Thursday, March 20, 2014

कुणीतरी असावंसं वाटतं…

आमची मुलं अमेरिकेत… तिकडेच राहतात सगळे…
हवामान झेपत नाही दोघांना… म्हणून राहिलो इथे वेगळे…
वर्षातून एखाद्वेळा… यायची मुलं सुट्टीला इकडे…
गेली २ वर्ष जमलंच नाही… बराच व्याप वाढलाय म्हणे तिकडे…
इमेल वगैरे नियमित असतो… पोरांनी खास laptop घेऊन दिलाय…
महिना झाला ट्राय करतोय… Page Not Found असा काहीतरी एरर आलाय…
आयुष्यातली बरीचशी पानं…
खरंच हरवली आहेत असं वाटतं…
शोधावीशी वाटतात पुन्हा…
तेव्हा सोबत… कुणीतरी असावंसं वाटतं…
एक दोन वर्षातून कधीतरी… नातवंडेही इकडे येतात…
फार अप्रूप वाटतं… जेव्हा आजी-आजोबा अशी हाक मारतात…
फारतर महिनाभरच थांबतात… त्यातच त्यांना सगळं पहायचं असतं…
आल्यादिवसापासूनच त्यांच… परतायचं प्लानिंग चालू होतं…
आजीची एखादी गोष्ट… दरवेळी अर्धवटच राहून जाते…
परतीच्या वाटेला लागलेली नात… तिला एयरपोर्टवरच विसरून जाते…
दरवेळी नवीन साईझमध्ये भेटणाऱ्या…
नातवंडाना कुशीत घ्यावंसं वाटतं…
घरासमोरचं रिकामं अंगण साद घालतं…
तेव्हा त्यात खेळणारं… कुणीतरी असावंसं वाटतं…
पैशाची काही कमी नाही… account नेहमी फुल असतं…
जे काही मनात येईल… ते सगळं घरात हजर असतं…
मागावं असं काहीच राहिलं नाही… आम्हाला हवं ते मिळतंय…
आमचं वेड मन मात्र… सारखं पोराबाळांच्या मागे पळतंय…
सगळी सुखं आहेत… अनुभवायचा प्रयत्न करतोय…
आजही हातात हात गुंतवून… दोघे आयुष्याचा प्रवास करतोय…
रोज नव्याने येणाऱ्या आजारपनांना…
दूर लोटून द्यावंसं वाटतं…
पण उठबस करताना गुढगे हटून बसतात…
तेव्हा मायेचा हात देणारं… कुणीतरी असावंसं वाटतं…
बाकी सर्व ठीक आहे… आम्ही खरंच खूप सुखी आहोत…
मुलं सोबत नाहीत म्हणून… अगदी थोडेसेच दुखी आहोत…
इच्छा एवढीच… 
डोळ्यांत पाणी भरलेली आई… एकदाच त्यांना दिसू देत…
थकलेल्या म्हाताऱ्या बापाला बघून… काहीतरी उमजू देत…
चार दिवस पाहुणे म्हणून न्हवे… पोरांनी कायमचं घरी यावं…
वाट पाहणाऱ्या आई-बापाला… त्यांच्या हक्काचं सुख मिळावं…
आमच्या थकलेल्या पावलांना…
लेकारांनीच सावरावंसं वाटतं…
आयुष्याचा सुर्य अस्ताला जाईल…
निदान त्याक्षणी तरी… कुणीतरी आपलं जवळ असावंसं वाटतं…
- टिंग्याची आई

Tuesday, March 18, 2014

आईचं काळीज हरवलंय…

उसन्या मायेच्या पदराखाली…
लेकरू आईविना वाढतंय…
बोल्ड पणाच्या नावाखाली…
आईपण कुठेतरी हरवतंय…

नऊ महिने पोटात वाढवून…
लेकराला जन्म तिनेच दिलाय…
पण आई व्हायला जमलं नाही…
तिला मायेचा पान्हा तरी कुठे फुटलाय…
ममा ममा म्हणत चिमुरडं…
पदराशी तिच्या खेळू लागलं…
नको उगीच नसता लळा…
म्हणत तिने पदारालाच वेगळं केलं…

