Thursday, February 18, 2016

सोबत…

माळरानावर एक छानशी होती झोपडी आणि होतं एक झाड तिची अखंड सोबत करणारं… 
खूप वर्षापासून पाहत होतो आम्ही ती झोपडी अन झाडाची सोबत…. 
कुणीच न्हवत राहत तिथे म्हणून सगळे तिला म्हातारीचं घर म्हणत… 
राहायचं म्हणे कुणीतरी फार पूर्वी त्या एवढ्याशा झोपडीत
विसावायचं सुख कधी काळी त्या झाडाच्या सावलीत… 
खूप जूनं होतं झाड अन झोपडीही तितकीच वृद्ध वाटायची 
कधीही पाहिलं तरी ती दोघं एकमेकांच्या सोबत उभी दिसायची 
बघताना वाटायचं कित्ती कित्ती प्रेम दडलंय बर या दोघांत 
आयुष्यभर सोबत राहायचं जणू वचन दिलंय त्यांनी गेल्या जन्मात

कुणी सावलीत बांधली होती झोपडी
कि झोपडीला सावली मिळावी म्हणून कुणी रुजवला होता अंकुर देव जाणे… 
चार तपं लोटली तेव्हापासून ते असेच सोबत आहेत म्हणे 
दिली होती सावली एकेकाळी त्या झाडाने झोपडीत नांदणाऱ्या इवल्या सुखांना 
आजही झोपडी बिलगली आहे त्याच्या खोलवर गेलेल्या मुळांना 
थाटला असेलच कि संसार कुणीतरी त्या मुळांचा आधार घेऊन 
फुलली असतील कितीतरी सुखं त्या झोपडीच्या कुशीत राहून 
याच अंगणात खेळली असतील अन याच सावलीत वाढली असतील 
आणि याच फांद्यांचा आधार घेऊन पाखरं भूर उडाली असतील 
उंची वाढलेल्या स्वप्नांना कदाचित झोपडी ठेंगणी वाटली असेल 
अन अशाच एखाद्या वळणावर तिच्या लेकरांची साथ सुटली असेल 

असं काही सोडून दिलं कुणी परत फिरून सुद्धा पाहिलं नाही 
माळावरच्या त्या झोपडीला झाडाशिवाय आपलं असं कुणीच राहिलं नाही 
त्या दिवसापासून दोघंही एकमेकांची अखंड सोबत करत आहेत 
प्रेमाच्या अतूट नात्याची मंजुळ गाणी गात आहेत 

बराच काळ लोटला झोपडी आता बरीच थकली होती 
जळमटलेल्या भिंतींचा आधार घेत कशी बशी उभी होती 
झोपडीचं हे असलं दुखणं झाडाच्याने बघवत न्हवतं 
गळणाऱ्या पानांसोबत जणू ते तिच्यासाठी अश्रू ढाळत होतं 
बघता बघता झाडाने बहरायचंच सोडून दिलं 
लाडक्या झोपडी सारखं तेही पूर्णपणे सुकून गेलं 

हल्ली दोघेही जरा जास्तच वठ्ल्यासारखे दिसत होते 
पण आजही एकमेकांच्या हातात हात गुंफून उभे होते
वठलेल्या त्या झाडाच्या फांदीवर कुणी पाखरू येत न्हवतं 
आणि पडक्या झोपडीच्या कुशीत दुःख सुद्धा विसावत न्हवतं
तसा काहीच उपयोग न्हवता आता त्यांना जगाचा ना जगाला त्यांचा 
जगत होते फक्त एकमेकांसाठी त्यांना कधीच विसर पडला होता जगाचा 

पण… बघवलं नाहीच कुणालातरी…. 
मावळतीच्या सुर्यासोबत कुणीतरी एक ठिणगी झाडावर टाकली 
अन बघता बघता सबंध झाडाला ती भुकेली आग लपेटली 
उभ्याने पेटलेल्या आपल्या झाडाकडे झोपडी असहायपणे बघत होती 
आगीच्या द्वारातून गूढ काळोखाकडे घाला होता तिचा लाडका सोबती 
धडधडत होती आग ऊरी झाड नुसतंच अश्रू ढाळत होतं 
आयुष्यभर साथ देणाऱ्या झोपडीला शेवटचं डोळ्यात साठवत होतं 

आख्खी रात्र पेटत राहिलं पण कुणी साधं विझवायलाही आलं नसावं 
त्यांच्या नात्याचं हे मरण आकाशातल्या चंद्रालाही सहन झालं नसावं 
फांदी-खोडासकट सगळ्याची आता राख राख झाली होती 
उरल्या सुरल्या मुळांना छातीशी कवटाळून झोपडी आक्रोश करत होती 
हरवलं होतं तिचं झाड बिचारं आता नुसतीच राख धुमसत होती 
मागे एकटी पडलेली झोपडी विरह यातनेत मुसमुसुत होती 
इतक्यात वाऱ्यासोबत कुठूनशी एक जळती ठिणगी धावत आली
अन लागलेल्या आगीने जणू झोपडीची अंतिम इच्छा पूर्ण केली 
एकच ठिणगी पुरेशी होती… झोपडीने क्षणार्धात पेट घेतला 
आपल्या साथीदाराच्या ओढीने तिनेही अखेरचा श्वास घेतला 
समाधानाने जळत होती आता तिला कशाचाच मोह उरला न्हवता 
आता फक्त तिला तिच्या प्रिय झाडाचा ध्यास लागला होता 
माळावरचे ते दोन राखेचे ढीग आजही त्यांची आठवण करून देत आहेत 
असे हे जीवाभावाचे सोबती अस्तित्वापलीकडेही एकमेकांची अखंड सोबत करत आहेत :)

- टिंग्याची आई 
ज्यावरून हे सर्व सुचलं तो प्रत्यक्ष फोटो… 

1 comment: