Thursday, December 29, 2016

अभंग अपेक्षा....

आमचे हे नेहमी म्हणतात .... "माणसाने कधीही कुठली अपेक्षा ठेवू नये... अगदी कुणाकडूनही नाही...."
माझ्यापेक्षा चार-पाच पावसाळे जास्त पाहिलेत त्यांनी आणि आजवरच्या अनुभवावरून त्यांनी हा नियम बनवून घेतलाय आणि स्वतःवर लागू सुद्धा केलाय... :)

पण माझं थोडं वेगळं आहे... मला वाटतं माणसाने अपेक्षा ठेवलीच नाही तर जगणं थोडंसं मुश्किल होईल.... 
समोरून येणारा ओळखीचा माणूस आपल्याकडे बघून स्माईल करेल एवढी माफक अपेक्षा तर असतेच ना... अन ती नाही ठेवली तर आपल्यातरी तोंडावर हसू कसं येणार नाही का... ????

सकाळी डोळे उघडल्यावर समोर आई दिसेल अशी अपेक्षा असते म्हणूनच तर पिल्लू हसत हसत डोळे उघडतं... 
आपल्याला येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बाई आपल्यालाच विचारणार अशी अपेक्षा असते म्हणून आपण आधीच हात वर करून तयार असतो.... 
खेळात आपण जिंकणार अशी अपेक्षा असते म्हणून तर आपण डबल जोर लोळवून खेळतो... 
आजचा दिवस चांगला जाईल हि अपेक्षा असते म्हणून तर आपण आनंदाने दिवसाची सुरुवात करतो.... 
शिखरावर नाही निदान मध्यावर तर पोहचू अशी अपेक्षा ठेवूनच प्रत्येकजण चढाईला सुरुवात करतो.... 
कुणी ओळखीचं वळणावर भेटेल याच अपेक्षेने आपण प्रत्येक वळण मागे टाकतो... 
कुणीतरी डोळे पुसणारं आपलं माणूस सापडेल म्हणूनच तर आपण आसवं ढाळतो... :)
आणि हो... दुःखाच्या गर्दीतून कधीतरी सुखही समोर येईल याच अपेक्षेवरच तर आपण आयुष्य जगत असतो... :)

छोट्या मोठ्या... बऱ्याच अपेक्षा... कधी क्षुल्लक... कधी खूपच गंभीर... महत्वाच्या... 
अपेक्षा हि अपेक्षा असते... कधी आपलीच इच्छा असते तर कधी एक आशा... 

अपेक्षा नेहमीच ठेवावी माणसाने पण ती पूर्ण झालीच पाहिजे अशी अपेक्षा मात्र ठेऊ नये...  :)
अपेक्षेचा भंग झाला कि मग सगळंच बिनसतं... म्हणून मला वाटतं.... नेहमी तुमची अपेक्षा अभंग ठेवा... अपेक्षा भंग नसेल तर होणारा त्रासही नसेल... मनाची नाराजी पण नसेल... पण एक नवी आशा मात्र दरवेळी असेल आणि तीच तुम्हाला प्रफुल्लित ठेवेल... 

एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर या वेळी नाही... पुढच्यावेळी सही म्हणून तीच अपेक्षा नव्याने ठेवा... हीच ती अभंग अपेक्षा... अभंग मुद्दामच सुरुवातीला ठेवला तो भंग होणार नाही मग अपेक्षा भंग होण्याचा प्रश्नच नाही... :)

मान्य आहे हे सर्व सांगणं लिहिणं जितकं सोप्प आहे तितकंच ते अमलात आणायला खूप अवघड आहे... पण काय आहे ना... ये दिल बडा बेवकूफ आहे... इसपे हाथ राख के कहो... ऑल इज वेल... बेचारा मान भी जाता है... :)

म्हणूनच अभंग अपेक्षा ठेवा.. पूर्ण झाली तरी आणि नाही झाली तरी तुमच्या वाट्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल... :)

आणि हो...माझी कोणतीही पोस्ट वाचणाऱ्या दहा जणांपैकी एकाला तरी मी मांडलेला विचार आवडेल आणि काहीतरी कंमेंट मिळेल... याच अपेक्षेपोटी मी प्रत्येक पोस्ट टाकते... आणि समजा नाहीच आवडलं कुणाला तर तीच अपेक्षा ठेवून मी पुढची पोस्ट टाकते... :)
तर मग एका नव्या अपेक्षेने एका नव्या वर्षाची सुरुवात करा मीही करतेय... 
Happy New Year २०१७ :) 

- टिंग्याची आई 

Tuesday, December 20, 2016

हक्काचा विसावा....

