सरीवर सर सोबत घेऊन…
तो आभाळभर बरसून गेला…
थेंबा थेंबा सोबत….
एक आठवण जागी करत गेला…
मन चिंब भिजलंच नाही अजून…
बेधुंद या पावसाला… पुन्हा एकदा बरसायला सांगेल का कोणी…?
पारावरचा हिंदोळा एकटाच झुलत…
वाट पाहतोय एका उनाड मनाची…
रानाकडच्या पाऊलवाटेलाही लागलीये…
ओढ खट्याळ पावलांची…
का बर मन बावरतय अजून…
हळव्या या मनाला… पुन्हा हुंदडायला शिकवेल का कोणी…?
उंचच उंच भरारी घेतंय…
मन पाखरू आभाळाहून उंच जाऊ पाहतंय…
अपेक्षांचं हे खोट आकाश…
नको इतकं वर जातंय…
हे पाखरू घरट्यात येतंच नाहीये परतून…
भरकटलेल्या या आकाशाला… पुन्हा क्षितिजावर झुकवेल का कोणी…?
डोळ्यासमोर फक्त तू आहेस…
अन हात तुझा हातात आहे…
तुझं माझं सगळंच विसरून….
मन हे तुझ्याच मिठीत गुंतलेलं आहे…
वाटतंय पूर्ण झालीच नाहीये भेट अजून…
सोन्यासारख्या या क्षणाला… कायमचं इथेच थांबवेल का कोणी…?
- शिल्पा

No comments:
Post a Comment