Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Wednesday, April 20, 2022

माणूस अप्पलपोटी झालाय....

आजी म्हणायची.. माणूस अप्पलपोटी झालाय... 

काळत न्हवतं तेव्हा... पण आता त्याचा अनुभव यायला लागलाय .... 

कोरोना नावाचा हा रोग... जगभर थयथय नाचत आलाय... 

माणसातला माणूस अन राक्षस सुद्धा दाखवू लागलाय.. माणूस खरंच अप्पलपोटी झालाय .. 


एकीकडे आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर आणायला धावतोय ... 

तर दुसरीकडे पाच हजारांचं सिलेंडर पट्ठ्या पन्नास हजाराला विकायला लागलाय.. माणूस अप्पलपोटी झालाय ... 


कुणी औषध इंजेक्शन साठी जीवाचा आटापिटा करताना दिसतोय.. 

आणि त्याच औषधांचा खुलेआम काळाबाजार होताना आम्ही पाहिलाय... माणूस अप्पलपोटी झालाय... 


बेड मिळेना ऍडमिट व्हायला म्हणून पेशंटला हातावर घेऊन वणवण फिरतोय ... 

अन एकाच बेडवर २-३ पेशंट ठेवून त्यातून बक्कळ पैसे काढायलाय ... माणूस अप्पलपोटी झालाय ... 


मरण आलं पण सरणाशिवाय २-२ दिवस देह पडून राहायला लागलाय ... 

अन त्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाताना माणूस मागं पुढं बघाना झालाय ... माणूस अप्पलपोटी झालाय ... 


एकीकडे मतदान करणाराच एक एक करून कमी होत चाललाय... 

अन सत्तेसाठी राजकारण्यांचा जीव मात्र निवडणुकीतच अडकायलाय... माणूस अप्पलपोटी झालाय... 


आपल्यातलंच कुणीतरी अचानक चालता बोलता  कायमचं सोडून चाललंय... 

शेवटची भेट नाही... निरोपाचा अंतिम क्षण नाही .. डोळ्यातलं पाणीही आता आटलंय... 

पण या सगळ्यांचं भांडवल करणारा मात्र आपली खळगी भरत बसलाय ... माणूस अप्पलपोटी झालाय... 


पण तरीही .... 

बेघरांना घर देणारा हात आजही पुढे येतोय ... 

भुकेल्या जीवांना कुणीतरी चार घास भरवतोय .... 

कधी डॉक्टर नर्स बनून पाठीशी उभा राहतोय ... 

तर कधी पोलीस, सफाई कामगार बनून आधार देतोय ... 

आपला जीव धोक्यात घालून कुणी जीव वाचवतोय ... 

तर कुणी आपल्याला शब्दांनीच मोलाचा आधार देतोय .... 


माणसंच आहेत हि सुद्धा... पण यांच्यामुळेच माणसांवरचा विश्वास पुन्हा दृढ होत चाललाय.... 

अप्पलपोटी माणसांच्या जगात यांच्या रूपाने प्रत्येकाला देव भेटायला लागलाय... 

पुन्हा देव भेटायला लागलाय... 


- टिंग्याची आई (शिल्पा कुर्ले )

Tuesday, December 20, 2016

हक्काचा विसावा....