अनुची आज खूपच गडबड चालू होती... सुट्टीचा दिवस होता... म्हणजे रजाच घेतली होती तिने तरीही सकाळपासून भलतीच धावपळ सुरु होती... आज तिच्या लेकीचा म्हणजे मनूचा बडे होता... पोरगी भलतीच खुश होती आणि म्हणूनच अनुसुद्धा... लेकीचं फेव्हरेट गिफ्ट दिलं होतं तिच्या लाडक्या आईने... एक छानसा परीचा ड्रेस... नाहीतरी अनुच्या आयुष्यातली परीच होती ती... सुखाची जादू करणारी परी...
बडे संध्याकाळीच करणार होते घरच्या घरी पण तरीही अनुने आज सुट्टी घेतली होती...
एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी....
अनु.... एक शिकली सवरलेली... नोकरी करत घर सांभाळणारी मुलगी... स्वतःचा ३ रूमचा फ्लॅट तिथे ती आपली आई आणि लेकीसोबत राहते... एक सिंगल पॅरेन्ट असूनही लेकीच्या कोणत्याही बाबतीत तिने काहीही कमी पडू दिलेलं नाहीये....
हो... सिंगल पॅरेन्ट... गेली चार वर्ष झाली ती मनूला एकटीच संभाळतेय... अमित... मनूचे बाबा... एकटाच राहतोय त्यांच्या जुन्या घरी...
दोघेही चांगले कमवणारे, चांगल्या कंपनीत कामाला आहेत... तसं त्यांचं लव्ह मॅरेज... घरचे समजूतदार म्हणून त्यांनी छान थाटामाटाने लग्न लावून दिलं... वर्ष दोन वर्ष छान संसार चालू होता... एक छान पिल्लूही दिला बाप्पाने मनूच्या रूपाने... पण नंतर काय बिनसलं देव जाणे... दोघेही नकळत दुरावत गेले... नात्यातला दुरावा इतका वाढत गेला कि दोघांना सोबत राहणं असह्य झालं आणि त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला... लेक अवघी २ वर्षांची होती म्हणून अनुकडे राहिली आणि अमितला अधेमधे भेटायला मिळायचं...
चार वर्ष झाली तरी अजून ऑफिशियल डिवोर्स मिळाला नाहीये आणि त्यासाठीच दोघं धडपड करत आहेत... :(
गेली चार वर्षं अगदी रोज म्हटलं तरी अनु अमितचा विचार करते... तिच्यावर आणि मनूवर इतकं प्रेम करणारा तिचा अमित असा कसा वागू शकतो हेच तिला कळत न्हवतं....  रोजची रात्र जणू काळरात्र बनून यायची अन थकलेल्या शरीराला अश्रूंत भिजलेली झोप शांत करून जायची... मनू होती म्हणून आजवर अनु तग धरू शकली... नाहीतर तिचं काय झालं असतं त्या बाप्पालाच ठाऊक...

थोडंफार काहीतरी झाल्यावर नातं तोडणाऱ्यातली अनु न्हवती... फार विचार करून निर्णय घेणारी आणि समंजस त्यामुळे तिच्या या निर्णयाला घरच्यांनी फार विरोध केला नाही... लेकीला आणि आईला सोबत घेऊन अनु राहत होती... सोपं न्हवतं असं एकटं आयुष्य जगणं पण तरीही ती जगात होती... लढत होती... एकटी... चिमुकल्या लेकीला पाठीशी घेऊन...

अमितही काहीसा अनुसारखाच पण बऱ्याचदा त्याचा राग मात्र त्याला तोंडघशी पाडायचा... कदाचित हा रागच त्यांच्या नात्याच्या या अवस्थेला कारणीभूत होता... घरातून कायमचं निघून जाणाऱ्या अनुच्या पावलांना माघारी फिरण्याची विनंती सुद्धा त्याने केली नाही... स्वतःमध्ये आणि कामामध्ये त्याने इतकं स्वतःला गुरफटून घेतलंय कि अनुचा काय त्याचा स्वतःचाही आवाज तो ऐकू शकत नाहीये... वेळ हा फक्त कामासाठीच आहे असं काहीसं त्याचं मत आहे...

