Monday, December 31, 2012

आईचं ऑफिस...

२८ डिसेंबर २०१२.... The best day in office.. :)
माझा टिंग्या आला होता ऑफिस मध्ये..... खूप मज्जा आली होती....
ऑफिस मध्येच cubicle मधून हिंडत फिरत दंगा चालला होता... आईचा PC दोन तीनदा restart मारला... :)


सगळ्या मामा मावशींनी दिलेला खाऊ खाल्ला... आणि झोप आली तेव्हा कांचन माउने छान झोपवला.... :)
We all enjoyed the day with dearest Tingya.. :)





आज न मी आईच्या ऑफिसमध्ये  गेलो होतो....
ऑफीस म्हणजे नक्की काय... आज सगळ स्वत्ता बघत होतो ... :)
ऑफीस कसलं..? छोटस एक सुंदर असं गावच इथे आहे...
मोठ्ठ्या मोठ्ठ्या बिल्डींग.. आणि मस्त swimming pool सुद्धा आहे....

आई सारखाच ID इथे... सगळेजण गळ्यात घालतात...
एवढा मोठ्ठा रिकामा रोड.. तरी फुटपाथ वरूनच चालतात.. (discipline ;)..)
इथे ना जादूची एक खोली आहे.. तिला लिफ्ट असं म्हणतात...
त्यात बसून सगळे.. एका मिनिटात हव तिथं जातात....

इथे सगळ्यांकडे एक एक T.V. (PC) आणी फोन आहे....
इतकं काम करतात कि कोणाला माहीतच नसतं.. आपल्या पलीकडे कोण आहे...
मी जरा T.V. जवळ गेलो.. कि आई मला कित्ती कित्ती ओरडते ...
आणि इथे म्हणे दिवसभर.. या टीव्हीतच डोक घालून बसते....

आईच्या ऑफिसमध्ये खूप मावशी आणि मामा होते...
आपापली काम सोडून.. सगळे मलाच भेटायला आले होते....
पहिलीच भेट आमची.. पण मी त्या सगळ्यांना अगदी जशाचा तसा माहिती होतो...
आईच्या कविता आणि गप्पांमधून.. म्हणे मी रोजच त्यांना भेटत असतो...

आईने आपला कोपरा (cube) खूपच छान सजवलाय....
देवबाप्पाचा एक आणि बाकी सगळीकडे माझाच फोटो लावलाय.... :)
सगळी काम सोडून कधी कधी... म्हणे नुसतेच माझे फोटो बघत बसते...
आणि खूप आठवण आली कि.... इथेच माझ्यावर कविता लिहित बसते ....

कळतच नाही मला... आई एवढ्या दूर कशासाठी येते.... :(
माझी आठवण आली की.. उगीच ऑफिसमध्येच रडत बसते....
कित्ती छान असलं... तरी ऑफीस शेवटी ऑफीस आहे...
आज सोबत आणलस.. पण टिंग्या रोज थोडीच तुझ्यासोबत येणार आहे.....???

- टिंग्याची आई

Tuesday, December 25, 2012

काही क्षणांची भेट ...

मी टिंग्याच्या आत्याकडे गेले होते चार दिवस राहायला... नेमकं त्याच गावात माझ्या दीदीच्या दूरच्या पाहुण्यांचं लग्न होत... नेमक्या त्याच दिवशी मलाही पुण्याला निघायचं होत.... गाडी होती १२ वाजताची... दीदी माझ्यासाठी आली होती त्या लग्नाला..... अगदीच धावती भेट झाली आमची.... खूप दिवसांनी भेटलो होतो दोघी... छोटीशीच भेट पण खरच खूप बर वाटलं....



एका आईच्या दोन लेकी.... आज एकमेकीला भेटल्या...
गंगा जमुना हातात हात घालून आल्या.. अन दोघींच्याही डोळ्यात दाटल्या...
एक आली होती कोणाच्यातरी लग्नाला.. तर दुसरी नंदेकडे राहायला....
आज काहीही कारण चालल असत.. दोघींनाही भेटायला....

एकमेकींच्या पिल्लांना दोघींनीही.. डोळेभरून बघितलं...
खूप दिवसांनी भेटलेल्या मावशीला... पिल्लांनी पण लग्गेच ओळखलं...
आपल्या भाच्याला ताई.. "मावशी" म्हणायला लावत होती...
धाकटी नुसतीच ताईकडे..... कौतुकाने पहात होती....

खूप जुनं ताईच घड्याळ.. धाकटी अजूनही वापरत होती....
आज धाकटीनेच घेतलेली साडी.. ताई मुद्दाम नेसून आली होती....
पिल्लांना एकत्र खेळताना पाहून.. दोघी मावशा सुखावल्या...
आपण कधी भेटायचं..?? म्हणत दोघी कडकडून भेटल्या....

शब्द न्हवते.. नुसतं डोळ्यातलं पाणीच बोलत होतं...
सासुरवाशनिला बहिणीच्या मिठीत.. जणू माहेरच सापडलं होतं...
बोलायचं खूप काही होत.. पण दोघी नुसत्याच बघत होत्या...
घळघळ अश्रू वाहत होते.. आणि खळखळून हसतही होत्या....

काहून रडती या लेकुरवाळ्या.. प्रश्न पडे लोकांना...
कोणाला काही वाटो.. आज फक्त पोटभरून भेटायचं होत त्या दोघींना....
तिकडे आईच्याही पापण्या.. उगीचच ओल्याचिंब झाल्या होत्या...
घरट्यात नसल्या.. तरी तिच्या चिमण्या आज एकत्र आल्या होत्या....

इन मीन दहा मिनिटांची भेट.. तासभर गप्पा त्या कुठल्या....??
आता परत भेट कधी ..? म्हणत पुन्हा एकदा दोघी कडकडून भेटल्या... :(
आता नेहमीसारखेच पुढेही... facebook वर नुसतेच फोटो पाठवायचे...
फोनवरच्या गप्पांमध्ये.. या गोड भेटीतले क्षण पुन्हा पुन्हा आठवायचे...

अवघ्या काही क्षणांचीच भेट... पण खूप काही देऊन गेली...
आठवणींची छोटीशी शिदोरी.. दोघी बहिणींनी आपल्या सोबत नेली...

- टिंग्याची आई (छकुल्याची मावशी)

Wednesday, December 19, 2012

कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला एक टेबल...

कुणीतरी जाणून बुजून लक्ष द्यावं.. असा मी मुळीच नाही...
आणी सहसा तसं लक्ष कोणी देतही नाही...
सगळ्यांसाठी सारखाच...
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

सकाळी सकाळी ऑफिसच्या गडबडीत एखादा रोजचाच माणूस येतो....
तीच ती चहाची ऑर्डर पुन्हा एकदा मागवतो ....
चहाच्या घोटाबरोबर ४-५ बातम्या वाचतो....
तर कधी दिवसभराच्या कामाची यादी वाचून दाखवतो...
घरातली टेन्शन देखील कधी कधी नकळत बडबडतो...
सरकारला शिव्या घालत.. महागाईचे चटके सोसायला पुन्हा बाहेर पडतो...
त्याची कित्येक मूक आक्रंदन ऐकणारा....
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

भर दुपारी कॉलेजचा एक ग्रुप धाडकन आत शिरतो..
आणि क्षणार्धात माझा ताबा घेऊन टाकतो...
कधी ट्रीप.. कधी नाटक... रोज नवा प्लान ठरतो....
एक करतो कविता... तर दुसरा शिव्यांनी दाद देतो....
एखाद्याचं तुटलेलं दिल.. कोणीतरी जोडायला मदत करतो...
कधी शिवबाचा मावळा जणू ... लढायलाही एका पायावर तयार असतो.....
दंगा-मस्ती सोबत त्यांच्या करियरच प्लानींग देखील करणारा....
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

संध्याकाळी एखादा प्रियकर आपल्या प्रियेला घेऊन येतो...
तिचा हात हातात घेऊन... चार चौघांना जळवतो...
मुद्दामच दोघांत मिळून एकच चहा मागवतो....
तिच्या डोळ्यांत डोळे घालून भविष्याची स्वप्न रंगवतो...
तिच्यासाठी तो सर्वस्व आणि तिलाच तो आपलं जग मानतो....
त्याच्या मिठीतच तिला तिचा संसार गवसतो....
त्या दोघांसोबत त्यांच्या गोड आयुष्याचं स्वप्न रंगवणारा...
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

संध्याकाळच्या वेळी एखादा नातू आपल्या आजोबांसोबत येतो...
त्यांची काठी हातात घेऊन स्वतःच त्यांना आधार देतो...
शाळेतल्या सगळ्या गमती जमती नातू आजोबाला सांगतो....
नातवाच्या रुपाने आजोबा... पुन्हा एकदा बालपण जगतो....
थकलेल्या आजोबांच्या पावलांना.. नातू गती देतो....
जणू विशाल वटवृक्ष छोटयाशा रोपट्याच्या सावलीत विसावतो....
जुनं आणि नवं त्यांच्या नात्यात एकत्र अनुभवणारा...
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

असाच माझा दिवस या सगळ्यांच्या सहवासात जातो....
आंबट-गोड भावनांमध्ये नकळत  मीही गुंफला जातो.....
रात्र झाली तरीही मी नेहमीच कोणाचीतरी वात पाहतो....
भरकटलेला कोणीतरी वाट शोधत शोधत नक्कीच येतो....
रात्री उशिरा एखादा हॉटेलातला लहानगा माझच अंथरून करतो....
त्याला आणि त्याच्या अनंत स्वप्नांना मी रोजच सांभाळतो...
रात्रीच्या एकाकी काळोखात.. पुन्हा  नव्या  उद्याची वाट पाहणारा...
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

- शिल्पा 
टॉपिक सिलेक्शन : My cubicle friends :)

Monday, December 17, 2012

गप्पा...

