Tuesday, September 29, 2015

चार ओळी….


ए जिंदगी…. जितना गम देना है … दे दे …. 
पर थोडासा गम तू संभाल के रखना…. 
क्यूंकि…. 
हजम कर लेंगे हम ये सारा जहर…. गुंजाईश अभी बाकी है…. 
टुटे हुए इस परिंदे में…. जीने कि ख्वाईश अभी बाकी है…

--------------------------------------------------------------------------------

दैव कोलमडून पाडतंय मांडव तुझा…. 
एक  एक खांब मुळासकट उपटून…. 
पण सांग त्याला… 
पालं राहिलंच कि ऊभं फक्त एका काठीचा आधार घेऊन…. 
अगदी विश्वासानं…. 

--------------------------------------------------------------------------------

मी पाहिलाय…. एक पर्वत कोसळताना… 
उत्तुंग महामेरू… कणाकणाने ढासळताना…. 
पण…. 
टेकडी म्हणून राहिला असला… तरी आजही तितकीच रग भरून आहे…. 
उरल्या सुरल्या मातीच्या कणाकणात… अजूनही एक आशा तग धरून आहे…. 

--------------------------------------------------------------------------------

आडवे… तिडवे… कसेही… घालू देत त्याला घाव…. 
सुरेख मूर्ती बनेल… तेव्हाही खाऊ देत त्यालाच भाव… 
पण…
देव बनशील जेव्हा तू…. तेव्हा तोच घेईल तुझ्याकडे धाव…. 
शेवटी कळेलच कि त्याला…. नक्की कुणी जिंकला हा डाव…. 

--------------------------------------------------------------------------------

असं नेहमीच होतं…. 
आभाळ दाटून आलं… कि आठवणीही दाटून येतात…. 
अन त्यातल्याच काहीशा… शब्दधारा बनून कागदावर बरसतात…. 

- टिंग्याची आई

Wednesday, September 9, 2015

गहाण….

राम राम… माझं नाव सखा… हितं जवळच हाय माझं गाव… रामाची वाडी… उपाजलो तवाधरणं हितच हाय… आमच्या चार पिढ्या ह्याच गावात जगल्या-वाचल्या…
शेतकरी हाय मी… एक जिमिनीचा तुकडा हाय त्यावरच आमचा परपंच चालतोय…
मी चार-पाच वर्षाचा हुतो तवा "गहाण…" म्हंजी आमच्या भाषेत "घाण…" हा शब्द पयल्यांदा ऐकला… चांगलं अठीवतंय आज बी मला…. 
माझ्या बा बरुबर मी सावकाराच्या घरी गेल्तो… पैशाची नड हुती… आमी सावकाराच्या पायरीवर बसलो हुतो वाट बघत कवा बारी येतीया म्हणून…. आतनं हाक आली तसं बा आन मी त्या पेढीकड गेलो… काय बोलायच्या आतच सावकार म्हणालं…
"या नामदेव शेठ… आज काय 'गहाण' ठेवताय बरं…???"

कर्ज देणारा सावकार शेठ का कर्ज घेणारा माझा बा हे कळण्याएवडा मी मोठा न्हव्तो… काय न बोलता बा गप गुमान बसला… उगा हसल्यागत करत त्येनं कमरच्या पिशवितन एक भला थोरला सोन्याचा मणी काडला… मनी बघताच सावकाराचं डोळं चमकलं… अन भराभरा त्येनं गच्च भरलेल्या तिजोरीतल्या ४-५ नोटा काडल्या… एका हातानं बाला त्या देत दुसऱ्या हातानं तो मणी जणू हिसकावूनच घेतला… आमी दोघ तिथनं मान खाली घालून मिळाला तेवडा पैसा घिऊन निघालो…
तो मणी आमच्या म्हातारीचा हुता… तिच्या कमरच्या पिशवीतनं काडून तिनं कवातरी आमा पोरांना दावला हुता… माय सांगायची… तो मणी म्हातारीच्या डोरल्यात हुता… आमचं म्हातारं खपलं तवाधरणं ती तो मणी कमरच्या पिशवीत ठेवाय लागली… तिचा जीवच जणू त्या मण्यात हुता…