भुकेनं व्याकूळ छकुली…
घरी आईसाठी टाहो फोड्तेय…
इकडे पार्टीमध्ये मम्मा…
विस्कीचे पेग खुशाल रिचवतेय…
बालमुखातला पहिला शब्द…
पिल्लू 'आई' नाही 'आया' म्हणतंय…
आई-बाप असूनही…
त्यांच्या मायेला पारखं होतंय…

काय झालंय या पिढीला…
अन उदयाच्या पिढीचं काय होईल…?
माय-लेकराचं हे असलं नातं…
न जाणो कुठवर साथ देईल…
अरे यशस्वी व्हा खूप काही मिळवा…
आमचं काही म्हणणं नाही…
पण तुमच्या अन लेकराच्या हक्काची ही माया…
पुन्हा मागून सुद्धा मिळणार नाही…

आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकताना…
पिल्लानं स्वतःच स्वतःला सावरलंय…
देवा… 
पोरासाठी काळीज काढून देणाऱ्या…
आईचं काळीज मात्र हरवलंय…. :(
-टिंग्याची आई
देवाच्या कृपेने मी आजवर अशी आई प्रत्यक्षात पाहिलेली नाहीये… पण जे काही ऐकलंय, वाचलंय आणि भविष्यात होईल असं वाटतंय तेच मांडलंय… 
देव करो… आईचं काळीज कध्धी कध्धी हरवू नये…

Friday, March 14, 2014

एक याद.…

एक याद है.… जो आज तक साथ है...
भुला न सकेंगे कभी... उसमे कुछ खास है...
इतने सालों बाद भी... लगती जैसे कल कि बात है...
तारों भरा आसमाँ... और वही पूनम कि रात है...
धुंदली हो गयी जिंदगी... पर उसे भुला न पाए...
छलकती है आज भी दो बुँदे... न किसीसे गिला कर पाए...
उस सुहानी रात में... वो छत पर आयी थी...
हर तारे ने रोशनी... उन्ही कि मुस्कुराहट से पायी थी...
दो दिल एक जान... कुछ ऐसाही हमारा किस्सा था...
गम हो या ख़ुशी... बराबर का हिस्सा था...
चमकता हुआ आसमाँ... उनकी आँचल में समाया था...
उम्रभर साथ का मीठा सपना... इश्क़ ने दिखाया था...
लफ्जों के बिना... यूँही एक दूसरे को ताकते रहे...
अपने प्रेमी को... आँखों में समाते रहे...
कुछ खास था उस रात में... जिसने हमें आजतक जिन्दा रखा है...
साथ तो न रहा उनका... पर आज भी प्यार सच्चा है...
जिंदगी चलती रही... राहे बिछड़ गयी...
सूख गए दो गुल... अब तो खुशबु भी निकल गयी...
जिन्दा है, जीते रहे... इस जालिम ज़माने के लिए...
इसके दस्तूर निभाते रहे... इस नामुराद जिंदगी के लिए...
गम तो नहीं है... ना वो ख़ुशी मिल पायी...
अधूरी थी जो कहानी... आज भी पूरी न हो पायी...
ख्वाईश नहीं रही अब.... के वो फिर मिलेंगे...
अब तो आदत हो गयी है... हम यूँही जी लेंगे...
खुदा का शुक्र है.…
वो एक याद तो है... जो आजतक साथ है...
कैसे भुलाएँ उसको... उसमें तो हमारी साँस है...

