं तरी रोज संध्याकाळी चहासाठी... मला ओढून कोण बरं नेणार...?

माझा Call आणि Meeting संपेपर्यंत... माझ्यासाठी जेवायला कोण थांबणार...?
अन तुझ्या गप्पंशिवाय... आमचा लंच ब्रेक कसाकाय लांबणार...?
 
अगदी वाट्टेल त्या विषयावर चर्चा करायला... कोण EverReady असेल...?
सगळी टेन्शन्स विसरायला... मला कोण बर हेल्प करेल...?

फोनवरच्या गप्पांनी... कोण आख्ख्या Floor ला जागवेल...?
वेळेवर खात नाही म्हणून... मला हक्काने कोण बर रागवेल...?

अब हर छोटी बात पे... अरुण किसके साथ लढ पाएगा...?
अपनी WorldClass इंग्लिश सुनाके... किसको घायल कर पाएगा...? :)

अगदी हाडाच्या हिंदी लोकांना... इथे मराठीत कोण सुनावणार...?
कोल्हापुरी Vs पुणेरी या विषयावर... आदित्य हुज्जत कोणाशी घालणार...?

नेहमी वाटायचं मला... ही माझ्याइतकी Emotional नक्कीच नाही...
पण टपोऱ्या डोळ्यातलं पाणी सांगून गेलं... वाटलं होतं तितकी Practical सुद्धा नाही...

आज तू निघून जाशील... उद्या आणखी कोणीतरी ही team सोडून जाईल...
पण खर सांगू? तुझ्या जाण्याने... आमचं हसू नक्कीच थोडंस कमी होईल... :(

अरे यार… अगदी कायमचं बिछडन वगैरे नक्कीच काही नाही...
पण तुझ्याशिवाय… आता ऑफिसमध्ये एवढी मजा येणार नाही… :)

- टिंग्याची आई
We Will Miss You Kanchan...

Monday, October 21, 2013

झालीये म्हणे फाशी काल…

दिल्ली मध्ये काही महिन्यापूर्वी एक Gang rape ची केस झाली तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे… तिच्यासाठी आपल्यातला प्रत्येकजण जमेल तसा लढला… तिलाही नक्कीच बर वाटलं असणार हे पाहून… ती आज या जगात नाही पण तुम्ही तिचा लढा चालू ठेवला आणि शेवटी तिला न्याय मिळाला… तिला नक्कीच समाधान वाटलं असणार आहे याचं… तिचं दुखं कल्पनेच्या पलीकडलं आहे हे मला मान्य आहे… तरीही तिचं मन इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न… 
झालीये म्हणे फाशी काल…
त्या चार नराधमांना… 
दुसरी शिक्षा शोभलीच नसती…
माणुसकीच्या या राक्षसांना…

माणसातला हैवान त्या दिवशी…
मी उघड्या डोळ्यांनी पाहिला…
माणुसकीवरचा उरला-सुरला विश्वास…
अगदी त्याच क्षणी पार उडाला…

जीव तोडून विनवण्या केल्या…
अगदी पायासुधा पडून झाले…
पण त्या पाशवी वृत्तीपुढे…
माझे काहीच नाही चालले…

गिधाडांनी लचके तोडावे…
तशी माझ्या अब्रूची लक्तरं केली…
भरलं न्हवतं मन अजून…
म्हणून माझ्या शरीराचीही दुरावस्था केली…

माणसंच उभी होती समोर कि लांडगे…
माझं मलाच काही कळत न्हवतं…
एका बलात्काराच्या अपराधापायी…
माझं पुरतं आयुष्यच बरबाद झालं होतं…

समाधान एकाच गोष्टीचं…
तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिल्याचं…
आज मी जगात नसले तरी…
माझ्यासाठी तुम्ही सगळे लढल्याचं…

त्या न्यायदेवतेचेही आभार…
जीने योग्य तोच फैसला सुनावला…
सगळ्या प्रकाराने खचलेला माझा बाप…
लेकीच्या मरणानंतर पहिल्यांदाच सुखावला…

पण……. 
चारजण फासावर गेले म्हणून…
इथेच हे सगळं संपणार नाही…
मुळासकट उपटून टाकावंच लागेल…
हे इतक्या सहजासहजी वाढायचं थांबणार नाही…

रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक मुलीला…
आज तुमचंच अभय हवंय… 
तिच्या प्रत्येक उंच भरारीला…
या समाजाचं पाठबळ हवंय…

आई, ताई, मैत्रीण… इथली प्रत्येक स्त्री… 
स्वतःच आयुष्य ताठ मानेने जगेल…
ती खऱ्या अर्थाने निर्भय होईल…
तीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली होईल…

- टिंग्याची आई

Friday, October 18, 2013

मला आई व्हायचंय....