अनुची आज खूपच गडबड चालू होती... सुट्टीचा दिवस होता... म्हणजे रजाच घेतली होती तिने तरीही सकाळपासून भलतीच धावपळ सुरु होती... आज तिच्या लेकीचा म्हणजे मनूचा बडे होता... पोरगी भलतीच खुश होती आणि म्हणूनच अनुसुद्धा... लेकीचं फेव्हरेट गिफ्ट दिलं होतं तिच्या लाडक्या आईने... एक छानसा परीचा ड्रेस... नाहीतरी अनुच्या आयुष्यातली परीच होती ती... सुखाची जादू करणारी परी...
बडे संध्याकाळीच करणार होते घरच्या घरी पण तरीही अनुने आज सुट्टी घेतली होती...
एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी....
अनु.... एक शिकली सवरलेली... नोकरी करत घर सांभाळणारी मुलगी... स्वतःचा ३ रूमचा फ्लॅट तिथे ती आपली आई आणि लेकीसोबत राहते... एक सिंगल पॅरेन्ट असूनही लेकीच्या कोणत्याही बाबतीत तिने काहीही कमी पडू दिलेलं नाहीये....
हो... सिंगल पॅरेन्ट... गेली चार वर्ष झाली ती मनूला एकटीच संभाळतेय... अमित... मनूचे बाबा... एकटाच राहतोय त्यांच्या जुन्या घरी...
दोघेही चांगले कमवणारे, चांगल्या कंपनीत कामाला आहेत... तसं त्यांचं लव्ह मॅरेज... घरचे समजूतदार म्हणून त्यांनी छान थाटामाटाने लग्न लावून दिलं... वर्ष दोन वर्ष छान संसार चालू होता... एक छान पिल्लूही दिला बाप्पाने मनूच्या रूपाने... पण नंतर काय बिनसलं देव जाणे... दोघेही नकळत दुरावत गेले... नात्यातला दुरावा इतका वाढत गेला कि दोघांना सोबत राहणं असह्य झालं आणि त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला... लेक अवघी २ वर्षांची होती म्हणून अनुकडे राहिली आणि अमितला अधेमधे भेटायला मिळायचं...
चार वर्ष झाली तरी अजून ऑफिशियल डिवोर्स मिळाला नाहीये आणि त्यासाठीच दोघं धडपड करत आहेत... :(
गेली चार वर्षं अगदी रोज म्हटलं तरी अनु अमितचा विचार करते... तिच्यावर आणि मनूवर इतकं प्रेम करणारा तिचा अमित असा कसा वागू शकतो हेच तिला कळत न्हवतं....  रोजची रात्र जणू काळरात्र बनून यायची अन थकलेल्या शरीराला अश्रूंत भिजलेली झोप शांत करून जायची... मनू होती म्हणून आजवर अनु तग धरू शकली... नाहीतर तिचं काय झालं असतं त्या बाप्पालाच ठाऊक...

थोडंफार काहीतरी झाल्यावर नातं तोडणाऱ्यातली अनु न्हवती... फार विचार करून निर्णय घेणारी आणि समंजस त्यामुळे तिच्या या निर्णयाला घरच्यांनी फार विरोध केला नाही... लेकीला आणि आईला सोबत घेऊन अनु राहत होती... सोपं न्हवतं असं एकटं आयुष्य जगणं पण तरीही ती जगात होती... लढत होती... एकटी... चिमुकल्या लेकीला पाठीशी घेऊन...

अमितही काहीसा अनुसारखाच पण बऱ्याचदा त्याचा राग मात्र त्याला तोंडघशी पाडायचा... कदाचित हा रागच त्यांच्या नात्याच्या या अवस्थेला कारणीभूत होता... घरातून कायमचं निघून जाणाऱ्या अनुच्या पावलांना माघारी फिरण्याची विनंती सुद्धा त्याने केली नाही... स्वतःमध्ये आणि कामामध्ये त्याने इतकं स्वतःला गुरफटून घेतलंय कि अनुचा काय त्याचा स्वतःचाही आवाज तो ऐकू शकत नाहीये... वेळ हा फक्त कामासाठीच आहे असं काहीसं त्याचं मत आहे...

गेल्या चार वर्षांत तो मनूला भेटायलाही फार वेळा आला न्हवता.. दार दुसरा तिसरा शनिवार अनु त्याच्यासाठी राखून ठेवायची.. पण तो मात्र फार कमी वेळा आला त्यांना भेटायला... "माझ्यासाठी नाही पण त्या लेकराची सुद्धा ओढ वाटू नये त्याला...?" हेच तिच्यासाठी मोठ्ठ प्रश्नचिन्ह होतं... नेहमीपेक्षा कामात आता तो जरा जास्तच गुंतला होता म्हणे... घरी येण्या जाण्याचाही नेम नाहीये... आणि हो जॉब मध्ये खूप प्रगती केलीये म्हणे... एवढं काम एवढा व्याप तरीही आश्चर्य म्हणजे कोर्टाची एकही तारीख त्याने आजवर चुकवली न्हवती...
वाढदिवसाची वगैरे तारीख हमखास विसरणार अमित कोर्टाची तारीख मात्र कसा काय लक्षात ठेवणे होता कोणास ठाऊक... हजारो प्रश्न रोज अनुच्या डोक्यात थैमान घालत पण उत्तरं मुळीच सापडत न्हवती.. आणि आता तर ती शोधायची इच्छाही मेली आहे असं तिला वाटायचं...
आज मनूला मुद्दाम ती बरोबर घेऊन आली होती... कदाचित बाबाला बडेच्या दिवशी तरी लेकीशी बोलावसं वाटेल म्हणून... आणि शंकाही होतीच कि त्याच्या लक्षातही असेल कि नाही... याच सगळ्या विचारात अनु गाडी चालवत होती... शेजारी बसलेल्या मनूचे प्रश्न चालूच होते... कुठे जायचंय.. कोण कोण येणारे.. वगैरे वगैरे...
त्या जीवाला तर बाबा म्हणायची साधी सवय पण न्हवती... आपल्याला एक बाबा आहे आणि दूर कुठेतरी राहतो एवढंच काय ते तिला ठाऊक... अनूनेही त्याच्या बद्दल बोलणं, सांगणं बऱ्याचदा टाळलं होतं... "बाबा खूप चांगला आहे" एवढंच ती सांगायची...  पण त्या चिमुकल्या जीवाला बाकीच्यांनी जे काही सांगितलं त्यावरून बाबा म्हणजे कुणी फारशी चांगली व्यक्ती नसते असाच तिचा ग्रह झाला होता...
मनूच्या प्रश्नांना जमेल तशी उत्तर देत प्रवास चालू होता... अवघा ४-५ किलोमीटर चा प्रवास तोही अनुला दरवेळी मैलोन मेल लांब वाटायचा...

