Sunday, August 23, 2015

काही गोष्टी बाप्पा न मागता देतो…. :)

 "सरू" या छोट्याशा कथेची नायिका…
तर हि गोष्ट आहे सरू आणि तिच्या लाडक्या बाप्पाची… सरुची बाप्पावर खूप श्रद्धा आहे… कोणतीही गोष्ट घडो मग ती आनंदाची असो वा दुःखाची, बाप्पाचा प्रसाद म्हणून ती समाधानाने स्वीकारते… कधी एकटीच बसून बप्पाशी गप्पा मारते तर कधी काही अगदीच असह्य झालं अन कोणाच्यातरी कुशीत शिरून मन मोकळं करावंसं वाटलं कि बाप्पाच्या समोर जाऊन बसते… हवे नको ते सगळे प्रश्न ती त्यालाच विचारते… उत्तरं लगेच मिळतातच असे नाही पण बाप्पा आपलं सगळ ऐकतो असं तिला वाटत… आणि तीच सरुची मन मोकळं करायची हक्काची जागा… :)बाप्पाशी बोललं कि तिला खूप हलक वाटत आणि प्रत्येक संकटाशी  झुंजायचं बळ मिळतं… तर अशी आहे आपली सरू… :)


सरुचं कुटुंब तसं छोटंच… जीवाला जीव देणारा नवरा… आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवणारे सासू-सासरे आणि घरात सुखाच्या पावलांनी दुडूदुडू धावणारं तिचं छोट पिल्लू… सगळे आनंदाने नांदतात आपल्या छोट्याशा घरकुलात…  

गेल्या श्रावण महिन्यातली गोष्ट… रोज ऑफिसमुळे बाप्पाच्या मंदिरात जायला मिळत न्हवत म्हणून सरुने शनिवारी सुट्टीच्या दिवशी देवळात जायचं ठरवलं… सगळी काम आटोपून दोघीजणी सासू-सुना आपल्या छकुल्याला घेऊन निघाल्या देव दर्शनाला… वाटेत लागेल त्या सगळ्याच देवळात दर्शन घेतलं त्यांनी… श्रावण मासातलं एक वेगळंच चैतन्य सार्या वातावरणात पसरलं होतं… मन प्रसन्न वाटत होत… सरते शेवटी आपल्या लाडक्या मोरया गणेशाचं दर्शन घेऊन मग दोघींनी घराची वाट धरली… 

सरू आणि तिचं नटखट पिल्लू पुढे चालले होते… आजीला भरभर चालता येत नाही ना म्हणून ती चार पावलं मागेच राहायची… सरू मात्र दर थोड्या वेळाने मागे वळून पाहत असे… पिल्लुसोबत मजा करत पुढे चालत असताना एका कोपऱ्यावर सरूला दोन अनोळखी व्यक्ती गाडीवर थांबलेल्या दिसल्या… काही न बोलता ती शांतपणे त्यांच्या शेजारून पुढे निघून आली… सासूबाई अजून चार पावलं मागेच होत्या… सरूला काहीतरी विचित्र जाणवलं कारण ती दोन माणसं लगेचंच गाडी चालू करून तिथून निघाली… आणि इतक्यात सरूच्या सासूबाई ओरडल्या….
"अग………. त्याने माझं डोरलं वडून नेलं…."
काय करावं क्षणभर सरूला काहीच सुचेना… आरडाओरडा करावा तर ते लोक कधीच फरार झाले होते… काय सांगावं अन कुणाला सांगावं… तिने साधा त्या गाडीचा नंबर किंवा त्या दोघांचे चेहरेही धड पाहिले न्हव्ते… अशा अचानक हल्ल्याने सासूबाई पण घाबरल्या होत्या… कसाबसा त्यांनी मंगळसूत्राचा एक पदर दाबून धरला होता तेवढाच काय तो वाचला… नाही म्हटलं तरी १ तोळ्याचा ऐवज गेला…. :( सरुने फार प्रेमाने घडवून आणलं होतं ते तिच्या आईसाठी…. पण आता कोणीच काही करू शकत न्हवत… 


सरुने स्वतःला सावरलं आणि आईचंही सांत्वन केल आणि सगळे घरी आले… आज सरुचे अहो पण काही बोलले नाहीत… गेलं तर जाऊ देत म्हणून त्यांनी हि गोष्ट सोडून दिली…. आईंनी मात्र भलतंच टेन्शन घेतलं होत… आणि सरूच्या डोक्यातूनही हि गोष्ट काही केल्या जात न्हवती… दोघीनाही रात्रभर शो लागली नाही… डोळे बंद करताच ते दोन अस्पष्ट चेहरे समोर धिंगाणा घालत होते… "मी का बर आईंकडे लक्ष दिलं नाही…??" "मी का बर त्या दोघांचे चेहरे आणि गाडीचा नंबर पहिला नाही…???" असे अनेक प्रश्न सारूच्या डोक्यात भुणभुण करत होते… आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत असं तिला वाटू लागलं… एकदम हेल्पलेस… काहीच करू शकत न्हवती ती…

तिने बाप्पासमोर बसून त्यालाच प्रश्न केला… माझ्या कष्टाचं होत ना ते मग तू का बर हिरावून घेतलंस…? काय चुकलं माझं म्हणून हि शिक्षा? तुझंच दर्शन द्यायला आलो होतो… त्याचाच का हा प्रसाद…??? एक ना दोन असे कित्येक प्रश्न तिने रागाच्या भरात बाप्पाला विचारले… परत येणार नाही तुझ्या मंदिरात असंही म्हणून टाकलं…. भांड भांड भांडली आणि रड रड रडली देखील… गेलेलं परत मिळणार नाही माहित होत पण बप्पाशी भांडून तीच तिलाच थोड हलक वाटलं… आणि हो शांत झाल्यावर तिने बाप्पाची माफी मागितली…