नेहमी प्रमाणे लंच टेबल वर... आमच्या गप्पा रंगल्या होत्या...
एक एक करत हळू हळू सगळ्याच विषयांना हात घालत होत्या...
एकमेकांच्या टिंगल टवाळ्या... कधी रुसवे-फुगवे...
बरेच काही चालू होते... थोडे जुने.. थोडे नवे.....

मधूनच मी पटकन बोलून गेले...
नको होता.. नेमका तोच विषय काढून चुकले...
आपलंच कोणीतरी जेव्हा काळजावर घाव घालत....
डोळ्यातला पाणीही जेव्हा आपल्यावर रुसत....
कळत नकळत सगळच पुन्हा एकदा सांगितल...
गहिवरलेल मन थोडस मोकळ केल....

क्षणभर सगळेच शांत झाले...  अन कुठेतरी हरवले...
आठवणींचे पटल जणू भराभर उलटून गेले...
बोचऱ्या क्षणांनी अंगावर शहारा आणला....
खूप खूप आतून आलेला  हुंदका.... काठावर साचला....
चुकून वेदनेची तार कुठेतरी छेडली गेली होती...
प्रत्येक वाक्याबरोबर एकेक खपली निघत होती...

फक्त क्षणभरच...
मग पुन्हा एकदा सगळेजण NORMAL झाले..
हसत हसत मला solution द्यायला बोलते झाले..

डोळे कोणाचेच पाणावले न्हवते.. पण मन नक्कीच गहिवरलेल होत...
जे विसरायचं ठरवलं होत तेच पुन्हा आठवत होत....

आज कळल... या professional जगात..
हसणारा प्रत्येक चेहरा मनातल्या एका कोपर्यात अश्रू ढाळत असतो ...
आमच्यातला प्रत्याकजण कुठेना कुठेतरी दुखावलेला असतो....

- शिल्पा
(Wriiten on 19-June-2012)

Saturday, December 15, 2012

तुझी आठवण आली होती म्हणूनच..

कारण नसताना काल अशीच घराबाहेर पडले...
तासभर शंभुच्य देवळात जाउन बसले...

डोळेभरून महादेवाचं दर्शन घेतलं....
आणि त्याच्या पुढ्यातच पद्मासन घातलं...

गाभार्यातला तो गारठा आणि मंद शांतता..
मी म्हटलेला ओम च फक्त तिला भेदत होता..

तेवणार्या नंदादिपासोबत.. तासभर तिथेच बसून राहिले...
हवे नको ते सगळे प्रश्न देवाला विचारले...

माहिती होत.. उत्तरं तर मिळणारच न्हवती...
पण मला सगळ सांगायला एक जागा हवी होती...

याहून चांगली जागा मिळणच शक्य न्हवत...
तू गेल्यापासून.... माझ ऐकून घेणारं दुसर कोणीच न्हवत...

तुझी आठवण आली होती म्हणूनच.. देवाचं  दार होत गाठलं....
त्याच्या कुशीत डोकं  ठेऊन.. थोडंस रडून... मन हलक करून घेतलं....

पुन्हा कधी फिरून आलीच तुझी आठवण.. तर परत त्याच्याच दारी जाईन...
रिकामी माझी ओंजळ.. तोच पुन्हा सुखाच्या थेंबांनी भरून देईल....

- शिल्पा

तुझी आठवण आली की असच काहीसं होत...

डबडबलेले डोळे... गहिवरलेला श्वास..
दाटून आलेला कंठ.. अन तू जवळ असल्याचा भास.....
तुझी आठवण आली की असच काहीसं होत...

व्याकूळ झालेलं मन.. कासावीस झालेला जीव....
तुझ्यासाठी धडधडणार ऊर... अन फक्त तुझीच उणीव...
तुझी आठवण आली कि असच काहीसं होत...

अवचित थबकलेली पावलं.. थरथरणारे दोन हात...
एक अनामिक कालवाकालव... अन हवी हवीशी वाटणारी तुझी साथ...
तुझी आठवण आली कि असच काहीसं होत...

ओठांतच विरलेली हाक.. सर्वांगातल हरवलेलं बळ...
स्वतःलाच मारलेली घट्ट मिठी... अन तुला भेटण्यासाठी अखंड तळमळ....
तुझी आठवण आली कि असच काहीसं होत...

अशाच वादळासारख्या धावून येतात आठवणी..
त्यात गुरफटलेली मी...
रोज अशीच जाते सांजवेळ...
मागे उरते एकटीच तुझी वाट  पाहणारी मी....

-- शिल्पा

नुसतंच सुचलं म्हणून लिहून टाकलं... :)

Friday, December 14, 2012

अर्थहीन.....


अशीच कधीतरी सांजवेळी...  बेधुंद रातराणी फुलते...
मनाच्या भेगाळलेल्या जमिनीत... तुझ्या आठवणींची सर बरसवून जाते....

---------------------

गळून गेलेली पान... कोणाच्या कशी लक्षात राहणार..
त्यांनी जागा सोडल्याशिवाय.. नवीन पालवी तरी कशी काय उमलणार..
माणसांचाही थोडफार असंच असतं..

---------------------

तुमची काहीही चूक नसताना.. जी माणस तुम्हाला शिक्षा करतात....
ती खूप जवळची असतात..
कारण...
त्यांना ठाऊक असतं... तुम्ही नक्की समजून घ्याल....

---------------------

हल्ली SMS ची सवय मोडलीये..
आणि तासनतास फोनवर गप्पा मारायचीही...
अग..
तू सोडून गेलीस त्याच दिवशी.. मोबाईल लाही राम राम केलाय.. :)

----------------------

प्रत्येक वेळी समजून घेणाऱ्या माणसालाही...
कधीतरी वाटतच असेल....
कोणीतरी मलाही समजून घ्यावं.. नाही का..??

---------------------

शिल्पा लिमकर

 

Tuesday, December 11, 2012

बोला ना ओ माझ्याशी...

टिंग्याच्या काकांनी आम्हा सगळ्यांना घरी बोलावलं होत... पण आम्हाला जाता आल नाही तेव्हा आमचे काका आमच्यावर रुसले होते.... बघा कशी पुतण्या काकाची मनधरणी करतोय....
हसतील का खरंच आमचे काका टिंग्याने हसवल्यावर.... ???


बघा ना ओ आई बाबा..
आज काका माझ्यावर रुसलेत..
रागाने नाक झालंय लाल....
आंनी गाल कसे टूमकन फूगलेत.....

आपण काल घरी गेलो नाही....
म्हणून काकांना राग आलाय...
मघाशी आईने केलेला फोन पण..
त्यांनी direct CUT केलाय....

अहो काका... bag सुद्धा भरली होती
मला खरच यायचं होतं....
पण काय करणार.. ऐन वेळी.....
बाबांना खूप मोठ्ठ काम आलं होतं....

आई गुंग तिच्या कामात..
तर बाबा Busy ऑफिसमध्ये...
सायकल वरून एकटा कसा येऊ..
सांगा एवढ्या ट्राफिकमध्ये...

अस्सच करतात सारखं दोघे...
माझ बिलकुल ऐकत नाहीत..
एकटा जातो म्हटलं काकीकडे..
तर मला पाठवत सुद्धा नाहीत...

चिनू दादा तिकडे माझी..
खूप वाट  बघत असेल...
कधी भेटेल शौर्य (टिंग्या) आपला..??
काकी रोजच म्हणत असेल.....

सांगितलंय मी आज्जीला..
आपण मामाला बरोबर घेऊया...
आई बाबांना इथेच सोडून..
तिघेच काकांकडे जाऊया....

काका.. खरंच येणार आहे मी तिकडे..
मग आपण खूप खूप मज्जा करू....
चिमुकल्या तुमच्या या पिल्लावर..
असा राग नका न धरू....

बोला ना ओ माझ्याशी...
काका अस नका ना करू.... :(
तुम्हाला हसवायला मी सांगा..
आणखी काय काय करू....??