- टिंग्याची आई
:)

Thursday, March 13, 2014

लढा…

आज लग्नाचा वाढदिवस... ती भलतीच खूष होती...
संध्याकाळचा बेत ठरवत... घरातली कामं आवरत होती...
नवरा सकाळीच कामावर गेला... संध्याकाळी येणं नक्की न्हवतं...
तरीही तिचं वेड मन... सांजवेळी त्याची वाट पाहत होतं...
६ बाय ६ ची छोटीशी झोपडी... तिने झाडून-सारवून लख्ख केली...
चौकटीतल्या उंबरठ्यावर... छानशी रांगोळी रेखली...
झोपडीपण तिच्यासारखीचv छोटीशी पण टुमदार होती...
चार-चौघात सहजपणे... उठून दिसणारी होती...
तिच्यासोबत झोपडीसुद्धा... आज हलकीशी नटली होती...
जुन्याच पडद्याची झालर... तोरणासोबत लहरत होती...
साग्रसंगीत नसला तरी... तिने छान स्वैपाक रांधला होता...
अगदी पुरी-श्रीखंड शक्य न्हवत... म्हणून आवडीचा वरणभात केला होता...
मनातलं गोड हसू... ओठांवर उमटत होतं...
आज खूप दिवसांनी... तिचं मन जरा खुश होतं...
पिल्लाला सोबत घेऊन... ती त्याची वाट पाहू लागली...
मनाच्या उबदार वाळूवर... आठवणींच्या रेषा ओढू लागली...
पिल्लाला कुरवाळताना... तिचाही डोळा लागला...
देव्हाऱ्यातल्या मिणमिणत्या समईने... आज नेमका घात केला...
एक एक करत हळू हळू... संपूर्ण झोपडीने पेट घेतला...
आगीच्या आक्राळ-विक्राळ दाढांनी... तिच्या घराचा ग्रास केला...
मिटल्या डोळ्यांना धग जाणवली... शांत झोप पार उडाली...
काय घडतंय समजाण्याआधी... माय लेकराला वाचवण्या धावली...
कसंतरी बाहेर पडून... लेकरू ठीक असल्याची खात्री केली...
अन पेटत्या संसाराला वाचवायला... तिची केविलवाणी धडपड सुरु झाली...
लोक पाणी मारत होते... तर कुणी नुसतंच बघत उभं होतं... 
कसं वाचवावं आता सगळं... तिला काहीच सुचत न्हवतं...
त्यातल्याच कुणीतरी... तिच्या नवऱ्याला सांगावा धाडला...
हातपाय गळाल्यागत... तो मटकन खालीच बसला...
आयुष्यभर खस्ता खाऊन... संसार उभा केला होता...
पण या निष्ठूर आगीत... त्याचा क्षणात नास झाला होता...
सगळं काही संपलं... मगच आग शांत झाली...
प्रेमाने जपलेली एकनेक गोष्ट... राख म्हणून मागे राहिली...
डोळ्यातलं पाणीही आटून गेलं... दोघे रात्रभर तसेच बसून राहिले...
खळकन तुटलेल्या काचेसारखे... एक एक स्वप्न विस्कटले...
निशब्द बसलेली ती... अचानक निर्धाराने उभी राहिली...
राखेच्या त्या ढिगाऱ्यात... खाणाखुणा शोधू लागली...
वाचली होती 'कणा' कधीतरी... आज पुन्हा तिला आठवली...
तिची ओळ न ओळ... आज ती स्वतः होती जगली...
कंबर कसून तयार झाली... पुन्हा संसार उभा करायला...
एकल्या कारभाऱ्याचा हात होता... तिला आधार म्हणून धरायला...
अर्धवट जळलेल्या भिंतीसोबत... बऱ्याच आठवणीही खाक झाल्या...
तिला बळ द्यायलाच कि कोण जाने... देव्हाऱ्यातल्या मूर्ती तेवढ्या सलामत राहिल्या...
भस्म झालेल्या छतामधून... आशेचा प्रकाश घरभर दाटला... 
मोकळ्या आभाळाच्या छताखाली... तिने पुन्हा नवा संसार थाटला...
राखेचा ढीग बाजूला सारून... जमीन कशीतरी मोकळी झाली...
शिल्लक राहिलेल्या सांगाड्यावरची... काजळीही तिने साफ केली...
डोंगारेवढं दुःखं होतं... अलगद पदराखाली घेतलं...
पापण्यांमधलं पाणी... तिने काठावरुनच परत पाठवलं...
घरदार जळल्यानंतर शेवट नाही... तर तिने पुन्हा प्रारंभ केला...
नशिबाला दोष देऊन रडत न बसता... तिने हसत हसत लढा दिला...
 
