Wednesday, February 10, 2016

"दुःख…"

दुःख… दोन अक्षरी शब्द तरीही खूप अर्थ सामावून घेणारा….
अन कधी कधी अगदीच निरर्थक वाटणारा… 
मोठं असो वा छोटं… दुःख म्हणजे दुःख असतं… 
इतरांपेक्षा नेहमी आपल्याला आपलंच दुःख मोठं असतं… 
आपलं दुःखं नेहमीच आपल्याला डोंगराएवढं वाटत राहतं…. 
पुढ्यात सुख असलं तरी आपल्या डोळ्यांत दाटत राहतं…. 

दुसऱ्याचं दुःख कितीही मोठं असो… आपल्यासाठी लहानच असतं…  
मी कसं सावरलंय अन किती सहन केलंय हेच आपल्याला दाखवायचं असतं… 
दुसऱ्यांना हजार वेळा सांगत… म्हणे आपण त्यातून मोकळं व्हायचा प्रयत्न करतो… 
अन दरवेळी सांगताना नकळत एक नवीन किस्सा रंगवून रिकामे होतो… 

पण खरं सांगू… 
असं एखादं जीवघेणं दुःख आलंच वाट्याला… तर दुसऱ्याचं दुःख ऐकावं… 
म्हणे दुसऱ्याचं दुःख ऐकलं कि आपण आपलं दुःख विसरतो 
पाझरणाऱ्या डोळ्यांना मग आपणच पुन्हा हसायला शिकवतो… 

दुसऱ्याचं खरंच डोंगराएवढं दुःख पाहिलं कि आपलं आपसूकच कणाएवढं वाटेल…
मनावर दाटलेलं मळभ हळू हळू का होईना पण नक्की सुटेल 
कितीही मोठं असलं तरी "दुःख" या शब्दाएवढंच त्याला छोटं समजायचं… 
सूर्याकडून एखादा किरण उधार घेत रोजच नव्याने उमलायचं… 

करावं सहन जमेल तितकं… त्यावरूनच मनाच्या जमिनीचा कस कळतो…
दुःखाचा कडू घोट पचावल्याशिवाय सुखाचा मधुर कण तरी कुठे मिळतो… 
तूच दिलंस दुःख, सहन करायची ताकदही दे… एवढंच त्याला हात जोडून सांगायचं… 
काळजातली कळ कंठात जिरवायचं सामर्थ्यही त्याच्याकडेच मागायचं… 
दुःख भरल्या ओंजळीत सुखाचं दानही तो स्वतःच घालेल … 
अन डोंगराएवढं दुःख इवल्याशा सुखाच्या छायेत समाधानाने विसावेल… :)

- टिंग्याची आई 

1 comment:

  1. As you know God always give the toughest role to his best performer.....So Move onn.......Life is waiting for you....

    ReplyDelete