आपल्या आयुष्यात खूप कमी लोक असतात जे आपल्यावर त्यांच्या विचारांचा, वागण्याचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडतात… देव आणि आई-बाबा यांच्यानंतर आपोआप जिथे आपण नतमस्तक होतो अशी एक व्यक्ती… माझ्या आयुष्यातल्या अशाच एका व्यक्तीबद्दल…
कदाचित तुमच्या आयुष्यातील 'त्या' व्यक्तीला भेटल्याच समाधान तुम्हाला मिळेल… :)
माझ्या ओळखीच्या एक आजी आहेत… खूपच शांत आणि समाधानी व्यक्तिमत्व आहे त्याचं… त्यांना पाहिलं कि एखाद्या विशाल समुद्रासारख्या वाटतात त्या आणि तरीही एखाद्या नदीसारख्या शांत आणि मंजुळ आवाजात आपल्याकडच अनुभवांचं दान माझ्यासारख्या दीनाला भरभरून देणाऱ्या…
खरतर मी आईच मानते त्यांना… एक आदर्श व्यक्तिमत्व काय असतं हे त्यांच्याकडे पाहून कळत…. आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला त्या धैर्याने सामोऱ्या गेल्या… पतीच्या माघारी मुलांना सांभाळल… त्यांच्यावर संस्कार केले…. त्यांना मार्गी लावलं… आणि आज उतरत्या वयात आजही तितक्याच समाधानाने आयुष्य जगत आहेत…त्यांच्याविषयी लिहिण्याएवढी माझी लेखणी कधीच मोठी होऊ शकणार नाही… तरीही हा छोटासा प्रयत्न… :)
आज त्यांची मुलं-मुली संसारात रमलेले आहेत… पण आजी हल्ली घरात एकट्याच असतात… सकाळी मावशी स्वैपाक करून जातात आणि दुपारी कमल मावशी झाडलोट करून निघतात… एवढ्या मोठ्या साऊलीत आजी अध्यात्माला जोडीला घेऊन शांत चित्ताने राहत आहेत… साऊली हे आजींच्या घराचं नाव आहे आणि तिथे गेल्यावर अगदी सावलीत विसावल्याचाच अनुभव मिळतो… :) मी जेव्हा जेव्हा गावी जाते तेव्हा हमखास त्यांना भेटायचा प्रयत्न करते… या भेटीचं जेवढं जमेल तेवढं समाधान ओंजळीत साठवते….
हल्ली आजींची त्यब्येत थोडी ठीक नसते… वयोमानानुसार शरीराच्या बर्याच तक्रारी येत आहेत… छोटी मोठी काही ऑपरेशन्स सुद्धा झाली आहेत… मुली जमेल तशी चौकशी करतात… कधी फोनवर तर कधी भेटून अगदी जमेल तशी… आम्ही त्यांचा मानस लेकिसुद्धा त्यांना अधून मधून फोन करून चौकशी करत असतो… ५-१० मिनिटांच्या संभाषणातून त्यांच्या अमृतमयी शब्द्लहरि अंगावर बरसतात आणि जगण्याची नवी उमेद जागवतात… नकळत डोळे भरून येतात आणि मन भारावून जातं… क्षणभर त्यांच्या पायावर डोकं टेकून यावंस वाटतं आणि तसा आभासही होतो… त्याचंच पोटभर समाधानही आपसूक मिळून जातं….