गेल्या चार वर्षांत तो मनूला भेटायलाही फार वेळा आला न्हवता.. दार दुसरा तिसरा शनिवार अनु त्याच्यासाठी राखून ठेवायची.. पण तो मात्र फार कमी वेळा आला त्यांना भेटायला... "माझ्यासाठी नाही पण त्या लेकराची सुद्धा ओढ वाटू नये त्याला...?" हेच तिच्यासाठी मोठ्ठ प्रश्नचिन्ह होतं... नेहमीपेक्षा कामात आता तो जरा जास्तच गुंतला होता म्हणे... घरी येण्या जाण्याचाही नेम नाहीये... आणि हो जॉब मध्ये खूप प्रगती केलीये म्हणे... एवढं काम एवढा व्याप तरीही आश्चर्य म्हणजे कोर्टाची एकही तारीख त्याने आजवर चुकवली न्हवती...
वाढदिवसाची वगैरे तारीख हमखास विसरणार अमित कोर्टाची तारीख मात्र कसा काय लक्षात ठेवणे होता कोणास ठाऊक... हजारो प्रश्न रोज अनुच्या डोक्यात थैमान घालत पण उत्तरं मुळीच सापडत न्हवती.. आणि आता तर ती शोधायची इच्छाही मेली आहे असं तिला वाटायचं...
आज मनूला मुद्दाम ती बरोबर घेऊन आली होती... कदाचित बाबाला बडेच्या दिवशी तरी लेकीशी बोलावसं वाटेल म्हणून... आणि शंकाही होतीच कि त्याच्या लक्षातही असेल कि नाही... याच सगळ्या विचारात अनु गाडी चालवत होती... शेजारी बसलेल्या मनूचे प्रश्न चालूच होते... कुठे जायचंय.. कोण कोण येणारे.. वगैरे वगैरे...
त्या जीवाला तर बाबा म्हणायची साधी सवय पण न्हवती... आपल्याला एक बाबा आहे आणि दूर कुठेतरी राहतो एवढंच काय ते तिला ठाऊक... अनूनेही त्याच्या बद्दल बोलणं, सांगणं बऱ्याचदा टाळलं होतं... "बाबा खूप चांगला आहे" एवढंच ती सांगायची...  पण त्या चिमुकल्या जीवाला बाकीच्यांनी जे काही सांगितलं त्यावरून बाबा म्हणजे कुणी फारशी चांगली व्यक्ती नसते असाच तिचा ग्रह झाला होता...
मनूच्या प्रश्नांना जमेल तशी उत्तर देत प्रवास चालू होता... अवघा ४-५ किलोमीटर चा प्रवास तोही अनुला दरवेळी मैलोन मेल लांब वाटायचा...

कोर्टाच्या दारातच अमितची गाडी दिसली.. तो आजही वेळे आधी पोचला होता... आणि त्याच्या वकीलांशी बोलण्यात बिझी होता... अनुने गाडी मुद्दामच थोडी लांब लावली... आणि मनूला घेऊन ती थेट आपल्या वकिलांकडे गेली....

अमित समोर दिसला तशी आतून एक कळ उठली... नकळत तिचं मन धावत जाऊन त्याला एक मिठी मारून आलं... त्याचा स्पर्श रोमारोमात भरून गेला... डोळे काठोकाठ भरून आले... आणि त्याच्याशी तोंडभर हसावं म्हणून मन आशेनं त्याच्याकडे पाहू लागलं... पण... अमित मात्र तितक्याच निर्विकारपणे तिच्याकडे पाहून फक्त "hi..." म्हणाला... क्षणार्धात हळवी अनु गळून पडली आणि आणि डिवोर्स घ्यायला आलेली इतकी वर्षे एकटी संसार करणारी... लेकीला एकटी सांभाळणारी अनु सावरून उभी राहिली.....

