Monday, February 18, 2019

नैवेद्य...

पहाटे ५ ची वेळ असेल.. स्वैपाक घरात काहीतरी पडलं आणि त्या आवाजाने जाग आली मला... आज सुट्टीचा दिवस म्हणून मुद्दाम जास्त वेळ झोपायचं ठरवलं होतं.. पण नेहमीसारखी जाग आलीच... आणि कारण मात्र त्या पडलेल्या भांड्याचं... :)
मला वाटलं हीच असेल म्हणून शेजारी पाहिलं तर हिची पण झोपमोड झालेली दिसली... मग मीच तिला उठू दिलं नाही, स्वतःच गेलो काय आहे बघायला... कोणाच्याही रूम मधून काहीच हालचाल न्हवती... सगळेच निवांत झोपले होते... नाहीतर रोज यावेळी घरात प्रचंड धावपळ सुरु असते... मुलांच्या शाळा.. त्यांचे आणि आमचे डब्बे.. अंघोळा आवरणे सगळंच तालासुरात सुरु असतं... 
पण आज तर सुट्टीचा दिवस होता... कुणी इतक्या लवकर स्वैपाक घरात लुडबुड करायचं मुळे कारणंच न्हवतं... 
मांजर असेल असं वाटलं पण थोडी आणखी हालचाल जाणवली.. कसली तरी तयारी चालू आहे असं वाटलं... कुतूहल वाढलं आणि म्हटलं बघू तरी कोण आहे.... 

हळूच गेलो... चूल पेटलेली दिसली.. काहीतरी शिजत घातलं होतं... वाईलावर मस्त चहा उकळत होता... बाजूचा गॅस मात्र आज आराम करत होता... मी जरा चमकलोच... कारण हा स्वैपाक रांधणार माणूस दुसरं तिसरं कुणी नसून आमची म्हातारी आई होती... इतर वेळी स्वैपाक घरात फक्त जिचा धाक असायचा तिथं आज ती स्वतः पहाटे उठून स्वैपाक करत होती... हे जरा नवलच होतं... :)

आमचं घर तसं छोट्या शहरात पण बऱ्यापैकी मोठं... आम्ही दोघे भाऊ आणि आमची बायका पोरं... आणि महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे हि म्हातारी आई... सगळेच तिला अशी हाक मारायचो... आमच्या लहानपणी कधीतरी ती आमच्या कुटुंबात सामील झाली होती... वय वर्ष आत्ता म्हणाल तर ९० च्या वरच... तरीही खमकी... आजही १० माणसाचा स्वैपाक एकटी रांधलं अशी... तिला तिची पोरंबाळं न्हवती... आम्हीच तिची मुलं आणि आमची पोरं हीच तिची नातवंडं... आई बाबा गेल्यापासून तीच या घराला आशीर्वादाची सावली देत आहे... आमच्या सौ ना हि तिने सासूचा धाक आणि आईची माया लावली आहे... धाक जरा जास्तच आहे म्हणा.. :)

आत्ता या क्षणी आमच्या हिला जर कळलं कि आई स्वैपाक करतेय तर खाडकन जागी होऊन धावतच आली असती... पण आज म्हाताऱ्या आईलाच सुनांना उठू द्यायचं न्हवत... तिचं आपलं सावकाश सांभाळून चालू होत सगळं काम... पण नेमका डब्यातला गूळ काढताना झाकण धडपडलं होतं... :) मी आत आलेलं एव्हाना तिच्या लक्षात आलं होत... तिने फक्त माझ्याकडे बघितलं आणि पुन्हा कामाला लागली... मग मीच म्हणालो... "काय म्हातारी आई... आज सकाळच्या पारी स्वैपाक घरात कशी तू..??"
ती नुसतीच हसली... तशी उत्तराची अपेक्षा मलाही न्हवती... मी बसलो तिथंच मांडी घालून... कदाचित वाईलावर उकळणारा थोडा चहा आपल्याला मिळेल या आशेने.. :) अहो खरंच म्हाताऱ्या आईच्या हातचा चहा मिळायला भाग्य लागतं... चहाकडे बघतच मी उठल्यासारखं केलं आणि हीला बोलवून आणतो म्हटलं... माझ्याकडे न बघताच तिने नको राहू दे म्हणून इशारा केला... 
"चला... मी सुटलो.." म्हणून परत तिथेच बसलो... खरंतर रात्री झोपतानाच मला हिने समज कम दम भरला होता.. सकाळी लवकर उठलात तर..... बाकी पुढचं समजण्याइतपत समजूतदार नवरा मी नक्कीच आहे... :)

डब्यातली शोधाशोध संपल्यावर आई पुन्हा चुलीजवळ येऊन बसली... तिचं फार येणंजाणं नसलं स्वैपाकघरात तरी कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला पक्कं माहिती होत... अगदी क्वचित लागणारी वस्तू सुद्धा नेमक्या कोणत्या डब्यात ठेवलीये हे तिच्याइतकं कुणालाच माहिती नसायचं.. मघाशी म्हटलं तसं ती नसली तरी तिचा धाक कायम असायचा स्वैपाक घरात... 

चुलीवरची भांडी उतरत ठेवत, कणिक मळत तीच काहीतरी सुरु होत.. त्यातच मला चहा द्यायला ती विसरली नाही... अहाहा... अमृत पिल्याचा आनंद... :) सहज तिला इचारलं.. "कसला ग बेत आहे आज...?" तर म्हणाली.. "पुरणपोळी.." मी बुचकळ्यात पडलो... ना कुठला सण ना वार मग  आज का अचानक पुरणपोळी..? कशासाठी? माझे प्रश्न आणि तिचा मात्र "आता गप्प बसतोस का जरा.." या अर्थाने माझ्याकडे टाकलेला कटाक्ष... मी समजलो काय समजायचं ते आणि गप्प बसलो.. अशी नजरेतली उत्तरं किंवा प्रश्न ओळखायची सवय झालीये आता मला.. ;) 
म्हातारी आईचा स्वैपाक पुढे चालू होता.. वाईला वर भट चढवला होता.. तो थोडं थोडं पाणी घालत ती हळुवार शिजवत होती.. कालच निवडलेली मेथीची भाजी लसूण आणि मिरचीच्या फोडणी सोबत कढईत जाऊन बसली होती... वाटीभर डाळ शिजून मस्त येळोनि काढून झाली... चांगला वाटी दीड वाटी गूळ घालून पुरण सांधून घेतलं... डाळीचं वरण पण झालं... दोन बटाट्याची पिवळी धमक भाजी झाली... दोन कुरवड्या दोन पापड टाळून घेतलं.. जेमतेम आठ दहा भजी टाळून झाल्या... नाही म्हटलं तर माझ्या वाट्याला के काम आलं.. पुरण वाटून द्यायचं... आता तिच्या हातात ताकद राहिली न्हवती नाहीतर पाट्यावर पूरन वाटल्याशिवाय राहिली नसती म्हातारी... मी आपलं दिलं जमेल तसं वाटून... ती पण खुश आणि मी पण... फक्त बायकोने पाहिलं नाही याचंच वाईट वाटलं.. तिलाही कळलं असत ना आपला नवरा किती कामाचा (??) आहे ते... 
कढीपत्त्याची मस्त फोडणी देऊन आता आमटी वाईला वर चढली आणि बिडाचा मोठाला तवा उपडी घातला तिनं पोळ्यांसाठी... मऊसूत कणकीचा गोळा घेऊन चांगलं मूठभर पुरण तीन त्यात जिरवलं... आणि तेलाची धार सोडून पोळपाट ओलाचिंब केला... लाटण्यालाही जवळ जवळ तेलात बुडवून तिनं पोळ्या लाटायला सुरुवात केली... इतर वेळी माझ्या बायकोनं जर एवढं तेल वापरलं असतं तर तिला म्हातारीने तेलाच्या किटलीत बुडवून मारलं असतं... पण आज नाही... ती प्रेमाने करत होती सगळं अगदी मन मोकळं.. कुणा आपल्या माणसासाठी... 
सरसर लाटणं फिरवत तर कधी पोळपाट फिरवत तिची पोळी पूर्ण झाली... कुठेही गालबोट नाही... जरा पुरण बाहेर नाही की कणिक जास्त नाही... त्या पोळीकडे कौतुकाने बघणाऱ्या माझ्याकडे तिने एक नजर टाकली... "बघ कशी झाली...!! जमल का तुझ्या बायकोला...!!" आणखी एक डोळ्यातला सवाल मला समजला... मी आपलं तिला हात जोडून नमस्कार केला... आणि उत्तर हेच. "नाही ग बाई.. निदान या जन्मात तरी नाही जमणार..." 
तवा तापला... म्हातारीनं हळूच ती पोळी अलगद लाटण्यावर घेतली आणि आधीच तेल टाकलेल्या तव्यावर पसरली... आज तवाही खुशीत होता... मस्त शेकू दिली त्यानं पोळीला... अजून एक तेलाची धार टाकली वरुन तीन... दोन्ही बाजूनी भाजल्यावर घडी करून हळूच पोळी शेजारच्या टोपल्यात जाऊन विसावली... तोवर दुसरी लाटून तयार... सरसर चार पाच पोळ्या झाल्या आणि म्हातारीने हात धुवून घेतला.. स्वैपाक झाला... 

घाईघाईनं जाग्या झालेल्या दोघी सुना कशीबशी अंघोळ आटोपून धावतच आल्या... जाम घाबरल्या होत्या.. मी म्हटलं चला आता मज्जा येणार... पण  म्हातारीचा मूडच निराळा होता आज... तिने दोघीनाही बसायला सांगितलं आणि चहा दिला... काहीच अंदाज येईना... हळूहळू डोळे चोळत चिल्ली पिल्ली पण अली होती एव्हाना... 