रखरखत्या उन्हातून चालताना अचानक एका घनदाट वटवृक्षाच्या साउलीत नदीच्या पाण्याचा नितळ गारवा पावलांना आणि अंतरंगाला सुखावून जावा असाच काहीसा असतो हा अनुभव माझ्यासाठी…
आजींची तब्येत ठीक नसते हे माहिती आहे त्यामुळे दर वेळी त्यांना फोन करताना जीवाला धाकधूक लागलेली असते… आपलं मन खरंच खूप वाईट असतं… कधी काय विचार करेल सांगता येत नाही… :(
असो… २-४ महिन्यातून एखादाच फोन होतो आमचा… पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी आजींच्या मोबाईलवर कॉल करते तेव्हा जीव वर खाली होत असतो…. दोन्ही हात जोडून मन देवाकडे पार्थना करत असतं… आजी फोन उचलू देत… त्या बऱ्या असू देत… मला त्यांच्याशी बोलायचं आहे… त्यांची काळजी घे… :) आणि १०-१५ रिंग्स नंतर का होईना आजी फोन उचलतात… तेव्हा त्यांचा 'Hello' हा शब्द ऐकताच मंदिरातल्या पवित्र घंटानाद ऐकल्यावर मिळणारं समाधान मिळतं…. मनातल्या मनात बाप्पाचे आभार मानून पुढच्या गप्पा होतात…. आणि मिळालेलं शब्दामृत पिऊन मी पुढे होते… पुन्हा फोन केल्यावर आजीशीच बोलायला मिळो हे साकडं माझ्या लाडक्या बाप्पाला घालून…
आजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी पार्थना…. :)
- टिंग्याची आई
Few of you might guess this great person.. :)
लास्ट विकेंडला माझ्या प्रिय मैत्रिणीला फार दिवसांनी भेटले… वेळ काढून तिच्या घरी गेले होते… मावशीला भेटून टिंग्या आणि मी दोघेही खुश झालो… धावती विझिट होती पण तरीही खूप बर वाटलं… जास्त गप्पा नाही मारता आल्या पण त्या भेटीने दोघींचाही पोट भरलं… समाधानाने दोघीही आपापल्या घरी परतलो… नेहमीची कामं झाली आणि रोजच्यासारख निवांत झोपी गेलो…. आणि रात्री मला एक स्वप्न पडलं…
एक अगदी जवळची मैत्रीण भेटली स्वप्नात…. थोडी काळजीत दिसत होती… मी भेटल्यावर थोडी खुलली… दोघींनीही घट्ट मिठी मारली… आणि या गोड भेटीचं सुख अश्रूंवाटे वाहू दिलं… या माझ्या मैत्रिणीलाही मी बरेच महिने कि बरेच वर्ष झाली भेटले नव्हते… आज संध्याकाळी एकीला भेटले म्हणून दुसरी मला स्वप्नात येउन भेटली… या दुसऱ्या मैत्रिणीचा विषयही झाला न्हवता आमच्या गप्पांमध्ये पण तरीही तिची 'आठवण' आली अगदी मनापासून आली…. म्हणूनच मग माझ्याही नकळत माझ्या मनाने खेळ मांडला आणि स्वप्नात भेट घडवून आणली आमची… :)
खूप खूप गप्पा झाल्या… घर-संसार… ऑफिस, पिल्लं अगदी सगळ्यांच्या… रात्र संपली तशी जाग आली आणि आमची भेटही तिथेच संपली… पाणावल्या डोळ्यांनी निरोप घेतला गेला… स्वप्न असलं तरी खऱ्याखुऱ्या भेटीसारखं गोंडस आणि लोभस होतं ते…
सकाळी उठून कामं आवरून पहिला त्या मैत्रिणीला फोन लावला… तीही बावरली असा सकाळी सकाळी आलेला फोन बघून… रात्रीच्या स्वप्नाचा सगळा वृतांत्त तिला सांगितला… आधी पोटभर हसून घेतलं आणि रात्रीच्या त्या भेटीचा आनंद जमेल तसा फोनवरच्या गप्पांमध्ये घेतला… आणि फोन ठेवताना जसा पाणावल्या डोळ्यांनी स्वप्नात घेतला तसाच काहीसा निरोप घेतला…
एका मैत्रिणीने ब्लॉगवर सांगितलेला आठवणींचा कप्पा डोळ्यासमोर उभा राहिला… जवळच्या-लांबच्या अगदी कोणाकोणाच्या आठवणींनी गच्च भरलेला… आवरवासा नाही वाटत… असाच भरलेला राहू देत सगळ्यांच्या आठवणींनी… :)
आज उगीचंच वाटत होतं….
