Friday, December 25, 2015

बाप्पा निघाले…

"विनू…. आवरलं का रे तुझं ?? ऊशीर होतोय रे मला निघायला…"
देवाच्या खोलीतून येणारा हा वाट पाहणाऱ्या बाप्पाचा आवाज… (हो बाप्पाच बोलतोय :)
गेले दहा दिवस झाले बाप्पा कुलकर्णींच्या घरी आलेत… अगदी आपल्या घरी येतात तसेच हो… आणि आज अनंत चतुर्दशी… बाप्पा निघालेत त्यांच्या गावाला… त्यावेळचा हा प्रसंग… श्रीयुत कुलकर्णी म्हणजे विनूच्या घरचा….
कुटुंब तसं छोटंच… सुखाने संसार करणारे श्रीमान-श्रीमती, घरातला आनंद म्हणजे त्यांची लेक आणि डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणारी आई….
चला बघू काय होतंय पुढे….
"विनूची आई तुला सांगतो, हा आपला विनू असंच करतो दरवर्षी… मला लवकर पाठवायची इच्छा नसते ना त्याची म्हणून मुद्दाम असा उशीर करतो…."
आलाच बघ…
"बाप्पा… आलोच मी आवरून… सोवळं नेसायला थोडा उशीर लागतो ना मला…" विनू कसाबसा सोवळ सावरत आला….
बाप्पा मात्र विनूला डोळे भरून पाहत होते आणि नकळत आईला म्हणाले… "असं सोवळ्यात विनूला पाहिलं कि त्याच्या बाबांची  आठवण येते…." नेहमीसारखे बाप्पा आणि विनू फक्त हसले आणि आईच्या डोळ्यांत मात्र टचकन पाणीच आलं… दोघांनी मुद्दामच तिकडे लक्ष दिलं नाही… हो मुद्दामच… :)

"बर… चला आता छानशी आरती करून घ्या बरं माझी…"
सगळ्यांनी मग एका सुरात बाप्पाची आरती म्हटली…. अगदी टाळ आणि घंटेच्या गजरात… 
"आता कर्पूर आरती होऊ देत…" बाप्पा सांगत होते 
आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी घालीन लोटांगण चा ताल धरला… बाप्पाही अगदी छान रंगून गेले होते आरती मध्ये… 
आरती संपली आणि बाप्पा थोडं सावरून बसत बोलले… "बर विनू, आता सावकाश खाली घे मला…"
सोवळ सावरत विनू उठला आणि त्याने हलकेच बाप्पांना त्यांच्या जागेवरून खाली घेतलं आणि खालच्या पाटावर सांभाळून ठेवलं…. बाप्पाही अगदी निवांतपणे खाली उतरले… :)
"अग नभा… चल नैवेद्याचं ताट आण बर आता…" नभा म्हणजे सुनबाई बर का आमची… 
नभा लगबगीने नैवेद्य घेऊन आली… घरच्या या लक्ष्मीरूपी अन्नपूर्णेकडे बाप्पा फार कुतूहलाने बघत होते… एक न एक मोदक कसा अगदी रेखीव बनवला होता पोरीने… चैत्र गौरीचे पंचरंगी विडेही अशीच सुरेख बांधते बर का आमची नभा… बाप्पा खुश होत बोलले… 
"सोबत दहा बारा मोदक बांधून दे ग मला… प्रवासात बर पडतं…" यावर नभाही प्रेमाने हो म्हणाली… 
"विनू चल आता आणखी एक आरती करा माझी… निघण्यापुर्वीची… " 
हे ऐकून आईच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं… तिला समजावताना बाप्पा म्हणाले… "अग कशाला ऊगीच डोळ्यातून पाणी काढतेस… येणारच आहे कि मी पुन्हा पुढल्या वर्षी… आणि तुझ्या देव्हाऱ्यात तर आहेच कि मी अखंड…"
आईने पदराने डोळे टिपले आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी आरती म्हणून घेतली… 
"बर  विनू, आता नैवेद्य दाखव…" बाप्पा 
"हो दाखवतो…." विनू 
"अरे आधी पाण्याचं मंडळ आणि मग त्यावर नैवेद्य ठेव बाळ…" पुढे बाप्पा सांगतील तशी विनूने पूजा आटोपली… 
तसा पूजाअर्चा करण्याच्या बाबतीत आमचा विनू आळशीच म्हणायचा… पण हि पूजा अगदी व्यवस्थित लक्षात असूनही बाप्पाने सांगितल्याशिवाय तो काही करत नाही… :)
बाप्पा निघायला तयार झाले… 
"चला… निघतो मी आता…."
"बाप्पा असं हो काय… येतो म्हणा ना…" एव्हाना आईला गहिवरून आलं होतं… 
"हो ग विनूची आई… येतो मी परत… " बाप्पा 
विनुही तयार होऊन आला अन बाप्पाला उचलून विसर्जनासाठी निघाला… आधीच तयार असलेली पिशवी घेऊन नभाही निघाली सोबत… 
उंबऱ्याबाहेर पाऊल टाकताच बाप्पा म्हणाले… "अरे विनू, तीनदा मागे वळून दाखव रे बाबा मला आपलं घर… पुन्हा वर्षभर नाही दर्शन व्हायचे या मायेच्या सावलीचे…"
आता मात्र बाप्पा आणि विनू दोघांनाही भरून आलं होतं… कुणाच्याही नकळत नभानेहि आपले डोळे कोरडे करून घेतले… घरात आईचा बांध कधीच फुटला होता… एकसारखी धार लागली होती डोळ्यातून… 
"लवकर चल विनू, उशीर होतोय…" बाप्पाच बोलले… 
अन आपल्या लाडक्या नातीला बाय करून बाप्पा निघाले… 
परतीच्या वाटेवर बाप्पाही शांत होते आणि विनुही… 
बाप्पाच्या मूर्तीच विसर्जन करताना जसजशी हातातून मूर्ती सुटत होती तसं विनूला गलबलून आलं… 
बाप्पा प्रवासाला निघाले… पुढच्या वर्षी पुन्हा परत यायला… 
दाटलेला कंठ मोकळा करत विनूने जोरात साद घातली… "गणपती बाप्पा मोरया………"
अन जमलेल्या प्रत्येकाने त्याला मनमोकळा प्रतिसाद दिला… "पुढच्या वर्षी लवकर या……"
विनूला उगीचंच समाधान वाटलं… अन तो परत फिरला… 
बाप्पाच्या न दिसणाऱ्या मूर्तीला पुन्हा एकदा नमस्कार करून…. :)
गणपती बाप्पा मोरया… 
- टिंग्याची आई

Friday, December 11, 2015

Alumni Meet

कॉलेजने alumni meet ठेवली आहे आमची…. तेव्हा आठवलेले इंजिनियरिंगचे ते मंतरलेले क्षण इथे बांधायचा प्रयत्न केलाय….
Dedicated to all my friends - EESA batch 2007-08....
येत्या एक दोन आठवड्यात.... कॉलेजने ठेवलीये म्हणे आमची Alumni Meet…
ठाऊक नाही आता एकमेकांना ओळखताही येईल कि नाही नीट….

वाऱ्यासारखी पसरली बातमी.... WatsApp वर ग्रुप पण तयार झाला....
जमेल तसा सगळ्यांचा.... निदान Virtually तरी राम राम झाला....
लेफ्ट ग्रुप चे मेसेज सुद्धा आलेच एक दोन अधून मधून....
काही दिले सोडून.... अन काही पुन्हा आम्हीच add केले मुद्दामून.... :)

ग्रुप इन्फो चाळता चाळता.... बरीच नावं पुन्हा एकदा लक्षात आली....
WatsApp DP काहीही असोत.... पण प्रत्येकाची जुनीच झलक डोळ्यासमोर तरळून गेली....
तेव्हाच अचानक लक्षात आलं.... ग्रुप वर add झालेत HOD सर....
जाणवलं आमचं आम्हालाच.... मन आजही करतंय त्यांचा आदर…
(अजून घाबरतो म्हटलं तरी चालेल ;)
ज्यांच्या-त्यांच्या हुबेहूब style सोबत.... बाकी सर नि mam सुद्धा आठवले....
त्यांनी दिलं हो ज्ञान भरभरून.... आम्ही आपले जमेल तसे डोक्यात साठवले… :)

आठ वर्षं सरली तरीही.... सगळं आठवतंय अगदी जसच्या तसं....
आयुष्य बदलली आमची.... मग कॉलेज तरी बदलायचं राहील कसं....