Hats off to her spirit.....
-टिंग्याची आई 
कुणीतरी सांगितलं होतं शेवट नेहमी वेगळा आणि चांगला कर… म्हणून असा केला… :) Thanks..

Tuesday, March 11, 2014

कादंबरी वाचन… एक अनुभव…

कादंबरी वाचन… हल्ली दुर्मिळच होत चाललंय… आजच्या या धावत्या इंटरनेट च्या जगात एकाजागी निवांत बसून कादंबरी किंवा तसंच एखादं पुस्तक वाचणं होतंच नाही... ही परिस्थिती आहे… :(पण आजही तुम्हाला आवडतंच असेल ना पुस्तकं वाचायला...? P. C. च्या स्क्रीनवर डोळे ताणून वाचण्यापेक्षा… आपल्या एखाद्या फेवरेट जागेवर, मांडीवर ती कादंबरी घेऊन… तिच्यात पुरतं डुंबून जाऊन मग तिचं एक एक पान आपलंसं करीत जाण्यातच खरा आनंद आहे…
        मलाही आवडतात कादंबरी, कथा, पुस्तकं वाचायला... पण संसाराच्या नादात जमतंच नाही… अरे संसार संसार अशी काहीतरी परिस्थिती आहे… :) तरीही मी जमेल तसा पुस्तकं वाचायचा प्रयत्न करते… जित्याची खोड... काय करणार… ;) ऑफिसमधून घरी गेल्यावर टिंग्याशी दंगा मस्ती करत कामं आवरतात आणि रात्री १०-१०.३० च्या सुमाराला टिंग्याने मांडीवर ठेवलेल्या डोक्यावरून हात फिरवत माझं कादंबरी वाचन सुरु होतं… मग ते अवघं १०-१५ मिनिटांच का असेना तेवढंच मनाला समाधान…
       सध्या मी शिवाजी सावंत यांची छावा हि कादंबरी वाचायला घेतली आहे… तशी तिची साईझ पाहूनच महिनाभर तरी शुभ मुहूर्तच सापडत न्हवता... पण एकदाची सुरवात केली आहे आणि आता रोजची रात्र शिवकालीन घटनांमध्ये रमून जाते….
          इतिहास वाचायला सगळ्यांनाच आवडत असेल, मलाही आवडतं... अभ्यासाला आवडत न्हवता ही गोष्ट वेगळी… ;) त्यातली प्रत्येक व्यक्ती एक रंगरूप घेऊन तुमच्या समोर उभी असते… प्रत्येक व्यक्तीरेखा वेगळी… स्वतःच वेगळं अस्तित्व असणारी… प्रत्येक घटना अगदी समोर घडतेय इतकी स्पष्ट आणि जिवंत… अर्थात यात लेखकाचंच खरं कौशल्य आहे… पण वाचणार्यानेही  तितकंच एकरूप होऊन वाचणं गरजेचं आहे… 
         तर हा माझा अनुभव मला तुमच्याशी शेयर करावासा वाटला… कादंबरी वाचत असताना मीही कशी प्रत्येक प्रसंगाशी एकरूप होत गेले… ते सगळं सांगावंसं वाटलं… कदाचित एखादी कादंबरी तुम्हालाही आठवेल किंवा वाचावीशी वाटेल… :)

