Saturday, June 7, 2014

मरणाचे फायदे….

त्याच्या माहितीतलाच कुणीतरी त्याच्याच वयाचा… 
परवा अचानक देवाघरी गेला …
इन्शुरन्स वगैरे सगळं मिळून… 
घरच्यांना बक्कळ पैसा मिळाला… 

त्या दिवसापासूनच… 
त्याच्या डोक्यात एकच विचार होता… 
आपल्याच  "मरणाचे फायदे…" 
तो स्वतःला समजून सांगत होता… 
इन्शुरन्सच्या documents उगीचंच… 
पुन्हा पुन्हा तपासू लागला… 
नक्की किती बर मिळतील पैसे… 
सगळी गोळाबेरीज करू लागला… 

दिवस असो वा रात्र… 
तो फक्त मरणाचाच विचार करत असे… 
त्याच्या  माघारी financially सुखी  कुटुंब… 
एवढंच त्याच्या डोळ्यांना दिसत असे… 
कारण…. 
त्याच्या स्वप्नांच्या घरट्याला… 
होता EMI च्या भिंतींचा आधार… 
घरातलं सगळ भागवताना… 
पुरत नसे महिन्याचा अख्खा पगार… 

सारासार विचार करून शेवटी… 
त्याने मरायचा निर्णय पक्का केला… 
अगदी natural death वाटेल असा …
मार्गसुद्धा काढून मोकळा झाला… 
मग कुठे त्याचा डोळा लागला अन चित्त शांत झालं… 
याच दरम्यान बाप्पाने एक काम करायचं ठरवलं… 
मरायचं त्याचं स्वप्न बाप्पाने त्याच्या स्वप्नातच पूर्ण केलं… 
आयुष्याच्या गणितातून त्याला एका दिवसासाठी वजा केलं… 
त्याला हवी तशीच… 
त्याची natural death झाली होती… 
विम्याची भलीमोठी रक्कम… 
अगदी विनासायास मिळाली होती… 

एक एक करत सगळी कर्ज… 
जणू नाहीशीच झाली…
कर्जाच्या ओझ्याखालुन… 
त्याची family अलगद मोकळी झाली… 
पण आता…. 
सगळे खेळ बाजूला सारून… 
पिल्लं बाबासाठी रडत होती… 
आयुष्यातून हरवल्या सारखी… 
बायको मुक्यानेच टिपं गाळत होती… 

हार घातलेल्या पोराच्या फोटोला… 
बाप नमस्कार करत होता… 
रिटायरमेंटच्या वयात… 
नव्या नोकरीचा विचार करत होता… 
थरथरत्या हातांनी आई… 
मुलाच्या आठवणी गोंजारत होती… 
परत येऊ देत लेकरू माझं… 
म्हणून देवाला साकड घालून बसली होती… 

हसणं खेळणं सगळ कसं… 
घरातून नाहीसच झालं होतं… 
कसलं आलंय घर तरी …
त्यातलं घरपण नेमकं हरवलं होतं… 
घरच्यांची ही अवस्था… 
तो स्वतः डोळ्यासमोर पहात होता… 
काहीच करता येत न्हवतं… 
सगळ्यांत असून नसल्यासारखा होता… 

पिल्लांना, बायकोला, आईला… 
जीव तोडून हाक मारली… 
त्याच्याविना निर्माण झालेली पोकळी… 
त्याला आत्ता कुठे जाणवली… 
कसही करून त्याला… 
आता पुन्हा जिवंत व्हायचं होतं …
खूप काही हरवलेलं… 
पुन्हा परत मिळवायचं होतं… 

फक्त एकदाच संधी दे रे… 
म्हणून देवाकडे तो भिक मागू लागला… 
तेव्हाच मरणाच्या त्या स्वप्नातून… 
तो खाडकन जागा झाला… 
खरंच किती फायदा होईल त्याच्या मरणाचा… 
सगळं क्षणात समजून चुकला… 
आजही कर्ज तशीच आहेत… 
EMI च्याच पण भिंती भक्कम उभ्या आहेत… 
आई-बाबांचे नातवंडासोबत खेळ छान सुरु आहेत… 
बायकोच्या डोळ्यात स्वप्नं अजूनही फुलत आहेत… 

"मरणाचे फायदे…" हा विषय अजूनही… 
त्याच्या भेटीला येतो अधून मधून… 
अन आल्या पावली निघून जातो… 
आपल्या माणसांसाठी जगण्याचा त्याचा पक्का निर्धार बघून… 
- टिंग्याची आई 

No comments:

Post a Comment