Tuesday, October 16, 2012

रांगोळी.....

परवा ऑफिसला येताना... एका रांगोळी वाल्याचा उलटा पडलेला गाडा पाहिला.... सगळी रांगोळी विस्कटली होती.. फक्त क्षणभरच गाडीवरून येता येता  पाहिलं ... तेव्हाच कधीतरी सुचलेलं....


सकाळच्यापारी रंगोळीवाला घना. आज लवकर तयार झाला...
धुवून पुसून आपला गाडा.. त्याने चांगला स्वच्छ केला...
 लाल, निळा, हिरवा, पिवळा अनेक रंग... आज सगळा नवा माल काढला...
लहान मोठ्या भांड्यामध्ये एक एक रंग सजला....

त्याची चिमुरडी लेक पण आज हाताखाली लुडबुडत होती...
संध्याकाळी बाबा कडून तिला.. नवी बाहुली हवी होती...
बायकोही त्याची आज जरा खुशीतच  दिसत होती...
येत्या दिवाळीला... तिला पण नवी साडी चोळी मिळणार होती...

रांगोळी.. रांगोळी.. ओरडत चार पाच गल्ल्या हिंडून झाल्या...
सकाळच्या भवानीला (बोहणी)... चांगल्या पाच पुड्या खपल्या....
खिशातल्या नोटांकड बघून तो अन त्याच्याकड बघून त्या पण हसल्या...
जणू बायको आणि पोरगी समोर नटून थटून उभ्या राहिल्या....

देवाला हात जोडत.. जरा खुशीतच तो पुढ निघाला.
रहदारीच्या रस्त्यावर त्याने.. गाडा जरा जपूनच घातला...
पण...... भरधाव येणाऱ्या एक गाडीन.. चांगलाच घाव घातला...
बघता बघता सगळा गाडाच  त्याच्या डोळ्यासमोर पालथा झाला...

थांब थांब म्हणुस्तोवर.... ठोकणारा कवाच पसार झाला...
शंभराची एक नोट.. नुसतीच हवेत भिरकाऊन  गेला....
रिकाम्या हाताने.. घना परत गड्याजवळ आला...
उरल सुरल बळ एकवटून.. गाडा तेवढा सरळ केला...

कुठे लाल.. कुठे हिरवा तर कुठे नीळा... काहीच कळेना....
कसा वाचवावा एक एक रंग.. त्याला काहीच सुचेना..
तासभर प्रयत्न करूनही.. एकही रंग वेगळा निघेना...
नवी बाहुली आणि साडी-चोळी... आता दुसर काहीच त्याला दिसेना...

आयुष्यातले रंगही त्याच्या होते.. असेच काहीसे विस्कटलेले...
सुखापेक्षा दुखाचेच माप सदा झुकलेले...
तरीही रोज रात्री.. समाधानाने डोळे मिटलेले....
ओठांवर नेहमीच हसू.. आणि आत खोलवर नुसतेच दुख साचलेले...

शेवटी विस्कटलेल्या रंगासोबत... त्याने मातीसुद्धा भरली...
आणि भरल्या डोळ्याने... घराकडची वाट  धरली...
दोन्ही हातांनी ती रांगोळी त्याने हज्जार वेळा गोंजारली...
आज त्याच्या ऐवजी गाड्यानेच.. त्याला घरापर्यंत वात दाखवली...

झोपडीबाहेर आता गाडा एकटाच शांत उभा होता....
आणि आत घना गुढग्यात डोक घालून... हुंदके देऊन रडत होता...
आज अचानकच दाटून आलेल्या आभाळात.. कोपर्यावरचा ढग एकटाच टीप गाळत होता...
सकाळपासून घनाच्या अश्रूंत भिजलेली ती रांगोळी... आता पाउस ओली चिंब करत होता....

- टिंग्याची आई..

2 comments:

  1. Asach Suchta kadhi kadhi... :)

    Thanks for the comments.. but at least naaav tari sanga na... :)
    - shilpa

    ReplyDelete