आठवण… कधीही सांगून येत नाही…
कधी आणि कशी येईल… सांगता येत नाही…
कोणाच्याही नकळत हळूच येते…
कधी हसवून अन कधी पापण्या भिजवून जाते…
आठवण येते जिवाभावाच्या माणसांची…
आठवण करून देते सोनसळी क्षणांची…
आठवण… भावनांच्या असंख्य तारा छेडत येते…
भाबड्या मनाला आरपार भेदत जाते…
वाटतं…
आपल्यातल्या प्रत्येकाची… कोणीतरी अशीच आठवण काढत असेल…
हरवलेल्या कित्येक क्षणांची… गोळा-बेरीज करत असेल…
अशीच काही भेटीची स्वप्न… सगळ्यांनाच पडत असतील…
आणि बऱ्याचशा आठवणीतल्या भेटी… फक्त स्वप्नातच राहत असतील…
सकाळी सावरलेलं मन… पुन्हा त्याच भेटीची वाट पाहू लागतं…
अन रात्रीचं ते स्वप्न सुद्धा… दिवसाच्या लख्ख उजेडात कुठेतरी हरवून जातं…
अशीच मग कधीतरी… आठवणच आठवण करून देते…
जिवाभावाच्या माणसांच्या भेटीची… पुन्हा एकदा ओढ लागते… :)
एखाद्या व्यक्तीची आठवण आली म्हणजे आपण त्यांना विसरलो अस नाही…
आठवण येते म्हणजे आपण त्यांना विसरू शकत नाही इतकंच… :)
- टिंग्याची आई
आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी इतरांकडून शिकतो… किंवा इतरांचं अनुकरण करतो असं म्हणा… चांगल्या वाईट बरच काही आपण शिकतो… कधी आईकडून प्रेम करयला शिकतो तर कधी बाबांकडून संयमाचे धडे घेतो… कधी ताई समजूतदारपण शिकवते तर धाकटा भाऊ खट्याळपणाचे क्लासेस घेतो…. :) कॉलेजमध्ये मित्रांकडून, ऑफिसमध्ये सिनियर्स कडून आपण शिकत राहतो… कधी कधी ते जसंच्या तसं कॉपी करतो तर कधी विथ modifications… लहापणापासून ते अगदी मोठे होईपर्यंत हे चालूच असतं…. आणि त्यात नक्कीच काही गैर नाहीये…
बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडतात म्हणून आपण कॉपी करतो आणि बरेचदा एखाद्या जवळच्या माणसाच्या सवयी नकळत आपल्याला लागून जातात… जणू आपल्या स्वतःमध्ये त्याचंच प्रतिबिंब असतं…
खरतर हे सगळं सुचायला कारण म्हणजे पुन्हा एकदा माझा लाडका टिंग्या… परवा सुट्टीदिवशी घरी सगळ्यांचा नाश्ता चालू होता टिंग्याची फेवरेट Maggi…. बाबांनी नेहमीप्रमाणे एका हातात पेपर घेऊन वाचत वाचत पेटपूजा चालू केली… आईपण पेपर वाचत होती… अचानक टिंग्याला काय सुचलं आणि पेपर हवाय म्हणून रडायला लागला…. आम्हाला वाटलं नेहमीसारखा त्याला डीशखाली ठेवायला हवाय पेपर म्हणून दिला जो हाताला सापडला तो… पण पठ्ठ्या ऐकतोय कुठला…. बाबाने हातातला पेपर दिला तेव्हा कुठे गप्प झाला… एवढ्यावरच थांबला नाही… डाव्या हातात पेपरची घडी धरून ती उटली होती हि गोष्ट वेगळी… ;) नजर पेपरवर खिळवून उजव्या हाताने खायला सुरुवात केली हिरोने… अगदी हुबेहूब बाबा… CopyCat कुठला… :)
आम्ही सगळे कौतुकाने बघतच बसलो… मुलं किती पटकन शिकतात आणि अनुकरण करतात सगळ्याचच अप्रूप वाटत होतं…
पण त्याच क्षणी हे सुद्धा जाणवलं… आपलंही अनुकरण केलं जातंय… आपल्या प्रत्येक गोष्टीतून आपलं चिमुरडं काहीतरी घेतंय… आणि स्वतः तसं करण्याचा प्रयत्नही करतंय….
गोष्ट छोटी असली तरीही जीवाला चटका लावून गेली… पिल्लू तुझ्याकडे पाहून घडतंय हे सांगून गेली… आजही अनुकरण केलं जातंय… पण कोणीतरी मला कॉपी करतंय… माझं लाडकं पिल्लू… :)
त्या दिवसापासून हातून घडणारी प्रत्येक गोष्ट… तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक बाहेर पडतो… विचार एकदा सोडून दोनदा केला जातोय… :)पिल्लाचं आपल्या वागण्या-बोलण्याकडे किती बारीक लक्ष असतं हे थोडं जास्त जाणवायला लागलंय हल्ली… आमचं वागणं अगदी वाईट वगैरे आहे असं नाही… पण या सगळ्यातूनच आमचं बाळ घडतंय म्हणून हि काळजी… :) अन काही चुकलंच तर लाडका CopyCat आहेच कि दाखवून द्यायला…
हल्ली अशाच नवनवीन जबाबदाऱ्या कळत आहेत…
आणि पिल्लसोबत त्याचे आई-बाबाही घडत आहेत…
Thanks टिंग्या… :)
- टिंग्याची आई
शाळेत असताना निबंध लिहायला लागायचा… दर सुट्टीत नवीन विषय…. हे नसतं तर… कधी ते नसतं तर… मी हा झालो तर… मी हि झाले तर… बरेच विषय… आमचा आपला एकच फंडा… कोणी का असेना फक्त महत्वाचे शब्द बदलायचे… बाकी सब कुछ सेम टू सेम… :) काय बरोबर आहे ना…?