छत्रपती शिवाजी महाराज:
         शिवरायांचं नाव घेताच छाती कशी अभिमानाने फुलून येते… कणा आपोआप वक्र होऊन मन महाराजांना त्रिवार मुजरा करतं… वाचताना जेव्हा जेव्हा राजांचा उल्लेख होतो तेव्हा आधीच झडलेला असतो…. त्यांचं दरबारात आगमन होताच हजर असलेल्या सरदारांसोबत नकळत झुकून मुजरा केला जातो… सदरेवर एखाद्या कोपऱ्यात मन आधीच जाऊन बसलेलं असतं बैठकीवर बसलेल्या राजांना न्याहाळत… अगदी पापणीही न लवता… राजांचा प्रत्येक शब्द न शब्द कान देऊन ऐकत… प्रत्येक बैठक याच पावित्र्यात पार पडते… आजूबाजूच्या जगाचा आपसूक विसर पडतो… टिंग्याच्या डोक्यावरून फिरणारा हात कादंबरीतल्या प्रसंगानुरूप कधी हळू तर कधी जोरात फिरत राहतो… त्याच्या बालिश अंड कुतूहलाने भरलेल्या प्रश्नांना उत्तरं देत वाचन चालू असतं… अन त्याची झोप लागली आहे हेही कधी कधी आईला कळत नाही… :)
           महिनोंमहिने मोहिमेवर असलेल्या राजांच्या घोडदळासोबत दौडत मन कित्येक प्रदेश भटकून येतं… तर कधी कधी राजगडाच्या बुरुजावर उभं राहून राजांच्या वाटेकडे डोळे लावून बसतं… :)
खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुत्ररत्न झाल्यावर पुरता राजगड सोहळा साजरा करत असताना नकळत त्यात सामील व्हायला होतं… आजारी सई बाईंची सावळी मूर्ती डोळ्यासमोर तरळते तेव्हा काळजात चर्रर होतं… पुत्र प्राप्तीने आनंदी झालेले राजे सई बाईंच्या जाण्याने तितकेच दु:खी होतात… पण राजाला सुख-दुखं ते कुठले? काळीज चिरत जाणारा घाव बसला तरी राजाने तो तितक्याच हिमतीने परतवायचा असतो… आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजे… 

जगन्माता जिजाऊ:
          राजे म्हणजे निश्चयाचा महामेरू आणि त्या मेरूचा कणा म्हणजे जिजाऊ… रोज सकाळी राजे जेव्हा जिजाऊचा चरणस्पर्श करतात तेव्हा आपसूक त्या पावलांचा स्पर्श माझ्याही कपाळाला जाणवतो… अन शांततेची एक लहर अंगभर दौडून जाते… चित्त शांत शांत करून जाते… शंभू राजे आपल्या कोवळ्या हातांनी मासाहेबांच्या कमरेला मिठी मारतात तेव्हा त्यांच्या नेसुचा पवित्र गंध क्षणभर दरवळून जातो… जिजाऊ शंभूच्या कपाळावर शिवगंध रेखत असता तो ओलसर गंधाचा गारवा मला माझ्या कपाळावर जाणवतो… त्या मातेचे निर्धारी डोळे अन घरंदाजपणा मला माझ्याकडे पाहायला मजबूर करतात… आणि आपणही त्या नितळ पाण्यात क्षणभर हरवून जावंसं वाटतं… 
           अष्टभुजा जगदंबेसमोर बसलेल्या जिजाऊचं वर्णन वाचलं कि जगन्मातेसमोर दर्पण ठेवलंय कि काय असा भास होतो… त्या फरसबंदीवर राजे, शंभूराजे, जिजाऊ कोणीही मस्तक टेकलं कि त्याच क्षणी माझं मस्तक अंबाबाईच्या पायरीवर टेकल्याच समाधान मला मिळून जातं… तोच गारवा आणि तीच पवित्रता… 

