Saturday, June 7, 2014

मरणाचे फायदे….

त्याच्या माहितीतलाच कुणीतरी त्याच्याच वयाचा… 
परवा अचानक देवाघरी गेला …
इन्शुरन्स वगैरे सगळं मिळून… 
घरच्यांना बक्कळ पैसा मिळाला… 

त्या दिवसापासूनच… 
त्याच्या डोक्यात एकच विचार होता… 
आपल्याच  "मरणाचे फायदे…" 
तो स्वतःला समजून सांगत होता… 
इन्शुरन्सच्या documents उगीचंच… 
पुन्हा पुन्हा तपासू लागला… 
नक्की किती बर मिळतील पैसे… 
सगळी गोळाबेरीज करू लागला… 

दिवस असो वा रात्र… 
तो फक्त मरणाचाच विचार करत असे… 
त्याच्या  माघारी financially सुखी  कुटुंब… 
एवढंच त्याच्या डोळ्यांना दिसत असे… 
कारण…. 
त्याच्या स्वप्नांच्या घरट्याला… 
होता EMI च्या भिंतींचा आधार… 
घरातलं सगळ भागवताना… 
पुरत नसे महिन्याचा अख्खा पगार… 

सारासार विचार करून शेवटी… 
त्याने मरायचा निर्णय पक्का केला… 
अगदी natural death वाटेल असा …
मार्गसुद्धा काढून मोकळा झाला… 
मग कुठे त्याचा डोळा लागला अन चित्त शांत झालं… 
याच दरम्यान बाप्पाने एक काम करायचं ठरवलं… 
मरायचं त्याचं स्वप्न बाप्पाने त्याच्या स्वप्नातच पूर्ण केलं… 
आयुष्याच्या गणितातून त्याला एका दिवसासाठी वजा केलं… 
त्याला हवी तशीच… 
त्याची natural death झाली होती… 
विम्याची भलीमोठी रक्कम… 
अगदी विनासायास मिळाली होती… 

एक एक करत सगळी कर्ज… 
जणू नाहीशीच झाली…
कर्जाच्या ओझ्याखालुन… 
त्याची family अलगद मोकळी झाली… 
पण आता…. 
सगळे खेळ बाजूला सारून… 
पिल्लं बाबासाठी रडत होती… 
आयुष्यातून हरवल्या सारखी… 
बायको मुक्यानेच टिपं गाळत होती… 

हार घातलेल्या पोराच्या फोटोला… 
बाप नमस्कार करत होता… 
रिटायरमेंटच्या वयात… 
नव्या नोकरीचा विचार करत होता… 
थरथरत्या हातांनी आई… 
मुलाच्या आठवणी गोंजारत होती… 
परत येऊ देत लेकरू माझं… 
म्हणून देवाला साकड घालून बसली होती… 

हसणं खेळणं सगळ कसं… 
घरातून नाहीसच झालं होतं… 
कसलं आलंय घर तरी …
त्यातलं घरपण नेमकं हरवलं होतं… 
घरच्यांची ही अवस्था… 
तो स्वतः डोळ्यासमोर पहात होता… 
काहीच करता येत न्हवतं… 
सगळ्यांत असून नसल्यासारखा होता… 

पिल्लांना, बायकोला, आईला… 
जीव तोडून हाक मारली… 
त्याच्याविना निर्माण झालेली पोकळी… 
त्याला आत्ता कुठे जाणवली… 
कसही करून त्याला… 
आता पुन्हा जिवंत व्हायचं होतं …
खूप काही हरवलेलं… 
पुन्हा परत मिळवायचं होतं… 

फक्त एकदाच संधी दे रे… 
म्हणून देवाकडे तो भिक मागू लागला… 
तेव्हाच मरणाच्या त्या स्वप्नातून… 
तो खाडकन जागा झाला… 
खरंच किती फायदा होईल त्याच्या मरणाचा… 
सगळं क्षणात समजून चुकला… 
आजही कर्ज तशीच आहेत… 
EMI च्याच पण भिंती भक्कम उभ्या आहेत… 
आई-बाबांचे नातवंडासोबत खेळ छान सुरु आहेत… 
बायकोच्या डोळ्यात स्वप्नं अजूनही फुलत आहेत… 

"मरणाचे फायदे…" हा विषय अजूनही… 
त्याच्या भेटीला येतो अधून मधून… 
अन आल्या पावली निघून जातो… 
आपल्या माणसांसाठी जगण्याचा त्याचा पक्का निर्धार बघून… 
- टिंग्याची आई 

माणसं पुन्हा भेटतात….

