Thursday, December 25, 2014

प्रोफेशनल...

ऑफिसमध्ये पोचल्यावर पोरींचं पहिलं काम म्हणजे वॉशरूम मध्ये जाऊन तयार होणे… असतेच गरज म्हणा… प्रवासाची दगदग एवढी असते… मग ती गाडीवर येण्याने असो किंवा गाडीत बसून… फ्रेश झाल्याशिवाय आम्हा पोरींना जमतच नाही… ;)
तर अशीच एका दिवशीची गोष्ट… 
नेहमीसारखी धावत धावत आजही ऑफिसला पोचले
आवरून घ्यावं थोडं म्हणून आधी वॉशरूम मध्ये शिरले
खूप काही नसलं तरी मलाही थोडासा मेकअप लागतो
मी आहेच माझ्या रुपाची राणी ;) पण आरशात एकदातरी मुखडा पहावा लागतो
 
साधीच आपली वेणी फणी रोजच्यासारखी करत होते
साज शृंगार करताना आवडीचं गाण गुणगुणत होते
आपल्याच नादात होते मी इतक्यात कुणाचीतरी चाहूल लागली
मुक्याने बरसणाऱ्या आसवांची तिच्या हुंद्क्याने मला वर्दी दिली
क्षणार्धात सगळच विसरले आता तिचीच काळजी वाटत होती
न जाणो कुठलं दुखं उराशी कवटाळून आज ती एकटीच रडत होती
 
आडोशाला तिचं रडणं चालू होतं जावं कि नको कळत न्हवतं
या प्रोफेशनल एटीकेटस मध्ये म्हणे सांत्वन करणं बसत न्हवतं
मग काहीबाही कारण काढून तिच्या बाजूला जाऊन आले
मला समोर पाहताच लपवले तिने रडून लालबुंद झालेले डोळे
टच्च भरलेल्या डोळ्यातले थेंब गालावरून ओघळत होते
मनात भरून आलेलं आभाळ तिच्याच ओंजळीत रिकामे होत होते
 
वाटलं
धावत जाऊन तिला कुशीत घ्यावं रडण्याचं तिच्या कारण विचारावं
भरून आलेलं तिचं आभाळ त्या टिशूऐवजी माझ्या पदरात बरसावं
ठाऊक न्हवतं माझं आपुलकीचं विचारणं तिला कितपत पटेल…?
हिला काय देणं घेणं कदाचित असंही काहीसं वाटेल
 
मन मानतच न्हवत बिलकुल मग बुद्धीला पटेल तेच केलं
एका टिपिकल प्रोफेशनल सारखं तिच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं
डेस्कला येउन बसले पण कामात लक्ष लागेना
तिचा तो रडवा चेहरा काहीकेल्या डोळ्यासमोरून जाईना
माझी मलाच कीव आली पुन्हा वॉशरूम कडे धावले
वाटू देत काहीही म्हणत तिचं सांत्वन करायला निघाले
 
ती बसली होती जिथे थेट तीच जागा गाठली
भिजलेले टिशू तिथेच सोडून ती आधीच होती निघाली
कळत न्हवत सावरली असेल कि अजूनही रडणं चालूच आहे?
कुणी बर केलं असेल सांत्वन कि तिने स्वतःच वादळ थांबवले आहे?
तशीच बाहेर पडले नजर तिलाच शोधू लागली
नसत्या प्रोफेशनल पणाची आज माझी मलाच लाज वाटली
खूप मोठ्ठ ओझं घेऊन मन उगाचच उदास झालं होतं
नक्की माझं चुकलं कि नाही…? याचाच हिशोब लावत होतं
 
डोक्यात विचार चालू होते इतक्यात तीच समोर दिसली
अगदी काहीच न घडल्यासारखी माझ्याकडे पाहून तोंडभर हसली
सुमार झालेले डोळे सोडले तर बाकी सगळ ठीक होतं
ती खूप रडलीये नुकतीच असं जरासुद्धा वाटत न्हवत

कदाचित
सगळं काही तात्पुरतं विसरून ती पुन्हा नॉर्मल झाली होती
तोच प्रोफेशनलपणाचा मुखवटा चढवून पुन्हा कामाला लागली होती
माझं मनही तिला हसताना पाहून जरा हलकं वाटू लागलं
आमच्यातला प्रत्येकजण एक "प्रोफेशनल" आहे हे पुन्हा नव्याने पटलं
अन एक नवा धडा शिकून आजचं पान दोघींनीही समाधानाने पलटलं… :)

- टिंग्याची आई

2 comments:

  1. पान पालटलं की सोडून दिलं ? असो …… ती हसली

    ReplyDelete
  2. पान सोडलं काय किंवा पालटलं काय… पुन्हा त्या पानावर परत जाणं अवघडच… नाही का? :)
    समाधान एवढंच कि ती हसली…. आणि मीही… :)

    ReplyDelete