शंभूराजे:
            राजे तसेच शंभूराजे… एक एक प्रसंग त्यांची नव्याने ओळख करून देतो… बाळराजे कोवळ्या वयात किती समजूतदारपणे वागले याचे दाखले वेळोवेळी मिळतात…. तेव्हा वाटतं माझा बाळही असाच कर्तुत्ववान व्हावा… :)
           औरंगजेबाच्या भेटीसाठी गेलेल्या शंभूराजांची करारी मुद्रा… वेळोवेळी होणारं त्यांच्या कवी मनाचं उत्कट दर्शन… आपल्या आबासाहेबांच्या बद्दल वाटणारा आदर प्रेम… आबांचे शब्द जीवाची बाजी लावून झेलणारा मुलगा बऱ्याचदा भेटतो… कधीही न पाहिलेल्या आपल्या आईसाहेब सईबाई यांच्या खुणा शोधणारं त्याचं धडपडणार मनही काळीज हेलावून टाकतं… मथुरेत बरेच महिने एका ब्राह्मण कुटुंबात राहून परतलेले शंभू बाळ राजांना धावत जाऊन बिलगतात त्या प्रसंगाने डोळ्यात पाणी उभं राहतं… एका उंटाच्या समोर गुढगे टेकून बादशहाची चाकरी स्वीकारताना त्या बालमनाची झालेली विचित्र तडफड जाणवते… एवढ्या लहान वयात इतकी हुशारी अन समजुतदारपण विरळाच… शंभूला प्रयाग स्थळी उभे राजे शिवपिंडीसारखे भासायचे… अन मला आता पिंडीचे दर्शन घेताच राजे समोर उभे राहतात… :)

राणीवसा:
राजांचा राणीवसा म्हटलं कि ठळकपणे समोर उभ्या राहतात त्या पुतळाबाई अन सोयराबाई… राजे आणि शंभूवर जीवापाड प्रेम करणाऱ्या केतकी वर्णाच्या निर्मळ मनाच्या पुतळाबाई… स्वामींच्या नावे कपाळभर लावलेल्या कुंकवाशी आणि शंभूच्या शिवगंधाशी तह करणाऱ्या पुतळाबाई… आणि दुसरीकडे आपल्या तिरकस नजरेने आणि बोलण्याने समोरच्याला कोड्यात टाकणाऱ्या सोयराबाई… नेहमीच काहीतरी गूढ मनात ठेऊन तोलून-मापून बोलणाऱ्या अन वागणाऱ्या सोयराबाई… यातल्या एकीवर प्रेम आणि दुसरीचा द्वेष करणं मीही कधीच सुरु केलंय… :)

धाराऊ:
धाराऊ म्हणजे शंभूची दुधाची आई… सईबाई नंतर हिनेच युवराजांना आपलं दुध पाजलं… आपल्या लेकरासारख किंबहुना त्याहून जास्त प्रेम तिने युव्रजांवर केलं… शंभूराजे चरणस्पर्श करत असताना धाराऊच्या मनाची नेहमीच होणारी चलबिचल खूपच निरागस वाटते… त्याच्या अंगावरून द्रीष्टेच कोंबडं उतरून टाकताना तीच धाराऊ आपली बोटं कडाकडा मोडते… बाळराजे मोहिमेवर जाताना तिचं मन गडाच्या बुरुजावर भगव्या जरीपटक्या सारखं फडफडत राहतं… तिच्या गोंदालेल्या हातावरची हिरवीगार नक्षी माझ्या मनावरही असेच काही क्षण गोंदून जाते… त्या माउलीची वेडी माया समर्पणाची वेगळी ओळख करून देते… 
गडकिल्ले आणि दरबारी हा एक अविभाज्य भाग आहे हिंदवी स्वराज्याचा… यातला प्रत्येकजण आणि गडापैकी विशेषतः रायगड आपली वेगळी छाप पडून जातो… 
One night at the museum या मूवी सारखं रोज रात्री मी कादंबरी हातात घेताच हि सगळी पात्रं जिवंत होतात… पानामागून पाने पलटत जातात आणि मी इतिहासासोबत धावत राहते… कधी अभिमानाने ऊर भरून येतो तर कधी मायेने कंठ दाटून येतो… कधी त्वेषाने तर कधी रागाने छातीचा भाता वरखाली होतो… कधी गर्वाने मान ताठ होते तर कधी तीच मान अदबीने राजांना, जीजाउंना आणि शंभूराजांना मानाचा मुजरा करते… 
          माझ्या टिंग्यालाही मग यातलीच एखादी गोष्ट मी आवर्जून सांगते… मला ठाऊक असलेले राजे त्याच्या चिमुकल्या शब्दांत बांधायचा प्रयत्न करते… 'छत्रपती शिवाजी महाराज कि…' एवढं म्हणायचं अवकाश कि टिंग्याही लगेच नरड्याच्या शिरा ताणून "जय" अशी ललकारी देतो तेव्हा ऊरभर समाधान मिळतं… :)
           २००-३०० पानांचा हा प्रवास आत्तापर्यंतचा… अजून बराच पल्ला गाठायचा आहे… हल्ली आम्ही महाराजांच्या राज्याभिशेकाच्या तयारीला लागलोय… खूप कामं पडली आहेत… रात्र वात पाहतेय माझी आणि शिवकालीन प्रवासाची… 