खूप खूप दिवसांनी एक जुनं नात पुन्हा भेटलं… अगदी कधीही भेट होईल अशी अशा नसलेल्या एक व्यक्तीची पुन्हा भेट झाली… त्यावरूनच सुचलेलं हे काहीतरी… 
माणसं पुन्हा भेटतात….
यावर माझा विश्वासच न्हवता… 
कारण सोडून गेलेला प्रत्येकजण… 
आजवर कधीच परत आला न्हवता… 

मित्र-मैत्रिणी बरेचजणांचे हात… 
आमच्या नकळत सुटत गेले… 
कधी काळी घट्ट बांधलेले धागे… 
आपोआप तुटत गेले… 
माणसांच्या या गर्दीत… 
आपली माणसं कुठेतरी हरवली… 
जवळची कधी लांबची नाती… 
कळत नकळत नाहीशी झाली… 

आठवत राहतो अधून मधून …
यातला प्रत्येक तुटलेला धागा… 
जूनंच काहीतरी सांगून जाते …
त्यांची ती रिकामी जागा… 
खूप काहीतरी सांगायचं असतं… 
पण का कुणास ठाऊक राहून जातं… 
डोळ्यांत साठवलेलं प्रतिबिंब …
आपल्याच आसवांत वाहून जातं… 

मनाच्या एका कप्प्यात सगळ बंद… 
बाकी प्रपंच सुरळीत चालू असतो… 
हरवलेला माणूस परत येईल… 
याच आशेवर जगत असतो…
अशाच सुटलेल्या एका धाग्याशी… 
परवा अचानक गाठभेट झाली… 
कुणाच्या ध्यानीमनी नसताना… 
दोघांची वाट पुन्हा एकत्र मिळाली… 

सुटले होते जे बंध… 
पुन्हा एकदा मायेने बांधले… 
एक जुनेच नाते नव्याने… 
एका नव्या सुरात गायले… 
आता आशा वाटू लागलीये…
जाणार पाउल फिरून परत येईल…
दोन समांतर रस्त्यांनाही…
एखाद वळण आपल्या कुशीत घेईल…

पटलंय आता ह्या मनालाही… 
हरवलेले मोती पुन्हा सापडतात… 
मायेच्या धाग्याने बांधलेली…
माणसं पुन्हा नक्की भेटतात….
- टिंग्याची आई 

कौतुक…

"गायू" आईच्या पंखांच्या साऊलीत वाढलेलं एक पाखरू… आईची लाडकी लेक… घरातलं शेंडफळ… चार बहिणींमध्ये सगळ्यात धाकटी… सगळ्यांची लाडकी… लहान असताना गायुला जेव्हा धड बाबा म्हणताही येत न्हवत तेव्हाच तिचे बाबा त्यांना सोडून देवाघरी गेले… आई-बाबा दोघांचंही प्रेम तिला आई कडूनच मिळालं… तीन तीन मोठ्या ताई असल्यामुळे गायुला कधी काम करायची गरजच पडत न्हवती… आजीशी गप्पा मारत… बाकीच्यांच्या   कामात लुडबुड करत… "साऊली"त तिचं बालपण छान रमून गेलं… 
हळू हळू मोठी होईल तशी तिच्या व्यक्तिमत्वाला आईच्या संस्कारांनी सुरेख आकार दिला… मोठ्यांचा मान राखणं… छान बोलणं… दुसऱ्याला न दुखावणं… या सगळ्या गोष्टी जणू तिला आधीपासूनच येत होत्या… 