कॉलेज म्हटलं कि आठवतं बरंच काही….
आठवते ती क्लासरूम अन आम्हीच बदनाम केलेला EESA कट्टा....
अन पार्किंग मध्ये तास तासभर उभं राहून खाल्लेला मस्त कला खट्टा....
अभ्यासाच्या नावाखाली मित्राच्या रूमवर रंगलेला carrom चा डाव....
आणि १००% येणाऱ्या टॉपिक वरही आमचा नेहमीच फसणारा दाव.... :)
गेल्या वर्षीच्या फाईल मधून रीडिंग सकट कॉपी करत पूर्ण केलेलं सबमिशन....
एखादी-दुसरी KT बाकी १०० पैकी ४०… एवढंच आमचं फायनल डेस्टीनेशन…. ;) 

डोक्यात न घुसता डोक्याभोवतीच जास्त फिरणारा lab मधलं circuit च मायाजाल....
Diode capacitor किंवा resistance कशाशीच आमचा जुळत न्हवता ताल...
ऐन परीक्षेच्या आधी झेरॉक्स वाल्याच्या दारात लागलेली रीघ….
किती वाचणार माहित नाही तरीही रूमवर नोटस चा भला मोठ्ठा ढीग….
Attendance असो वा टेस्ट Results…. Defaulter List मध्ये आमची नावं ठरलेली….
राडा कुणी का करेना पण HOD च्या शिव्या खायला अख्खी batch उभी राहिलेली….
अवघे चारच असायचे डबे पण खायला मात्र चाळीसजन हजर….
लेक्चरला proxy मारली म्हणून सरांचा आमच्या नावाने गजर….
अभ्यासापेक्षा external ओरल ला कोण येणार यावरच ठरायचं आमचं रेटिंग….
आणि exam ला मागे पुढे कोण कसं दाखवणार याचंच चालू असायचं सेटिंग….

सुधीर मामांच्या टपरी वरचा मस्त कटिंग आणि बन-सामोसा....
जिथे बिलाचं टेन्शन कधीच नसायचं जरी रिकामा असला खिसा....
इलेक्शन gathering days म्हणजे तर नुसता आपलाच दंगा….
देशी असो वा विदेशी प्रत्येक गाण्यावर आपला ठरलेला असायचा पिंगा….
वर्षभर आलो नाही आलो तरी PL मध्ये कॉलेजच्या रोजच व्हायच्या फेऱ्या….
सोबत notes आणि वह्या मिळवायला Scholor च्या घराच्या वाऱ्या….
कधीही न विसरता येणारी ती फेयरवेलची धमाल रात्र….
कळलंच नाही कधी हातून निसटत गेलं ते सोनेरी क्षणांचं सत्र….
Engg म्हणजे गप्पा दंगा धिंगाणा अगदी दिलखुलास कलेली मस्ती….
अन आयुष्यभर पुरणारी अगदी आजही जपलेली आपली दोस्ती….

असो… तर कसे असतील बर आज सगळे….?
कॉलेज टाईमच्या सगळ्या मिस १००% मिसेस झाल्या असतील….
चिमुरड्यांची ओळख करून देताना बिचाऱ्या पोरांचा मामा बनवतील….
तेव्हाच्या बिनधास्त पोरी आता जबाबदार सुना बनल्या असतील….
मैत्रीच्या क्षणांना उजाळा देताना पुन्हा ताज्यातवान्या होऊन जातील….

वाढत्या जबाबदाऱ्यासोबत पोरांच्या पोटाचा घेरही कदाचित वाढला असेल….
डोळ्यांवर असेल अनुभवाचा चष्मा अन डोक्यावरचं छप्पर सुद्धा उडालं असेल….  ;)
Business, ऑफिस, Family वगैरे सांभाळताना आता Responsible झाले असतील….
अन परिस्थितीचे चटके आमच्यातल्या प्रत्येकालाच बसले असतील….

मुंबई दिल्ली क्या चीज है कुणी सातासमुद्रापार पोचलं आहे….
सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं प्रत्येकाने अगदी व्यवस्थित पेललं आहे….
बरंच काही मिळवलं असेल कुणी उत्तुंग शिखर गाठलं असेल….
ऊरभर आत्मविश्वास अन डोळ्यांत त्या यशाचं समाधान दिसेल….

कुणास ठाऊक कशी होईल हि आपल्या सगळ्यांची Alumni Meet….
नक्कीच ठरेल आपल्यासाठी मैत्रीच्या धाग्यांना पुन्हा घट्ट करणारी FriendShip Treat….
Great Things Come in Small Packages.. आपली स्लोगन पुन्हा एकदा आठवूया 
मित्रांनो EESA... EESA... खच्चून ओरडायला आपल्या Alumni Meet ला नक्की या… :) 

- टिंग्याची आई (Shilpax)

Tuesday, November 24, 2015

ओळख जगाची….

एक चिमुरडी नुकतीच या मोठाल्या जगात आली आहे…. माझ्या एका मैत्रिणीची मुलगी… आणि तिला आता या जगाची ओळख करून घ्यायची आहे… आपल्या लाडक्या आईला ती सगळी आपली माणसं कशी बरोबर ओळखून दाखवते बघा तर खरं….