त्या दिसानंतर शेवटचा तो मणी मी पाह्यला तो आमी सावकाराकडनं घरी गेलो तवा… म्हातारीच्या भरल्या डोळ्यात… बा तिची नजर चुकवून सरळ घरात गेला आन मी तसाच गेलो म्हातारीकड… तिच्या कमरला येढा घालून डोक्यात कवाचं रिंगण घालणारा सवाल तिला इचारला…
"म्हातारी आय… गहाण म्हंजी काय ग…???"
मागपासन टच्च भरलेलं तिचं डोळं खळकन रिकामं झालं… मला पोटाशी धरून ती म्हणली…
"लेकरा… घाण म्हंजी… चार पैशासाटी  आपल्या जिवाभावाची एकांदी चीज सावकाराकडं ठीवायची… आन ती परत मिळल का न्हाई ह्येची जलमभर वाट बगायची…."
बोलता बोलता जणू म्हातारीच्या डोळ्यातनं टपोऱ्या मण्यांची धारच लागली… ती काय बोलली ते तवा कळलं न्हाई पर जसं जसं मोठ झालो तसं समदं कळून चुकलं….

पैशाची नड भागली पर त्या दिसापासन आमच्या म्हातारीनं हाय खाल्ली… माय म्हणाली हुती तसंच झालं… तो मणी म्हणजे म्हातारीचा जीवच हुता…. लई तर सालभर जगली म्हातारी… हातरुनाला खिळूनच हुती ती… एक दिस मला हाक मारली…
मला म्हणली… "लेकरा… माज एक काम करशील…???"
आईनं सांगितलं हुतं म्हातारीच समद ऐकायचं म्हणून मग मी … "व्हय करतो कि…" म्हणून मोकळा झालो…
कापऱ्या आवाजात म्हातारी बोलली… "माजा मणी तेवडा सावकाराकडनं सोडवून आन रं लेकरा…."
म्हातारी डोळ्यात जीव आणून आशेनं माज्याकडं बघत हुती… मी नुसतंच "व्हय" म्हणलं… 
आणि म्हातारीनं समाधानान जीव सोडला… तिच्या त्या मण्याच वझं कायमचं माझ्या मनावर टाकून…

म्हातारीच्या जाण्यानं घर रिकाम रिकाम वाटाय लागलं… पर लई दिस न्हाई… सा म्हयन्यातच म्हातारी जूनी झाली… गरीबाचं असंच असतंय… दुक असू देत नायतर सुक, लई दिस न्हाई मुक्काम करत ते गरीबाच्या घरी….
दिस सरत गेलं… हळू हळू आमी मोट झालो…
मी माज्या चार भणी आन माय-बा सगळीच शेतात राबायचो… चार पोती धान्य पिकवायला दिसभर शेतात घाम गाळायचो… पर कदी मनाजोग धान्य पिकलंय असं आटवत न्हाई मला… 


बा म्हणायचा… "कदी काळी आमि पोत्यानं पिक घ्याचो ह्या जीमनीत… ही रास लागायची धान्याची…."
पर तशी रास मी तरी कदी बगितली नवती आन बा ला बी परत कवा दिसल असं वाटत नवतं…
निदान या वर्षाला तरी पाऊस चांगला पडल आणि मनाजोग पिक ईल ह्याच आशेपायी गावातला एक न एक शेतकरी धरणी मायला साकडं घालून नांगर चालवायचा… पर त्या वरच्याच्या मनात काय हुतं त्याचं त्यालाच ठाव… कधी दुष्काळान आमचा घात करावा तर कदी नगो इतक्या पडणाऱ्या पावसानं… तरीबी आमी तग धरून हुतो… 


रोज नवी नड दारात हुबी असावी आन बानं सावकाराकड धाव घ्यावी असा नेमच झालता जणू… कदी अक्काचं लगीन पार पडावं मनून तर कदी धाकल्या यमीचं आजारपण… कदी ब्या-बियाणाची खरेदी तर कदी गुरा-ढोरांची… पैशाची गरज इचारून येत न्हव्ती… दरयेळी घरातला एकांदा दागिना नायतर वस्तू सावकाराकड घाण पडत गेली… मायचं तर सगळं दागिनं कवाच सावकाराच्या तिजोरीत जाऊन बसलं हुतं…
वाटलं हुत का म्हातारी सारकं मायबी दुक करत बसल… पर त्या माऊलीला कसला तो मोह न्हव्ता… तिनं हसऱ्या तोंडानं बाला एक न एक दागीना आन खचणाऱ्या बाला लाक मोलाचा आधार दिलता… 