गायू मोठी झाली…. सगळ्या ताई लोकांची लग्न पार पडली… आणि आता आईची आणि घराची काळजी घ्यायची जबाबदारी गायुवर आली… इंजिनियरिंगचं शिक्षण चालू होतं पोरीचं… तिचे बाबाही इंजिनियर होते… बाबांच्यानंतर घरात दुसरा इंजिनियर म्हणजे गायू… आईला याचं फार समाधान वाटायचं… 
दोघीच राहायच्या आता घरात… गायुच करायची घरातली-बाहेरची बरीचशी काम पण एकदम निवांत… :) घाई गडबड असलं काही जमायचंच नाही तिला… आईला आपली उगीच काळजी वाटायची… लग्न झाल्यावर हिचं कसं व्हायचं? जमेल का बर तिला सगळी धावपळ? बरेच प्रश्न पडायचे…. सगळेच अनुत्तरीत… 

शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर लवकरच गायुचही लग्न झालं… आईची तब्येत बरी नसायची म्हणून सर्वांनी मिळूनच हा निर्णय घेतला होता… मग आई घरी एकटीच राहायची पण समाधानाने…. सगळे मार्गी लागले होते…. गयुचहि ठीक चाललं होतं… सरकारी नोकरी मिळाली… एक गोंडस पिल्लू झालं…. मध्ये ३-४ वर्षं अशीच आनंदाने निघून गेली… तब्येतीमुळे जमायचे नाही म्हणून आई कधी लेकीकडे आलीच न्हवती एवढ्या वर्षात… पण यावेळी लाडक्या जावयाच्या आणि लेकीच्या आग्रहाला नाही म्हणू शकली नाही आणि आली लेकीकडे ८-१० दिवस राहायला… 
गायू… तिचं घर, ऑफिस आणि बाळ सगळं सहज सांभाळत होती…. पहाटे उठून डब्याची तयारी मग पिल्लूची शाळेची तयारी… घरातल्या पाहुणे मंडळींची उठाठेव… सगळ ती लीलया सांभाळत होती… दिवसभर ऑफिसमध्ये काम करून दमलेली पोरगी संध्याकाळी आल्यावर देखील पदर खोचून स्वैपाकाला उभी असायची…. एवढ्या कामात असूनही आईला एखादी स्पेशल डिश करून खायला घालायची… आणि तिचं छकुल आहेच अधेमधे लुडबुड करायला… या सगळ्या व्यापातही त्याच्यासोबत दोन बोबडे शब्द बोलून एखाद गाणं गाऊन रिकामी होत असे… ऑफिसमधली टेन्शन तिथेच विसरून घरात संसाराचं रहाट-गाडगं ती आनंदाने सांभाळत असल्याचं पाहून आईला समाधान वाटलं… विकेंडला भाजीपाला, समान-सुमान आणि आठवड्याभराची तयारी करणारी गायू बघून आईला खूप अप्रूप वाटलं… 

एकेकाळची निवांतपणे काम करणारी गायू भूर उडून गेली होती आणि तिच्या जागी ही चपळतेने सगळ handle करणारी गृहिणी दिसत होती… रात्री पर्यंत सगळी काम आवरून पिल्लाला कुशीत घेऊन शांतपणे पहुडलेल्या गायुकडे पाहून आईला आपल्या लाडक्या लेकीचं फार कौतुक वाटलं…. घरातल्या कामासोबत प्रत्येक व्यक्तीचं मनही सांभाळणाऱ्या लेकीचं कौतुक वाटलं… प्रेमाने तिच्या डोक्यवर हात फिरवला… कदाचित तो गायुला कळलाही नसेल… पण माऊलीच्या मायेने भरलेला तो स्पर्श मिळताच आपणही कोणाच्यातरी कुशीत विसावल्यासारखी गायुला शांत झोप लागली…. 
आज आईला आपल्या या लेकीचं खूप कौतुक वाटत होतं… तिच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं होतं… आईची "गायुचं कसं व्हायचं?" हि काळजी कधीच विरून गेली होती…. 
गायू सारख्या अशा बऱ्याच working Mother आहेत ज्या घर, घरातली माणसं आणि ऑफिस अगदी छान सांभाळतात… त्या सगळ्याचं खूप खूप कौतुक…. म्हणूनच हा लेख खास आपणा सर्वांसाठी… 
Hats off to all of us... :)
- टिंग्याची आई