एका चिमुकल्या जीवाने स्वतः करून घेतलेली ही ओळख जगाची…. आपल्या माणसांची…. :)
(सगळेजण लाईन मध्ये उभे आहेत या नव्या पिल्लूला कुशीत घ्यायला… )
आई… बघ मी आले तुझ्या कुशीत शिरायला….
इवलुशा माझ्या हातात…. तुझा प्रेमळ हात धरायला….
तुझ्या अंतरात राहून…. मला आधीच झालीये ओळख या जगाची….
पण तुझी छकुलीच करून घेईल…. बघ ओळख आता सगळ्यांची….
माझ्यासाठी इतका त्रास सहन करूनही…. मला पाहून गोड हसतेस….
बाप्पाने सांगितलं होतं तशीच…. तू कित्ती कित्ती छान दिसतेस….
सगळ्यांचीच लाडकी…. तूच तर माझी प्रिय आई आहेस….
या चिमुकल्या तुझ्या लेकीचं…. तू आख्खं जगच आहेस….
मला मांडीवर घ्यायचा…. पहिला मान यालाच मिळालाय….
मी आल्यावर कसा ग हा…. एवढा खुश खुश झालाय…. :)
मला बाप्पाकडे मागणारा…. हा दादाच आहे ना ग माझा….?
माझ्या इतका तोही…. खूप खूप लाडका आहे ना तुझा….
गुंडाळलेल्या धुपट्याची ऊब आहे ग या दोन्ही हातात….
वात्सल्य कसं ओसंडून वाहतंय बघ तिच्या भरल्या डोळ्यांत….
मायेची साऊलीच जणू हि तर आजी आहे ना ग माझी….
ठाऊक आहे ग मला खरंतर तीच आहे गुरु माऊली तुझी…. :)
कित्ती कित्ती ग समाधान वाटतं यांच्या कुशीत येऊन….
वाटतंय निवांतपणे याच हातात असंच राहावं पहडून….
अग सगळ्यांचाच आधार म्हणजे…. हे तर माझे आबाच आहेत….
एवढी धीराची तू…. पण खरंतर तेच तुझा दृढ विश्वास आहेत….
घेईल ग तो सरळ मला…. तू नको काळजी करू….
ऊगीच त्याला Instructions द्यायला…. तू नि आजी होऊ नका सुरु….
सगळ्यात भारी असाच…. हा तर फेवरेट मामा आहे ग माझा….
बाहुली पासून ड्रेस पर्यंत…. सगळा हट्ट मामाच पुरवेल माझा….
मी घरी जायच्या आधीच…. हिने तर माझी रूम सजवून ठेवली असेल….
अन सगळी काम तशीच टाकून…. आता दिवसभर मलाच घेऊन बसेल….
तुझ्या सारखीच गोड गोड…. हि तर लाडकी मनी माऊ आहे ग माझी….
तू तर आहेस आई…. पण ही तर हसरी मम्मा आहे बघ माझी….
चार चार मावशा, चार चार मामा….
दोन दोन आजी आणि दोन दोन आजोबा….
कित्ती कित्ती माणसं या मोठाल्या आहेत….
सगळेच जन बघ तर माझे कसे लाड करत आहेत….
मजा वाटतेय खूप…. आज राजकुमारी मी झालेय….
बघ तुझ्या घरी मी केवढा आनंद घेऊन आलेय….  :)
सगळे आहेत ग आई इथे…. पण माझा बाबा कुठे दडलाय….?
त्याच्या लाडक्या छकुलीवर…. तो असा का बर रुसलाय….? :(
(बाबा तर onsite च्या गावाला आहे एकटाच… नाही मिळाली सुट्टी त्याला :(
तुझ्या इतकीच माझ्या येण्याची…. तो सुद्धा वाट पाहत होता….
आपल्याला सोडून एक एक क्षण…. कसाबसा मागे सारत होता….
एवढी वाट पाहिली…. मग आता मला भेटत का ग नाही….?
धावत येऊन मला…. त्याच्या कुशीत का ग घेत नाही….?
सांग त्याला…. त्याच्या मिठीत विसावायचं आहे त्याच्या लाडक्या लेकीला….
डोळे भरून बघायचं आहे ग मलाही माझ्या बाबाला….
घेईल सुट्टी लवकरच…. बघ कसा धावत येईल मला भेटायला….
तुलाही मग लावावा लागेल नंबर…. या छकुलीला मांडीवर घ्यायला… 
अग…. 
लाडक्या बाबाला भेटल्याशिवाय…. ही जगाची ओळख पूर्ण कशी बर होणार….
एकमेकांना घट्ट मिठी मारल्याशिवाय आम्हा बाप-लेकीला चैन नाही पडणार…. ;) :)

- टिंग्याची आई

Tuesday, November 17, 2015

कधी मी अन कधी ती…

एका अतूट नात्यात बांधलेले तो आणि ती…. 
तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा "तो" आज त्याच्यावर दृढ विश्वास असणाऱ्या "ती"च्या साठी काहीतरी मनातलं सांगतोय… :)
दो दिल एक जान असलेल्या त्या दोघांसाठी… :) 
कधी ती भासते माझी प्रतिमा…. अन कधी मीच तीचेत प्रतिबिंब….
कधी ती बेधुंद कोसळणारा पाऊस…. अन मी तृप्त धरणी ओलीचिंब….
 
कधी मी व्याकूळ क्षितीज…. अन ती झुकलेलं रुपेरी इंद्रधनुष्य….
कधी मी एक श्वास थांबलेला…. अन ती माझं अख्खं आयुष्य….
 
कधी मी तिची सावली…. अन कधी ती माझ्याच अस्तित्वाची छाया….
कधी मी म्हणजे निस्वार्थ प्रेम…. अन ती वेड्या मनाची वेडी माया….
 
कधी ती नाजूक कळीच सौंदर्य…. अन मी सुगंध दरवळणारा….
कधी ती राधा बावरी माझी…. अन मी तिचा प्रेमवेडा कृष्ण सावळा….
 
कधी ती सुरेख भाऊक नयन…. अन मी अश्रू पापण्यांमागे दडलेला….
कधी मी न सुटणारा गुंता नात्यांचा…. अन ती अतूट धागा अंतरातूनी जोडलेला….
तिचं नि माझं नातं….
असंच काहीसं आगळ वेगळं….
जणू ती माझा ध्यास मी तिचा श्वास….
ती माझ्या जगण्याची आस अन मीच तिचा दृढ विश्वास….
 

- टिंग्याची आई

Monday, October 12, 2015

एक नात.... हरवलेल...

मनात नेहमी दाटणार पण ओठांवर कधीच न आलेलं असं काहीतरी….
अशी भावना जिला शब्द कधीच फुटू नयेत… :)
आठवणीतली एक जुनी कविता…. 
तिचा आवाज म्हणजे त्याच्यासाठी नुसतीच किरकिर होती….
तिने आपलं समजून सांगितलेलं म्हणजे न थांबवता येणारी बडबड होती….
तिचा सहज झालेला स्पर्श सुद्धा त्याला नकोस वाटायचा….
नको असलेल्या तिच्या मैत्रीमध्ये त्याचा जीव घुसमटायचा….

 
तिने मनापासून लिहिलेल्या कवितांमध्ये त्याला कुठलाच अर्थ सापडला नाही….
तिने मांडलेला नात्यांचा गुंता त्याला कधी आवडलाच नाही….
नकोच होती ती आयुष्यात पण स्पष्ट कधीच त्याने सांगितलं नाही….
तिच्या त्या मैत्रीला कधी मनापासून आपलं मानलंच नाही…. 


तिचे डबडबलेले डोळे पाहूनही त्याचं मन कोरड ते कोरडच राहायचं….
नको असलेलं हे असलं ओझं मग कुणी का बर वाहायचं….?
अगदीच नको झालं होतं मग एकदातरी सांगून बघायचं होतं….
निस्वार्थपणे मायाच करायची, निदान एकदा खरं वागून बघायचं होतं….
नसेलच झालं सगळं सहन म्हणून मनगटावरचा धागा त्याने स्वतःच तोडून टाकला….
आहे तशी तिला सोडून ती नसलेल्या जगाचा रस्ता धरला….

केवळ एकच प्रश्न तिचा…
तुला खरंच हे बंध तोडायचे आहेत…? 

आजवरचे सगळे क्षण कायमचे विसरायचे आहेत…?
एक अक्षरी उत्तर त्याचं…. "हो…"


ऐकून खरतर पायाखालची जमीनच सरकली….
पण जाणवत होत आजवर ते घडलं म्हणून ती स्वतःच सावरली….
त्यानंतर एकही प्रश्न तिने कधी केला नाही….
त्याच्या वाटेत येईल असा एकही रस्ता धरला नाही….

मागचं सगळ आठवून आजही आसवं गाळते इतकंच….
त्याच्यासाठी आपण म्हणजे एक बंधन होतो, हे ओझं मनावर वाहतेय इतकंच….

एकच मागणं मागते बाप्पाकडे….
तिच्याइतक वाईट माणूस पुन्हा कधीच त्याच्या आयुष्यात येऊ नये….
झालीच जर चुकून भेट… तर डोळ्यांत दाटलेलं आभाळ त्याच्यासमोर कोसळू नये….

खंत एकंच…
तिची हि मैत्री त्याला कधीच कळली नाही….
अन त्याची होणारी घुसमट तिला लक्षात आली नाही….

सुटलाय आता हात कायमचा….
दोघे आपापल्या घरी सुखी आहेत….
एक रिकामी जागा भरून काढायचा….
आजही प्रयत्न करत आहेत…

- टिंग्याची आई

Tuesday, September 29, 2015

चार ओळी….


ए जिंदगी…. जितना गम देना है … दे दे …. 
पर थोडासा गम तू संभाल के रखना…. 
क्यूंकि…. 
हजम कर लेंगे हम ये सारा जहर…. गुंजाईश अभी बाकी है…. 
टुटे हुए इस परिंदे में…. जीने कि ख्वाईश अभी बाकी है…

--------------------------------------------------------------------------------

दैव कोलमडून पाडतंय मांडव तुझा…. 
एक  एक खांब मुळासकट उपटून…. 
पण सांग त्याला… 
पालं राहिलंच कि ऊभं फक्त एका काठीचा आधार घेऊन…. 
अगदी विश्वासानं…. 

--------------------------------------------------------------------------------

मी पाहिलाय…. एक पर्वत कोसळताना… 
उत्तुंग महामेरू… कणाकणाने ढासळताना…. 
पण…. 
टेकडी म्हणून राहिला असला… तरी आजही तितकीच रग भरून आहे…. 
उरल्या सुरल्या मातीच्या कणाकणात… अजूनही एक आशा तग धरून आहे…. 

--------------------------------------------------------------------------------

आडवे… तिडवे… कसेही… घालू देत त्याला घाव…. 
सुरेख मूर्ती बनेल… तेव्हाही खाऊ देत त्यालाच भाव… 
पण…
देव बनशील जेव्हा तू…. तेव्हा तोच घेईल तुझ्याकडे धाव…. 
शेवटी कळेलच कि त्याला…. नक्की कुणी जिंकला हा डाव…. 

--------------------------------------------------------------------------------

असं नेहमीच होतं…. 
आभाळ दाटून आलं… कि आठवणीही दाटून येतात…. 
अन त्यातल्याच काहीशा… शब्दधारा बनून कागदावर बरसतात…. 

- टिंग्याची आई

Wednesday, September 9, 2015

गहाण….

राम राम… माझं नाव सखा… हितं जवळच हाय माझं गाव… रामाची वाडी… उपाजलो तवाधरणं हितच हाय… आमच्या चार पिढ्या ह्याच गावात जगल्या-वाचल्या…
शेतकरी हाय मी… एक जिमिनीचा तुकडा हाय त्यावरच आमचा परपंच चालतोय…
मी चार-पाच वर्षाचा हुतो तवा "गहाण…" म्हंजी आमच्या भाषेत "घाण…" हा शब्द पयल्यांदा ऐकला… चांगलं अठीवतंय आज बी मला…. 
माझ्या बा बरुबर मी सावकाराच्या घरी गेल्तो… पैशाची नड हुती… आमी सावकाराच्या पायरीवर बसलो हुतो वाट बघत कवा बारी येतीया म्हणून…. आतनं हाक आली तसं बा आन मी त्या पेढीकड गेलो… काय बोलायच्या आतच सावकार म्हणालं…
"या नामदेव शेठ… आज काय 'गहाण' ठेवताय बरं…???"

कर्ज देणारा सावकार शेठ का कर्ज घेणारा माझा बा हे कळण्याएवडा मी मोठा न्हव्तो… काय न बोलता बा गप गुमान बसला… उगा हसल्यागत करत त्येनं कमरच्या पिशवितन एक भला थोरला सोन्याचा मणी काडला… मनी बघताच सावकाराचं डोळं चमकलं… अन भराभरा त्येनं गच्च भरलेल्या तिजोरीतल्या ४-५ नोटा काडल्या… एका हातानं बाला त्या देत दुसऱ्या हातानं तो मणी जणू हिसकावूनच घेतला… आमी दोघ तिथनं मान खाली घालून मिळाला तेवडा पैसा घिऊन निघालो…
तो मणी आमच्या म्हातारीचा हुता… तिच्या कमरच्या पिशवीतनं काडून तिनं कवातरी आमा पोरांना दावला हुता… माय सांगायची… तो मणी म्हातारीच्या डोरल्यात हुता… आमचं म्हातारं खपलं तवाधरणं ती तो मणी कमरच्या पिशवीत ठेवाय लागली… तिचा जीवच जणू त्या मण्यात हुता…

त्या दिसानंतर शेवटचा तो मणी मी पाह्यला तो आमी सावकाराकडनं घरी गेलो तवा… म्हातारीच्या भरल्या डोळ्यात… बा तिची नजर चुकवून सरळ घरात गेला आन मी तसाच गेलो म्हातारीकड… तिच्या कमरला येढा घालून डोक्यात कवाचं रिंगण घालणारा सवाल तिला इचारला…
"म्हातारी आय… गहाण म्हंजी काय ग…???"
मागपासन टच्च भरलेलं तिचं डोळं खळकन रिकामं झालं… मला पोटाशी धरून ती म्हणली…
"लेकरा… घाण म्हंजी… चार पैशासाटी  आपल्या जिवाभावाची एकांदी चीज सावकाराकडं ठीवायची… आन ती परत मिळल का न्हाई ह्येची जलमभर वाट बगायची…."
बोलता बोलता जणू म्हातारीच्या डोळ्यातनं टपोऱ्या मण्यांची धारच लागली… ती काय बोलली ते तवा कळलं न्हाई पर जसं जसं मोठ झालो तसं समदं कळून चुकलं….

पैशाची नड भागली पर त्या दिसापासन आमच्या म्हातारीनं हाय खाल्ली… माय म्हणाली हुती तसंच झालं… तो मणी म्हणजे म्हातारीचा जीवच हुता…. लई तर सालभर जगली म्हातारी… हातरुनाला खिळूनच हुती ती… एक दिस मला हाक मारली…
मला म्हणली… "लेकरा… माज एक काम करशील…???"
आईनं सांगितलं हुतं म्हातारीच समद ऐकायचं म्हणून मग मी … "व्हय करतो कि…" म्हणून मोकळा झालो…
कापऱ्या आवाजात म्हातारी बोलली… "माजा मणी तेवडा सावकाराकडनं सोडवून आन रं लेकरा…."
म्हातारी डोळ्यात जीव आणून आशेनं माज्याकडं बघत हुती… मी नुसतंच "व्हय" म्हणलं… 
आणि म्हातारीनं समाधानान जीव सोडला… तिच्या त्या मण्याच वझं कायमचं माझ्या मनावर टाकून…

म्हातारीच्या जाण्यानं घर रिकाम रिकाम वाटाय लागलं… पर लई दिस न्हाई… सा म्हयन्यातच म्हातारी जूनी झाली… गरीबाचं असंच असतंय… दुक असू देत नायतर सुक, लई दिस न्हाई मुक्काम करत ते गरीबाच्या घरी….
दिस सरत गेलं… हळू हळू आमी मोट झालो…
मी माज्या चार भणी आन माय-बा सगळीच शेतात राबायचो… चार पोती धान्य पिकवायला दिसभर शेतात घाम गाळायचो… पर कदी मनाजोग धान्य पिकलंय असं आटवत न्हाई मला… 


बा म्हणायचा… "कदी काळी आमि पोत्यानं पिक घ्याचो ह्या जीमनीत… ही रास लागायची धान्याची…."
पर तशी रास मी तरी कदी बगितली नवती आन बा ला बी परत कवा दिसल असं वाटत नवतं…
निदान या वर्षाला तरी पाऊस चांगला पडल आणि मनाजोग पिक ईल ह्याच आशेपायी गावातला एक न एक शेतकरी धरणी मायला साकडं घालून नांगर चालवायचा… पर त्या वरच्याच्या मनात काय हुतं त्याचं त्यालाच ठाव… कधी दुष्काळान आमचा घात करावा तर कदी नगो इतक्या पडणाऱ्या पावसानं… तरीबी आमी तग धरून हुतो… 


रोज नवी नड दारात हुबी असावी आन बानं सावकाराकड धाव घ्यावी असा नेमच झालता जणू… कदी अक्काचं लगीन पार पडावं मनून तर कदी धाकल्या यमीचं आजारपण… कदी ब्या-बियाणाची खरेदी तर कदी गुरा-ढोरांची… पैशाची गरज इचारून येत न्हव्ती… दरयेळी घरातला एकांदा दागिना नायतर वस्तू सावकाराकड घाण पडत गेली… मायचं तर सगळं दागिनं कवाच सावकाराच्या तिजोरीत जाऊन बसलं हुतं…
वाटलं हुत का म्हातारी सारकं मायबी दुक करत बसल… पर त्या माऊलीला कसला तो मोह न्हव्ता… तिनं हसऱ्या तोंडानं बाला एक न एक दागीना आन खचणाऱ्या बाला लाक मोलाचा आधार दिलता… 

