Friday, February 28, 2014

आलाय आता उन्हाळा....

आमचे लाडके सूर्यनारायण… हल्ली जरा लवकरच जागे होतात…
टिंग्याच्या चिमुकल्या पापण्या… वेळेआधीच चुळबुळ करतात…
उन्हाळा जवळ आलाय… हळू हळू समजायला लागलंय…
कोवळ्या उन्हाच्या नवलाईत… कडक ऊन भेटायला लागलंय…
स्वेटर, मफलर, स्कार्फ सगळी मंडळी… परत गाठोड्यात जाऊन बसली आहेत…
पांढरे शुभ्र सुती कपडे… पुन्हा कपाटातून बाहेर पडत आहेत…
छताला लटकणाऱ्या fan ची… ड्युटी २४ तास सुरु झाली आहे…
संध्याकाळी वाऱ्याला फिराणाऱ्यांची… बागेत गर्दी पण वाढली आहे…
भर दुपारी रस्त्यावरून… गारेगार वाल्याची घंटी ऐकू येते…
लहानपणी खाल्लेल्या… मटका कुल्फीची आठवण करून देते…
गुऱ्हाळातल्या घुंगरांची ताल… चौकाचौकात घुमू लागली आहे…
कोकम लिंबू आणि पन्हच्या कॅनची… फ्रीजमध्ये पंगत बसू लागली आहे…
कलिंगडाची भली मोठी रास… जाता-येता हमखास साद घालते…
चिंचा आवळे करवंद जांभळं… यांची खूप खूप आठवण येते…
बाजारात नुकतीच आलेली कैरी… न खाताच दात आंबट करून टाकते…
येतेस का गावी निदान या वर्षी तरी… हळूच मला विचारून जाते…
जवळ आलेल्या परीक्षेपेक्षा… पोरांना सुट्टीची जास्त ओढ लागली आहे…
मामाकडे कधी आणि कसं जायचं… याचीच प्लानिंग चालली आहे…
आलाय आता उन्हाळा… सगळे तयारीला लागले आहेत…
उन्हाच्या झळासोबत… गोळ्याची मजा घ्यायलाही तयार आहेत…
आणि हो… 
नद्या, नाले, तलाव यांच्या घशाला… आणखी थोडी कोरड पडली आहे…
पाण्यासाठी वणवण करणाऱ्यांच्या डोईवर… एक एक घागर वाढली आहे…

- टिंग्याची आई

Thursday, February 27, 2014

अवेळी पाऊस दाटून आलाय....

आज पुन्हा एकदा अवेळी….  पाऊस दाटून आलाय….
जुन्या आठवणींसोबत… चार नवी स्वप्न घेऊन आलाय… 
काळभोर आभाळही…. आज ओंजळीत भरून आलंय….
पहिले वाहिले थेंब झेलत…. मन पाखरू बेभान झालंय….
भिजल्या मातीच्या सुगंधाने…. आसमंत दरवळून टाकलाय….
धरतीचं सौंदर्य वाढवण्या…. सूर्य क्षितिजावर इद्रधनु होऊन झुकलाय….
एक थेंब आठवण…. तर दुसरा स्वप्न बनून बरसतोय….  
एका डोळ्यात अश्रू …. तर दुसऱ्यात हसू म्हणून सापडतोय….
नेहमीसारखा आठवणींचा चिखल…. आजसुद्धा साचलाय….
पण नव्या स्वप्नांचा अंकुर…. त्याच चिखलात रुजलाय….
असाच धो धो पडत रहावा…. असं मनापासून वाटतंय….
थेंबांच्या मंजुळ तालावर…. तुझंच गीत गावंसं वाटतंय….
पूर्वीसारखा उदासवाणा…. नाही राहिला आता माझा पाऊस….
पाठमोऱ्या तुझी आठवण नाही…. तर जवळ येणाऱ्या तुझं स्वप्न दाखवतोय माझा पाऊस….
पूर्वी जेव्हा जेव्हा पडायचा…. तुझ्याच आठवणी घेऊन यायचा….
धुरकटलेला प्रत्येक क्षण…. पुन्हा स्वच्छ करून जायचा….
नकोच वाटायचा अगदी… मग म्हटलं थेंबात स्वप्न दिसतंय का पहावं….
पापण्या भिजवणार्या पावसात…. स्वतःच चिंब भिजून पहावं….
खर सांगू, त्या दिवसापासून…. पाऊस नकोसा वाटत नाही….
मनमोकळ बरसून जातो…. हल्ली तो माझ्या डोळ्यांत दाटत नाही….
मनावर साचलेली मळभ…. छान स्वच्छ धुवून जातो….
पुन्हा नव्याने सुरुवात कर…. माझं मीच स्वतःला सांगतो….
पण… 
नेहमीसारखाच आजही बघ…. कसा अवेळी तो दाटून आलाय….
बघ जमलं तर… 
तुही थोडं भिजून घे… स्वप्न नवं पाहून घे… तो नुकताच कोपर्यावरून वळलाय… :)