निदान मनूला तरी त्याने मिठीत घ्यावं... कडेवर घ्यावं अशी आशा होती... पण त्याने तेही केलं नाही... बाबाकडे जा म्हटल्यावर मनू गेली त्याच्याकडे... तिचा एक पापा घेऊन नेहमीप्रमाणे एक चेक अमितने तिच्या हातात दिला.... आणि मनू आईकडे परत आली... दरवेळी एक चेक तो माणूस द्यायचा... चेक वटवणं तर दूरच पण आजवर अनुने त्यावरची रक्कम सुद्धा कधी पाहिली न्हवती...
थोडीफार कागदपत्रांची कामं आटपली आणि मग दोन्ही पार्टी बोलायला म्हणजेच अर्ग्युमेण्ट ला सज्ज झाल्या... आजवर सांगितलेल्या त्याच तयच गोष्टी पुन्हा गिरवल्या जात होत्या... चार वर्षांपूर्वीची भांडणं आज पुन्हा नव्याने उकरून काढली जात होती... वकील आपापल्या परीने प्रत्येक कारणाचा अर्थ लावून त्या दोघांची बाजू मांडत होते... अमिताही बोलत होता अगदी मुद्देसूद... जणू सगळं काही त्याच्या हुबेहूब लक्षात होतं...
"तू बोलायला लागलास कि नुसतं ऐकत बसावसं वाटतं..." असा नेहमीच म्हणायची अनु...
पण आज ती नुसतीच शांत होती... सगळं शांतपणे ऐकत उभी होती... आणि हातात घट्ट धरला होता बावरलेल्या मनूचा हात....

अनुला असं शांत पाहून अमित अचानक गप्प झाला... कदाचित त्यालाही काहीतरी जाणवलं... सगळेच गप्प झाले होते... तेव्हा डबडबलेले डोळे वर करून अनुने अमितकडे पाहिलं... आज तिला अनावर झालं होतं.. डोळ्यातून संतापाची धार घळघळ वाहू लागली होती.... खूप राग आला कि अनु अशीच वागते लक्षात होतं अमितला....

थरथरत्या आवाजात अनु बोलू लागली... 
अमित... किती सहजपणे बोलून जातोस रे तू.. हे नातं नको आहे म्हणून किती प्रयत्न करतोस... हे नातं जुळवायला सुद्धा तू इतका उतावळा न्हवतास... आणि हेच नातं जपतानाही इतका उत्सुक कधीच न्हवतास रे तू... 
कोर्टाच्या सगळ्या तारखा तू न चुकता लक्षात ठेवल्यास रे पण साधा आपल्या लग्नाचा वाढदिवस असो किंवा मग लेकीची डॉक्टरची अपॉइंटमेंट कुठल्याच तारखा तू कधी लक्षात ठेवल्या न्हवत्यास... 
दार वेळी कोर्टात येताना वेळेआधी हजर राहतोस पण कधी मला दिलेली वेळ पाळली नाहीस किंवा कुठलंही काम कधी वेळेवर पूर्ण केला नाहीस... आणि ज्या वेळी मला खरंच तुझी गरज होती तेव्हाही तू ती वेळ हरवलीस... 
किती जबाबदारीने सगळे पुरावे गोळा केलेस... चार वर्ष झाली ते रीतसर सांभाळलेसही... पण तुझं माझं नातं कधीच सांभाळलं नाहीस... ती तुझी जबाबदारी न्हवतीच का रे? 
आज इथे वकिलांसमोर जितकं तू माझ्या विरुद्ध बोलतोयस... हे नातं कसं योग्य नाहीये हे जीव तोडून सांगतोयस... यातलं कणभरही तू कधी मोकळेपणाने माझ्याशी बोलला नाहीयेस... माझ्या कडून इतक्या चुका व्हायच्या असं म्हणतोस तू आज पण यातली एक जरी तू मला वेळीच समजावून सांगितली असतीस तर कदाचित आज चित्र खूपच वेगळं असतं... 