 दिवस सरत गेले तसे सगळेच हि गोष्ट हळू हळू विसरत होते… मग प्दुहे खोट्या मंगळसूत्राची खरेदी झाली… सोन्याचं काही घालायची जणू भीतीच वाटू लागली… श्रावण सरला आणि भाद्रपाद्ची सुरुवात गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल घेऊन आली…. सारूच्या घरीही गणपती बसतात…. खूप मन लावून आरास करते ती बाप्पाची… यावेळी तर तिने वेगळाच घाट मांडला होता… जुन्या वर्तमानपत्राचा वापर करून आरास करायची… त्यासाठी ती १०-१२ दिवस आधीपासूनच तयारी करत होती… संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर स्वैपाक-जेवण-भांडी आवरून रात्री १०-१०.३० वाजता ती डेकोरेशनच साहित्य बनवत असे ते रात्री १२-१२.३० पर्यंत… यावेळी ती एकटीच सगळ करत होती… घरच्यांना मदत करणं फारसं जमलं न्हवतं यंदा… मदतीला एक मोठ्ठ माणूस म्हणजे तिचं लाडकं पिल्लू… तो तिला पेपर फाडायला मदत करत असे… रोजची हि थोडी थोडी मेहनत घेऊन सरुने बाप्पाची आरास खूपच छान केली अगदी दृष्ट लागावी अशी…. बाप्पा यावेळी तिने बनवलेल्या मोरावर बसून मयुरेश्वर झाला होता… सर्वांना खूपच आवडलं होत डेकोरेशन… एक नवीन, वेगळी आणि इको फ्रेंडली कल्पना म्हणून सगळ्यांनीच कौतुक केलं… बाप्पाला बघून सरुलाही खूप समाधान वाटलं… बाप्पा घरी आले कि तिला जणू जगाचा विसरच पडतो….

 असंच एके दिवशी दुपारच्या वेळी पिल्लूचा मामा फेसबुकवर टाईमपास करत असताना त्याला गणपती डेकोरेशन स्पर्धेची पोस्ट दिसली। सरूच्या सोसायटी वाल्या बिल्डरची होती ती… मामाने सरूला आग्रह केला भाग घेण्यासाठी पण तिचं मन तयार होत न्हवत… कारण तिने कोणतीही अपेक्षा न ठेवता हि सगळी आरास केली होती…. पण मामाच्या हट्टापुढे हतबल होऊन तिने शेवटी पार्टीसीपेट केलच… :) आणि मग विसरूनही गेली…
बाप्पासोबत घरी येणाऱ्या  गौराईचंही तिने आनंदाने स्वागत केलं, छान सजावट केली… त्यांना खाऊ पिऊ घातलं, नटवल सजवलं, अगदी सगळ सगळ केलं…. या दरम्यान ती त्या गेलेल्या मंगळसूत्राची बाबही पूर्णपणे विसरून गेली होती…. :)

गौरी विसर्जन झाल्यावर एक दिवस सहजच सरू निवांतपणे मेल चेक करत बसली होती…. आणि तिला बाप्पाने एक मोठ्ठ सरप्राईज दिलं…. :)
तिने भाग घेतलेल्या स्पर्धेत तिला पहिलं बक्षीस मिळालं होतं…. तिचा आनंद गगनात मावेना… बाप्पाला खरंच तिने केलेली आरास आवडली होती याचीच ती पावती होती…. बक्षिसाची रक्कम ऐकून खर तर तिचा विश्वासच बसत न्हवता… अवघं तीनशे रुपयांचं सामान वापरून केलेल्या सजावटीला चक्क ३०००० रुपयांचं बक्षीस मिळालं होतं…. :) :)
सगळ्यांनी सरूच खूप कौतुक केलं… तिच्या आई पण खूप खुश झाल्या… घरचे सगळेच खुश होते…
सरू मात्र इतकंच म्हणाली…. "बाप्पाने नेलं होतं आणि बाप्पानेच पुन्हा ओंजळीत दान म्हणून परत दिलं…."
इतरांना याचा अर्थ कळला नाही पण सरूला आणि तिच्या बाप्पालाच समजला….

चोरीला गेलेल्या अर्ध्या मंगळसुत्रासाठी ती तिच्या बाप्पाशी भांडली होती… खूप रडली होती…. कदाचित म्हणूनच बाप्पाने तिला तिच्या कष्टाचं फळ परत दिलं होतं…. या ना त्या रूपाने गेलेलं धन बाप्पाने पुन्हा सरूच्या पदरात घातलं…. काही गोष्टी बाप्पा न मागता देतो हे पुन्हा एकदा सरूला पटलंय… :)
त्या दिवसापासून बाप्पावरची तिची श्रद्धा आणखीनच दृढ झाली आहे…. पुढच्या वर्षी काय आरास करायची याचे विचार आत्तापासूनच तिच्या डोक्यात घोळत आहेत… :) 
बक्षिसाच्या मिळालेल्या पैशातून सरुने बाप्पासाठी छानसा श्रीमंत हार घडवून घेतलाय… पुढच्या वर्षी आरास कशी का असेना पण हा हार घालून सरूचा लाडका बाप्पा गोड दिसेल एवढं नक्की….
Thank you so much Bappa... :)


- टिंग्याची आई
बोला गणपती बाप्पा…. मोरया…!!!

No comments:

Post a Comment