- टिंग्याची आई 

Monday, February 17, 2014

तूच सांग सखे मी कसा विसरु तुला…?

एका वेड्या मनाचे वेडे भाव…
:)
आतूर असतं हे मन नेहमीच तुला भेटायला…
अन शब्द अपुरे पडतात तुला थांबवून ठेवायला..
तू सोडून जाऊ नये अस सतत वाटत मला….
तेव्हा वाटते गुंफून ठेवावे ह्या मिठीत तुला… 

नेहामिच्याच तक्रारी तीच तीच भांडण...
जमत नाही तुझ्याशिवाय हेचं माझ सांगणं… 
उगीच रुसवा धरतो मग मीही पापण्यात पाणी साठवून… 
चार क्षण जास्त मिळतात म्हणूनच बसतो तुझी वाट अडवून… 

समोर तू आली की फेर धरतात त्याच जुन्या आठवणी…
अन नसताना तू तुझ्याच त्या हळव्या बोगनवेली...

कळलंच नाही ग कधी हा गुंता वाढत गेला… 
तूच सांग सखे मी कसा विसरु तुला…?

सगळंच पुसून टाकून पाटी कोरी करावी म्हणतो… 
अन पुसताना सारं पुन्हा त्यातंच हरवून जातो… 
जमेल ग मलाही… पण निदान थोडा तरी वेळ दे…
गुंतलंय मन तुझ्यात… त्याला हळूहळू मोकळं करू दे… 
निदान तोवर तरी मला तुझ्या मिठीत विसावू दे…. 

- शिल्पा

Friday, February 7, 2014

पत्र…

हरवलेल्या पत्राला लिहिलेलं पत्र  :)
।। श्री ।।
प्रिय पत्र… 
सा. न. वि. वि.

