Saturday, June 7, 2014

माणसं पुन्हा भेटतात….

खूप खूप दिवसांनी एक जुनं नात पुन्हा भेटलं… अगदी कधीही भेट होईल अशी अशा नसलेल्या एक व्यक्तीची पुन्हा भेट झाली… त्यावरूनच सुचलेलं हे काहीतरी… 
माणसं पुन्हा भेटतात….
यावर माझा विश्वासच न्हवता… 
कारण सोडून गेलेला प्रत्येकजण… 
आजवर कधीच परत आला न्हवता… 

मित्र-मैत्रिणी बरेचजणांचे हात… 
आमच्या नकळत सुटत गेले… 
कधी काळी घट्ट बांधलेले धागे… 
आपोआप तुटत गेले… 
माणसांच्या या गर्दीत… 
आपली माणसं कुठेतरी हरवली… 
जवळची कधी लांबची नाती… 
कळत नकळत नाहीशी झाली… 

आठवत राहतो अधून मधून …
यातला प्रत्येक तुटलेला धागा… 
जूनंच काहीतरी सांगून जाते …
त्यांची ती रिकामी जागा… 
खूप काहीतरी सांगायचं असतं… 
पण का कुणास ठाऊक राहून जातं… 
डोळ्यांत साठवलेलं प्रतिबिंब …
आपल्याच आसवांत वाहून जातं… 

मनाच्या एका कप्प्यात सगळ बंद… 
बाकी प्रपंच सुरळीत चालू असतो… 
हरवलेला माणूस परत येईल… 
याच आशेवर जगत असतो…
अशाच सुटलेल्या एका धाग्याशी… 
परवा अचानक गाठभेट झाली… 
कुणाच्या ध्यानीमनी नसताना… 
दोघांची वाट पुन्हा एकत्र मिळाली… 

सुटले होते जे बंध… 
पुन्हा एकदा मायेने बांधले… 
एक जुनेच नाते नव्याने… 
एका नव्या सुरात गायले… 
आता आशा वाटू लागलीये…
जाणार पाउल फिरून परत येईल…
दोन समांतर रस्त्यांनाही…
एखाद वळण आपल्या कुशीत घेईल…

पटलंय आता ह्या मनालाही… 
हरवलेले मोती पुन्हा सापडतात… 
मायेच्या धाग्याने बांधलेली…
माणसं पुन्हा नक्की भेटतात….
- टिंग्याची आई 

No comments:

Post a Comment