आजी म्हणाली होती.. तूच सांग..
म्हणजे काकाचा राग लग्गेच जाईल...
खर सांगतो.. तुम्ही नाही हसलात...
तर आता मलाच रडू येईल..... :(

टिंग्याचे बोल ऐकून काका हसलेत कदाचित.... बघा पुढे कसा म्हणतो हिरो.... :)

कित्ती स्वीट काका माझे...
कसे लग्गेच गोड गोड हसले....
रडलो बिडलो काही नाही....
मी उगाचं रडायचे नाटक केले... ;)

- टिंग्या (-ची आई)

Saturday, December 8, 2012

पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....

टिंग्याचे काका आजोबा रिटायर झाले हल्लीच.. त्यांच्या छोट्याशा फेअरवेल पार्टी  मध्ये आम्हा सर्वांच्या भावना अशाच काहीशा होत्या.... :)
आयुष्यात जेव्हा जेव्हा पडलो अडखळलो...
जगाच्या रीतीने चालताना अनेकदा धडपडलो....
प्रत्येक वेळी तुम्ही आधाराचा हात आम्हास दिला...
संकटांचा डोंगरही कधी कधी त्या हातांनी सहज पेलला..
त्याच हातांमध्ये आता नातवांचे चिमुकले हात धरा..
पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....

लेकाची कॉलेजची फी.. तर कधी पुस्तकं लेकीची ..

कधी रात्री अपरात्री करावी लागलेली धावपळ औशाधासाठीची...
आमच्या गरजा भागवल्या.. कष्ट सहन करून स्वता...
आम्हा मुलांनाही होऊ दया थोडंस मोठ आता....
कुठे चुकलोच अजूनही.... तर कान मात्र नक्की धरा....
पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....

आमच्या परीक्षांमुळे कितीतरी बेत कॅन्सल झाले...

ट्रिपचे बरेचसे plan नुसतेच ठरत राहिले...
जुने पुराने बेत आता पुन्हा आखायला बसू...
आम्हा मुलांना पहायचय तुमच्या चेहऱ्यावरच छान हसू...
आजीला घेऊन आता.. एक मस्त world टूर करा....
पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....

आमच्या आवडी निवडींमध्ये तुमचे छंद कुठेतरी हरवले ..

आनंदातच आमच्या... तुम्ही आपले समाधान शोधले...
आयुष्यातल्या प्रत्येक स्पर्धेत तुम्ही आम्हाला cheer केले आहे...
अजून जिंकलो नसलो तरी हरलेलो नाही याचंच मोठ समाधान आहे..
चला .. आता तुम्ही पण स्वतःमध्ये एक नवीन चार्म भरा..
पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....

भर उन्हात चालताना तुम्ही आम्हाला सांभाळल...

कधी स्वतःच चप्पल सुद्धा आमच्या पायात घातलं...
तुमच बोट धरून चालणारं पिल्लू आता उंच झेप घेतंय...
त्याच्या भरारी पुढे हे आकाश सुद्धा झुकतंय...
पण तुमच्या प्रेमाची साऊली सतत त्याच्यावर धरा...
पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....

आमच्या आजारपणात जागून काढल्या कित्येक रात्री...

आम्हाला नवीन आणि स्वतः मात्र वापरली तीच जुनी छत्री...
आमच्या काळजीत घालवले कित्येक उन्हाळे अन पावसाळे...
तुमच्यामुळेच मोठी होऊ शकलो आम्ही तुमची बाळे...
आमची काळजी सोडून.. आता थोडी स्वतःचीही काळजी करा..
पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....

छोटया छोटया गोष्टीत शोधू पुन्हा छोटी छोटी सुखं...

कितीही मोठी असली तरी विसरून जाऊ सगळी दुखं...
पिलांच्या बरोबर सोनेरी करूया आता एक एक क्षण..
रेशीम धाग्यांनी आणखी घट्ट करू ही नात्यांची वीण...
सगळे मिळून जगूया.. आयुष्यातला हा आनंद खरा...
पुरे झाल काम... आता थोडा आराम करा....

-- शिल्पा काकी


Wednesday, December 5, 2012

दूरदेशी गेलाय आपला बाबा....

बाबा दूरदेशी गेलाय आणि आई इकडे बाळाला सांभाळतेय.... कधी कधी तिलाही भावना अनावर होतात.... त्याचच थोडस चित्रण करायचा हा प्रयत्न....

दूरदेशी  गेलाय आपला बाबा ..
आई एकटीच सांभाळतेय इकडे तुला...
बाबाविना दिवस काढायचे सामर्थ्य मिळत..
बाळा  तुझ्याकडेच पाहून मला....

बाबा हवाय आत्ताच मला...
म्हणून किती रे करशी हट्ट...
रडता रडता बाबाच्या फोटोला....
मिठी मारशी कित्ती कित्ती घट्ट...

आईने कुशीत घेतल्यावर...
रडायचा तू थांबशील रे बाळा...
पण मी कोणाला दाखवू सांग...
या अंतरातल्या विरह कळा..

रोज तुला भातु भरवताना..
बाब्च्याच गोष्टी सांगते स्वीट स्वीट...
पण बाबा भूर गेल्यापासून...
आई जेवली नाहीये रे नीट ...

तुझ्याच टपोऱ्या डोळ्यात...
ह्यांना (बाबाला) पाहिलंय रे मी कितीदा..
तुझ्या चिमुकल्या हातात....
स्पर्श त्यांचा (बाबाचा) जाणवतो बऱ्याचदा...

सांगशील का रे बाप्पाला तुझ्या....
माझी एकच गोष्ट ऐकायला....
आत्ता लग्गेच आपल्याला...
बाबाच्या गावी धडायला.....


इवलासा आहेस रे सोन्या...
म्हणूनच मी सांगत नाही तुला...
तुझ्या सारखीच खूप खूप खूप....
बाबाची आठवण येतेय रे मला..... :(

हे ऐकून.. आईला समजावताना पिल्लू कस म्हणत.....

शहाणी माझी आई ती....
असं वेड्यासारखं नाही ग करायचं...
पाठवेल ना बाबा  आपलं तिकीट...
आपण लवकरच त्याच्या गावी जायचं.... :)

- शिल्पा

Tuesday, December 4, 2012

काय झालंय ग आई...?

काय झालंय ग आई...?
आज तू हसत का नाहीस.?
ताप आलाय न तुला...
म्हणूनच का माझ्याशी बोलत नाहीस...?

मला थोडूस बर नसलं..
कि तू लग्गेच सुट्टी घेतेस...
आणि तुला एवढा ताप आलाय...
मग उगीच कशाला ऑफिसला जातेस.. ??

डॉक्टर काका इंजेशन देतील...
 रडायचं नाही हा आज्जीबात...
खूपच जर दुखलं तुला...
तर तू हळूच धार माझा हात....

डॉक्टर काकांनी दिलेलं औषध..
सगळ संपवायचं बर....
थोडूसच कडू लागेल ग...
मी सांगतोय अगदी खर.....

बर नाही म्हणून जेवत नाहीस...
माहिती आहे ग मला..
पण खाशील का ग थोडासा वरणभात..?
आज मीच भरवणार आहे तुला ...

आई.. मला ताप आल्यावर..
मी रात्रभर तुझ्या मांडीवरच झोपतो...
काळजी करू नकोस ग...झोप माझ्या मांडीवर...
आज मी तुला थोपटतो....

रात्री स्वप्नात माझा बाप्पा भेटेल...
तेव्हा त्याला मी सांगेन....
माझ्या आईला लग्गेच बर कर...
नाहीतर मी तुझ्यावर रुसेन.... :(

बाप्पा माझा खूप खूप गोड आहे...
माझ किनई तो नक्की ऐकेल..
रात्रीच ताप भूर पळून जाईल....
आणि आईला माझ्या लग्गेच बर वाटेल.....

आई मनात म्हणते..

एवढासा चिमुकला आहेस ...
तरी तुला इतक कस रे कळत....
कस सांगू पिला तुला...
तुला पाहूनच आईला लग्गेच बर वाटत 


- टिंग्याची  मम्माई 

Friday, November 30, 2012

बाबांनी सांगितलेली गोष्ट....

रोज आई गोष्ट सांगते ती बाळाला एवढी आवडत नाही... पण बाबांनी चार गोष्टी कशातरी एकत्र करून आठवेल तशी ऐकवलेली भेळ-मिसळ मात्र खूप आवडली आहे लेकाला आमच्या...... :)
पहा किती गोष्टी आठवतात तुम्हाला..... :)

ऐक ना ग आई....
काल रात्री बाबांनी मला...
एक छान गोष्ट सांगितली.
तुझ्या रोजच्या गोष्टी पेक्षा...
मला बाबांचीच गोष्ट  खूप खूप आवडली...

तुझ्या गोष्टीत नुसतेच चिऊ  काऊ...
आणि रोजच मोठ्ठा पाउस असतो...
काउच घर सारखं वाहून जात...
आणि बिच्चारा पुन्हा चिऊच दार वाजवत बसतो....