तर परवा एकदा गप्पा मारता मारता विषय सुचला टी. व्ही. नसता तर…. लहान असताना बरंच काही लिहिलं असतं चित्र विचित्र पण आज इथे जे काही टिंग्याची आई म्हणून लिहिलंय तेवढंच काय ते सुचलं… बघा पसंत पडतंय का आणि पटतंय का… :)
टी. व्ही. नसता तर….
बाळ टी. व्ही. बघतोय तोवर…. आईला सगळी कामं आवरता आली नसती….
अन आई घरी नसताना…. टी. व्ही. वरची अंगाई ऐकत पिल्लूला झोप सुद्धा आली नसती….
सकाळी आई ऑफिसला निघताना…. रडणारा बाळ शांत झाला नसता….
इकडे तिकडे पळणारे Tom & Jerry दाखवत…. आईला ऑफिसला पळ काढता आला नसता….
टी. व्ही. नसता तर….
सर्कशितला भला मोठ्ठा हत्ती…. बाळाला रोज रोज पाहायला मिळाला नसता….
टी. व्ही. वर नाच रे मोरा बघत…. ताटातला वरण-भात फिनिश झाला नसता….
वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना…. पिल्लूला हुबेहूब जमली नसती….
उशिरा येणाऱ्या बाबाची…. डोळे ताणून टी. व्ही. बघत वाट पाहता आली नसती….
टी. व्ही. नसता तर….
पिल्लासाठी छान छान रेसिपीज…. आईला शिकता आल्या नसत्या….
बाबाच्या रोजच्या बातम्या…. कार्टूनच्या ब्रेकशिवाय पूर्णच झाल्या नसत्या….
रात्री छोटा भीम बघत बघत…. डोळ्यांची चिमुकली फुलं मिटली नसती….
अन तेच कार्टून बघत दमलेली आई…. बाबाच्या कुशीत विसावली नसती….
टी. व्ही. नसता तर….
आजीच्या सिरियल मधलं जानू-श्रीचं गाण… पिल्लाने सूर लावून म्हटलं नसतं….
अन लुंगी डान्सच्या तालावर…. छकुल ठेका धरून नाचलं नसतं….
Match सोडून बाबाचं सगळं लक्ष…. त्याच्या जेवणाकडे असतं….
आणि लाईटचं बील सुद्धा…. नक्कीच कमी झालं असतं…. :)
तरीही टी. व्ही. नसता तर…
टी. व्ही. च्या नादात मिस केलेलं…. बरंच काही खऱ्या अर्थाने जगता आलं असतं….
पण रिमोट साठी भांडणाऱ्या…. बापलेकाचं सुख तरी कुठे अनुभवता आलं असतं…
टी. व्ही. नसता तर… थोडंस अवघडच झालं असतं… :)
- टिंग्याची आई
Specially dedicated to Mahila Mandal member Madhura... :)
आमच्या महिला मंडळात एक पोरगी आहे… तिच्या घरी कामाला एक मावशी आहेत… २४ hr तिच्याकडेच राहतात, काम वगैरे सगळ त्याच बघतात आणि तिच्या मुलीची काळजी पण घेतात… परवा त्या गावी गेल्या सुट्टीला आणि यायचा पत्ताच नहि… तिला आणि तिच्या नवऱ्याला सगळ संभाळण नक्कीच कठीण जात होतं… जेव्हा आई बाबा दोघेही Working असतात तेव्हा प्रॉब्लेम तर होतोच असा अचानक मावशी निघून गेल्यावर…. त्या दोघांनी कसं manage केलं असेल त्यांनाच ठाऊक….