कुणीतरी आहे जवळच… ज्यांचं हे दुख आहे… :(
मला आई व्हायचंय म्हणून…
किती वेळा सांगू रे देवा… ?
माझं हे गाऱ्हाणं…
तू ऐकणार तरी आहेस केव्हा… ?

एकच मागणं तुझ्याकडे…
मी रात्रदिवस मागते…
व्रत-वैकल्य, पूजा-अर्चा…
सांग मी नक्की कुठे चुकते?

इतकी वर्ष निघून गेली…
अजून अंकुर रुजला नाही…
दिवस नुसतेच वाट पाहत राहिले…
पण अजून पाळणा सजला नाही…

शेजार-पाजारच्या पोरांना…
किती दिवस जवळ करू… ?
सांजवेळी अंगण रिकामं झाल्यावर…
हक्काने कोणाला हाक मारू… ?

सणासुदीला गोड-धोड करून…
किती दोघांनीच खायचं…?
कोमेजल्या दोघांच्याही मनाने…
सांग कामात तरी किती वेळ रमायचं… ?

ऐसपैस अंगण राखलंय…
बाळकृष्णाच्या खेळासाठी …
एवढं मोठ हे वैभव…
उभं केलंय तरी कोणासाठी?

जगातली सगळी सुखं…
आज लोळण घेताहेत पायाशी…
सगळं दिलंस रे बाप्पा…
एक लेकरू दे कवटाळायला पोटाशी…

नको मला ही सगळी सुखं…
दाग-दागिने नको पैसा-अडका…
फक्त एक चिमुरडा जीव दे या कुशीत…
मग ती लाडकी असो वा लाडका…

आईचंच काळीज माझं…
निदान पोटभर रडून तरी घेता येतं… 
पण बापाचं त्या दुखं मोठं… 
काळीज नुसतंच मुक्याने कण्हत राहतं…

आमच्यासोबत या घरानेही… 
कितीतरी एकाकी क्षण वेचलेत रे… 
आई-बाबा ही हाक ऐकायला… 
दोघांचेही कान तरसलेत रे…

जमलं तर ऐक रे बाप्पा… 
मला फक्त एवढंच म्हणायचंय… 
दोघांचं हे अर्धवट आयुष्य पूर्ण करायला… 
फक्त एकदाच मला आई व्हायचंय….


- टिंग्याची आई

Wednesday, October 16, 2013

कोल्हापुरी तांबडा-पांढरा…. :)

काय सुटलं ना पाणी तोंडाला या पोस्टच नाव वाचून? आणि भरीला भर म्हणजे हा चमचमीत फोटो… :) हे सगळ कागदावर उतरवताना माझंही असंच काहीसं झालं होतं… :)

तर कोल्हापुरी तांबडा-पांढरा म्हणजे जबरदस्त चव… जबरदस्त रंग आणि ते खाल्ल्यावर मिळणार जबरदस्त समाधान… आता तुम्ही म्हणाल कि हि इथे रेसिपी वगैरे सांगणार आहे कि काय? तर तसं काही नाही… :) फक्त सांगायचं आहे मला त्याबद्दल जे काही झणझणीत चमचमीत वाटत ते… :) बघा आवडतंय का ते…
कोणीतरी म्हटलंय… "कोल्हापुरी म्हणजे तिखट न्हवे तर कोल्हापुरी हि एक चव आहे… " आणि "हि चव असते कोल्हापुरातल्या प्रत्येक आईच्या हाताची… मन आणि जीभ दोन्हीही तृप्त करणारी…" (हे मी म्हटलंय ;)… हे वाचून इतकं बर वाटलं होत म्हणून सांगू…
कारण कधी ऑफिस मधल्या लोकांबरोबर बाहेर जेवायला गेलो आणि कोल्हापुरी मागवते म्हटलं कि लगेच सुरु…
"अरे नही शिल्पा… बहुत तिखा होगा…."
अस्सा राग येतो तेव्हा… म्हणावं वाटत " अरे जरा कोल्हापूरला चला, तिथे खा मग कळेल कोल्हापुरी काय चीज आहे ते…"
कधी कधी तांबड्या-पांढऱ्या वर मस्त discussion सुरु असताना एखाद्या अमराठी मित्राला हुक्की येते… आणि न राहवून विचारतोच शेवटी… हे काय असत नक्की?
मग त्यांना कांचन style मध्ये सांगावं लागतं…
"वो लाल रंग का रस्सा होता है उसको तांबडा मतलब रेड केहते है और वो जो आळणी पाणी काढ के नारळ का दुध डाल के बनता है उसको पांढरा बोलते है…" special कांचन हिंदी आहे हे… :)
एखादा Non-Veg प्राणी असेल तर निदान म्हणता तरी येत बाबा खाऊन बघ मग कळेल पण हेच एका पक्का Vegetarian माणसाला समजावणं म्हणजे Real दिव्य… :)