पत्रास कारण की… फार दिवस झाले… सॉरी सॉरी… फार वर्षं झाली तू आमच्याकडे आला नाहीस… रागावलास का रे आमच्यावर…? इतक्या सहज तुला विसरून गेलो म्हणून…? अरे हल्ली या फोन, ईमेल, इंटरनेट, फेसबुक च्या नादात तू कुठे आणि कसा हरवून गेलास कळलच नाही… त्या छोट्याशा ४x६ च्या तुझ्या देहावर तू सगळ्यांची ख्याली-खुशाली घेऊन यायचास… कधी मावशी येत असल्याची वर्दी तर कधी कोणी १०वी पास झाल्याची खुशखबरी… कधी कोणाच्या लग्नाचं निमंत्रण तर कधी कोणाच्या बारशाचं आमंत्रण… कसलीही खबर असो आम्ही मुलं कौतुकानं तुझी वाट पहायचो… पोस्टमन काका कॉलनीत शिरताच आम्ही त्यांच्या सायकलच्या मागे पळायचो… "आमचं पत्र आलंय का हो काका?" उगीचंच त्यांना विचारायचो… पण तू नेमका तिसऱ्याच कोणासाठीतरी आलेला असायचास… आणि आमच्यावर खुदु खुदू हसत ज्याच्याकडे आलेला असायचास त्याच्या घरी गायब व्हायचास… 
वर्षातून ३-४ वेळाच तू घरी यायचास पण खूप भारी वाटायचं… कधी आजीच्या घरून तर कधी आत्याच्या घरून… कसलं भारी वाटायचं तुला वाचून… 
माथ्यावर ।।श्री।। शिवगंधासारखा रेखलेला… सा. न. वि. वि. मग पुढे प्रिय टिंब टिंब… तुम्ही कसे आहात मग आम्ही बरे आहोत करत करत अलीकडच्या पलीकडच्या चार घरांची विचारपूस आणि खुशाली कळवली जायची… पुढच्या सुट्टीत नक्की या किंवा येऊ असं काहीतरी लिहून शेवटी 'कळावे' ठरलेले… :) पत्ता लिहायला तर २-३ ओळीत चाळीपासून ते पार राज्य-महाराष्ट्र पर्यंतचा सगळा पत्ता कसातरी मावायचा… पण खर तर तेव्हा फक्त नावचं पुरेसं असायचं पत्र योग्य पत्त्यावर पोचायला… :) हल्ली नाही तसं चालत… अगदी खोलीनंबर पर्यंत सगळं अप टू डेट द्यावं लागतं… 
असो… तर तू घरी आल्यानंतर…  तुला घरातला प्रत्येकजण वाचायचा… पहिला मान बाबांचा… डोळ्यावरच्या चष्म्याने पत्र एका दमात वाचून काढावं आणि तेव्हाच ते त्यांना तोंडपाठ व्हावं परत वाचायची गरजचं नाही… :) मग आम्हा मुलांचा नंबर… शाळेतलं काही वाचायला येत असो वा नसो पण पत्र वाचायला नेहमी पुढे… जमेल तितक्या मोठ्या आणि स्पष्ट आवाजात आईला पत्र वाचून दाखवायचं तेव्हाही जितकी भावंडं असतील त्यातल्या प्रत्येकाने निदान एकदातरी पत्र वाचलंच पाहिजे असा नियम… सोबत आपलही नाव कुठे लिहिलंय का हे पहायची वेडी धडपड… वर चिडवायला चान्स मिळायचा तो वेगळाच… :) 
आम्हा मुलांची हौस पूर्ण झाल्यानंतर कि आईने तुला स्वताच्या हातात घ्यावं… चुलीशेजारी बसून पुन्हा एकदा तुला भरल्या डोळ्यांनी मनातल्या मनात वाचावं… पदराच्या काठाने ओल्या झालेल्या पापण्यांच्या कडा पुसत तुला खिळ्याला अडकवलेल्या तारकीट मध्ये खोचून द्यावं… मग बाकी कागदांच्या सोबत तुही तिथंच बसून पुढच्या पत्राची वाट बघत आम्हा चिमण्यासारखं त्याच्या वाटेला डोळे लावून बसावं… 
आणि हो जेव्हा पत्र लिहायची वेळ येई तेव्हा… फार फार मज्जा असायची… शेजारच्या आजींनी ही पत्र लिहायची कामगिरी आमच्यावर सोपवावी आणि आमची सगळी शक्ती पणाला लावून त्याचं पत्र लिहाव… तयारी तरी काय वर्णावी… माथ्यावर नेहमीसारखा श्री उजव्या कोपऱ्यात तारीख अन सरळ रेषेत सगळ्या ओळी याव्यात म्हणून सुईने आखलेल्या अदृश्य रेषा… एवढं सगळं करूनही शेवटच्या ओळीपर्यंत अगदी व्यवस्थित सुरुवात झालेल्या ओळीसुद्धा फुग्याच्या तोंडाजवळ गोळा झाल्यासारख्या गोळा व्हायच्या… 
मागच्या बाजूलाही छोट्याशा जागेत लिहिताना इवली इवली वाक्यं जागा मिळेल तिथे घुसवायची…. अगदी पत्त्याच्या वर खालीही कुणाला तरी आशीर्वाद नाहीतर गोड गोड पापा देणारी ओळ लुडबुडत असायचीच… झालं… आजींच पत्र पोस्टाच्या पेटीत पडायला तयार… 
पुढे मोठे झाल्यावर व्यवस्थित अक्षरात आणि आकारात मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, प्रियजन सगळ्यांना लिहिलेली पत्र… होस्टेलवरच्या खोलीत डोळ्यात पाणी भरून आईला लिहिलेली आणि तिची आलेली पत्र… सगळी आजही आठवतात अगदी जशीच्या तशी… 
पण हल्ली नाही येत ती मजा… लोक जणू विसरूनच गेलेत तुला… फार फार तर सरकारी दफ्तरात सापडतोस तू हल्ली… फोन, मेल, chat, फेसबुक, watsup यावर गप्पा होतात रे… पण एवढ्याशा पत्रात सगळं लिहून पाठवण्यात आणि ते वाचण्यात खरी मजा होती… आजकालच्या ईमेल आणि मेसेजेस ना तुझी सर नाही यायची… आम्ही खरंच तुला मिस करतोय रे… 
बाकी सर्व काही ठीक… आम्ही मुलं आता मोठी झालोय… आमचीही पिल्लं आली आहेत… आमच्यासारखीच खट्याळ :) आई-बाबा सगळे मजेत… 
तुझी खुशाली कळवायला तू स्वतः येणे… 
आंतरदेशीय काकांना आमचा साष्टांग नमस्कार सांगणे… 