असंच कितीतरी वर्सं चालत राह्यलं… मी आता कर्ता झालो आन घरचा धनी बनलो… म्हातारीची जागा आता मायनं घीतली आन तिची माज्या बायकोनं… आन बा असाच कवातरी धान्याच्या राशीची वाट बगत बगत काळाच्या आड जावून बसला…

जमनीच्या त्याच तुकड्यावर आज बी आमचा परपंच चालू हाय… आन आजबी तीच आशा मनात तग धरून हाय… कवातरी चांगलं दिस यीतील म्हणून आभाळाकड डोळं लावून बसलेलं हाय… दुष्काळ अजून जुनाच असला तरी दर साल नवं रूप घिऊन येतोय अन नव्या जोमानं येतोय… शेतात पिकलेलं पुरत न्हाई आणि देणी दिऊन काय ऊरत न्हाई अशी गत झालीया… सावकाराकड घाण टाकावं असं काय बी उरलं न्हाई आता…  
दर पाचव्या सालाला कुणीतरी सायेब येतो हात जोडत… कोरडं आभाळ भरल एवडी सपनं दावतो अन निगुन जातो… पर पाऊस काय त्येच्या घरचा हाय व्हय…  त्यो काय करायचं तेच करतो… जमनीला करपून शेवटी आमा गरिबांच्या डोळ्यातंनंच पाझरतो… घाण टाकून आमची घर रिकामी तर सावकाराची घर भराय  लागलीत… 
आज बी जवा त्येच्या दारात हुबा ऱ्हातो तवा म्हातारीचं बोल काळीज चिरत जात्यात…  
"लेकरा… घाण म्हंजी… चार पैशासाटी  आपल्या जिवाभावाची एकांदी चीज सावकाराकडं ठीवायची… आन ती परत मिळल का न्हाई ह्येची जलमभर वाट बगायची…."
 
पैसा कुटणं आन कसा आणावा काय बी कळत न्हाई… सरकार दितीया म्हण लाखभर रुपयं पर शेतकरी मेल्यावर त्येच्या घरच्यास्नी… निदान आपल्या मागारी घरची सुकी होत्याल मनून लई जणांनी केली म्हण आत्महत्या… 
माजा मैतर शिवा… त्येनं बी हेच केलं २ साल झाली आता… गावाभाईरच्या वडाला फास लावून घेतला हुता त्येनं… लई खटपट करून मिळाला हुता त्येच्या जीवाचा मोबदला त्येच्या घरच्यास्नी…
पैसा आला तसा गेला… किती आला कसा आला कळायच्या आतच…. आता त्येची कारभारीण लोकाच्या शेतावर मजुरी करून चार लेकरं पोटाशी धरून कसबसं दिस काड्तीया… आन त्येची म्हातारी माय त्याच वडाखाली आपल्या लेकराला शोदत बस्तीया…
पर त्येची सगळी कर्ज माफ झाली म्हणत्यात…. तेवडाच काय तो फायदा…
 
डोईवरची कर्ज बगितली कि कवा कवा मलाबी वाटतंय का त्या वडाच्या झाडाखाली जीव घाण टाकावा आन मरणाचं दान घिऊन यावं… घरची तरी सुखी हुतील… सगळीच देणी फिटतील… सावकाराकड घाण पडलेलं कायतरी सोडवून आणता ईल… घरातल्या वस्तू घाण टाकण्यातच आविक्ष गेलं आमचं निदान आता जीव घाण टाकला तर काय तरी उपेग हुईल…

डोक्यात इचारांची पाखरं निसतीच भिरभिरत्यात… गावाभाईरचा वड जणू पारंब्या लांब करू करू मला जवळ बलीवतो…
"कर तू बी आत्महत्या… टाक जीव घाण आता माज्या पायाशी…" म्हणून मला साद घालतो…
न्हाई हुईत सहन मग कवातरी पावलं वळत्यात त्या वाटकडं… आता करून टाकू आपण बी… लागू दे एकदाचा सोक्ष मोक्ष म्हणत मरणाच्या दाराकड जावं म्हणतो….
पर एवड्यात एकंच आवाज काळजात घुमतो… "माजा मणी तेवडा सावकाराकडन सोडवून आन रं लेकरा…."

म्हातारीच्या या शब्दाला वलांडून जाणं मला न्हाई जमत… आन जमणार बी न्हाई…
करापलेली जिमीन असो…
कोरडं आभाळ असो…
ताटातली कोरभर भाकर असो…
का टच्च भरल्याल डोळं… एक आशा आज बी तग धरून हाय…
म्हणूनच…
बानं सांगीतल्याली धान्याची रास एकदा तरी पिकवावी म्हणतो…
लेकराला चार बुकं जास्त शिकवावी म्हणतो…
देवीला दरसाली केलेला नवस या साली तरी फेडावा म्हणतो…
आन त्या वडाखाली जीव घाण टाकण्यापरास…
म्हातारीचा घाण पडलेला मणी तेवडा सोडवून आणावा म्हणतो… 

बळ दे रे खंडेराया…
चला… लई वकत घेतला तुमचा… निगतो मी आता… राम राम…
 - टिंग्याची माय

Tuesday, September 1, 2015

साफ-सफाई…

दसरा-दिवाळी कोणताही सण असो आपण पहिल्यांदा करतो ती घराची साफ-सफाई… रंग-रंगोटी… 
आई स्वैपाक घरातली सगळी भांडी घासून पुसून लक्ख करते… थोड्याफार वस्तू इकडे तिकडे होतात… काहींची जागा बदलते आणि आई पुन्हा आपलं किचन हव तसं लावून घेते…. 
आपणही मग उगाचंच घरतल्या वस्तूंची रचना बदलू पाहतो… थोडा बदल करायच्या नादात चांगलच काम वाढवून ठेवतो… आईसाठी… ;) आणि शेवटी पुन्हा एकदा सगळ होतं तसं ठेऊन टाकतो… :) तर अशी असते आपली साफ-सफाई… 

या सफाई मधलाच एक महत्वाचा भाग म्हणजे माळा साफ करणे… हल्लीच्या घरात माळा उरलाच नाहीये म्हणा… :( 
असो… माळा म्हणजे तशी अडगळीची जागा… सगळ्या जुन्या पुराण्या वस्तू तिथेच सापडतात… आणि तो साफ करताना गवसतात कित्येक जुन्या आठवणी… एकेका वस्तूशी घट्ट जोडलेल्या भावना… या सगळ्यांना पुन्हा एकदा उजाळा मिळतो… 
माळ्यावर अशा बऱ्याच वस्तू असतात… तुमची लहानपणीची पहिली-वाहिली सायकल… शाळेचं जुनं दप्तर… त्यातली ती जुनी कंपास-पेटी… जुनी पुरानी कपडे… तुमची फेवरेट bat सुद्धा तिथेच धूळखात पडलेली सापडते… जुनी पुस्तकं, जुन्या वह्या… अर्धवट लिहून ठेवलेल्या डायऱ्या…. अन त्या प्रत्येक पानात जपलेल्या जुन्या आठवणी…. :)

माळा आवरायचा…. नको असलेल्या वस्तू फेकून द्यायच्या या उद्देशाने सुरु केलेलं काम आपण विसरूनच जातो… आणि मन त्या आठवणींमध्ये गुरफटून जातं… यातली एकही वस्तू कितीही निरुपयोगी असली तरी टाकून न देता साफसूफ करून ठेवली जाते… आणि माळा पुन्हा एकदा गच्च भरलेला राहतो वस्तूंनी आणि आठवणींनी…. 