पण ना.. बाबांच्या गोष्टीत मात्र ...
चिऊ काऊ सोबत कोल्हा पण असतो...
भोपळ्यात बसलेली म्हातारी... आणि...
छोट्टासा उंदीर मामा सिंहाला वाचवतो....

ऐक ह....


एक असते चिऊ आणि एक असतो काऊ...
चीउच घर शेणाच आणि काउच असत मेणाच..
एकदा खूप खूप मोठ्ठा पाउस  येतो....
आणि म्हातारीचा वाडा वाहूनच जातो....

म्हणून म्हातारी आपल्या लेकीकडे जाते..
परत येताना मोठ्ठ्या भोपळ्यात बसते...
जंगलात तिला मग एक कोल्हा भेटतो...
म्हातारीची सगळी बोर तो खाऊन टाकतो...

बोर खाऊन कोल्हा जंगलात पळून जातो...
सिंहाच्या गुहेत जाऊन दडून बसतो...
गुहेतला सिंह शिकार्याच्या जाळ्यात अडकतो...
मग छोट्टासा उंदीर मामा त्याला दोरी कापून सोडवतो..

पुढे राजाची टोपी उंदीरमामा पळवतो...

पावसात भिजत भिजत आपल्या बिळात घुसतो....
डोंगरावर मग ससा कासवाशी रेस लावतो....
कासव जात झोपून आणि.. ससाच  रेस जिंकतो...

अग आई...
शेवटी एकदाचा पाउस गेला..
चिऊ आणि काऊ सगळे भूर उडून गेले....
आणि मला गोष्ट सांगता सांगता....
बाबा तर माझ्या आधीच झोपी गेले.... :)

- टिंग्याची आई

Friday, November 23, 2012

आणखी काय हवंय आईला....

गोड गोड साखर झोपेत...
आईला उठायचा अगदीच कंटाळा आलेला असताना...
डोळे उघडताच तू दिलेली एक क्युटशी स्माईल...
आणखी काय हवंय आईला... दिवसाची  सुरुवात करायला...

रोजच सकाळी उंबर्यावर....
ऑफिससाठी आईचा पाय निघता निघत नसताना...
Bye Bye म्हणत.. तू दिलेला एक गोड गोड पापा...
आणखी काय हवंय आईला.... संध्याकाळची वाट पाहत ऑफिसला निघायला...

नेहमीच्याच कामाच्या टेन्शन मध्ये...
मधूनच desktop वरचा तुझा फोटो न्याहाळत असताना...
फोनवर तुझ... "आई लवकर ये ना ग.." अस सांगण....
आणखी काय हवंय आईला.... तुझ्याविना दिवस कसातरी पुढे ढकलायला....

दिवसभर वेडी तुझ्याच आठवणीत राहून...
ऑफिसमधून येताना तुला भेटायला अधीर झालेली असताना...
दार उघडताच तू मारलेली घट्ट मिठी.....
आणखी काय हवंय आईला.... दिवसभराचा शीण विसरायला...

चिऊ काऊशी गप्पा मारत...
मऊ मऊ वरण भात तुला भरवत असताना...
तू भरवलेला एक चिमुकला घास....
आणखी काय हवंय बाळा... आईच पोट भरायला..

तुला गाणी-गोष्टी ऐकवत.. तुझ्याशी खेळून...
तुझ्या मागे धाऊन धाऊन आई दमलेली असताना....
खोट खोटच तिला थोपटणारा  तू....
आणखी काय हवंय आईला... रात्री शांत झोप लागायला....

कधी बनशी छोटा भीम तर कधी खट्याळ कृष्ण...
सारखा सारखा त्रास देशी.. आजीला काम करत असताना....
अशा या तुझ्या रोजच नवनवीन लीला...
आणखी काय हवंय तुझ्या मम्माईला... तुझ्यावर गोड गोड कविता लिहायला.. :-)

- टिंग्याची आई...
टिंग्याने dictionary ला बहाल केलेला नवीन शब्द -->
मम्माई = मम्मा + आई 

Inspiration : परवा सकाळी उठल्या उठल्या टिंग्याने दिलेली Cuuuuuute स्माईल... :-)


Tuesday, October 16, 2012

रांगोळी.....

परवा ऑफिसला येताना... एका रांगोळी वाल्याचा उलटा पडलेला गाडा पाहिला.... सगळी रांगोळी विस्कटली होती.. फक्त क्षणभरच गाडीवरून येता येता  पाहिलं ... तेव्हाच कधीतरी सुचलेलं....


सकाळच्यापारी रंगोळीवाला घना. आज लवकर तयार झाला...
धुवून पुसून आपला गाडा.. त्याने चांगला स्वच्छ केला...
 लाल, निळा, हिरवा, पिवळा अनेक रंग... आज सगळा नवा माल काढला...
लहान मोठ्या भांड्यामध्ये एक एक रंग सजला....

त्याची चिमुरडी लेक पण आज हाताखाली लुडबुडत होती...
संध्याकाळी बाबा कडून तिला.. नवी बाहुली हवी होती...
बायकोही त्याची आज जरा खुशीतच  दिसत होती...
येत्या दिवाळीला... तिला पण नवी साडी चोळी मिळणार होती...

रांगोळी.. रांगोळी.. ओरडत चार पाच गल्ल्या हिंडून झाल्या...
सकाळच्या भवानीला (बोहणी)... चांगल्या पाच पुड्या खपल्या....
खिशातल्या नोटांकड बघून तो अन त्याच्याकड बघून त्या पण हसल्या...
जणू बायको आणि पोरगी समोर नटून थटून उभ्या राहिल्या....

देवाला हात जोडत.. जरा खुशीतच तो पुढ निघाला.
रहदारीच्या रस्त्यावर त्याने.. गाडा जरा जपूनच घातला...
पण...... भरधाव येणाऱ्या एक गाडीन.. चांगलाच घाव घातला...
बघता बघता सगळा गाडाच  त्याच्या डोळ्यासमोर पालथा झाला...

थांब थांब म्हणुस्तोवर.... ठोकणारा कवाच पसार झाला...
शंभराची एक नोट.. नुसतीच हवेत भिरकाऊन  गेला....
रिकाम्या हाताने.. घना परत गड्याजवळ आला...
उरल सुरल बळ एकवटून.. गाडा तेवढा सरळ केला...

कुठे लाल.. कुठे हिरवा तर कुठे नीळा... काहीच कळेना....
कसा वाचवावा एक एक रंग.. त्याला काहीच सुचेना..
तासभर प्रयत्न करूनही.. एकही रंग वेगळा निघेना...
नवी बाहुली आणि साडी-चोळी... आता दुसर काहीच त्याला दिसेना...

आयुष्यातले रंगही त्याच्या होते.. असेच काहीसे विस्कटलेले...
सुखापेक्षा दुखाचेच माप सदा झुकलेले...
तरीही रोज रात्री.. समाधानाने डोळे मिटलेले....
ओठांवर नेहमीच हसू.. आणि आत खोलवर नुसतेच दुख साचलेले...

शेवटी विस्कटलेल्या रंगासोबत... त्याने मातीसुद्धा भरली...
आणि भरल्या डोळ्याने... घराकडची वाट  धरली...
दोन्ही हातांनी ती रांगोळी त्याने हज्जार वेळा गोंजारली...
आज त्याच्या ऐवजी गाड्यानेच.. त्याला घरापर्यंत वात दाखवली...

झोपडीबाहेर आता गाडा एकटाच शांत उभा होता....
आणि आत घना गुढग्यात डोक घालून... हुंदके देऊन रडत होता...
आज अचानकच दाटून आलेल्या आभाळात.. कोपर्यावरचा ढग एकटाच टीप गाळत होता...
सकाळपासून घनाच्या अश्रूंत भिजलेली ती रांगोळी... आता पाउस ओली चिंब करत होता....

- टिंग्याची आई..

Thursday, October 11, 2012

बाबाच्या कुशीत शिरायचं....

काय झालय ग आई तुला.?
अशी गप्प गप्प का बसतेस..
बाबा गावी गेल्यापासून...
सारखी एकटी एकटीच रडतेस...

अग बाबाच्या त्या गावाला म्हणे....
Onsite अस म्हणतात...
कुठलीच बस जात नाही तिकडे... 
सगळे खऱ्याखुऱ्या विमानानेच जातात......

जाताना मला बाबाने सांगितलय..
तुझी काळजी घ्यायला...
म्हणूनच कालपासून लागलोय बघ मी...
सगळ सगळ दूधू प्यायला.....

अग आई.. तुझे डोळे पुसायला..
इथे तुझ्या सोबत मी आहे....
पण खर संग आत्ता....
माझ्या बाबा जवळ दुसर कोण ग आहे.....?

मला पण कळतच नाही....
बाबा का गेलाय एवढ्या दूर....
कडेवर बसवून रोज संध्याकाळी ....
आता कोणाला तो नेईल भूर..?

तिकडे म्हणे बाबाला ना ...
खूप खूप पैसे मिळतात...
सांग त्याला माझ्या money बँक मध्ये पण...
आबा रोज एक रुपया टाकतात...