म्हातारी आई ने स्वच्छ घासून ठेवलेली पितळी घेतली आणि नैवेद्य भरायला सुरु केला... दोन लुसलुशीत पोळ्या घडी करून तीन ताटात ठेवल्या.. मेथी अन बटाट्याची भाजी वाढली... भजी पापड कुरवड्या घातल्या... मोठाल्या पण नाजुकशा भाताच्या दोन मुद्या पाडल्या त्यावर घट्ट डाळ तुपाची धार आणि गुळाचा खडा ठेवला... लोणच्याची फोड घातली... वाटीभर येलोणीची आमटी ठेवली आणि तांब्याभर पाणी.. झाला नैवेद्य तयार... 
आता हि देव्हाऱ्याकडे जाणार म्हणून सगळेच उठलो... तिला घेऊन निघालो बघू म्हटलं आज कुठल्या देवाला निवद दाखवते... 
ते नैवेद्याचं ताट घेऊन आज ती देवघराकडे वळलीच नाही... ती सरळ आज तिच्या खोलीत गेली... ताट न तांब्या ठेवला.. कालचा तिने गुंफलेला मोगऱ्याचा हार काढला आणि पुढे तिने जे काही केल ते खरंच नवल होत... डोळेभरून आम्ही सगळे तो सोहळा पाहत होतो... हो सोहळाच... 

तिच्या खोलीत खूप वर्षांपासून एक छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्लॅक न व्हाईट फोटो होता.. तो नेहमीच तिच्या भिंतीवर असायचा... रोज एकतरी फुल नक्की वाहायची ती... आज तिने पदरानं फोटो पुसला... शुभ्र हार घातला... आणि डोकं टेकून तिने नमस्कार केला... तो फोटोही आज निराळाच दिसत होता... जणू तिची मानवंदना महाराज प्रेमानं स्वीकारत होते... टेबलावरच ताट हातात घेऊन म्हातारीनं एक घास मोडला... सगळं त्या घासत घेतलं आणि तीनदा पाणी ओवाळून तिने चक्क महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला... क्षणभर डबडबलेले डोळे पदरानं पुसत ती मला म्हणाली.... 
"आज माझ्या राजांची जयंती हाय र....."

नकळत माझ्याही डोळ्यात पाणी आलं... काळजात चर्रर्र झालं... पुढे काहीही विचारावंस नाही वाटलं... तिच्या तोंडावरच समाधान पाहूनच बर वाटलं... काही न बोलता बरंच काही बोलून गेली ती आज... त्या फोटो समोर आमच्यातला प्रत्येक जण न सांगता डोकं टेकून आला अगदी माझी ३ वर्षाची लेक सुद्धा... किती गाढ आणि अपार श्रद्धा होती आईच्या त्या स्वैपाक रांधण्यामागे आणि या चिमुकलीने केलेल्या नमस्कारामध्ये... दरवर्षी शिवजयंती ला ताटात पोळीचा एक एक घास असायचा याचा उलगडा आज झाला... 

आम्ही तर सुट्टी कशाची आहे हे सुद्धा विसरलोच होतो... निवांत उठायचं काम निवांत करायची सुट्टी एन्जॉय करायची वगैरे प्लॅन केले होते... पण आजच्या दिवसाचं महत्व म्हातारी आईमुळे पुन्हा एकदा उमगलं... 
ज्या महाराजांनी स्वराज्य घडवलं... मराठी माणसाला ताठ मानेनं जगायला शिकवलं. माझा महाराष्ट्र रचला... त्यांच्या जयंतीला मी काय करतोय..!! जरा लाजच वाटली स्वतःची... पण म्हटलं नाही... आज असे होणे नाही... बायका पोरांना लगेच तयार व्हायला सांगितलं म्हटलं आज महाराजांचं दर्शन घेऊ... छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी... 
छान नटून थटून सगळे शिवाजी पुतळ्याला जाऊन धडकलो... तिथे होते बरेच कार्यकर्ते... पांढरे शर्ट भगवे फेटे 
भगवे झेंडे घेऊन गाड्यांचे सायलेन्सर काढून रॅली सुरु होती... पण आमचं फारसं लक्षच न्हवत आज... भारावलो होतो आज आम्ही... थेट पुतळ्यासमोर गेलो आणि वाकून त्रिवार मुजरा केला... क्षणभर सगळेच आमच्याकडे नुसते बघत राहिले पण तो क्षणच भारावलेला होता... आम्हाला कुणाची परवा न्हवती... वर नजर गेली तर महाराजांचा तो पुतळा जिवंत होऊन आमचा मुजरा स्वीकारत असल्याचा भास झाला... समाधानाने आम्ही सगळे मागे फिरलो... 
घरी येताना चांगला २x२ फूट मोठा फोटो घेतला शिवाजी महाराजांचा आणि घरातल्या मेन भिंतीवर लावलाय... आता रोजच मुजरा ठरलेला आहे.. त्या एका दिवसात म्हातारी आईने लयी मोठी शिकवण दिली... आयुष्यभर जपण्याजोगी... 
खरंच काय हरकत आहे ना आपल्या राजांच्या जयंतीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायला... :)

- टिंग्याची आई 
छत्रपती शिवाजी महाराज कि जय....!!!!!! 

2 comments:

  1. Words!!!!

    अक्षरशः डोळ्यासमोर घडतंय अस वाटलं. Excellent 👌

    ReplyDelete