जय भवानी…. जय शिवाजी… 
हर हर महादेव…. 
माझा राजा देव न्हवता पण आज त्याच्यामुळे देवळात देव आहे… 
छत्रपती शिवाजी महाराज कि जय….
:)

- टिंग्याची आई

Thursday, March 6, 2014

Poem Testing... :)

परवा अवेळी पाऊस दाटून आलाय ही कविता एका टेस्टिंग मध्ये असलेल्या मित्राला वाचायला दिली….  तेव्हाची ही सगळी मज्जा…. :)
आहे एक मित्र माझा… software testing करतो…
code मधली एक न एक error… अगदी शोधून शोधून काढतो…
सहज म्हणून एकदा मी… त्याला माझीच कविता वाचायला दिली…
वाचा आता पुढे… त्याने कशी  कवितेची टेस्टिंग केली… :)
बर्याच ओळी आहेत ग… जिथे शब्द होत नाहीत Match…
लावत नाहीस का कधी… एखादा सिम्पल Try and Catch…
present मध्ये असतेस… तर कधी दिसतो past tense…
अचानक कसं बर चेंज करतेस… थोडा तरी ठेव sense…
किती ठिकाणी दिसतंय… नुसतंच तुझं Imagination…
सजेस्ट करावसं वाटतंय… बऱ्याच ठिकाणी Modification…
सगळंच कसं हवेत आहे… कशाचा काहीच नाहीये Proof…
प्रत्येक ओळ कशी एकदम… असावी प्रॉपर foolproof…
एखादी ओळ मस्त जमलीये… उरलेली आहे Okay Okay…
३-४ errors log केलेत… बाकी nothing to say…. :)

थक्क झाले ऐकून… काय बोलू काहीच सुचेना…
कविता लिहिलीये कि Code… माझं मलाच कळेना… :)
एवढंच सांगावंसं वाटतंय…. 
मित्रा, तुझ्या सगळ्या टीका मान्य… पुन्हा नक्की लक्षात ठेवीन…
सगळे points लक्षात ठेवून… एक एक ओळ लिहीन…
पण… 
कविता आहे रे ती… तिला कविता म्हणून वाचावी…
Intelligent डोक्याने न्हवे… ती आपल्या मनाच्या डोळ्यांनी पहावी…
कवितेला कधी… काळ अन वेळेचं बंधन नसतं…
कवीने मनातलं सहजपणे… तुमच्यासमोर मांडलेलं असतं…
कविता म्हणजे गोड स्वप्न… वाचून कधी रडावं कधी हसावं…
 क्षणभर डोळे मिटून… ते आपणही आपलंस करावं…
कविता म्हणजे संवाद… कवी आणि वाचकांच्या मनांचा…
कधी दूरवर साथ देईल… तर कधी फक्त काही क्षणांचा…
कवितेकडे कोणताही… proof कधी मागायचा नसतो…
धरतीवर उतरलेला चंद्र वा सुर्य… सहज accept करायचो असतो…
कविता कधी पटते काधी नाही… नाहीच पटली तर सोडून द्यावी…
अगदीच काळजाला भिडलीच… तर पुन्हा पुन्हा वाचून आपलीशी करावी…
म्हणून सांगते मित्रा,
जरा डोकं बाजूला ठेऊन… तीच कविता पुन्हा एकदा वाचून बघ…
शब्दांचे चार टपोरे थेंब… तुझ्या कोरड्या मनावर झेलून बघ… :)