कोर्टाच्या दारातच अमितची गाडी दिसली.. तो आजही वेळे आधी पोचला होता... आणि त्याच्या वकीलांशी बोलण्यात बिझी होता... अनुने गाडी मुद्दामच थोडी लांब लावली... आणि मनूला घेऊन ती थेट आपल्या वकिलांकडे गेली....

अमित समोर दिसला तशी आतून एक कळ उठली... नकळत तिचं मन धावत जाऊन त्याला एक मिठी मारून आलं... त्याचा स्पर्श रोमारोमात भरून गेला... डोळे काठोकाठ भरून आले... आणि त्याच्याशी तोंडभर हसावं म्हणून मन आशेनं त्याच्याकडे पाहू लागलं... पण... अमित मात्र तितक्याच निर्विकारपणे तिच्याकडे पाहून फक्त "hi..." म्हणाला... क्षणार्धात हळवी अनु गळून पडली आणि आणि डिवोर्स घ्यायला आलेली इतकी वर्षे एकटी संसार करणारी... लेकीला एकटी सांभाळणारी अनु सावरून उभी राहिली.....

निदान मनूला तरी त्याने मिठीत घ्यावं... कडेवर घ्यावं अशी आशा होती... पण त्याने तेही केलं नाही... बाबाकडे जा म्हटल्यावर मनू गेली त्याच्याकडे... तिचा एक पापा घेऊन नेहमीप्रमाणे एक चेक अमितने तिच्या हातात दिला.... आणि मनू आईकडे परत आली... दरवेळी एक चेक तो माणूस द्यायचा... चेक वटवणं तर दूरच पण आजवर अनुने त्यावरची रक्कम सुद्धा कधी पाहिली न्हवती...
थोडीफार कागदपत्रांची कामं आटपली आणि मग दोन्ही पार्टी बोलायला म्हणजेच अर्ग्युमेण्ट ला सज्ज झाल्या... आजवर सांगितलेल्या त्याच तयच गोष्टी पुन्हा गिरवल्या जात होत्या... चार वर्षांपूर्वीची भांडणं आज पुन्हा नव्याने उकरून काढली जात होती... वकील आपापल्या परीने प्रत्येक कारणाचा अर्थ लावून त्या दोघांची बाजू मांडत होते... अमिताही बोलत होता अगदी मुद्देसूद... जणू सगळं काही त्याच्या हुबेहूब लक्षात होतं...
"तू बोलायला लागलास कि नुसतं ऐकत बसावसं वाटतं..." असा नेहमीच म्हणायची अनु...
पण आज ती नुसतीच शांत होती... सगळं शांतपणे ऐकत उभी होती... आणि हातात घट्ट धरला होता बावरलेल्या मनूचा हात....

अनुला असं शांत पाहून अमित अचानक गप्प झाला... कदाचित त्यालाही काहीतरी जाणवलं... सगळेच गप्प झाले होते... तेव्हा डबडबलेले डोळे वर करून अनुने अमितकडे पाहिलं... आज तिला अनावर झालं होतं.. डोळ्यातून संतापाची धार घळघळ वाहू लागली होती.... खूप राग आला कि अनु अशीच वागते लक्षात होतं अमितला....

थरथरत्या आवाजात अनु बोलू लागली... 
अमित... किती सहजपणे बोलून जातोस रे तू.. हे नातं नको आहे म्हणून किती प्रयत्न करतोस... हे नातं जुळवायला सुद्धा तू इतका उतावळा न्हवतास... आणि हेच नातं जपतानाही इतका उत्सुक कधीच न्हवतास रे तू... 
कोर्टाच्या सगळ्या तारखा तू न चुकता लक्षात ठेवल्यास रे पण साधा आपल्या लग्नाचा वाढदिवस असो किंवा मग लेकीची डॉक्टरची अपॉइंटमेंट कुठल्याच तारखा तू कधी लक्षात ठेवल्या न्हवत्यास... 
दार वेळी कोर्टात येताना वेळेआधी हजर राहतोस पण कधी मला दिलेली वेळ पाळली नाहीस किंवा कुठलंही काम कधी वेळेवर पूर्ण केला नाहीस... आणि ज्या वेळी मला खरंच तुझी गरज होती तेव्हाही तू ती वेळ हरवलीस... 
किती जबाबदारीने सगळे पुरावे गोळा केलेस... चार वर्ष झाली ते रीतसर सांभाळलेसही... पण तुझं माझं नातं कधीच सांभाळलं नाहीस... ती तुझी जबाबदारी न्हवतीच का रे? 
आज इथे वकिलांसमोर जितकं तू माझ्या विरुद्ध बोलतोयस... हे नातं कसं योग्य नाहीये हे जीव तोडून सांगतोयस... यातलं कणभरही तू कधी मोकळेपणाने माझ्याशी बोलला नाहीयेस... माझ्या कडून इतक्या चुका व्हायच्या असं म्हणतोस तू आज पण यातली एक जरी तू मला वेळीच समजावून सांगितली असतीस तर कदाचित आज चित्र खूपच वेगळं असतं... 

का असा वागलास तू??? तुझी अनु तुला खरंच नको आहे का????
अमित.... आपण आत्ता इथे जितकं बोलतोय त्यापेक्षा निम्मं जरी एकमेकांशी बोललो असतो तर आज हि वेळ आली नसती.... एकमेकांविरुद्ध असे पुरावे गोळा करण्यापेक्षा जर आपल्या नात्यातला गोडवा आपण जपला असता तर आज असे एकमेकांच्या विरुद्ध उभे राहाव लागल नसत... कोर्टाच्या तारखा अशा लक्षात ठेवण्यापेक्षा जर आपण एकमेकांच्या आवडी निवडी लक्षात ठेवल्या असत्या तर आज हा संघर्ष करावा लागला नसता... 
कोर्टाचे कायदे असे समजून घेण्यापेक्षा जर आपण कधी एकमेकांना समजून घेतलं असतं तर आयुष्य या वळणावर येऊन थांबलं नसतं.... वेगळं होण्यासाठी कोर्टाचा रस्ता धरण्यापेक्षा जर आपण एकमेकांकडे दोन पावलं जरी चाललो असतो तर आपल्या नात्याची अशी विटंबना झाली नसती रे.... 
आणि हो... कोर्टासमोर असं तुझं माझं करण्यापेक्षा आपल्या लेकराला कुशीत घेतलं असतं तर त्या जीवाची ही अशी परवड झाली नसती.... 
आज पहिल्यांदाच ती अमितला इतकं बोलत होती.... आणि तोही काही न बोलता शांतपणे सगळं ऐकून घेत होता... 
अनु उभ्या उभ्या थरथरत होती... बोलताना ती रडत होती हे तिचं तिलाही लक्षात आलं न्हवतं... हाताला धरलेली मनू तिला कधीची घट्ट बिलगून होती... आपल्या आईला तिने आजवर कधीच असं पाहिलं न्हवतं... एव्हाना अनुच्या पायातलं बळ सारून गेलं होतं... चार वर्षांत साठलेलं सगळं नकळत बाहेर पडून गेलं होतं... आजवरचा प्रत्येक हुंदका आज मोकळेपणाने बाहेर पडला होता... 

सगळं बोलून झाल्यावर ती शांत झाली... भिजल्या डोळ्यांनी पाहत होती अमितकडे... कोणत्याही उत्तराची अपेक्षा न्हवती... फक्त तिचा हरवलेला अमित शोधायची धडपड... 
निघायचं म्हणून तिने शेवटचं त्याच्याकडे पाहिलं... त्याच्या डोळ्यांत बघताच अनु थक्क झाली... त्याच्या त्या भरल्या डोळ्यांत अनु संपूर्ण दिसत होती... एकही शब्द न बोलता त्याने सरळ अनुला घट्ट मिठी मारली... काय करावं तिलाही सुचेना... गच्चं भरलेले डोळे रिकामे होई पर्यंत तो तिला बिलगून होता... त्याची ओढ अनुला जाणवत होती... सगळं विसरून पुन्हा त्याला मिठीत घ्यावं म्हणून तिचे हात सरसावले.. इतक्यात त्याने मिठी सोडली अन इकडे तिकडे न बघता तो निघाला... गेला सुद्धा... 
कोर्टाचे पेपर्स, पुरावे.. काहीच न घेता तो एकटाच रिकाम्या हाताने निघून गेला... 

गाडीत बसून अमितने सरळ घर गाठलं... अनु क्षणभर स्तब्ध झाली आणि तीही काही न घेता तिथून निघाली... मनूला घेऊन ती घरी कधी पोचली तिचं तिलाही नाही कळलं... 

आज असंख्य प्रश्नाची उत्तरं नाही पण बरंच काही गवसलं होतं... आज तिला बऱ्याच वर्षांनी शांत वाटत होतं... 
अमितही घरी पोचला... आणि गाडीतलं गिफ्ट आणून आधीच घरी असलेल्या गिफ्टच्या गठ्ठ्यात ठेऊन दिलं... आजवर मनू साठी वेळोवेळी आणलेली गिफ्ट्स होती ती... 
फक्त इतकंच म्हटला... "हॅपी बर्थडे पिल्लू...."
आणि नेहमीप्रमाणे तो त्या दिवशीही अगदी ढसाढसा रडला... 
कोर्टाची ती वारी तशी शेवटचीच ठरली... चुकलेल्या दोन वाटा पुन्हा एकदा एक वळणावर भेटल्या पुन्हा कधीही वेगळं न होण्यासाठी.... 
का.... कशा .... किती वेळ लागला... काहीच महत्वाचं न्हवतं... 
पण... दोन जीवांना पुन्हा एकदा त्यांच्या हक्काचा विसावा मिळाला... हेच खूप मोठं समाधान... :)

- टिंग्याची आई 
आमची काकी वकील आहे... तिच्यासमोर कधीतरी घडलेला असाच काहीसा प्रसंग... त्या दोघांचं काय झाल माहित नाही... 
पण माझ्या या गोष्टीचा शेवट मी मला हवा तसा केलाय... :) आवडेल अशी आशा आहे... 

Sunday, October 19, 2014

काही कविता…

खास माझ्या कवी मित्र-मैत्रिणींसाठी… :)
काही कविता असतात…
अगदी मनापासून लिहिलेल्या….
स्वतःवरच रचल्यात जणू….
फक्त स्वतःसाठीच असलेल्या….

दुसऱ्या कोणीही….
वाचू नयेत अशा वाटणाऱ्या….
अन 'त्या' खास व्यक्तीने वाचावं….
म्हणून आतुरतेने वाट पाहणाऱ्या….

एकांतात बसून….
बऱ्याचदा वाचून झालेल्या….
डोळे मिटून अनेकदा….
स्वप्नात सुद्धा पाहिलेल्या….

कधी वाचता वाचता….
डोळ्यांत पाणी आणणाऱ्या….
अन कधी कधी….
गालातल्या गालात हसणाऱ्या….

आयुष्यातले काही मोजके….
सोनेरी क्षण साठवणाऱ्या….
आनंद असो वा दुःख….
प्रत्येक क्षणी आठवणाऱ्या….

मायेच्या माणसाची….
आठवण करून देणाऱ्या….
भावनांच्या असंख्य हातांनी….
मनाला हळुवार गोंजारणाऱ्या…. 

असतात अशा काही कविता….
मनातल्या मनात लिहिलेल्या…. 
मनाच्याच एखाद्या कप्प्यात…. 
अगदी जीवापाड जपलेल्या… काही कविता…. 

- टिंग्याची आई

Saturday, September 20, 2014

आज आई धडपडली… :)

एका सत्य घटनेवर आधारित… ;)
रोज संध्याकाळी टिंग्या… आई सोबत खेळतो… 
आईचा हा थोडासा वेळ… फक्त त्याच्यासाठीच असतो… 
पकडा पकडी दंगा मस्ती… रोज नवे खेळ खेळतो… 
खेळता खेळता नेमका… कुठे ना कुठे धडपडतो… 

परवा संध्याकाळी दोघे… असंच काहीतरी खेळत होते… 
निवांत बसलेल्या आजीसमोर… एकमेकांच्या खोड्या काढत होते…… 
पडाल रे सांभाळून… आजोबा आतून ओरडत होते… 
चालली होती मस्ती… दोघांचे तिकडे मुळीच लक्ष न्हवते… 

घरभर इकडून तिकडे… पकडा पकडी खेळून झाली… 
फेवरेट साँग लुंगी डान्सवर… स्टेप सुद्धा करून झाली… 
लाडाने टिंग्याला उचलून घेताना… आई फरशीवरून घसरली… 
अन त्याला सांभाळताना… नेमकी आईच आज धडपडली… 

टिंग्याला लागलं नाही… पण आईचं डोकं भिंतीवर आपटलं… 
त्यानेच पाडलं कि काय… म्हणून बाबाने टिंग्याला थोडं धोपटलं… 
तेवढ्यातूनही आईने… त्याला मारापासून वाचवलं… 
मग धावत जाऊन पिल्लुने… आईसाठी पाणी आणलं… 

चांगलीच कळ आली होती… डोळ्यातून घळघळ पाणी आलं… 
अन आईच्या डोळ्यांत पाणी बघून… पिल्लू कावरं बावरं झालं… 
लागलं का ग आई तुला…? केवीलवाण होऊन विचारू लागलं… 
आईच्या डोक्याला लावायला… तेलाची बाटली घेऊन आलं… 
(टिंग्याला काहीही लागलं कि आजी लगेच तेल लावते ना म्हणून… :)

दोन बोट तेल लावून…म्हणे आई आता स्माईल कर… 
भूर उडून जाईल कळ… फक्त एकदा छू मंतर कर…(हा आईचा ऊपाय असतो नेहमी… :)

थोडंस कसतरी हसली आई… म्हणाली टिंग्या आता बास कर… 
स्वतः स्माईल करून दाखवत म्हणतो… अग आधी दात दाखवून हस तर… 

आईने स्माईल केल्याशिवाय… टिंग्या ऐकायला तयार न्हवता… 
आता नेहमीची close-up स्माईल दिल्याखेरीज… आईकडे पर्याय न्हवता… 
तिची एकच स्माईल बघायला… पोरगा आतुर झाला होता… 
डोळे पुसून ती छान हसली… तेव्हा जब्बर खुश झाला होता… 

चांगलाच टण्णू आला होता… पण आईला हसणं भाग होतं… 
डोक्यात उठणाऱ्या कळीपेक्षा… पिल्लूच हसणं महत्वाचं होतं… 
नंतर त्याच्या नकळत… आईने हळूच औषध लावलं होतं… 
दुखायचं तर तेव्हाच थांबलं… जेव्हा टिंग्याने तिला मिठीत घेतलं होतं… 

चार दिवस होऊन गेले… आईला आजही दुखतंय विंचरताना… 
पण टिंग्या नेमकं हे विसरतो… मुद्दामून तिचे केस ओढताना… 
पापण्यामधून डोकावणारा एखादा थेंब… ती लपवते तोंडभर हसताना… 
आणि सगळी कळ विसरून जाते… पुन्हा एकदा टिंग्याच्या मागे धावताना… :)
- टिंग्याची आई

Saturday, September 6, 2014

गणपती बाप्पा मोरया….

गणपती बाप्पा मोरया….
या वर्षी बाप्पाची आरास Eco friendly करायची ठरवलं होतं…. 
त्यातूनच साकारलेली हि या वर्षीची आरास… :) पाहिलं बक्षीस मिळालं बर का आम्हाला या स्पर्धेत… 
सर्वकाही बाप्पाच्या कृपेने आणि माझ्या घरच्यांनी साथ दिली म्हणून…. :)
गणपती बाप्पा मोरया… 

मयुरेश्वर:























Saturday, August 30, 2014

आम्ही Watsapp वाले झालो…:)

 
कधी येतेस ग Watsapp वर…?
रोज एकतरी मैत्रीण विचारायची... 
किती मज्जा असते group वर... 
मला रंगवून रंगवून सांगायची... 

शाळा कॉलेजचे सगळे मित्र मैत्रिणी... 
Watsapp वर गप्पा मारायचे... 
शिल्पा पण आहे का ग्रुप मध्ये... 
बऱ्याचदा एकमेकांना विचारायचे... 

अजूनतरी मी मात्र आपला... 
साधाच फोन वापरत होते... 
आलीच कुणाची आठवण तर... 
डायरेक्ट फोनच करत होते... 

जितक्या दिवसांनी फोन व्हायचा... 
गोष्टी तितक्या लेट कळायच्या... 
कोण कुठे आणि कसं काय आहे... 
सगळ्या बातम्या फोनवरच मिळायच्या... 

पिल्लू खराब करेल फोन... 
म्हणून आजवर फोन घ्यायचं टाळलं... 
कधी घेतेस स्मार्ट फोन...
या प्रश्नावर मुद्दामून मौन पाळलं... 

नाही होय करत शेवटी... 
पावती फाडली चौदा हजाराची... 
हा घेऊ कि तो घेऊ म्हणत... 
Samsung, Nokia सोडून घेतला Moto G...
एवढा महागडा फोन घेतला… (माझ्यासाठी हा खरच खूप महाग आहे… :)
अन नंतर विचार करत बसले... 
होऊ देत खर्च चा मारी... 
म्हणून स्वतःवरच खळखळून हसले... 

त्या इंटरनेट चा पायी... 
फोनच बिल २०० रुपयांनी वाढवून घेतलं... 
कुणी केलं नेट सेटिंग... 
तर कुणी Watsapp download करून दिलं... 

मैत्रिणींचा ग्रुप जॉईन केला... 
सगळे भलतेच खुश झाले... 
आलीस बाई एकदाची Watsapp वर…??
म्हणून बऱ्याच जणांनी पिंग केले… (हो अगदी याच शब्दात…. ;)

नया है यह… करता करता... 
आम्हीही chatting करायला शिकलो... 
अहो खर सांगतो राव... 
आम्ही Watsapp वाले झालो…

सातासमुद्रापार बसलेली मैत्रीणसुद्धा... 
रोज न चुकता पिंग करते... 
दुरावलेल्या कितीतरी नात्यांना... 
पुन्हा साद घालावीशी वाटते... 

Chatting-Watting काय ते हल्ली... 
आमचं रोजच चालू आहे... 
सुख दुख आणि मजा मस्ती... 
Watsapp वर शेयर करणं सुरु आहे... 

झालीये आता सवय याची... 
बंद पडून हल्ली चालतच नाही... 
रोज कोणालातरी पिंग केल्याशिवाय... 
आमचा दिवस काही सरत नाही... 
I am Loving It... ;)
- टिंग्याची आई

मातृमुखी…

काल आम्ही एकाखेळण्याच्या दुकानात गेलो होतो… टिंग्याच्या एका फ्रेंड साठी बडे गिफ्ट घ्ययचं होतं… त्याचा नेहमीसारखा दुकानात दंगा चालू होता… एवढी सगळी खेळणी बघून त्याला हे घेऊ कि ते घेऊ असं झालं होतं आणि आम्ही दोघे त्याला काहीतरी सांगून गप्प करत होतो…. त्याचे प्रश्न चालूच होते… 
टिंग्या: आई मला कॅमेरा घ्यायचा का? 
मी: नको रे त्यात फोटो नाही निघत… 
टिंग्या: मला बेन १० घ्यायचं का?
मी: नको नको ते खराब झालंय म्हणे 
टिंग्या: ते हेलीकॉप्टर नाहीतर ती कार घेऊया?
मी: अरे बाळा त्यातलं पेट्रोल संपलंय रे… (खूप काही बाही सांगाव लागतं हिरोला :)
असा आमचा प्रश्नोत्तरांचा खेळ चालू होता… अखंड बडबड… नाही म्हटलं तरी गप्प बसेल तो टिंग्या कुठला?? :) आम्हा मायलेकराच्या या गप्पा चालू असताना शेजारी बसलेल्या आजीचं आमच्याकडे लक्ष आहे हे कळलंच नाही आम्हाला… कधी टिंग्याला तर कधी मला त्या न्यहाळत होत्या…. आणि एकदमच मला म्हणाल्या… 
"मातृमुखी" आहे तुमचा मुलगा… चांगलं असतं मुलाने मातृमुखी असलेलं खूप सुख मिळतं म्हणे आईला… 
आजी सहजच म्हणून गेल्या… मी फक्त हसूनच reply केला… काय बोलावं सुचलंच नाही मला… उगीचंच बरं वाटलं माझं मलाच… :) आजी निघून गेल्या… आमचीही खरेदी झाली… टिंग्याच्या गप्पा चालूच होत्या… अन माझ्या मात्र मनात एकच विचार घोळत होता… "मातृमुखी"… 
बरेच शब्द आहेत तसे… आईची कार्बन कॉपी… झेरॉक्स कॉपी… तर एखादी गावाकडची आजी म्हणते "आक्षी आईच्या तोंडातन पडलंय जणू पोरगं…" 
माझा टिंग्या सुद्धा माझी कार्बन कॉपी आहे… दिसायला, हसायला आणि दंगा करायला सुद्धा… :) आजी म्हणाल्या मुलगा मातृमुखी असला कि आईला खूप सुख मिळत… खरंच… टिंग्या माझ्या आयुष्यात आल्यापासून घरात सुख हा एक permanent मेम्बर झालाय… ज्या दिवशी टिंग्या आला त्याच दिवशी सुखाने माझ्या घराचं माप पुन्हा नव्याने ओलांडलं… त्याच्या पावलानीच सुख घरभर हुंदडत असत… कितीही टेन्शन अन प्रॉब्लेम्स असले तरी टिंग्याने मारलेल्या एका मिठीत सगळं विरघळून जातं… गेल्या साडेतीन वर्षांत एकही असा दिवस नाही जेव्हा मी आणि माझं घर टिंग्यामुळे खळखळून हसलेलो नाहीये… सुख म्हणजे तरी याहून वेगळं काय असत?
आमच्या लाडक्या टिंग्याने त्याच्या आईलाच नाही तर साऱ्या घरादाराला सुखी केलंय…. 
त्याच्या छोट्या छोट्या बाल लीलांनी सुखाची नवी परिभाषा आम्हाला शिकवली आहे… आणि आमचा टिंग्या असाच हसत खेळत राहावा हीच काय ती आमची सुखाची व्याख्या…. :)