असो… तर कोल्हापुरात आजही एक पद्धत आहे… घरी आलेला पाहुणा कधी मटण खाल्ल्याशिवाय परत जात नाही… मटणाच जेवण न करता पाहुणा गेलाच तर त्याला अन घरच्यानाही चुकल्यासारखं वाटतं… पाहुणचार अर्धवट राहिल्यासारखं वाटतं… आजही इथे लाडक्या लेकीच्या आवडत्या तांबड्या-पांढऱ्यानेच तिचं केळवण केलं जातं आणि घरी जावईबापूंना मटणाच्या ताटावर बसून मनसोक्त रस्सा हाणल्याशिवाय बायकोच्या घरी आल्यासारखं वाटतच नाही… :)
सासरी आल्यापासून अशी आईच्या हातची मेजवानी ५-६ महिन्यातून एकदाच मिळते पण पुढचे सहा महिने वाट पाहायला पुरेशी असते… :) पण आलीच कधी अचानक आठवण तर मग पुरेपूर कोल्हापूर किंवा लई भारी कोल्हापुरी मधलं जेवण specially तांबडा-पांढरा हाणला कि जीवाला कसं बर वाटतंय…
अशी या तांबड्या पांढऱ्याची चवच काही निराळी अस्ते…. एकदा खाल्यावर पुन्हा खाईपर्यंत जिभेवर रेंगाळणारी… :)

आता हे सगळं सुचायचं खर कारण सांगते… :)
कोल्हापुरी तांबडा असो वा पांढरा… तो चमच्याने वगैरे खाण्यात काही अर्थ नाही… खरी मजा आहे ती अख्खी वाटी तोंडाला लावून व्हरपन्यातच… :)
परवा दसऱ्या दिवशी घरी मी येळोणीची (कटाची) आमटी केली होती… टिंग्या नेहमीप्रमाणे जेवायला बसला… स्वतःच्या हाताने अगदी जेवनासकट तोही मावेल एवढं मोठ ताट घेऊन… आमटी चपाती खायला… :)
खाता खाता अचानक टिंग्याने वाटी उचलली आणि सरळ तोंडाला लावली… बघता बघता अर्धी वाटी आमटी फस्त केली… मी बघतच बसले… आश्चर्य आणि कौतुक दोन्ही भाव माझ्या तोंडावर टणाटण उड्या मारत होते… :) आणि आमटी व्हर्पुन टिंग्याच्या तोंडावर जग जिंकल्याचा आनंद… :) सगळंच अप्रतिम… तेव्हा नकळत मी म्हणून गेले…
"आत्ता खरा कोल्हापुरी शोभलास बघ टिंग्या…"
आमटी येळोणीची होती... पण भावना अगदी तांबड्या पांढऱ्या सारखीच जबरदस्त… तर असा हा कोल्हापुरी तांबडा-पांढरा एकदम… "नादखुळा....."

Tuesday, October 1, 2013

बाबा मोठा होतोय…

पिल्लाबरोबर पिल्लाचे बाबाही मोठा होतोय… नवीन जबाबदाऱ्या… नवीन हक्क… नवी काळजी… सगळ आत्मसात करतोय… बाबा मोठा होतोय…
टिंग्याच्या एका वहीवर नाव लिहायचं होत… तर त्याच्या बाबांनी लिहिल
"Shourya R. Kurle" instead of "Shourya S. Kurle" :) अजूनही आजोबांच्या नावाचं आद्याक्षर लिहिलं बाबाने टिंग्याच्या नावात… त्यावरूनच सुचलेलं हे सगळ….
Dedicated to Shailesh, Sagar ani Kailash...
(Tingyache baba...)
तुझा गोड गोड पापा घेऊनच, त्याच्या दिवस सुरु होतो
ब्रेकफास्टची डिश सुद्धा तो तुझ्या बरोबर शेयर करतो
ऑफिसला निघेपर्यंत फक्त तुझ्याच नावाचा गजर असतो
वस्तू विसरणं तर रोजचंच झालंय… निदान एकदा तरी माघारी फिरतो :)
laptop चा एक अख्खा Drive तुझ्याच गाण्यांनी भरलाय
desktop वरही बाबाने तुझाच हसरा फोटो लावलाय
आजीच्या खोड्या काढण्यात तुझी पुरेपूर साथ देतोय
तुझ्यासोबत पुन्हा आपलं बालपण जगतोय… बाबा मोठा होतोय… 
 
(Manuche Dadoo)
आपल्या लाडक्या लेकीसाठी त्याचा प्रत्येक वीकेंड फुल असतो
लेकीच्या भातुकलीच्या खेळात… तिच्याहून लहान होऊन खेळत बसतो
बाबाला कुणी हात लावलेलं लेकीला बिलकुल खपत नाही
अन लेकीला सर म्हटलेलं बाबाला पसंत पडत नाही
चिमुरड्या मनुडी भोवतीचं त्याचं… सगळ आयुष्य घुमू लागलंय
तुम्हा बाप-लेकीचं प्रेम रोज नव्या अर्थाने फुलू लागलंय
अग कुणी तुझ्या लग्नाचा विषय काढावा… तर हल्ली लगेच हळवा होतोय
पापण्यामधली आसवं हळूच लपवतोय… बाबा मोठा होतोय... 
 
(Chinuche Pappa...)
संध्याकाळी लवकर यायचं प्रॉमिस करत रोज सकाळी ऑफिसला पळतो…
रात्री कितीही दमला असला… तरी तुझ्याशी एकतरी गेम खेळतो
तुझा Tom & Jerry आता त्याचाही Favorite प्रोग्राम झालाय
तुझ्या अभ्यासासाठी पुस्तकांचा एक कप्पा आधीच भरून ठेवलाय
तुझ्या एका Smile वर अख्खं जग ओवाळून टाकतो
रोज सकाळी बाप्पाकडे तुझंच सुख मागतो
आपल्या लाडक्या चीनुसाठी जबाबदार्यांचं भलं मोठ्ठ ओझं पेलतोय
रोज स्वतःला नव्याने आजमावतोय बाबा मोठा होतोय

पिल्लू विचारतंय…  बाबा नक्की किती मोठा असतो ग आई…? बाबा म्हणजे नक्की काय ग आई?
त्यावर आई म्हणतेय… 

बाबा म्हणजे लहानपणी पहिलं पाऊल टाकायला
आणि मोठेपणी उभं रहायला मिळणारा "आधार"
बाबा म्हणजे लहानपणी आपल्याला घडवणारे
आणि मोठेपणी आपलं आयुष्य घडवणारे "संस्कार"
बाबा म्हणजे लहानपणी लहानपणी चुकलो म्हणून
आणि मोठेपणी चुकू नये म्हणून खाल्लेला पोटभर "मार"
बाबा म्हणजे लहानपणी आपण त्याच्या खांद्यावर टाकलेला
आणि मोठेपणी आपले खांदे मजबूत करणारा "भार"
बाबा म्हणजे लहानपणी गावी गेलेल्या बाबाच्या आठवणीने
आणि मोठेपणी बाबाला सोडून जाताना लेकीच्या डोळ्यातून अखंड वाहणारं "पाणी"
बाबा म्हणजे लहानपणी आणि मोठेपणी अगदी आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी
आपल्या अस्तित्वाला मिळणारा खरा "अर्थ…"
बाबा म्हणजे…. मनुचे डॅडू… चीनुचे पप्पा आणि टिंग्याचे बाबा… :)
- टिंग्याची आई