असंच कितीतरी वर्सं चालत राह्यलं… मी आता कर्ता झालो आन घरचा धनी बनलो… म्हातारीची जागा आता मायनं घीतली आन तिची माज्या बायकोनं… आन बा असाच कवातरी धान्याच्या राशीची वाट बगत बगत काळाच्या आड जावून बसला…

जमनीच्या त्याच तुकड्यावर आज बी आमचा परपंच चालू हाय… आन आजबी तीच आशा मनात तग धरून हाय… कवातरी चांगलं दिस यीतील म्हणून आभाळाकड डोळं लावून बसलेलं हाय… दुष्काळ अजून जुनाच असला तरी दर साल नवं रूप घिऊन येतोय अन नव्या जोमानं येतोय… शेतात पिकलेलं पुरत न्हाई आणि देणी दिऊन काय ऊरत न्हाई अशी गत झालीया… सावकाराकड घाण टाकावं असं काय बी उरलं न्हाई आता…  
दर पाचव्या सालाला कुणीतरी सायेब येतो हात जोडत… कोरडं आभाळ भरल एवडी सपनं दावतो अन निगुन जातो… पर पाऊस काय त्येच्या घरचा हाय व्हय…  त्यो काय करायचं तेच करतो… जमनीला करपून शेवटी आमा गरिबांच्या डोळ्यातंनंच पाझरतो… घाण टाकून आमची घर रिकामी तर सावकाराची घर भराय  लागलीत… 
आज बी जवा त्येच्या दारात हुबा ऱ्हातो तवा म्हातारीचं बोल काळीज चिरत जात्यात…  
"लेकरा… घाण म्हंजी… चार पैशासाटी  आपल्या जिवाभावाची एकांदी चीज सावकाराकडं ठीवायची… आन ती परत मिळल का न्हाई ह्येची जलमभर वाट बगायची…."
 
पैसा कुटणं आन कसा आणावा काय बी कळत न्हाई… सरकार दितीया म्हण लाखभर रुपयं पर शेतकरी मेल्यावर त्येच्या घरच्यास्नी… निदान आपल्या मागारी घरची सुकी होत्याल मनून लई जणांनी केली म्हण आत्महत्या… 
माजा मैतर शिवा… त्येनं बी हेच केलं २ साल झाली आता… गावाभाईरच्या वडाला फास लावून घेतला हुता त्येनं… लई खटपट करून मिळाला हुता त्येच्या जीवाचा मोबदला त्येच्या घरच्यास्नी…
पैसा आला तसा गेला… किती आला कसा आला कळायच्या आतच…. आता त्येची कारभारीण लोकाच्या शेतावर मजुरी करून चार लेकरं पोटाशी धरून कसबसं दिस काड्तीया… आन त्येची म्हातारी माय त्याच वडाखाली आपल्या लेकराला शोदत बस्तीया…
पर त्येची सगळी कर्ज माफ झाली म्हणत्यात…. तेवडाच काय तो फायदा…
 
डोईवरची कर्ज बगितली कि कवा कवा मलाबी वाटतंय का त्या वडाच्या झाडाखाली जीव घाण टाकावा आन मरणाचं दान घिऊन यावं… घरची तरी सुखी हुतील… सगळीच देणी फिटतील… सावकाराकड घाण पडलेलं कायतरी सोडवून आणता ईल… घरातल्या वस्तू घाण टाकण्यातच आविक्ष गेलं आमचं निदान आता जीव घाण टाकला तर काय तरी उपेग हुईल…

डोक्यात इचारांची पाखरं निसतीच भिरभिरत्यात… गावाभाईरचा वड जणू पारंब्या लांब करू करू मला जवळ बलीवतो…
"कर तू बी आत्महत्या… टाक जीव घाण आता माज्या पायाशी…" म्हणून मला साद घालतो…
न्हाई हुईत सहन मग कवातरी पावलं वळत्यात त्या वाटकडं… आता करून टाकू आपण बी… लागू दे एकदाचा सोक्ष मोक्ष म्हणत मरणाच्या दाराकड जावं म्हणतो….
पर एवड्यात एकंच आवाज काळजात घुमतो… "माजा मणी तेवडा सावकाराकडन सोडवून आन रं लेकरा…."

