Thursday, January 1, 2015

संदीप आणि सलिल….

संदीप खरे सारख्या मस्त कविता….
आपल्याला बाप जन्मात जमणार नाहीत….
आणि सलिल सारखी झकास गाणी….
आपल्याच्याने कधीच होणार नाहीत….
एक एक कविता…. एक एक ओळ….
मनाला नकळत स्पर्शून जाते….
हलकी फुलकी चाल सहज ओठांत बसते….

दमलेल्या बाबाची कहाणी ऐकून…. बाप-लेकीचे डोळे टच्च भरून येतात….
अन दूरदेशी गेला बाबा कवितेचे शब्द…. घरी एकट्या पिल्लूची सोबत करतात….
अग्गोबाई ढग्गोबाई च्या तालावर चिमुरडी फेर धरतात….
अन पप्पांचा घेऊन फोन बाप्पाला डायरेक्ट फोन लावतात….
एकटी एकटी घाबरलीस ना म्हणत…. पिल्लू आईला धीर देतं….
आई बाबा झोपा जरा गात…. तिच्याच कुशीत झोपी जातं….
साऱ्या विचारांनी आईला कसं गलबलायला होतं….
मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही म्हणताना प्रत्येक आईला भरून येतं….

स्वप्न परीचं वेड लागलेलं मन…. देवाकडे रोज एक अपघात मागतं….
माझ्याविना कसे सरतील दिस…. व्याकून होऊन तिला विचारतं….
स्टेशनवर "ती"ला सोडायला गेलेल्या त्याला कळते हे भलते अवघड असते….
अन ती गेल्यावर "नसतेस घरी तू जेव्हा"…. आमच्या एकटेपणाची सोबत करते….
सरीवर सर झेलत…. आयुष्याचे पावसाळे उन्हाळे आम्ही बिनधास्त झेलतो….
अन असाच कधीतरी आलेला ब्लँक कॉल…. चांगलाच जिव्हारी बसतो….
दिवस असेही येतात…. जेव्हा आम्ही कोणाचे नसतो….
पण एवढंच न म्हणून…. आम्ही खुशाल एकटेच जगतो….
दुःख येते…  दुःख येतेच आणि त्याचे हसतच स्वागत करतो….
हजार चिंता आहेत…. पण रूळ सोडून डब्बा सुटू दिलेला नाही….
प्रत्येकाची रात्र थोडी सांगते…. मित्रा आयुष्यावर बोलू काही….

कशा सुचतात ओळी…. अन कविता कशा बर सुचतात…?
बघता बघता नकळत…. आम्हाला आपलंस करून टाकतात ….

सुरुवात केलीये आम्हीसुद्धा…. आता कविता लिहायला….
एखादा काळजाला भिडलेला प्रसंग…. किंवा टिंग्याची एखादी गोष्ट सांगायला….
शब्दांच्या जादुई दुनियेत…. आत्ता कुठे शिकलोय रांगायला….
हि तर सुरुवात आहे…. अजून बराच पल्ला गाठायचा आहे….
रसिकांचं बोट धरून…. हा प्रवास पूर्ण करायचा आहे….

आभाळाला गवसणी नाही…. पण इवलीशी भरारी नक्की मारायची आहे….
एखादी काळजाला भिडणारी कविता…. मलाही लिहायची आहे….

-टिंग्याची आई

No comments:

Post a Comment