- टिंग्याची आई
कशी वाटली कविता टेस्टिंग? :)

Monday, March 3, 2014

पेपर टाकावा म्हणतोय…. Resignation.. :)

प्रत्येक सॉफ्टवेयर इंजिनियर ची व्यथा म्हणायला हरकत नाही असा विषय…. :)
आजूबाजूच्या मंडळींच्या अनुभवावरून…. 
आजकाल रोज एखादा मित्र पेपर टाकतोय….
भलं मोठ्ठ Package मिळाल्याचं सांगतोय….
ऐकलं असं काही कि डोकं वाईट फिरत….
हजार प्रश्नांचं वटवाघूळ डोक्यात फडफडत….
Naukari, Monster चा ज्वर पुन्हा एकदा चढतो….
Resume अपडेट करायचा इंटरेस्ट भलताच वाढतो….
चार दिवस चालतात नखरे गाडी पुन्हा रुळावर येते….
११-११ तास काम करायची सवयही परत लागते….
आणखी किती दिवस चालायचं याचाच विचार करतोय…. मीही पेपर टाकावा म्हणतोय….
इथे प्रोजेक्टमध्ये सदानकदा आग लागलेली असते….
कितीही issues असेनात Deadline meet करावीच लागते….
रात्रीचे १० वाजो वा ११ आम्ही कामच करत असतो….
प्रत्येक विकेंड सुद्धा हल्ली ऑफिसमध्येच जातो….
एवढं करून सुद्धा appraisal मध्ये तेच रडगाणं….
मिळालेलं फालतू रेटिंग बघून पुन्हा पुन्हा Frustrate होणं….
सोडून दे आता हे सगळं दरवेळी स्वतःला सांगतोय…. मीही पेपर टाकावा म्हणतोय….
वाढत्या टेन्शनसोबत आमचा पगार काही वाढत नाही….
मनाला हवी तेव्हा साधी सुट्टी सुद्धा मिळत नाही….
रेटिंगची वाटच आहे मग promotion तर लांबच राहिलेलं….
Onsite चं विचारावं तर manager चं तोंड वाकडं झालेलं….
बरीच स्वप्न आहेत डोळ्यात.. पूर्ण होतील असं दिसत नाही….
हरवून जातील हळू हळू.. पुन्हा पहावी तर तशी झोपसुद्धा लागत नाही….
सगळं ठीक होईल उगाच स्वतःला समजावतोय…. बस झालं…. आता मीही पेपर टाकावा म्हणतोय….
खूप विचार केला.. शेवटी eSep एकदाचं file केलं….
हातात दुसरी ऑफर नसताना.. एवढं मोठ्ठ धाडस केलं….
हा हा म्हणता बातमी.. जणू वाऱ्यासारखी पसरत गेली….
PM, DM, Onsite, Manager… सगळ्यांना सरसकट जाग आली….
इतके वर्ष जाणवलं नाही.. आणि अचानक माझी किंमत कळली कशी….?
कालपर्यंत वाकडी होणारी तोंडं…. आज इतकी सरळ झाली कशी….?
मी खरंच Valuable Resource आहे.. म्हणे आत्ता ह्यांना पटलंय….
onsite, Hike, Promotion.. रोज नवं ताट समोर येऊ लागलंय….
म्हणून पुन्हा विचारात पडलोय…. या सगळ्यात किती बर तथ्य आहे….?
नुसतंच राजीनाम्याच भूत…. कि खरंच एक हवं असलेलं सत्य आहे….?
या फुटकळ प्रलोभनांना बळी पडावं.. कि तडक इथून निघावं….? आता हाच विचार करतोय….
टाकलेला पेपर मागे घ्यावा कि नको…. सध्या हेच मी ठरवतोय….

-टिंग्याची आई
हे सगळ लिहिताना माझीही अशीच काहीशी अवस्था होती… पण अजून तरी पेपर टाकलेला नाहीये… :)