Sunday, October 19, 2014

Feeling Proud...

         अभिमान वाटावा अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात… कधी देशाचा, कधी आपल्या माणसांचा तर कधी स्वतःचा… बरीच कारणं असतात… 
आपली छाती अभिमानाने फुलून येते… कसलं भारी वाटत… म्हणजे अगदी नादखुळा…!!! :)
५ जानेवारी २०१४ हा असाच एक अभिमानाचा दिवस आहे माझ्यासाठी… का ते सांगते… पण थोडी प्रस्तावना तर हवीच… ;) 

        शाळेत असताना मी बऱ्यापैकी हुशार होते… पहिला नंबर नेहमीच असायचा… आणि बाकी एक्स्ट्रा curriculum कि काय म्हणत्यात तेही होतच जोडीला… दरवर्षी एखाद दुसऱ्या खेळात किंवा कथाकथन, भाषण, निबंध स्पर्धेत एखाद सर्टिफिकेट किंवा मस्त चषक मिळायचं… खूप मस्त वाटायचं… तेव्हा वाटायचा अभिमान कि नुसताच गर्व होता कोण जाणे… :) आमचं आम्हालाच कळायचं नाही… 
असो… तर घरी नेऊन चषक दाखवलं कि बाबांकडून शाबासकी आणि आईकडून संध्याकाळी मस्त मेजवानी मिळायची… फार फार तर चार दिवस चालायचं कौतुक मग कुठल्यातरी शोकेसच्या कप्प्यात पडून राहायची ती ट्रॉफी आपल्या जोडीदार मंडळीसोबत… पुढे १० वी १२ वी पर्यंत बऱ्याच ट्रॉफी मिळाल्या… दरवेळी छान वाटायचं त्या घेताना… मग कॉलेजला आल्यावर सगळं अलमोस्ट बंद झालं… इंजिनियरिंगला आल्यावर कुठला आलाय अभ्यास अन कुठलं एक्स्ट्रा curriculum… :) अवघी एखादी-दुसरी ट्रॉफी किंवा सर्टिफिकेट असेल तेव्हाचं… आणि मग एकदा जॉब अन संसार सुरु झाल्यावर तेवढं सुद्धा नाही… :) पिल्लुच्या खोड्या अनुभवताना खुश व्हायचं… रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीत मिळालेला आनंद हीच आमची ट्रॉफी… 
           तर माझं पिल्लू हल्ली स्कूल मध्ये जातं (हो स्कूल… शाळा म्हटलं कि मला म्हणतो ममा स्कूल म्हण… :) किती खेळ आणि किती अभ्यास असतो कोणास ठाऊक… पण पोरांची मज्जा असते एवढं नक्की… 
          
         ५ जानेवारीला टिंग्याच्या शाळेचा वार्षिक कार्यक्रम होता… fancy dress. dance असे चिमुरड्यांचे बरेच प्रोग्राम ठेवले होते… टिंग्या शिवाजी महाराज बनला होता… फार कौतुकाने सजवलं होतं आम्ही त्याला… पण स्टेजवर गेलाच नाही पोरगा… :( रड रड रडला… कदाचित एवढे लोक समोर बघून घाबरला तो… मग वाटलं… अरेरे टिंग्याला नाहीच जमणार का हे?? उगीचंच वाईट वाटलं… पण त्याच्या वयापेक्षा जास्त अपेक्षांचं ओझं मी त्याच्यावर लादतेय कि काय असाही प्रश्न पडला… आणि मी स्वतःला सावरलं… यावेळी नाही पुढच्या वेळी नक्की जमेल म्हणून सोडून दिलं… कार्यक्रम पुढे चालू राहिला आणि शेवटी बक्षीस वितरण सुरु झालं… काहीच कल्पना नसताना टिंग्याचं नाव पुकारलं गेलं… रनिंग मध्ये त्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं…. त्याला स्टेज जवळ सोडताच धावत धावत जाऊन त्याने पारितोषिक स्वीकारलं… त्या पाहुण्यांसोबत फोटोसाठी छान पोज पण दिली पठ्ठ्याने न घाबरता…. :) एक छोटीशी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळालं माझ्या लाडक्या छकुल्याला… :) त्याने धावत येउन मला मिठी मारली… कौतुकाने तो मला ते दाखवत होता… आणि मी "टिंग्याची आई" अभिमामाने त्याला पाहत होते… 
Feeling Proud याचा खरा अर्थ जणू त्या दिवशी मला कळला होता… :)
      आज मला अभिमान वाटत होता माझ्या लेकाचा… आजवर कोणतही पारितोषिक स्वीकारताना मला इतका आनंद झाला न्हवता जितका आज टिंग्याला पोटाशी कवटाळताना झाला होता… माझ्या लाडक्याची पहिली वहिली ट्रॉफी…. माझ्या सगळ्या जुन्या ट्रॉफीज चा कुठेच काही पत्ता नाही पण आज माझ्या टिंग्याची छोटीशी ट्रॉफी त्या गोतावळ्यात नक्कीच शोभून दिसली असती… 
I am Proud of My Dear Tingya.... :)
कशात का असेना पण आज त्याला त्याची पहिली ट्रॉफी मिळाली…. सोबत drawing आणि poem मधेही त्याला छोटे छोटे बक्षीस मिळाले होते…. दिल खुश हो गया…. 
हल्ली असे बरेच प्रसंग येतात जेव्हा टिंग्यामुळे आम्हाला त्याचा आणि स्वतःचा अभिमान वाटतो… त्याच्या बाईंनी केलेलं कौतुक…. त्याच्या रिपोर्ट कार्ड वरचा very good चा शेरा… थोरामोठ्यांनी त्याचं केलेलं कौतुक… 
आजवरच्या आमच्या कोणत्याही यशाने इतकं समाधान मिळालं न्हवतं जितकं टिंग्याच्या छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतंय… खरंच खूप आनंद मिळतोय, फक्त तुझ्याच मुळे बाळा… :)
आणि हो… 
आमच्या जुन्या पुराण्या ट्रॉफी, आई आपल्या पदराने पुसून अजूनपर्यंत शोकेसमध्ये का जपून ठेवते हे कळून चुकलंय… :) Thank You ग आई…. :)

- टिंग्याची आई 

No comments:

Post a Comment