आपलं मनही कितीतरी आठवणी साठवून ठेवतं… अगदी आपल्याला काळात नसताना घडलेली एखादी घटना सुद्धा आपल्याला लख्ख आठवत असते… सुख-दुःखाच्या, प्रेमाच्या, मैत्रीच्या, कितीतरी आठवणी मनाच्या माळ्यावर वर्षानुवर्षे साठलेल्या असतात… 
मग म्हटलं… आज या मनाची साफसफाई केली तर……!!! होईल ते शक्य….????
आज सहजंच वाटलं… या मनाची करावी साफ-सफाई… 
काढून टाकाव्या अशा आठवणी… ज्यांची खरच काही गरज नाही… 
अन साफसूफ करून ठेवाव्या…  जवळच्या अशा काही…
जीवापाड जपलेल्या… ज्यांच्या शिवाय मी जगू शकत नाही…
ठरवलंच होतं आज… सगळं साफ करून टाकायचं…
मनावरचं नको असलेलं ओझं… आज कायमचं झटकायचं…
कुठून करावी सुरुवात म्हणून पहिल्यांदा बालपण निवडलं…
बऱ्याच सापडल्या आठवणी…  ज्यांनी मला घडवलं…
आईची शिकवण… अन आजीच्या अर्धवट आठवणाऱ्या गोष्टी…
बाबांनी दिलेला सल्ला…  अन फक्त मित्रासोबत शेयर केलेल्या गोष्टी…
शुल्लक कारणावरून… भावंडांसोबत केलेली टोकाची भांडणं…
आणि त्यांच्यासाठीच दादा बनून गल्लीतल्या पोरांना बडवणं…
मित्र मैत्रिणी खास दोस्त शाळा घर आणि असं बरंच काही…
सगळंच आजही हवं होतं… टाकून द्यावंसं काही वाटलंच नाही…
मग निवडलं तारुण्य…. सुखद सौंदर्याने बहरलेलं… 
आठवणींच्या कित्येक कळ्यांनी… आजही टवटवीत असलेलं…
कोवळ्या ओठांवर फुटलेलं… पहिलं वहिलं ते मिसरूड…
अन कधीही एका जागी न स्थिरावणार आमचं बूड…
आठवलं ते पहिलं प्रेम अन ती अप्सरा स्वर्गाची…
आठवणीतली एक रम्य… पहाट जणू ती प्रेमाची… 
आणि आठवला… ती सोडून गेली तो काळाकुट्ट दिवस…
अन दुसरी लवकर मिळो म्हणून गणपतीला केलेला नवस… :)

आठवला… माणसांच्या गर्दीत जिवलगांचा… नकळत सुटलेला हात… 
अन जीवघेण्या त्याच दुखात जागून काढलेली रात…
समज गैरसमजांचे नको असलेलं एक विचित्र मायाजाल… 
काय मिळवलं आणि काय गमावलं हा नेहमीचाच सवाल… 
कधी आपल्याच माणसांशी करावा लागलेला न संपणारा लढा 
रक्तबंबाळ झालेल्या भावनांचा आपल्याच पायाखाली साचलेला सडा… 

तरुणपणाची मस्ती, जिद्द, उतावळेपणा… सगळंच आठवत होतं…
अन त्यातून भोगावं लागलेलं बरच काही… मनाच्या डोळ्यातून वाहत होतं…
आयुष्यात लागलेली पहिली ठेच… पहिलं अपयश, पहिला आनंद…. सगळे एकाच रांगेत उभे होते…
सुख टाकावं कि दुखं पुसावं… काहीच काळात न्हवते…
नाही होय करत… पुन्हा सगळ तसाच ठेवलं…
तरुणाईच्या आठवणीतलंही काहीच नाही टाकलं….
संसाराच्या आठवणींचही असंच काहीसं झालं…
दोघांतलं प्रेम असो वा भांडण काहीच टाकता नाही आलं…
सोबत वाटून घेतलेला प्रत्येक क्षण आठवण बनून उभा होता 
कधी गोड हसू तर कधी आमच्यासाठी नवा धडा घेऊन उभा होता…
कडू -गोड सगळ्याच आठवणी… आज जवळच्या वाटत होत्या… 
आणखीनच दाट कोरल्या गेल्या… ज्या खरंच विसाराव्याशा वाटत होत्या…
आजवरचा हिशोब मांडून झाला… टाकून द्यावीशी एकही आठवण सापडली नाही…
आवरून ठेवलं मन पुन्हा… कोणतीही आठवण मीच हरवू दिली नाही…

सहज वळून पाहिलं… मनात अजून बरीच स्पेस उरली होती…
आयुष्यातल्या प्रत्येक आठवणीसाठी… एकतरी जागा राखीव होती…
पण खरं सांगायचं तर…. 
आता कळलंय… या मनाच्या साफ-सफाईची खरंच काही गरज न्हवती…. :)
- टिंग्याची आई
माळ्यावरची एखादी वस्तू खूपच जीर्ण झाली तर कदाचित टाकून देता येईलही… पण या मनातली कोणतीही आठवण कितीही त्रास देणारी किंवा नकोशी असली तरी टाकून देत येत नाही… आपण पुन्हा ती घासून-पुसून स्वच्छ करून ठेवतो…. अगदी शेवटपर्यंत… एक एक आठवण जीवापाड जपून…. :)

Sunday, August 23, 2015

काही गोष्टी बाप्पा न मागता देतो…. :)

 "सरू" या छोट्याशा कथेची नायिका…
तर हि गोष्ट आहे सरू आणि तिच्या लाडक्या बाप्पाची… सरुची बाप्पावर खूप श्रद्धा आहे… कोणतीही गोष्ट घडो मग ती आनंदाची असो वा दुःखाची, बाप्पाचा प्रसाद म्हणून ती समाधानाने स्वीकारते… कधी एकटीच बसून बप्पाशी गप्पा मारते तर कधी काही अगदीच असह्य झालं अन कोणाच्यातरी कुशीत शिरून मन मोकळं करावंसं वाटलं कि बाप्पाच्या समोर जाऊन बसते… हवे नको ते सगळे प्रश्न ती त्यालाच विचारते… उत्तरं लगेच मिळतातच असे नाही पण बाप्पा आपलं सगळ ऐकतो असं तिला वाटत… आणि तीच सरुची मन मोकळं करायची हक्काची जागा… :)बाप्पाशी बोललं कि तिला खूप हलक वाटत आणि प्रत्येक संकटाशी  झुंजायचं बळ मिळतं… तर अशी आहे आपली सरू… :)


सरुचं कुटुंब तसं छोटंच… जीवाला जीव देणारा नवरा… आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवणारे सासू-सासरे आणि घरात सुखाच्या पावलांनी दुडूदुडू धावणारं तिचं छोट पिल्लू… सगळे आनंदाने नांदतात आपल्या छोट्याशा घरकुलात…  

गेल्या श्रावण महिन्यातली गोष्ट… रोज ऑफिसमुळे बाप्पाच्या मंदिरात जायला मिळत न्हवत म्हणून सरुने शनिवारी सुट्टीच्या दिवशी देवळात जायचं ठरवलं… सगळी काम आटोपून दोघीजणी सासू-सुना आपल्या छकुल्याला घेऊन निघाल्या देव दर्शनाला… वाटेत लागेल त्या सगळ्याच देवळात दर्शन घेतलं त्यांनी… श्रावण मासातलं एक वेगळंच चैतन्य सार्या वातावरणात पसरलं होतं… मन प्रसन्न वाटत होत… सरते शेवटी आपल्या लाडक्या मोरया गणेशाचं दर्शन घेऊन मग दोघींनी घराची वाट धरली… 

