Saturday, April 4, 2015

लाडकं घर….

माझ्या एक ताई आहेत… त्यांचं नावही शिल्पा आहे…
त्यांचं नागपूरला एक छानसं घर होतं… शिल्पाचं लग्न झाल्यावर ती पुण्याला शिफ्ट झाली आणि आई बाबा नागपूरलाच…. काही वर्षांनी बाप्पाच्या आशीर्वादाने तिला दोन गोंडस जुळ्या मुली झाल्या… पोरींच्या पायाने सुख घरात धावू लागलं… पण दोघींना एकत्र सांभाळणं कठीण होऊ लागलं तेव्हा आई-बाबा दोघांनाही पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं आणि नागपूरच घर एकटं पडलं… १-२ वर्षांनी घर विकायचा अवघड निर्णय घेतला गेला… कठीण होतं पण शेवटी निर्णय घेतला आणि एका बिल्डरला जागा विकून टाकली…
अवघ्या काही महिन्यातच त्या घराच्या जागी एक टॉवर उभा राहिला… तेव्हा शिल्पाने त्याचा फोटो फेसबुकवर शेयर केला होता… आणि आता त्या ठिकाणी आपलं घर आणि त्यातल्या आठवणी नसल्याची खंत व्यक्त केली होती…
त्यावरूनच सुचलेलं हे काहीतरी… माझ्याच मनातले विचार… कोकणातलं घर imagine करून लिहिलंय…
 
इथे हो इथेच होतं माझं लाडकं घर
या टॉवर खाली आता नाहीसं झालंय माझं लाडकं घर

आम्हा भावंडांचा जन्म याच वास्तूत झाला होता
आमच्या प्रत्येक सुखानेही इथेच जन्म घेतला होता
भलं मोठ अंगण भोवतीचं ते काटेरी कुंपण
मधोमध उभं असायचं तुळशीचं छानसं वृंदावन
पकडापकडी, भातुकली कितीतरी खेळ इथे रंगायचे
जीवापाड प्रेम करणारे बहिण-भाऊ जीव तोडून एकमेकांशी भांडायचे
लाडक्या लेकीच्या लग्नाचा कळस याच अंगणात मांडला होता
मुलीची पाठवणी करताना इथेच बाबा ढसाढसा रडला होता

बैठकीची जागा म्हणजे आमच्या गप्पांचा अड्डा होता
सगळं टेन्शन विसरायला लावणारा भावनांचा कट्टा होता
स्वैपाक घर तरी जणू अन्नपूर्णेच मंदिरच दिसायचं
आईच्या हातचं मधुर जेवण देवीच्या प्रसादासारखंच लागायचं
कपाटातली सगळीच भांडी नेहमी लख्ख चकाकणारी
खास होती लिंपलेली चूल आणि तिच्यावरची भाकरी
परसदाराला सुगंधित करायचा सडा सुगंधी जाईचा
फक्त तिच्याच गजऱ्याने नटायचा अंबाडा माझ्या आईचा
गर्द सावली देणारं होतं भलं थोरलं पळसाच झाड
शेजारी अमृताच्या गोडीने भरलेल पाणी देणारा आड
तिथे जवळच होती माझी फेवरेट जागा बसायची
आज पूर्ण झालेली बरीच स्वप्न मी तिथेच बसून पहायची
 
आई-बाबांची नीटनेटकी तर आमची सदा विस्कटलेली खोली
पायाला अन मनालाही गारवा देणारी पायाखालची जमीन ओली
आम्ही घरच्यांनीच रंगवलेल्या मोठाल्या मातीच्या भिंती
त्यावर उठून  दिसायच्या आजीनं नुसत्या चुन्याने काढलेल्या कलाकृती
जुन्या आठवणींनी गच्च भरलेली माळ्यावरची अडगळ
घराला अन घरातल्या माणसांना सावली देणारं कौलारू छप्पर
अंधुकशा प्रकाशात आशेचा रोज नवा किरण दिसायचा
सुख असो वा दुःख इथे येणारा प्रत्येकजण तृप्त असायचा
छोटसच होतं पण आठवणींनी गच्च भरलेलं
नुसत्या दगड मातीने न्हवे तर हळव्या भावनांनी बांधलेलं
 
आयुष्यातले बरेच चढ-उतार या घराच्या साथीनेच पार पडले
अन अशाच एका क्षणी आम्ही पुढे निघून आलो अन घर मात्र मागे एकटे पडले
आलीच होती नड अशी म्हणून घराचा व्यवहार केला
काळजावर दगड ठेऊन लाडक्या घराला कायमचा निरोप दिला
 
माझं घर हरवलं आता तिथे मोठ्ठा टॉवर झालाय
डोळेभरून आठवणी आणि जीवाला बोचणी लावून गेलाय
निदान एकतरी आठवण सापडेल म्हणून सारा टॉवर हिंडून पाहिला
थकल्या मनाला सावली द्यायला तो पळस सुद्धा न्हवता राहिला… 
या घराने आमच्यासोबत सुख-दुःखाचे अनेक फेर धरले
आता फक्त त्याचे प्रतिबिंब पापण्यांमधल्या पाण्यावर उमटले
आलीच आठवण घराची तर आता आईच्या कुशीत डोकं ठेवते
अन तिच्या पदराच्या छायेत पुन्हा घराची ऊब गवसते
घराची एक एक आठवण माझी पावलोपावली सोबत करतेय
आता माझ्या पिल्लांच्या सोबतीने मी एका नव्या घराला आकार देतेय
:)
Miss you my dear ladak ghar... 

-टिंग्याची आई
Specially Dedicated to dear Shilpa Page and her Family... :)

1 comment:

  1. Comment By Shilpa Page: For whom I have written this poerm .. :)
    "
    Thanks Shilpa for making me remember my old memories...
    Very nice wirte up. :)
    "

    Thanks you so much Shilpa... for being an inspiration to this poem..
    ;)

    ReplyDelete