आपल्याला इथे सोडून...
बाबा तरी कसा काय ग रहात असेल.
तुझी आणि माझी त्याला...
कित्ती कित्ती आठवण येत असेल....

आत्ता तू इथून हाक मारलीस...
तरी सुद्धा तो लग्गेच ओ देईल....
तू जास्त आठवण नको काढू.
नाहीतर काम सोडून बाबा खरच परत येईल. :)

रोज रात्री LATPOT वर...
आपण बाबाला भेटायचं...
त्याच्या समोर रडायचं नाही ह...
फक्त हसत हसत गुड नाईट म्हणायचं....

आई तू काळजी करू नकोस ग...
देवबाप्पाला मी कालच सांगितलय...
माझ्या पासपोर्ट च काम आता..
त्याने स्वत्ता हातात घेतलय....

लवकरच आपण बाबाच्या गावी जाऊन... 
वाट पाहणाऱ्या बाबाला Surprise द्यायचं..
आणि दोघांनीही धावत जाऊन..
बाबाच्या कुशीत शिरायचं....

- टिंग्याची आई...


Tuesday, October 2, 2012

रिकामा खिसा... :-)

खूप भूक लागली होती म्हणून काल IBPO (फूड कोर्ट) ला गेलो जेवायला..
जाता जाताच काय काय खायचा सगळा बेत आखला...
पैसे हवे होते म्हणून दोघींनीही कांचाकडे हात पसरला...
आणि त्याने मात्र रिकामा खिसा आमच्या पुढे उलटा करून दाखवला...
तिघांचीही तेव्हा आमची मस्त गोची झाली होती...
खरच मित्रा तेव्हा तुझी आठवण आली होती..

कोणती डीश घ्यायची करत अक्खा तास घालवला..
चिकन पुढ्यात होत.. तरीही Veg मेनूच निवडला..
कूपन घेतल्यावर कलाल.. balance थोडा कमी पडला...
नशिबाने ढोलीच्या पर्स मध्ये एक २ चा ठोकळा सापडला...
Counter समोर तेव्हा आमची बोलती बंद झाली होती....
खरच मित्रा तेव्हा तुझी आठवण आली होती...

पराकोटीच्या उत्सुकतेने कांचाचा डब्बा पहिला..
त्याच्याही डब्ब्यात काल नेमका दोडकाच सापडला...
म्हणूनच Fried rice ला नाव ठेवत ढोलीचा वेळ गेला...
आणि मीही तोंड वाकड करत चपातीचा ढीग संपवला..
एखादी चिकनची प्लेट शेजारी हवी हवीशी वाटत होती...
खरच मित्रा तेव्हा तुझी खूप आठवण आली होती...

जेवण तरी झालं.. वाटल निदान एक प्रश्न मिटला...
तेवढ्यात आपल्या madam ना मिल्क शेक प्यावासा वाटला...
अचानक कुठून तरी तिला ६१५ रु. चा खजिना सापडला...
आणि मैत्रिणीच्या बिलाचे पैसे म्हणत तीओही आम्हाला दुरावला...
वरची १५ रुपयांची चिल्लर सुद्धा तेव्हा महत्वाची वाटत होती...
खरच मित्रा तेव्हा तुझी खूप आठवण आली होती...

नाही होय करत शेवटी ज्यूस कसातरी cancel झाला...
गप्प कशी बसेल ढोली म्हणे कॅडबरी खाऊया चला...
हातातले पैसे बघत दुकानदाराला हळूच दर विचारला...
१५ ला ३ म्हटल्यावर आमच्या आनंदाला पार तो कुठला... :)
खिशात दमडी न्हवती पण अंगात मस्ती तशीच होती...
खरच मित्रा तेव्हा तुझी खूप आठवण आली होती...

लिफ्ट मधून येता येताच कॅडबरीचा फडशा पडला..
अरेरे तुला घेतलीच नाही हा विचार तिघांच्याही मनात डोकावला...
पोटात नको दुखायला म्हणून नुसताच wrapper तुझ्यासाठी ठेवला..
पण खरतर चोकलेटच्या चवी पेक्षा रिकामा खिसाच त्यावेळी महत्वाचा वाटला...
तिन्घांच्याही डोळ्यापुढ भर उन्हात आता फक्त ATM चमकत होती...
खरच मित्रा त्यावेळी तुझी खूप आठवण आली होती..

परत येताना थेट FC२ (ATM) कडे मोर्चा वळला..
आता पैसे मिळणार म्हणून आधीच खिसा तुम्कन फुगला...
पण.... बंद असलेली ATM पाहून तिन्घांचाही चेहरा पडला...
मनातल्या मनातच एक दगड उचलून त्या ATM वर फेकला...
चक्क ती २ ATM आमच्याकडे बघून हसत होती...
खरच मित्रा तेव्हा तुझी आठवण आली होती...

रिकाम्या खिशाने आपापल्या SDB चा मार्ग धरला...
पुन्हा रिकामे आलात तर याद राख असा दम एक मेकांना दिला..
स्वताच्या झालेल्या फजितीवर आमच्यातला प्रत्येकजण खळखळून हसला...
आणि शेवटी पुन्हा एकदा रिकामा खिसा दिसला...
आमच्या रिकाम्या खिशांना काल तुझ्या भरलेल्या पाकिटाची साथ हवी होती...
खरच...
काल जेवताना मित्रा तुझी खूप खूप आठवण आली होती....
:)
- शिल्पा लिमकर
 Dedicated to My Infy Friends... Written on 24/03/2009

Thursday, September 20, 2012

जमल नाही....

पोटातल प्रेम... ओठांत आणायला जमल नाही...
काठोकाठ भरलेल्या डोळ्यातला  आनंद.. सांडायला जमल नाही ...
तू समोर असतानाही... हाक मारायला जमल नाही...
तूच दिलेली शपथ.. आज मला मोडायला जमल नाही....

Monday, September 17, 2012

तू जवळ नसताना....

तू जवळ नसताना...
विचार चक्र जागीच थांबतात.. ओठी शब्द फुटत नाही...
घड्याळाची घर घर चालूच असते. पण क्षणच पुढे सरकत नाही....
तू जवळ नसताना...
उरी निशब्द धडधड सुरु असते.. आणि शब्दांचा ठावच लागत नाही...
डोळे सताड उघडे ठेवले.. तरी तुझ्याशिवाय कोणीच दिसत नाही..
तू जवळ नसताना...
पावलं निरंतर चालत राहतात.. पण वाटच गवसत नाही...
तुझ्या पूल खुणांवर चालव... तर त्याही गवसत नाहीत...
तू जवळ नसताना...
शब्दांच्या बाजारात या मग... संवादही कळत नाही...
फक्त तुझी हाक ऐकू येते.. बाकी काही उमजत नाही..
तू जवळ नसताना...
स्वताला आरशात पाहताना.. मी स्वताला पाहतच नाही...
तुझ प्रतिबिंब न्हावे.. माझी कल्पना आहे हेच मला कळत नाही...
तू जवळ नसताना...
तहान-भूक काय असते.. याचीही जान राहत नाही...
तुझ्या हातचा घास मुखी जावा.. याशिवाय दुसरी इच्छा असत नाही...
तू जवळ नसताना...
एक एक क्षण युगासारखा.. अगदी सरता सरत नाही...
तू भेटशील या आशेने.. वेद प्राणही जात नाही...
तू जवळ नसताना...
डोळ्यात प्राण आणून तुझी वात पाहते... पण तू दिसत नाहीस...
आर्त साद घालते आहे तुला.. पण तू प्रतिसादच देत नाहीस...
नको दूर राहू आता...
या जीवाला घरट्यात जास्त वेळ बांधून ठेवता येणार नाही..
तुला उशीर झाला तर... तुझ्या या प्रिय सखीला परत बोलावता येणार नाही...
                                                                 परत बोलावता येणार नाही....
- शिल्पा 

Friday, September 14, 2012

तू निघताना आई...


आयुष्यातला तो एकच क्षण.. किती दीर्घ वाटत होता...
तू निघताना आई... हा कंठ दाटून आला होता..

हातातला हात तुझ्या... मला सोडवता येत न्हवता..
बाबांचाही पाय का आज उंबरठ्यावरच अडत होता...?
भावनांच्या जाळ्यात हा श्वास कुठेतरी अडकत होता..
आयुष्यभराच्या मायेचा गुंता असा क्षणात थोडीच सुटणार होता..?

हसर्या चेहऱ्याने दोघेही निरोप मला देत होता...
मग आपल्या बाळाला हाक मारताना... तुझा ओठ का ग थरथरत होता..?
पाऊसही तेव्हा दाराबाहेर धो-धो बरसात.. हे सार पाहत होता...
झोंबणारा तो अल्लड गारठा.. आत हुंदके देऊन रडत होता...

पुढे चाललीस कि पदर तुझा सारखा कुठेतरी अडकत होता....
कधीच न्हावे पण आज.. बाबांचा चष्माही सारखा का ग विसरत होता..?
मनाला कसतरी समजवत.. एकदाचा पाय घराबाहेर काढला होता..
गाडी पर्यंतचा रस्ताही आज मैलभर दूर व्हावासा वाटत होता...

गाडीतून हात उंचावताना कदाचित तुम्हीही निश्वास टाकला होता...
आपल्या बळावर प्रेम करणारा बाप.. आता मनमोकळ रडायला रिकामा झाला होता...
दृष्टीआड होणारी गाडी तुझी पाहून माझा आत्मा तळमळत होता...
तू निघाल्यावर आई.. या अश्रूंचा बांध मात्र फुटला होता..

आई...
तुझ्याशिवाय कधी कुणावर विश्वास न मायेचा हात सोबत होता...
एकट्या तुझ्या या पिलाला... आता संग कुणाचा ग आधार होता...?
अर्धवट माझ्या आयुष्याला एकाच व्यक्तीने तेव्हा पूर्ण आकार दिला होता...
त्याच्याच पंखांच्या साउलीने माझ्या भरारीला आधार दिला होता...

पोरक्या झालेल्या या तुझ्या पिलाला... तिचा नवा संसार मिळाला होता..
आणि त्याच्या रूपाने मला जणू तुमचा.. आशीर्वाद मिळाला होता....

- शिल्पा लिमकर 

Monday, September 10, 2012

डोळ्यातलं पाणी डोळ्यातच थांबत...

डोळ्यातलं पाणी डोळ्यातच थांबत..
कुणी जवळ असावस सारख वाटत राहत...
किती प्रश्न आणि कोणाला विचारणार...??
भळभळणारी  जखम ही कोणाला दाखवणार....??

ओठांवर शब्द येऊन थांबलेले असतात...
समोरचा ऐकेल म्हणून नुसतेच वाट बघतात...
किती  आणि  काय  बोलणार ... कोणासाठी ...??
ऐकणारा  निघून  गेलाय  कधीच ... तरीही  त्याच्यासाठी ...?

अंगार  झालाय  सगळ्या  शरीराचा ...
धगधगतोय  कण  आणि  कण ..
किती  वेळ  आणखी  हा  असाच  मला  जाळत  राहणार ...?
वाटत   माझ्या  अस्तित्वाची .. शेवटी  राख  रांगोळी  करणार ...

जीव  घुटमळतोय   त्याच्याच  पायी ..
तुडवला  जातोय  पर  त्याला  परवाच  न्हाई ...
कसली  ही  कळ .. किती  सहन  करावी ...??
उठणारी  किंकाळी  सुद्धा ... ओठांतच  घट्ट  दाबावी ...

न ओघळणारी  आसव अखंड  वाहत  आहेत ...
मला  नखशिखांत  चिंब  भिजवत  आहेत ...
कोणी  आणि  कस  कराव  या  आसवांच  माप ...?
कोरड्या  विहिरीला  या आता  .. आणी  काय  द्यावा  आटायचा  शाप....??

- शिल्पा

Sunday, September 2, 2012

देवबाप्पा...

आई बघ ना ग.... आपला देवबाप्पा कसा दिसतोय..
माझ्याकडे बघून.. गालातल्या गालात हसतोय...
कुणी म्हणे गणेश अन गणपती.. तर कुणी म्हणतय मोरया..
माझ्यासारखंच त्याचंही.. बाबा म्हणतात पोप्या. तर तू म्हणतेस टिंग्या...

बाप्पाचे कान एवढे मोठ्ठे ग कशाला...??
आपण काय काय सांगतो... ते सगळ सगळ ऐकायला...???
बाप्पाची सोंड पण कित्ती कित्ती cute आहे...
तू दिलेल्या मोदाकापेक्षा माझा बाप्पाच जास्त स्वीट आहे.... :)

तुला माहितीये..? बाप्पाचे पोट एवढे मोठ्ठे कसे झाले..?
आजी म्हणते.. आपले काय काय चुकले. ते सगळे त्याने पोटात घेतले...
चल पटकन.. कान पकडून त्याला सॉरी म्हणूया...
दुधाची वाटी त्याने संपवली कि नाही बघूया....

एवढ्याश्या उंदीर मामावर बाप्पा कसा काय ग बसतो?
बाप्पाला घेऊन सुद्धा तो कित्ती फास्ट पळतो....
सांगितलंय बाप्पाला... माझी नवी सायकल तू घे...
उंदीर मामाला आता थोडा आराम करू दे...

तुझ्यासारखच बाप्पाची आई त्याला सारख सारख जवळ घेते का..?
अभ्यास केला नाही म्हणून त्याचे पण बाबा रागावतात का??
कोपऱ्यात रुसून बसला की त्याची आजी पण जवळ घेत असेल...
आजोबांनी आणलेला खाऊ एकटा एकटाच संपवत असेल... :)

माझा बाप्पा किनई माझ सगळ सगळ ऐकतो...
बाबांसाठी आणि तुझ्यासाठी मी रोज एक  एक सुट्टी मागतो...
आजोबांच्या खोकल्याच आणि आजीच्या गुडघ्यावरच औषध पण मी मागितलंय..
माझ्या खाउताला अर्धा खाऊ त्याला देतो म्हणून सांगितलंय...

रोज रात्री बाप्पा माझ्या स्वप्नात सुद्धा येतो..
दूर दूर डोंगरावर आम्ही रोज फिरायला जातो...
रात्रभर आम्ही दोघे खूप खूप मज्जा करतो...
सकाळ झाली की पुन्हा बाप्पा... गुपचूप देव घरात जाऊन बसतो...
आमच हे गुपित आई.. कुणा कुणाला नको ह सांगू....
आज रात्री भूर फिरायला जाताना... आम्ही तुला पण बरोबर नेऊ.... :)

टिंग्याची आई... शिल्पा 

Monday, August 27, 2012

आई तू कधी ग येणार...??

सकाळपासून तुझी वाट बघतोय...
आई तू कधी ग येणार....??
Sack  आणि हेल्मेट दारातच टाकून ..
मला जवळ कधी घेणार...??

जेवताना आजी म्हणाली होती..
वरण भात खा मग आई येईल परत..
सगळा खाऊ खायला लावलाय बघ...

असंच काहीतरी सांगत...

रोजचा बाबांनी सांगितलेला...
आज सगळा अभ्यास केलाय...
दूध पिताना पण आजोबांना हरवून...
मी पहिला नंबर काढलाय...

खेळणी सगळी मीच उचलून..
जागेवर ठेवली आहेत...
माझ्यासारखीच ती सुद्धा...
फक्त तुझीच वाट बघत आहेत....

अग.. दुपारी मी घसरून पडलो...
वरचे दोन दात सरळ खालच्या ओठात घुसले...
खूप खूप लक्त आलं. मी खूप रडलो...
मग आजीने कडेवर घेतलं आणि बाहेर चिऊ-काऊ दाखवले...

औषध लावलंय मघाशी आजीने...
पण मला अजून पण दुखतंय..
कट्टी आता तुझ्याशी.. बोलणारच नाही...
कंटाळा आलाय.. आता मी गप्प झोपलोय...

अग बघ ना ग आई...
मी कित्ती कित्ती वेडा आहे...
झोपेत सुद्धा मला किनई...
तुझीच अंगाई ऐकू येत आहे...

डोळे उघडून पाहतोय तर..
खरच मज्जा मज्जाच झाली...
आई आज माझी खरोखर....
घरी लवकर परत आली...

मिठी मारून सारखी सारखी...
कित्ती कित्ती ग पापी घेतेस..
बाऊ झालाय मला आणि..
उगीच तू कशाला ग रडतेस...??

सांगितलंय देव बाप्पाला.. खूप मोठा पाऊस पडून..
तुझं ऑफिस वाहूनच जाऊ देत..
माझ्या सोबत खेळायला..
तुला रोज रोज सुट्टी मिळू देत...

जास्त नाही ग खरच सांगतो...
अगदी थोडूसाच तुझ्यावर रुसलो होतो..
सकाळ पासून पायरीवर बसून...
तुझीच वाट बघत होतो.....

डोळे पूस. चल लवकर.. सगळी खेळणी काढून..
दोघेच छान छान खेळत बसुया...
दमली असशील ना ग दिवसभर..
चांदोबाची उशी करून.. चांदण्यांची चादर ओढून.. दोघ निवांत झोपूया..
गुड नाईट....

Wednesday, August 22, 2012

टिंग्याच्या लीला....

चिमुकले ओठ पसरून डोळे मिचकावत गोड गोड हसायचं
बाबांनी मारलं म्हणून खोट खोट रडायचं...
रोज सकाळी आजी सोबत देवबाप्पा करायला बसायचं..
संध्याकाळी आजोबांसोबत शुभंकरोती म्हणायचं....
आणि सगळ्यांच्या खोड्या काढून शेवटी आईच्या कुशीत शिरायचं...