का असा वागलास तू??? तुझी अनु तुला खरंच नको आहे का????
अमित.... आपण आत्ता इथे जितकं बोलतोय त्यापेक्षा निम्मं जरी एकमेकांशी बोललो असतो तर आज हि वेळ आली नसती.... एकमेकांविरुद्ध असे पुरावे गोळा करण्यापेक्षा जर आपल्या नात्यातला गोडवा आपण जपला असता तर आज असे एकमेकांच्या विरुद्ध उभे राहाव लागल नसत... कोर्टाच्या तारखा अशा लक्षात ठेवण्यापेक्षा जर आपण एकमेकांच्या आवडी निवडी लक्षात ठेवल्या असत्या तर आज हा संघर्ष करावा लागला नसता... 
कोर्टाचे कायदे असे समजून घेण्यापेक्षा जर आपण कधी एकमेकांना समजून घेतलं असतं तर आयुष्य या वळणावर येऊन थांबलं नसतं.... वेगळं होण्यासाठी कोर्टाचा रस्ता धरण्यापेक्षा जर आपण एकमेकांकडे दोन पावलं जरी चाललो असतो तर आपल्या नात्याची अशी विटंबना झाली नसती रे.... 
आणि हो... कोर्टासमोर असं तुझं माझं करण्यापेक्षा आपल्या लेकराला कुशीत घेतलं असतं तर त्या जीवाची ही अशी परवड झाली नसती.... 
आज पहिल्यांदाच ती अमितला इतकं बोलत होती.... आणि तोही काही न बोलता शांतपणे सगळं ऐकून घेत होता... 
अनु उभ्या उभ्या थरथरत होती... बोलताना ती रडत होती हे तिचं तिलाही लक्षात आलं न्हवतं... हाताला धरलेली मनू तिला कधीची घट्ट बिलगून होती... आपल्या आईला तिने आजवर कधीच असं पाहिलं न्हवतं... एव्हाना अनुच्या पायातलं बळ सारून गेलं होतं... चार वर्षांत साठलेलं सगळं नकळत बाहेर पडून गेलं होतं... आजवरचा प्रत्येक हुंदका आज मोकळेपणाने बाहेर पडला होता... 

सगळं बोलून झाल्यावर ती शांत झाली... भिजल्या डोळ्यांनी पाहत होती अमितकडे... कोणत्याही उत्तराची अपेक्षा न्हवती... फक्त तिचा हरवलेला अमित शोधायची धडपड... 
निघायचं म्हणून तिने शेवटचं त्याच्याकडे पाहिलं... त्याच्या डोळ्यांत बघताच अनु थक्क झाली... त्याच्या त्या भरल्या डोळ्यांत अनु संपूर्ण दिसत होती... एकही शब्द न बोलता त्याने सरळ अनुला घट्ट मिठी मारली... काय करावं तिलाही सुचेना... गच्चं भरलेले डोळे रिकामे होई पर्यंत तो तिला बिलगून होता... त्याची ओढ अनुला जाणवत होती... सगळं विसरून पुन्हा त्याला मिठीत घ्यावं म्हणून तिचे हात सरसावले.. इतक्यात त्याने मिठी सोडली अन इकडे तिकडे न बघता तो निघाला... गेला सुद्धा... 
कोर्टाचे पेपर्स, पुरावे.. काहीच न घेता तो एकटाच रिकाम्या हाताने निघून गेला... 

गाडीत बसून अमितने सरळ घर गाठलं... अनु क्षणभर स्तब्ध झाली आणि तीही काही न घेता तिथून निघाली... मनूला घेऊन ती घरी कधी पोचली तिचं तिलाही नाही कळलं... 

आज असंख्य प्रश्नाची उत्तरं नाही पण बरंच काही गवसलं होतं... आज तिला बऱ्याच वर्षांनी शांत वाटत होतं... 
अमितही घरी पोचला... आणि गाडीतलं गिफ्ट आणून आधीच घरी असलेल्या गिफ्टच्या गठ्ठ्यात ठेऊन दिलं... आजवर मनू साठी वेळोवेळी आणलेली गिफ्ट्स होती ती... 
फक्त इतकंच म्हटला... "हॅपी बर्थडे पिल्लू...."
आणि नेहमीप्रमाणे तो त्या दिवशीही अगदी ढसाढसा रडला... 
कोर्टाची ती वारी तशी शेवटचीच ठरली... चुकलेल्या दोन वाटा पुन्हा एकदा एक वळणावर भेटल्या पुन्हा कधीही वेगळं न होण्यासाठी.... 
का.... कशा .... किती वेळ लागला... काहीच महत्वाचं न्हवतं... 
पण... दोन जीवांना पुन्हा एकदा त्यांच्या हक्काचा विसावा मिळाला... हेच खूप मोठं समाधान... :)

- टिंग्याची आई 
आमची काकी वकील आहे... तिच्यासमोर कधीतरी घडलेला असाच काहीसा प्रसंग... त्या दोघांचं काय झाल माहित नाही... 
पण माझ्या या गोष्टीचा शेवट मी मला हवा तसा केलाय... :) आवडेल अशी आशा आहे...