म्हातारीच्या या शब्दाला वलांडून जाणं मला न्हाई जमत… आन जमणार बी न्हाई…
करापलेली जिमीन असो…
कोरडं आभाळ असो…
ताटातली कोरभर भाकर असो…
का टच्च भरल्याल डोळं… एक आशा आज बी तग धरून हाय…
म्हणूनच…
बानं सांगीतल्याली धान्याची रास एकदा तरी पिकवावी म्हणतो…
लेकराला चार बुकं जास्त शिकवावी म्हणतो…
देवीला दरसाली केलेला नवस या साली तरी फेडावा म्हणतो…
आन त्या वडाखाली जीव घाण टाकण्यापरास…
म्हातारीचा घाण पडलेला मणी तेवडा सोडवून आणावा म्हणतो… 

बळ दे रे खंडेराया…
चला… लई वकत घेतला तुमचा… निगतो मी आता… राम राम…
 - टिंग्याची माय

Tuesday, September 1, 2015

साफ-सफाई…

दसरा-दिवाळी कोणताही सण असो आपण पहिल्यांदा करतो ती घराची साफ-सफाई… रंग-रंगोटी… 
आई स्वैपाक घरातली सगळी भांडी घासून पुसून लक्ख करते… थोड्याफार वस्तू इकडे तिकडे होतात… काहींची जागा बदलते आणि आई पुन्हा आपलं किचन हव तसं लावून घेते…. 
आपणही मग उगाचंच घरतल्या वस्तूंची रचना बदलू पाहतो… थोडा बदल करायच्या नादात चांगलच काम वाढवून ठेवतो… आईसाठी… ;) आणि शेवटी पुन्हा एकदा सगळ होतं तसं ठेऊन टाकतो… :) तर अशी असते आपली साफ-सफाई… 

या सफाई मधलाच एक महत्वाचा भाग म्हणजे माळा साफ करणे… हल्लीच्या घरात माळा उरलाच नाहीये म्हणा… :( 
असो… माळा म्हणजे तशी अडगळीची जागा… सगळ्या जुन्या पुराण्या वस्तू तिथेच सापडतात… आणि तो साफ करताना गवसतात कित्येक जुन्या आठवणी… एकेका वस्तूशी घट्ट जोडलेल्या भावना… या सगळ्यांना पुन्हा एकदा उजाळा मिळतो… 
माळ्यावर अशा बऱ्याच वस्तू असतात… तुमची लहानपणीची पहिली-वाहिली सायकल… शाळेचं जुनं दप्तर… त्यातली ती जुनी कंपास-पेटी… जुनी पुरानी कपडे… तुमची फेवरेट bat सुद्धा तिथेच धूळखात पडलेली सापडते… जुनी पुस्तकं, जुन्या वह्या… अर्धवट लिहून ठेवलेल्या डायऱ्या…. अन त्या प्रत्येक पानात जपलेल्या जुन्या आठवणी…. :)

माळा आवरायचा…. नको असलेल्या वस्तू फेकून द्यायच्या या उद्देशाने सुरु केलेलं काम आपण विसरूनच जातो… आणि मन त्या आठवणींमध्ये गुरफटून जातं… यातली एकही वस्तू कितीही निरुपयोगी असली तरी टाकून न देता साफसूफ करून ठेवली जाते… आणि माळा पुन्हा एकदा गच्च भरलेला राहतो वस्तूंनी आणि आठवणींनी…. 