कळावे…. 

तुझी लाडकी,
मोठी झालेली लहान मुलं
येशील ना रे पुन्हा आमच्याकडे? नक्की ये… आम्ही मोठेसुद्धा तुझी वाट पाहतोय पिल्लांसोबत… :)
- टिंग्याची आई

Thursday, February 6, 2014

जगावेगळा…

एका जगावेगळ्या व्यक्तीसाठी… 
एक वेगळा विषय…
दाटून आल्या आभाळागत होता… त्याचा रंग सावळा…
एका शांत डोहासारखा होता… तो एक जगावेगळा…
लहानपणापासूनच त्याच्यात… काहीतरी वेगळेपण होतं…
तोल सावरेपर्यंत… त्याचं त्यालाही उमगलं न्हवतं…
मैदानी खेळांत त्याचं मन… फारसं कधीच रमलं नाही…
मित्रांसोबत भांडण मारामारी… यातलं काहीच त्याला जमलं नाही…
आईच्या अवतीभवतीच… त्याचं चिमणं मन रमायचं…
छोटीच्या भातुकलीच्या खेळात… त्याला आपलं जग दिसायचं…
 
कळतही न्हवतं आणि वळतही न्हवतं… अशातच तो मोठा झाला…
मुळच्या अबोल लाजळूला… तारुण्याचा मोहोर आला…
मनाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची… उत्तरं हळू हळू सापडू लागली…
तरण्या पोरींच्या सहवासापेक्षा… पोरांशी सलगी आवडू लागली…
२-३ गर्लफ्रेंड्सच्या नाजूक स्पर्शाचा… अनुभव सुद्धा घेऊन पाहिला…
पण मित्राच्या चुकून झालेल्या स्पर्शापुढे… तो फारच फिका वाटू लागला…
 
हे सगळं पोटात साठवून होता… कोणाला काहीच ठाऊक न्हवतं…
आत गुदमरणार त्याचं मन… जगाला ओरडून सांगू पाहत होतं…
कोण कसा अर्थ घेईल… याचा काहीच अंदाज न्हवता…
या सोफेस्टीकेटेड समाजाला… तो म्हणावा तसा सुटेबल न्हवता…
कोणीच न्हवतं सोबतीला… मग कवितांची ओढ लागली…
मनातली सगळी गुपितं… लेखणी कागदावर फोडू लागली…
कथा, कविता, लेख… जमेल तसं सगळं लिहित गेला…
सोबत त्याला समजून घेईल… अशा आपल्या माणसाचा शोध सुरु झाला…
 
फेसबुकवर फेक अकाउंट… नेटवर अफेयर सुद्धा करून पाहिलं…
बऱ्याच पोरांच्या प्रेमात पडला… पण हाती काहीच नाही लागलं…
मुलींसारखं नटणं मुरडणं… असलं कधीच त्याने केलं नाही…
नॉरमल वागायचाही खुपदा प्रयत्न केला… पण तेही त्याला जमलं नाही…
सुनबाईची शोध मोहीम… आईने आधीच सुरु केली होती…
बाबांनीही त्याच्यामागे… संसार थाटायची घाई लावली होती…
 
