Tuesday, November 26, 2013

साखरपुडा ते लग्न…

प्रिय शरी आणि प्रभा….
Congratulations… लग्न ठरलंय ना तुमचं… :) शरीच्या आईंनी कळवलं होतं मला पण तुमच्या साखरपुड्याला यायला काही जमलं नाही… टिंग्याची शाळा आणि माझं ऑफिस दोन्हीकडे सुट्टीचा नेहमीचा प्रॉब्लेम… असो… तुमच्या लग्नाला अजून २ महिने अवकाश आहे असं कळलं…. त्यामुळे आम्ही आधीच सुट्टी काढून तयार आहोत…. आम्ही येतोय… :)
साखरपुडा ते लग्न… खरंच खूप महत्वाचा आणि गोजिरवाणा काळ असतो हा… लव-मेरेज असो वा अरेंज दोन्हीच्या बाबतीत हा मधला काळ अगदी वेगळा आणि सुखद असतो… अवघ्या एका कांदेपोह्याच्या कार्यक्रमात निवडलेल्या आपल्या जोडीदाराला ओळखून, जाणून घेण्याचा हा काळ तर हेच Love Marriage मध्ये म्हणाल तर आपण आधीच ओळखत असलेल्या आपल्या माणसाला नव्याने ओळखण्याची एक संधी…. एकमेकांना केले जाणारे अगणित फोन कॉल्स… रात्र-रात्रभर मारलेल्या गप्पा… रंकाळ्यावर बसून घालवलेली एखादी किंवा अनेक रम्य संध्याकाळ… I hope तुमचं हे सगळं सुरूच असणार आहे… ;)
छान एन्जॉय करा… हीच वेळ आहे तुमच्या या नव्या नात्याला छान रुजवण्याची आणि गोंजारायची…. या नवख्या प्रेमाचा आनंद घेता घेता अनेक जबाब्दार्यांचीही जाणीव अपोआपच होईल तुम्हाला आणि एकमेकांना साथ देत त्या पार पडायलाही तुम्ही मागे हटणार नाही याची खात्री आहे आम्हाला… :)
           एखादं बी कसं पेरलंय यावर अवलंबून असतं तो अंकुर कसा उमलेल किंवा अगदीच उमलेल कि नाही… ते किती खोलवर ठेवलं गेलंय… कडेची माती किती हळुवार दाबलीये…. माती किती भुसभुशीत केलीये… आळ कसं छान बांधलय… यावरच सगळं निभावलेलं असतं… तुमच्याही नात्याचं बीज तुम्ही आत्ता पेरताय… सगळ्या गोष्टींची अगदी नितांत काळजी घ्या… हा अंकुराचच पुढे एका वटवृक्षात रुपांतर होईल… आणि त्याच्याच सावलीत आयुष्याची गोड संध्याकाळ तुम्हाला अनुभवायची आहे… 
         साखरपुडा ते लग्न हि वेळ असते एकमेकांना समजवून घ्यायची… एकमेकांना ओळखायची… कधी एखादी गोष्ट न सांगता समजते… कधी नकळत आवडी निवडी कळतात त्या याच काळात मारलेल्या गप्पांमध्ये… कधी उगीचंच काहीतरी बोलून किंवा करून त्याला राग कधी आणि किती लवकर येतो हे पहावं… तर कधी एखाद्या छोट्या मुलासारखं हट्ट करून पहावं आणि दुसर्याने तो हौसेने पूर्णही करावा… कधी त्याच्या काळजीने तिने हळवं व्हावं तर त्यानला तिचं हे प्रेम पाहून स्वतःचाच हेवा वाटावा… सगळीच गणितं नव्याने मांडली जातात आणि चक्क सगळ्यांची उत्तरही सापडतात आणि तीही अगदी बरोबर… :) ती व्यक्ती आपलं आयुष्य बदलून टाकते अन तिच्यामुळेच प्रेमाची रोज एक नवी परिभाषा कळत राहते….

         प्रेम जडतं ते "आपल्या माणसावर" आणि आपण अपोआप प्रेम करायला शिकतो ते त्याला जोडून आयुष्यात आलेल्या "आपल्या माणसांवर"…. या आपल्या माणसांना जाणून घेण्याची हीच वेळ असते… आपल्या जोडीदाराच्या नजरेतून… जे घर आपलं होणार आहे त्या घरातल्या माणसांना जाणून घ्यावं… दोघांनीही…. सासूबाई, सासरेबुवा, नणंद, दीर, भावजय… सगळ्यांनी प्रेमाने तुमचं स्वागत केलंय त्या प्रेमाची परतफेड तुमच्या प्रेमानेच होईल… तुमच्या सप्तपदीची खरी सुरुवात इथूनच आहे… प्रत्येक पाऊल एकमेकांच्या आधाराने टाकत रहा… आणि आयुष्यातल्या प्रत्येक लढ्यात विश्वासाने एकमेकांची साथ द्या… 
         आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तुम्हाला या नात्याला जपायचंय … एकमेकांना जपायचंय… येतील अनेक वादळ… त्यातही एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवायचाय… सुख-दुःखाचा प्रत्येक क्षण समाधानाने ओंजळीत घ्यायचाय… या नात्यातला प्रत्येक शब्द आयुष्यभर जगायचाय… 
काळजी घ्या दोघेही… छान एन्जोय करा हे गोल्डन डेज… :)
बाकी सगळ निवांत… तुमच्या लग्नात भेटूच आपण… 
कळावे…. 

- टिंग्याची आई