सकाळी त्याला पेपर हवा वाचायला आणि पुस्तक अभ्यासाला...

चांगलाच पटाईत झालाय आता प्राणी पक्षी ओळखायला..
गाडी, घोडा, सायकल सोबत भांडीही लागतात खेळायला..
रिमोट घेऊन सगळ्यांना सांगतो मोराच गाण लावायला..
आणि झोपताना सुद्धा आईला सांगे आवडीची अंगाई गायला...

मऊ मऊ भात रोज चिऊ काऊ सोबत खायचा...

घरभर हिंडत फिरत दुधू चा ग्लास संपवायचा..
वरण असो वा औषध दोन्ही सेमच व्हरपायचं..
वाटीभर आळणी पाणी every Sunday हाणायच...
पण Apple आणि आंबा मात्र एकट्यालाच असत खायचं...

सगळ्या वस्तू हातात देत Tan Tu (Thank You) म्हणायचं..

गॉगल लावून hero बनून आऊ (WOW) म्हणत हिंडायचं..
आईला मनसोक्त बडवून मग उगीचच तॉई तॉई (Sorry Sorry ) करायचं..
कोणीही भूर जाताना Bye Bye करत धाडकन दार लावायचं...
आमच enlish असलं भारी सगळ्यांना बोलायला लावायचं..

रात्रभर जागवूनही सकाळी याला घाई.. आईला लवकर उठवायची..
घोडा घोडा करत तिची दुखरी पाठ दाबायची...
ऑफिसची बाग तिची.. त्याला स्वताच असते आवरायची...
गच्चीतून गाडी आईची दूर दूर.... जाऊस्तोवर बघायची...
आणि संध्याकाळी आई घरी आल्यावर.. धावत जाऊन घट्ट मिठी मारायची.... आणि एक गोड गोड पापी द्यायची...
 
पैजणाच्या मंजुळ बोलावर आईचा बाळ असा धावला..
हसत खेळत बोबड बोलत.. त्याने सगळ्यांना लळा लावला...
आनंदाच्या झुल्यावर.. आईचा विठ्ठल तिला गवसला...
आई कशी म्हणते...
मनापासून वाटत.. बाळ कृष्णही कधीतरी असाच असेल खेळला...
त्याचीच आठवण येते.. अनुभवताना या टिंग्याच्या लीला.......
 
 -- टिंग्याची आई.. शिल्पा

Tuesday, August 21, 2012

माझी माय आज पोरकी झाली....

25 july 2012 la majhi aaji geli..... hi kavita mi kharokhar anubhavleli ahe... :-(

त्या दिवशी सकाळी सकाळी सांगावा आला...
भांड भर चहा माझ्या हातान पालथा झाला...
माझ्या माहेरचा निरोप घेऊन माणूस धापा टाकत आला...
माझी आजी गेली म्हणून सांगायला....

काय करू काय समजना.. सगळंच सुन्न झाल...
सासूबाई कड बघून मला तर रडूच फुटलं...
सगळ तसंच सोडलं नि लेकराला कडेवर घेतलं..
घराचा निरोप घेऊन पायीच स्टेशन गाठल...

गाडीवाल्याला आज जरा लवकर पोचाव म्हणल...
रस्ता गावल तसा पलीवतो म्हणत त्येन मला समजवल..
का कुणास ठाऊक रस्ता सरता सरत न्हवता...
आजीच तोंड बघायला जीव कासावीस झालता...

कशीतरी पोचले पण घरात पाय टाकायला जरा भीतीच वाटत हुती...
प्रेमान जवळ घ्यायला आज तिथे आजी असणार न्हवती...
कानाकोपर्यात आजी बरोबरच एक एक क्षण जिवंत झाला हुता...
अन भेदरलेला जीव माझ्या माय ला शोधीत हुता...

एका कोपर्यात रडत बसलेली माय आज वळखू येईना...
आई साठी रडणार लेकरू होत ते.. माझी माय तिच्यात दिसंना..
डोळ्यातलं पाणी तिच्या काय केल्या थांबना...
आईसाठी हत्त धरून बसलेली माय आज कुणाचाच ऐकणा..

सगळ्या घराला सावरणारी माय आता स्वत ढासळली हुती...
माझ्या आजीची ४५ वर्षाची लेक धाय मोकलून रडत हुती...
आई.. आई.. म्हणून आभाळाकड बघून नुसतीच हाका मारत हुती...
माझी गाय आज तिच्या आई साठी हंबरडा फोडत हुती...

तवा नकळत मनात कुठेतरी मोठेपण जाणवलं...
थोडी मोठी होऊन आईला मीच आपल्या कुशीत घेतलं...
मांडीवर डोक ठेऊन तिला मायेन गोंजारलं...
जुनीच तिची अंगाई गाऊन तिला शांत निजवल..

आई किती मोठी असते.. आज मला खरी कळली...
लेकरू जस मोठ झाल .. तशी आईची माया वाढतच गेली...
दैवाची हि रीत कुणाला कधीच नाही कळली.... माझी माय आज पोरकी झाली....
आणि  माझ्याच अंगाईत माझ्या माय ला तिची आई भेटली...
- शिल्पा लिमकर 

Monday, August 13, 2012

नाती...


नाती असतात स्वच्छंद फुलपाखरासारखी... आयुष्य रंगी-बेरंगी करणारी...
नाती असतात खळखळनार्या झर्यासारखी... थेंब थेंबात सुख-दुखाचे मोती वेचणारी...

काही नाती असतात मधाळ गोडवा घेऊन येणारी...
तर काही कारल्यालाहि कडूपणा शिकवणारी... पण जितकी मुरतील तितकाच जास्त आनंद देणारी...

काही नाती असतात अगदी खळखळून हसवणारी...

आणि काही तितकंच रडवणारी... हसता रडता आपल्याला प्रत्येक क्षणी सावरणारी...

काही नाती अगदी बाल कृष्णासारखी खट्याळ..
तर काहींमध्ये साचलेला नुसता शिष्टपणाचा गाळ.. पण इतक्या भिन्नतेतहि असते एकत्र बांधलेली नाळ...

काही नाती मनात खोल घरट करून बसतात...

काही मात्र आभाळभर भरकटलेलीच असतात...सांजवेळी सगळी पुन्हा मनात एकत्र  येऊन निजतात...

काही नाती मनाशी अगदी घट्ट बांधलेली...
तर काही अगदी सहजच सुटत गेलेली.... सगळ्यांनी मिळून मायेची उब देणारी गोधडी विणलेली...

काही नाती मस्त गोंडस नावानी सजलेली...

तर काही नाव नसूनही.. गूढ अर्थ दडलेली... मनाच्या जमिनीत सगळीच खोलवर रुजलेली....

काही नाती असतात आयुष्यभर साथ देणारी...
तर काही क्षणभराची पण कायम लक्षात राहणारी... क्षण क्षण गोळा करून बांधलेली शिदोरी.. जन्मभर पुरून उरणारी...

कशीही असली तरी हि नाती असतात माणस बांधणारी...

सुख दुखाच्या क्षणी आधाराचा हात देणारी.... एका एका धाग्याने आपला विखुरलेलं आयुष्य सांधणारी....
नाती हि अशीच असतात... शब्दांच्या चौकटीत कधीही न मावणारी....

-शिल्पा लिमकर

Friday, August 10, 2012

चार ओळी....

डोळ्यातून ओघळणारा प्रत्येक अश्रू.. समोरच्याला दिसत नाही...
दिसला तरी.. प्रत्येकाला त्याचा अर्थ कळत नाही...
असे अर्थ ओळखायला.... कोणीतरी काळजा जवळचा माणूस असावा लागतो...
फक्त त्यालाच आपल्या न ओघळणार्या अश्रूंचाही  ओलावा जाणवतो...

टिंग्या साठी.....

गोड गोड पापा तुझा.. जणू साखरेचा गोळा...
घरभर पावलं टाकत.. लावलास सगळ्यांना लळा..
गोजिरवाण्या रुपात तुझ्या.. रोज दर्शन देतो माझा विठू सावळा...
सगळ घर पुन्हा एकदा लहान झालंय फक्त तुझ्याच साठी बाळा....

Monday, August 6, 2012

कुणीतरी हव असत....


Aayushyachi MAAL…….

Hatatun tutun khali padlelya motyanchya maletala pratyek mani sapdtoch ase nahi, kahi tasech rahtat... ekhadya kalokhya kopryat .. ekhadya junya kapatakhali andharat jaaun bastat...ki jithe te swatahala suddha pahu shakat nahit mag aapan taru shodhnare kon...???
Tyana shodhaycha aapan noshfal praytna karto pan... aapan tyanchyaparyant pohchu shakat nahi... Tyana shodhnyasathi adgalit agadi dhadsane ghatlela haat dekhil kanbhar lambunach jaato ani shevati tikamach parat ghyava lagto....
Punha ekda aapan ti maal gumfayla gheto.. ek ek moti agadi kaljine hatalto... Punha punha sagale moti aapan mojat asto..ugich dar veli manachi samjut kadhto... "Are.... Aapanach chuktoy kadachit mojayla..."... pan nahi... Shevati tya Adgalit gelelyanchi kami astech...

