Saturday, November 25, 2017

गाडी गियर कि ऑटो...

सकाळी एका मैत्रिणीने एक छान लेख पाठवला आपल्या आयुष्यातल्या टप्प्यांची आणि गाडी-गियर  ची छान सांगड घालणारा लेख.... छान होता... आयुष्य जसं जसं पुढं जातं तसं आपण पहिला गियर म्हणजे आई -बाबा, कुटुंब यांचा आधार घेत संथ गतीने पुढे चालत राहतो...  मग दुसरा गियर शिक्षण, तिसरा नोकरी-घरदार, चौथा पैसाअडका, ऐश्वर्य.. पाचवा धुंदी बेफाम स्पीड... असे वेगवेगळे गियर टाकतो अन अचानक आलेल्या नियती नावाच्या स्पीड ब्रेकर समोर खाडकन पहिल्या गियरवर येतो... तर या आयुष्याच्या स्पीड चा अनुभव घेत असताना पहिला गियर विसरू नका अशा आशयाचा हा छानसा लेख... 
क्षणभर विचार करून सोडून द्यावं म्हटलं पण जमलं नाही... आणि डोक्यातली चक्र पाचव्या गियर मध्ये धावू लागली.... :)

जग बदललंय... म्हणजेच आपणही बदललोय... आपल्याला सगळं काही ऑटोमॅटिक लागतं.... अगदी गाड्याही... म्हणजे ते पहिला, दुसरा, तिसरा गियर कसलंच झंजट नाही... फक्त अक्सिलेटर दाबत राहायचं... गाडी पळते कि मग सुसाट हवी तशी... कुठल्या गियरवर आहोत आणि आता कुठला टाकायचा काही लक्षात ठेवायला नको... संयमाचा क्लच तर नसतोच मुळी आमच्याकडे... फक्त धावत राहायचं... 
लहानपणापासूनच आपण आपल्या पोरांना ह्या सवयी लावून देतोय... आयुष्याच्या कॉम्पेटिशन मध्ये सतत पुढे राहण्यासाठी आपणच त्यांना असली ऑटो कार चालवायची सवय लावतोय... 

आपली माणसं, नाती, कुटुंब हा पहिला गियरच मुळी पोरांच्या लक्षात येत नाही.. मग बाकी तर दूरच... आपल्याला फक्त अनुभवायचं असतं भन्नाट स्पीड मग त्यासाठी किती गियर्स आणि कधी, कसे टाकावे लागतात याच्याशी आपल्याला काहीच देणंघेणं नसतं.. 

मग अशी ऑटो कार चालवताना आपण चक्क एका पायाचा वापरच बंद करून टाकतो... आणि तोच पाय सीटवर मांडी घालून बसतो... आणि स्वीकारतो त्या एका पायासोबत मेंदूला आलेलं अधूपण... :(

तरी नशीब... अजून ब्रेक हा स्वतःच मारावा लागतो... गाडी कसलीही असो पण नियती नावाचा एक स्पीडब्रेकर असतोच... जो नेमकं तुम्ही सुसाट वेगात असता तेव्हा अचानक समोर उभा ठाकतो... पण या ऑटो कार ला ब्रेक मारायचं एवढंच काम... खरंतर आतून पूर्णपणे हादरलेल्या तुम्हाला पुन्हा एकदा पहिल्या गियरची आठवण होते... पण खाडखाड गियर उतरवायचे म्हटलं तरीही जमत नाही... ते कामही तुमची गाडी स्वतःच करते... आणि पुन्हा सुरवात करायची म्हटलं तर पहिला काय आणि पाचवा काय कोणताच गियर सापडत नाही... मग शेवटी क्षणभर त्राण हरवलेल्या पायानेच पुन्हा एक्सेलरेटर दाबून नव्याने सुरुवात करावी लागते.. एकट्यानेच... 

हल्ली आम्हाला तसं कुणीच लागत नाही म्हणा... फोटो साठीपण नाही आणि सहलीसाठी पण नाही... एकट्यानेच होतं सगळं.. :) अशी ऑटो कार जवळ असल्यावर मग आणखी काय हवंय... 

अशी राईड एन्जॉय करायलाही काही हरकत नाही.. पण आयुष्याच्या या ऑटो कार ला कधीतरी अधून मधून का होईना ड्राइव्ह मोडवर टाकत चला... 
ऑटोमॅटिकली तुमची आयुष्यभर साथ देण्याऱ्या या गियर्सना आणि तुमच्या गाडीलाही थोडं समाधान मिळेल... बघा नक्की ट्राय करून... :)
तब तक हैप्पी ड्रायविंग.... :)

- टिंग्याची आई 

No comments:

Post a Comment