शेवटी काय… मातृमुखी असो वा पितृमुखी… ही पिल्लं आपल्या आयुष्यात सुखच सुख घेऊन येतात…. सगळ्या घराला आनंदित आणि प्रफुल्लीत करतात… 
आमच्या या लेकरांना सुखी ठेव रे बाप्पा… 
Thanks tingya for being part my life.... Love you... :)

- टिंग्याची आई

एक दिवस कवितेच्या वहीशिवाय… :)

मी कधीही घराबाहेर पडताना पर्समध्ये एखाद वही पेन नक्की असतं… ऑफिस मध्ये, कधी पाहुण्यांकडे तर अगदी प्रवासात सुद्धा… कोण कधी एखादी ओळ सुचेल आणि ती वहीत उतरून ठेवावीशी वाटेल… :) एकदा अशीच ऑफिस मध्ये वही न्यायची विसरले तेव्हाची हि हलकी फुलकी गोष्ट… 
कोणास ठाऊक कशी... 
आज नेमकी कवितेची वही विसरले...
पर्स वगैरे बदलायच्या नादात... 
वही-पेन दोन्ही घरीच ठेऊन आले... 

ठीक आहे वाटलं होतं...
काहीच फरक पडणार नाही... 
फार फार तर काय होईल... 
आज कविता लिहायला जमणार नाही... 

अहो मी सोडून दिलं सहज... 
पण माझ्या मनाने मनावर घेतलं... 
किती नाही म्हटलं तरी... 
एक एक नवं कडवं सुचू लागलं... 

नुसतंच सुचत होतं... 
नेमकं लिहून काढता येईना...
वहीतच लिहायची सवय नडली... 
computer वर लिहायची इच्छा होईना...

अर्धवट राहिलेल्या बऱ्याच कविता... 
आज हट्ट धरून बसल्या... 
अन बऱ्याचशा नवीनही... 
रांगेत येउन उभ्या राहिल्या..... 

म्हटल आजचा दिवस थांबा... 
उद्या सगळ्यांना पूर्ण करेन... 
छान छान अक्षरात... 
तुम्हाला वहीत उतरून काढेन... 

विचार, मन आणि शब्द... 
कोणीच तयार न्हवतं ऐकायला... 
पावलंही वळत होती घराकडे... 
विसरलेलं वही-पेन आणायला... 

एक एक ओळ सुचेल तशी... 
मग मनातच साठवत गेले... 
घरी गेल्या गेल्या उतरून काढायचे... 
हे आधीच होते ठरवून ठेवले... 

घरी पोचताच पहिल्यांदा... 
लाडके वही-पेन बाहेर काढले... 
भराभरा लिहावं सगळं... 
म्हणून पुन्हा पुन्हा आठवले... 

पण झालं भलतंच...
वही हातात घेताच...
सगळे विचार भूर उडाले... 
लेखणीला पाहून हातात... 
जणू शब्द दशदिशा पळाले... 

काय चाललंय नक्की... 
माझं मलाच कळत न्हवतं... 
पण कवितेच्या वाहिशिवाय करमत नाही... 
हे आज पहिल्यांदाच कळलं होतं... 

बाकी कवितांचं काय... 
आज नाही तर उद्या सुचतील... 
कधी हट्टाने कधी सहज... 
सगळ्या या प्रिय वहीतच विसावतील... :) 

- टिंग्याची आई