आपलं मनही कितीतरी आठवणी साठवून ठेवतं… अगदी आपल्याला काळात नसताना घडलेली एखादी घटना सुद्धा आपल्याला लख्ख आठवत असते… सुख-दुःखाच्या, प्रेमाच्या, मैत्रीच्या, कितीतरी आठवणी मनाच्या माळ्यावर वर्षानुवर्षे साठलेल्या असतात… 
मग म्हटलं… आज या मनाची साफसफाई केली तर……!!! होईल ते शक्य….????
आज सहजंच वाटलं… या मनाची करावी साफ-सफाई… 
काढून टाकाव्या अशा आठवणी… ज्यांची खरच काही गरज नाही… 
अन साफसूफ करून ठेवाव्या…  जवळच्या अशा काही…
जीवापाड जपलेल्या… ज्यांच्या शिवाय मी जगू शकत नाही…
ठरवलंच होतं आज… सगळं साफ करून टाकायचं…
मनावरचं नको असलेलं ओझं… आज कायमचं झटकायचं…
कुठून करावी सुरुवात म्हणून पहिल्यांदा बालपण निवडलं…
बऱ्याच सापडल्या आठवणी…  ज्यांनी मला घडवलं…
आईची शिकवण… अन आजीच्या अर्धवट आठवणाऱ्या गोष्टी…
बाबांनी दिलेला सल्ला…  अन फक्त मित्रासोबत शेयर केलेल्या गोष्टी…
शुल्लक कारणावरून… भावंडांसोबत केलेली टोकाची भांडणं…
आणि त्यांच्यासाठीच दादा बनून गल्लीतल्या पोरांना बडवणं…
मित्र मैत्रिणी खास दोस्त शाळा घर आणि असं बरंच काही…
सगळंच आजही हवं होतं… टाकून द्यावंसं काही वाटलंच नाही…
मग निवडलं तारुण्य…. सुखद सौंदर्याने बहरलेलं… 
आठवणींच्या कित्येक कळ्यांनी… आजही टवटवीत असलेलं…
कोवळ्या ओठांवर फुटलेलं… पहिलं वहिलं ते मिसरूड…
अन कधीही एका जागी न स्थिरावणार आमचं बूड…
आठवलं ते पहिलं प्रेम अन ती अप्सरा स्वर्गाची…
आठवणीतली एक रम्य… पहाट जणू ती प्रेमाची… 
आणि आठवला… ती सोडून गेली तो काळाकुट्ट दिवस…
अन दुसरी लवकर मिळो म्हणून गणपतीला केलेला नवस… :)

आठवला… माणसांच्या गर्दीत जिवलगांचा… नकळत सुटलेला हात… 
अन जीवघेण्या त्याच दुखात जागून काढलेली रात…
समज गैरसमजांचे नको असलेलं एक विचित्र मायाजाल… 
काय मिळवलं आणि काय गमावलं हा नेहमीचाच सवाल… 
कधी आपल्याच माणसांशी करावा लागलेला न संपणारा लढा 
रक्तबंबाळ झालेल्या भावनांचा आपल्याच पायाखाली साचलेला सडा… 

तरुणपणाची मस्ती, जिद्द, उतावळेपणा… सगळंच आठवत होतं…
अन त्यातून भोगावं लागलेलं बरच काही… मनाच्या डोळ्यातून वाहत होतं…
आयुष्यात लागलेली पहिली ठेच… पहिलं अपयश, पहिला आनंद…. सगळे एकाच रांगेत उभे होते…
सुख टाकावं कि दुखं पुसावं… काहीच काळात न्हवते…
नाही होय करत… पुन्हा सगळ तसाच ठेवलं…
तरुणाईच्या आठवणीतलंही काहीच नाही टाकलं….
संसाराच्या आठवणींचही असंच काहीसं झालं…
दोघांतलं प्रेम असो वा भांडण काहीच टाकता नाही आलं…
सोबत वाटून घेतलेला प्रत्येक क्षण आठवण बनून उभा होता 
कधी गोड हसू तर कधी आमच्यासाठी नवा धडा घेऊन उभा होता…
कडू -गोड सगळ्याच आठवणी… आज जवळच्या वाटत होत्या… 
आणखीनच दाट कोरल्या गेल्या… ज्या खरंच विसाराव्याशा वाटत होत्या…
आजवरचा हिशोब मांडून झाला… टाकून द्यावीशी एकही आठवण सापडली नाही…
आवरून ठेवलं मन पुन्हा… कोणतीही आठवण मीच हरवू दिली नाही…

सहज वळून पाहिलं… मनात अजून बरीच स्पेस उरली होती…
आयुष्यातल्या प्रत्येक आठवणीसाठी… एकतरी जागा राखीव होती…
पण खरं सांगायचं तर…. 
आता कळलंय… या मनाच्या साफ-सफाईची खरंच काही गरज न्हवती…. :)
- टिंग्याची आई
माळ्यावरची एखादी वस्तू खूपच जीर्ण झाली तर कदाचित टाकून देता येईलही… पण या मनातली कोणतीही आठवण कितीही त्रास देणारी किंवा नकोशी असली तरी टाकून देत येत नाही… आपण पुन्हा ती घासून-पुसून स्वच्छ करून ठेवतो…. अगदी शेवटपर्यंत… एक एक आठवण जीवापाड जपून…. :)