असह्य झालं सगळंच… आणि घरी खरं खरं सांगून टाकलं…
भयंकर स्मशान शांततेने… सगळं घरंच जणू व्यापून टाकलं…
भोळ्या-भाबड्या आईला… समजावणं खूप कठीण होतं…
बाबांच्या तरी मनाला… हे सगळं कुठे पटलं होतं…
त्याच्या प्रत्येक गोष्टीवर… घरच्यांचं लक्ष वाढू लागलं…
ज्यांचा आधार मिळावा… त्याचं डोळ्यांनी संशयाचं काजळ घातलं…
घरंच वातावरण पार बदलून गेलं… आकांड-तांडव वाढत गेले…
पापण्यामधलं पाणी… हात मूकपणे लिहित गेले…

लिहिता लिहिता शेवटी… सूसाइड नोट पण लिहून गेला…
जे करायला नको होतं… नेमकं तेच तो करून बसला…
असेना का वेगळा… पण कोणालाच ते कळलं नाही…
कुशीत घेऊन कुरवाळणारं… त्याला शेवटपर्यंत कोणीच मिळालं नाही…
जगावेगळा तो न्हवता… तर त्याचंच एक वेगळं जग होतं…
त्याचं म्हणन समजून घ्यायला… त्याच्यासारखंच कोणीतरी हवं होतं…
आता समजून फायदा न्हवता… सगळा खेळच संपला होता…
या समाजाच्या नियमांपायी… आणखी एकाच बळी गेला होता…
 
एकटाच न्हवता तो… असे बरेच जगावेगळे आहेत…
समजाच्या मान्यतेची… ते आजही वाट पाहत आहेत…
आणि सगळाच गुंता वाढल्यावर… मरणापलीकडच जग जवळ करत आहेत…. 

- टिंग्याची आई

Tuesday, February 4, 2014

काळजी घे सखे…. :)

संसारात बिझी झालेल्या दोन जिवलग मैत्रिणीसाठी…
Specially dedicated to my dearest friend.... :)
दोन दिवसापूर्वी कळलं… तुला खूप बरं नाहीये… 
तेव्हापासून माझं मन… अगदी कशातच लागत नाहीये… 
आज सांजवेळीचा मंद वारा… जरा जास्तच झोंबून गेलाय… 
विसरतेय का मी मैत्री आपली…? हा कटू प्रश्न विचारून गेलाय…

आपण कॉलेजमध्ये असताना… ही मैत्रीच आपलं सर्वस्व होतं…
दोघींच्याही मनाचं सुख… सांग तुलातरी परत सापडलंय का कुठं…?
यश असो वा अपयश… दोघींनी सोबत सेलिब्रेट केलं…
हवं नको ते सगळं… एकमेकींशी बिनधास्त शेयर केलं…

अधून मधून बंद पडणाऱ्या… माझ्या गाडीवरून गावभर हिंडायचो…
कधी कधी कारणं काढून… तर कधी विनाकारण भांडायचो…
किती छान होतं ते जग… मैत्रीच्या धाग्यात गुंतलेलं…
पापण्यामधलं सोनेरी स्वप्न… मैत्रीच्या जादूने मंतरलेलं…

आपापल्या संसाराच्या नादात… आपण किती ग गुंतून गेलोय…
आपलं ते गोंडस नातं… किती सहज हरवून बसलोय…
आज तुझ्याबद्दल ऐकलं… आणि मनाने साद घातली…
सुटत चाललेली रेशीम गाठ… पुन्हा एकदा मीच घट्ट बांधली…

सगळंच पाहिल्यासारखं होईल… असं मी नक्कीच म्हणणार नाही…
पण आपल्या मैत्रीची ही वीण… कध्धी कध्धी सुटणार नाही…
काळजी घे ग सखे… फक्त एवढंच तुला सांगेन…
तुझ्या सुखी आयुष्याचं… बाप्पाकडे पदर पसरून मागणं मागेन… :)

Get well Soooon Dear.... :)
- टिंग्याची आई