सरू आणि तिचं नटखट पिल्लू पुढे चालले होते… आजीला भरभर चालता येत नाही ना म्हणून ती चार पावलं मागेच राहायची… सरू मात्र दर थोड्या वेळाने मागे वळून पाहत असे… पिल्लुसोबत मजा करत पुढे चालत असताना एका कोपऱ्यावर सरूला दोन अनोळखी व्यक्ती गाडीवर थांबलेल्या दिसल्या… काही न बोलता ती शांतपणे त्यांच्या शेजारून पुढे निघून आली… सासूबाई अजून चार पावलं मागेच होत्या… सरूला काहीतरी विचित्र जाणवलं कारण ती दोन माणसं लगेचंच गाडी चालू करून तिथून निघाली… आणि इतक्यात सरूच्या सासूबाई ओरडल्या….
"अग………. त्याने माझं डोरलं वडून नेलं…."
काय करावं क्षणभर सरूला काहीच सुचेना… आरडाओरडा करावा तर ते लोक कधीच फरार झाले होते… काय सांगावं अन कुणाला सांगावं… तिने साधा त्या गाडीचा नंबर किंवा त्या दोघांचे चेहरेही धड पाहिले न्हव्ते… अशा अचानक हल्ल्याने सासूबाई पण घाबरल्या होत्या… कसाबसा त्यांनी मंगळसूत्राचा एक पदर दाबून धरला होता तेवढाच काय तो वाचला… नाही म्हटलं तरी १ तोळ्याचा ऐवज गेला…. :( सरुने फार प्रेमाने घडवून आणलं होतं ते तिच्या आईसाठी…. पण आता कोणीच काही करू शकत न्हवत… 


सरुने स्वतःला सावरलं आणि आईचंही सांत्वन केल आणि सगळे घरी आले… आज सरुचे अहो पण काही बोलले नाहीत… गेलं तर जाऊ देत म्हणून त्यांनी हि गोष्ट सोडून दिली…. आईंनी मात्र भलतंच टेन्शन घेतलं होत… आणि सरूच्या डोक्यातूनही हि गोष्ट काही केल्या जात न्हवती… दोघीनाही रात्रभर शो लागली नाही… डोळे बंद करताच ते दोन अस्पष्ट चेहरे समोर धिंगाणा घालत होते… "मी का बर आईंकडे लक्ष दिलं नाही…??" "मी का बर त्या दोघांचे चेहरे आणि गाडीचा नंबर पहिला नाही…???" असे अनेक प्रश्न सारूच्या डोक्यात भुणभुण करत होते… आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत असं तिला वाटू लागलं… एकदम हेल्पलेस… काहीच करू शकत न्हवती ती…

तिने बाप्पासमोर बसून त्यालाच प्रश्न केला… माझ्या कष्टाचं होत ना ते मग तू का बर हिरावून घेतलंस…? काय चुकलं माझं म्हणून हि शिक्षा? तुझंच दर्शन द्यायला आलो होतो… त्याचाच का हा प्रसाद…??? एक ना दोन असे कित्येक प्रश्न तिने रागाच्या भरात बाप्पाला विचारले… परत येणार नाही तुझ्या मंदिरात असंही म्हणून टाकलं…. भांड भांड भांडली आणि रड रड रडली देखील… गेलेलं परत मिळणार नाही माहित होत पण बप्पाशी भांडून तीच तिलाच थोड हलक वाटलं… आणि हो शांत झाल्यावर तिने बाप्पाची माफी मागितली…

 दिवस सरत गेले तसे सगळेच हि गोष्ट हळू हळू विसरत होते… मग प्दुहे खोट्या मंगळसूत्राची खरेदी झाली… सोन्याचं काही घालायची जणू भीतीच वाटू लागली… श्रावण सरला आणि भाद्रपाद्ची सुरुवात गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल घेऊन आली…. सारूच्या घरीही गणपती बसतात…. खूप मन लावून आरास करते ती बाप्पाची… यावेळी तर तिने वेगळाच घाट मांडला होता… जुन्या वर्तमानपत्राचा वापर करून आरास करायची… त्यासाठी ती १०-१२ दिवस आधीपासूनच तयारी करत होती… संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर स्वैपाक-जेवण-भांडी आवरून रात्री १०-१०.३० वाजता ती डेकोरेशनच साहित्य बनवत असे ते रात्री १२-१२.३० पर्यंत… यावेळी ती एकटीच सगळ करत होती… घरच्यांना मदत करणं फारसं जमलं न्हवतं यंदा… मदतीला एक मोठ्ठ माणूस म्हणजे तिचं लाडकं पिल्लू… तो तिला पेपर फाडायला मदत करत असे… रोजची हि थोडी थोडी मेहनत घेऊन सरुने बाप्पाची आरास खूपच छान केली अगदी दृष्ट लागावी अशी…. बाप्पा यावेळी तिने बनवलेल्या मोरावर बसून मयुरेश्वर झाला होता… सर्वांना खूपच आवडलं होत डेकोरेशन… एक नवीन, वेगळी आणि इको फ्रेंडली कल्पना म्हणून सगळ्यांनीच कौतुक केलं… बाप्पाला बघून सरुलाही खूप समाधान वाटलं… बाप्पा घरी आले कि तिला जणू जगाचा विसरच पडतो….

 असंच एके दिवशी दुपारच्या वेळी पिल्लूचा मामा फेसबुकवर टाईमपास करत असताना त्याला गणपती डेकोरेशन स्पर्धेची पोस्ट दिसली। सरूच्या सोसायटी वाल्या बिल्डरची होती ती… मामाने सरूला आग्रह केला भाग घेण्यासाठी पण तिचं मन तयार होत न्हवत… कारण तिने कोणतीही अपेक्षा न ठेवता हि सगळी आरास केली होती…. पण मामाच्या हट्टापुढे हतबल होऊन तिने शेवटी पार्टीसीपेट केलच… :) आणि मग विसरूनही गेली…
बाप्पासोबत घरी येणाऱ्या  गौराईचंही तिने आनंदाने स्वागत केलं, छान सजावट केली… त्यांना खाऊ पिऊ घातलं, नटवल सजवलं, अगदी सगळ सगळ केलं…. या दरम्यान ती त्या गेलेल्या मंगळसूत्राची बाबही पूर्णपणे विसरून गेली होती…. :)

गौरी विसर्जन झाल्यावर एक दिवस सहजच सरू निवांतपणे मेल चेक करत बसली होती…. आणि तिला बाप्पाने एक मोठ्ठ सरप्राईज दिलं…. :)
तिने भाग घेतलेल्या स्पर्धेत तिला पहिलं बक्षीस मिळालं होतं…. तिचा आनंद गगनात मावेना… बाप्पाला खरंच तिने केलेली आरास आवडली होती याचीच ती पावती होती…. बक्षिसाची रक्कम ऐकून खर तर तिचा विश्वासच बसत न्हवता… अवघं तीनशे रुपयांचं सामान वापरून केलेल्या सजावटीला चक्क ३०००० रुपयांचं बक्षीस मिळालं होतं…. :) :)
सगळ्यांनी सरूच खूप कौतुक केलं… तिच्या आई पण खूप खुश झाल्या… घरचे सगळेच खुश होते…
सरू मात्र इतकंच म्हणाली…. "बाप्पाने नेलं होतं आणि बाप्पानेच पुन्हा ओंजळीत दान म्हणून परत दिलं…."
इतरांना याचा अर्थ कळला नाही पण सरूला आणि तिच्या बाप्पालाच समजला….