तर तिच्या नवऱ्याने सहज यावर कविता मागितली माझ्याकडून आणि नाही देईन तर टिंग्याची आई म्हणावी…. ;) म्हणून हि कविता अशा सगळ्या आई-बाबांसाठी… :)
आमच्या पिल्लासोबत घराची काळजी… आमची मावशीच तर घ्यायची…
ती घरी असताना… माझी बायको पण निवांत असायची…
धुणं-भांडी, स्वैपाक-पाणी… सगळं काही तीच तर करत असे…
माझी लाडकी छकुलीपण… तिच्यासोबत खूप छान रमत असे…
घरी म्हणून गेली परवा… आणि परत ती आलीच नाही…
पन्नास निरोप पाठवून पाहिले… पण तिचा काहीच पत्ता नाही…
कळेच ना आम्हाला नक्की काय झालंय Wrong… ज्यामुळे या मावशीने मारलीये टांग… :)
पण…
कधी तिची सुट्टी तर कधी माझी असं किती दिवस चालायचं
ऑफिस आपल्या बापाचं असल्यासारखं आणखी किती दिवस वागायचं
रोज उठून ऑफिसला जायचो सगळं त्या मावशीवर सोडून
अवघड झालंय निवांत बसणं सुद्धा… जेव्हा कामं येतात एकमेकाला जोडून
आता पिल्लू आणि घरची कामं आम्ही दोघं मिळून आवरतोय
त्रास तर होतोच आहे पण खूप एन्जॉय सुद्धा करतोय
तरीही प्रश्न पडतोय न संपणारी कामाची पाहून रांग… का बरं मावशीने मारलीये टांग… :(
एक काम आवरतंय एवढ्यात… पिल्लू दुसरं विस्कटून ठेवतंय…
आई कामात बिझी असताना… नेमकं कुठतरी धडपडतंय…
विस्कटलेल्या घरासोबत… जमेल तसं पिल्लालाही ती सांभाळते आहे…
नवरा न्हवे तर एक मित्र बनून… तिला साथ द्यायचा माझा प्रयत्न आहे…
दिवसभराच्या कामाने कंटाळली… तरी तिच्या चेहऱ्यावर छान स्माईल असते…
एखादं काम एक्स्ट्रा करायची… मला उगीचचं प्रेरणा मिळते…
पार अवतार झाला असला तरी तिचा तो गोड प्रश्न… मी कशी दिसतेय सांग…?
तेव्हा वाटतं बर झालं मावशीने मारलीये टांग… ;)
पुन्हा पुन्हा जाणवतंय…. आपण किती Dependent होत गेलोय….
भविष्य भक्कम करायच्या नादात…. पाया मात्र दुबळा करून ठेवतोय….
नातवासाठीची आजीची माया…. अशी पैशात विकत घेता येत नाही….
पगार वेळेवर नाही मिळाला…. तर मावशी काम सुद्धा करत नाही….
आई-बाबांना वेळ नाही म्हणून…. पिल्लं दुसऱ्याच्या छायेखाली वाढतात….
संध्याकाळी डबडबलेले चिमणे डोळे…. आईची वाट पाहतात….
ठरवलंय आता आई-बाबाने…. पिल्लासोबत घराची काळजी घ्यायची….
पिल्ला बरोबर आपणही घडायचं…. हि परीक्षा मिळून पार पाडायची….
ही जबाबदारी उचलायचा दोघांनी बांधलाय चंग….
काळजी नाही आता जरी मावशीने कायमची मारली टांग…. :)
- टिंग्याची आई
One of my X-Teammates who is doing her MBA Dear Priyanka, was asked to write a poem on any subject in English.... Everyone in the group tried to write the peom but ended up with nothing... :( after trying hard she thought of asking for a poem to her Taai(its me.. :) and then and there I was given a challenge to write a poem on any subject in ENGLISH...
which was a real challenge for Taai... as she has never written any of her poems in English... :( that too it had to be written without help of google and in just 1-2 hours... But still enjoyed it... :)
So here is my first ever attempt to write a poem in Engrajee.... :)
Definitely it is not a great poem.. but feeling much better now... ;)
One fine day...
We were asked to write a poem on whatever we can..
Happily accepted the challenge just like superman...
Its time to write a poem.. everyone got ready...
But our paper and pen... both were just still n steady...
Whatever task u give we do it perfect and fine...
But found it real difficult to write a single line...
Family nature emotions.. so much to write...
Wanted something.. which will shine lil bright...
We were all genius.. each one clever and smart...
But no one knew the real words and their art...
Finally decided... lets write on our own poem writing..
Playing with words.. we found really exciting...
Few rhyming lines... is what we thought a poetry...
Now we knw...to someone's heart its a direct entry...
And we understood...
Writing poem is not a game with clay...
Words are the only ones with whom you play....
A poem can express every thing in this big world..
It holds the power of changing your own lil world...
- This time it is Tingya's Mom... ;)