Navin tayar zaleli maal punha ekda akhand disayla lagte..Fakt dolyana....
Pan tichi lambi pahilypeksha thodi kamich aste... ani te harvalele moti disat asatat aaplyach panavlelya dolyat....
Kitihi majbut dhaga ata vaprala tarihi pahila reshmi bandh nahi julun yenar kadachit.....
Galyat ghalun Firaki kitihi avalali tari tari ti maal punha punha tutlyacha bhaas honar....
Ugachach kanthashi punha punha haat janar... manat bhiti tashich rahnar... "Hi mazi maal punha tutnar tar nahi na...!!!!" ek nakalat yenara shankecha kalokh.....

Mansachya bhavnachahi agdi asach asata.... Ekhadyashi manatalya bhavnanchi, aapulakichi premachi ani maitrichi maal aapan nakalat gumfato.. Tyana aaplyavar taklelya vishwasacha dhaga tya malela ghatt bandhun thevato....

Kalji ghavi asha aaplya mansanchi.. ti maal kadhihi tutu deu naye... Nahitar ya navin malesarkhi tichi ani aaplihi avastha houn jate...
Sambhala he moti, Tutlich chukun jar maal kadhi tar...Moti shodhayla nakki vel kadha...
Sagala aayushya ulat slat karav lagla tari chalel.. pan ek n ek moti punha tumchya padrat prat yeu dya...
Tya vyaktichya vishvasacha dhaga kadachit punha milanar nahi pan.. tine kelelya kshamechya doryat punha ekda he moti perayla suruvaat kara...
Tya vyakticha aaplyavar kharach faar prem asata...
Aapan chukalo mhanun ti ragavat nahi ani aapan tila sodun gelo tarihi ti aapli jaga kadhich sodat nahi karan aaplya parat yenyachi ti vaat pahat aste......

Kharach....
Sambhala asha tumchya aavadtya malela...
Kadhihi visktu deu naka tya vyaktichya niragas god bhavanana...

Friday, July 6, 2012

शरी आणि प्रभा....

शरी...


प्रभा..




माझं प्रेम एकदा आजमवायला हव होतंस...

Khup juni ahe kavita.. sumwer in 2010....

असच काहीतरी.....

त्याने धावत याव वार्यासारख...
मला मिठीत घेऊन आकाशभर भरकटाव...
त्याने कोसळत याव पावसा सारख...
मला थेंब थेम्बाने चिंब भिजवून जाव...

 -------

ओठामधले  शब्द बिंदू नाणून पापण्यांच्या काठावर येऊन थांबतात...
भावनांच्या गुंत्यामध्ये श्वास अधिकच अडकतात....
तुला थांबवणार्या हातातलं बळही अचानक निघून जात....
तुझ्याच पायाशी मन नुसतंच घुटमळत राहत....
तू निघतो म्हटलास.. कि असंच काहीस होत....

--------
पाउस काय सांगतोय कधीतरी ऐकून बघ...
थेंबामधलं गुपित जरा उलगडून बघ...
तुझ्या साठीच धावत आलाय तो एवढ्या लांबून...
पापण्यांमध्ये साठवलस जिला तिचीच आठवण घेऊन..
डोळ्यातले तुझ्या भाव टिपण्यात तो चांगलाच
प्रवीण आहे...
म्हणूनच तर असा अवेळी आज न बोलावता आला आहे...

-------
आपलं रडण  जेव्हा  जवळच्या  माणसासाठी  Disuturbance बनत ...
टच्च  भरलेल्या डोळ्यातलं पाणीही  आपोआप  आटून  जात ....
कोरड्या  डोळ्यांनी  मग  नुसतच  एकटक त्याच्याकडे  बघत  रहायचं ...
विचारांचं उठलेलं वादळ आपल्याच  ओंजळीत  बंद करून ठेवायचं...
खूप  खूप  आतून  दाटून  येतो  मग  एखादा  हुंदका .... रडून  घ्याव  त्याच्यासोबत  थोडस..
उद्या  पुन्हा  हसायचच  आहे .. मनाला  पुन्हा  एकदा  समजवावं  थोडस...

--------

जेव्हा  मनात  आठवणींचा  कडकडाट  होतो ...
तेव्हा  विचारांचा  पाऊस  पडतो ..
आणि  मग  त्यातल्याच  काही  धारा ...डोळ्यातून  बाहेर  पडतात ...
पापण्यांचा  बांध  ओलांडून  हळूच  गालावर  ओघळतात
आणि  मन  हलकं  करून  जातात ...
कदाचित  त्यालाच  अश्रू  असे  म्हणतात ..

--------

शिल्पा

Monday, June 25, 2012

मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय....

कॉलेजमध्ये जे काही थोडे फार चांगलेच  अनुभव माझ्या वाट्याला आले त्यावरून.... मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय यावरून सुचलेलं...

तुम्ही खुप दिलंत मित्रानो... आयुष्यभर पुरेल इतकं :)



मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय....

बारावीला चांगले मार्क्स मिळवून...महिनाभर धावपळ करत Engg ला अडमिशन घ्यायचंय...
नवीन कॉलेजच्या स्वप्नात आक्खी रात्र जाग वायाचीये...
पहिल्याच दिवशी दिमाखात कॉलेज मध्ये एन्ट्री माराय्चीये...
आणि ते नाव जग पाहून थोड कावर बावर व्हायला...
मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय....

नवीन Drafter .. नवीन Sack ... सगळंच नवीन...
निदान पहिले काही दिवस तरी कॉलेज attend करायचंय....
सच्च्या मैत्रीला जागत.. मित्रांची एकदातरी Proxy मारायचीय...
रोज एखादा तरी क्लास बंक करून..बाहेर चहाची टपरी गाठायचीय...
college सुटल्यावर मात्र वर्गातच गप्पा मारत बसायचंय.....
Semister  सगळी वाया घालवून.. ३-४ chapters गाळत..
PL मध्ये जीव तोडून रट्टा मारायला...मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय...

आता जुन्या झालेल्या मित्र आणि मैत्रिणी सोबत..
दोघी-तिघींनी आणलेला डब्बा १५ जणांनी वाटून खायचाय..
तेवढ्याने भूक भागली नाही म्हणतच..
सगळ्यांनी पुन्हा सुधीर मामाच्या टपरीत बन सामोशावर ताव मारायचाय...
बावड्यातल World Famous सरबत प्यायचं...
आणि उन्हात उभ राहून गोळा खायचाय...
संध्याकाळी परत टपरीवरचा कटिंग घ्यायला... मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय...

जुने पुराने Journals ढापून.. सगळ्यात शेवटीच submission पूर्ण करायचय..
स्कॉलर पोरांच्या नोट्स चे झेरोक्स मारून.. सगळ्यांना वाटत फिरायचय..
काम सोडून ओरल घ्यायला नक्की कोण येणार याची information काढत हिंडायचंय..
अभ्यासाच्या नावाखाली मित्राच्या रूम वर.. Carrom नाहीतर पत्ते कुटत बसायचंय...
युनिट टेस्ट चा एखादा महत्वाचा Paper फोडून.. नाव माहिती असून सुद्धा...
HOD नि विचारल्यावर गप्प उभ राहायला...मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय...

सगळे Days  साजरे करत.. Gathering चे ३-४ दिवस फुल एन्जोय करायचेत...
एक मेकांच्या slam बुक्स भरत.. EESA च्या कट्ट्यावर दिवस दिवस घालवायचाय....
रोजच संध्याकाळी ठरल्याप्रमाणे पार्किंग मध्ये...
एखाद्या मैत्रिणीची बंद पडलेली गाडी सुरु करायचीये...
सगळ कॉलेज रिकाम झाला तरीही..
उगीचच कोपर्यावर्ती रेंगाळायला... मला पुन्हा एकदा कॉलेजला जायचंय....

ग्रुप मधल्या कोणाचाही Campus selection झाला कि...
सगळ्यांनी मिळून celebrate करायचय...
भावी आयुष्याची स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत...
निदान लास्ट year ला तरी अभ्यास करायचय......
शेवटच्या पेपर नंतर सायलेन्सर काढून... गाडी सुसाट पलवत धुंद व्हायचंय...
Farewell च्या  रात्री सब कूच भूलाके... वाजवणारा थके  पर्यंत नाचायचंय...
आणि त्याच रात्री २-३ वाजे पर्यंत बसून... चार वर्षातला प्रत्येक क्षण पुन्हा जगायचाय..
वीट आलाय आता या Professional जगाचा...
एक स्वच्छंद फुलपाखरू होऊन... आयुष्यातले ते सोनेरी क्षण अनुभवायला....
मला पुन्हा एकदा तरी कॉलेजला जायचंय.....

-Shilpax
For DYPCET EESA 2007... :-)