चोरीला गेलेल्या अर्ध्या मंगळसुत्रासाठी ती तिच्या बाप्पाशी भांडली होती… खूप रडली होती…. कदाचित म्हणूनच बाप्पाने तिला तिच्या कष्टाचं फळ परत दिलं होतं…. या ना त्या रूपाने गेलेलं धन बाप्पाने पुन्हा सरूच्या पदरात घातलं…. काही गोष्टी बाप्पा न मागता देतो हे पुन्हा एकदा सरूला पटलंय… :)
त्या दिवसापासून बाप्पावरची तिची श्रद्धा आणखीनच दृढ झाली आहे…. पुढच्या वर्षी काय आरास करायची याचे विचार आत्तापासूनच तिच्या डोक्यात घोळत आहेत… :) 
बक्षिसाच्या मिळालेल्या पैशातून सरुने बाप्पासाठी छानसा श्रीमंत हार घडवून घेतलाय… पुढच्या वर्षी आरास कशी का असेना पण हा हार घालून सरूचा लाडका बाप्पा गोड दिसेल एवढं नक्की….
Thank you so much Bappa... :)


- टिंग्याची आई
बोला गणपती बाप्पा…. मोरया…!!!

Monday, August 3, 2015

डबल सेंच्युरी… :)

अहो खरच आज डबल सेंच्युरी झाली…
२०१२ मध्ये सुरुवात झाली अन बघता बघता आज ब्लॉगची डबल सेंच्युरी झाली…. आभार तुमचेच आणि श्रेयही तुम्हालाच… 
कारण... कुणी वाचणारं असतं तेव्हाच तर लिहिण्यात खरी मजा असते… :) शंभरी गाठली तेव्हाही असाच आनंद झाला होता… सरस्वतीच्या चरणी १०० पाकळ्यांची हि दोन फुलं वाहण्याच भाग्य मला तुमच्यामुळेच लाभलं आहे… :)
तर हि डबल सेंच्युरी साजरी करणारी अन गेल्या १०० कवितांचा आढावा घेणारी हि द्विशतकी कविता पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी… :)
(To read the poems please click on the links :)
यार… कभी mood Change हो तब घर याद आता है...
बिदाई का दिन भी... एक याद बन के रह जाता है...
गाडी कि servicing में भी... कविता का विषय मिल जाता है...
और आपकी Comments पढके... मेरा दिल भर आता है...
सिर्फ एक बार मांगी... पर यह ख़ुशी मुझे हर बार मिली...
ना ना करते करते… आज डबल सेंच्युरी झाली… :)
I knew, It was time to write to in English... and I did... :)
I know, life doesn't give you Ctrl+Z.. but still I wanna try... :)
And Thank You...
You all made it possible... to find my real treasury...
You cheered, inspired and helped me achieve this Double Century... :)
बाप होताना बावरलेला... बाबा आता मोठा होतोय...
अन आजोबा झालेले बाबा अन टीवी पाहून… टीवी नसता तर हा प्रश्न पडतोय…
कोल्हापुरी तांबडा-पांढरा व्हरपत... टिंग्या म्हणे तुझे सगळे विषय संपले कि काय आई...?
माझीच Copy Cat करत हा मातृमुखी... रामरक्षा म्हणत... खिडकीतल्या पावसाला सांगतोय... आज आई धडपडली… :)
अन मी Feeling Proud… आजवरचा सफर आठवत पुन्हा सांगतेय… आज डबल सेंच्युरी झाली… :)

खूप वर्षांनी... वाट बघणाऱ्या घराकडे... खाटकाच पोर पुन्हा परत आलं…
बोलणाऱ्या डोंगराने... माळीन गावच्या दुखात रडून घेतलं…
राजकारण या किचकट विषयाला... शब्दांत बांधून पाहिलं…
अन आलाय आता उन्हाळा म्हणत… पाऊस कुठे गेलाय म्हणायलाही लावलं… 
मला आई व्हायचंय हि हळहळ... तर कुठे आईचं काळीजच हरवलंय...
तर कधी त्या पोरक्याच्या डोळ्यात
... मनातलं पाणी दाटलंय...
  
आज तू येणार होतीस म्हणत... लाडक्या गौराईला साद घातली...
कधी हरवलेली सखी
... काळजी घे... अगदी सहज म्हणून गेली...
सुनबाई कशी असावी...? सुगरनीने कवितेतून सांगितलं...
कांचन म्हणे… ताज्या ताज्या भूतांकितने
... बिचाऱ्या भूतांनाही नाही सोडलं…
"त्या" ची अन "ती" ची गोष्ट सांगताना... अवेळी पाऊस दाटून यावा...
निरोप घेऊन तो onsite ला गेल्यावर
... तिला त्याच्या आठवणींचा ठसका लागावा...
कादंबरी सारख्या तिला
... तो विचारतो सखे मी कसा विसरू तुला...?
अन तिने मात्र बांधलाय मनात
... त्याच्याच आठवणींचा झुला… 

एक लग्नाच्या अनोख्या गोष्टी सोबत
... एक छानसं स्वप्न पाहिलं...
अन प्रेम म्हणजे काय त्या दोघांना... लाडक्या घराच्या सावलीत गवसलं...
एकमेकांना लिहिलेलं पत्र, touchscreen वरून Watsapp वरच्या गप्पा, कौतुक
... सगळंच समाधान देणारं आहे...
कुणीतरी असावसं वाटतं म्हणणाऱ्या दोघांनाही
... प्रेमाला भाषा नसते रोज नव्याने कळत आहे...
तरीही एखादा दिवस रागाचा
... येतोच अधून मधून त्यांच्या भेटीला...
अन मावशीने टांग मारलीच
... तर मदतही करतात एकमेकाला...
साखरपुडा ते लग्न सफर पार करून
... आपणच आहोत दोघे म्हणत ते लढा देत आहेत...  
अन बोगनवेलीची फुलं... आजही येते म्हणणाऱ्या तिची वाट पाहत आहेत...

गुन्हेगारांना झालीये म्हणे फाशी… अन मरणाचे फायदेही सांगून झाले…
टमटम मधून जुन्या ठिकाणी जाताच... ती समोर आल्यावर सगळे संशय अपोआप हरवले… 
हरवलेली माणसंही पुन्हा भेटतात… हे पुन्हा एकदा मनाला पटले… :)
एकसष्ठीच्या निमित्ताने... आजीचा डायबेटीस सगळ्यांना भेटून गेला…
अन सर्वांना Happy New Year म्हणत
... काकीचा बडे सेलिब्रेट केला… 
Manager नको ग बाई... म्हणून पेपर टाकावा म्हटलं…
अन प्रोफेशनल पणाच्या नादात
... Poem Testing करून टाकलं… 

जगावेगळा आपला क्रिकेटचा
देव रिटायर होताना... लेखणी आपसूक बोलली…
तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत
... टिंग्यासोबत माझी कविताही हसली…
अन हसत खेळत आज
... ब्लॉगची डबल सेंच्युरी झाली… :)
संदीप-सलिल च्या काही कवितांमध्ये… विचार लहरीत मन आजही तरंगत राही…
एक दिवस कवितेच्या वहिशिवाय… आता टिंग्याच्या आईला राहवत नाही….  

वाईट वाटत आजवर त्याने एकही कविता वाचली नाही म्हणून…
कदाचित तिसरी शंभरी गाठावी लागेल त्याची शाबासकी मिळावी म्हणून… :)
आज एवढंच शिकलो… वाहायला हवं म्हणून साचलेलं वाहत नाही…
अन कितीही अडवून ठेवलं तरी… हसू असो वा रडू वाहायचं राहत नाही… 


मनातलं सगळ मांडायची माझी हक्काची जागा म्हणजे हि शब्दांजली…. 
बाप्पाच्या कृपेनेच आज ब्लॉगवर... पोस्ट ची डबल सेंच्युरी झाली…. 
अन तुमची लाडकी टिंग्याची आई... आज जरा जास्तच आहे शेफारली…. :)
खरं सांगायचं तर….
तितकं सोपं न्हवतं… तुमच्याशिवाय ही शब्दांजली बहरणं…
देव करो… हि छोटीशी शब्दांजली कविते कवितेने अशीच मोठी होत राहो…
बळ दे रे बाप्पा… गणपती बाप्पा मोरया… :)
- टिंग्याची आई
Well Done Tingyachi Aai... ;)