Wednesday, April 3, 2013

शेवटची भेट…एक आठवण…

एक आठवण… 

ती दोन क्षणांची भेट शेवटची आहे… हे आधीच कळलं असतं… 
तर किती बर झालं असतं… 
त्या दिवशी तुला अगदी डोळे भरून पाहिलं असतं… 
तुझ्या ओठांवरच हसरं गाण… मनसोक्त ऐकलं असतं… 
तुझ्या हातात हात गुंतवून… मन हवं तितकं हिंडल असतं…. 
दोघींच्याही डोळ्यातलं पाणी… क्षणभर का होईना हसलं असतं… 

दोघी बालमैत्रिणी मिळून अंगणभर खेळल्या असत्या… 
दोघींच्या पायातल्या साखळ्या… एकाच तालावर नाचल्या असत्या… 
एकमेकींची सुख-दुखं विसरून… एकदातरी खळखळून हसल्या असत्या… 
निघता निघता दोघी शेवटचंच… पण कडकडून भेटल्या असत्या… 

त्या लांबसडक केसांची… मी स्वतः वेणी घातली असती… 
तुला कुशीत घेऊन एखादी… चार ओळींची अंगाई गायली असती… 
एखादी हृदयाला भिडणारी कविता… दोघींनी मिळून लिहिली असती… 
पुन्हा या भेटीची भूक भागवायला… एवढीच शिदोरी पुरली असती… 

प्रत्येक प्रश्न दोघींनी मिळून सोडवला… किंवा सोडला असता… 
गरगर फिरणारा घड्याळाचा काटा… थोडा काळ त्यांच्यासाठी स्थिरावला असता… 
सुटत चाललेला हात… दोघींनीही घट्ट धरून ठेवला असता… 
मनातला एक रिकामा कोपरा… या भेटीने ओसंडून वाहिला असता… 

तसं पाहिलं तर… तितकासा फरक नक्कीच पडला नसता… 
एकमेकींच्या आठवणीशिवाय… दोघींचाही दिवस सरला नसता… 
हरवलेला तो सूर… पुन्हा कोणीच छेडला नसता…
आजही पापण्यांच्या काठावर साचलेला थेंब… असा कवितेतून सांडायचा राहिला नसता… 

पण तरीही… आधी कळलं असतं… तर खरच खूप बर झालं असतं…. 
:)
~ शिल्पा 

1 comment:

  1. :) Likes below line

    प्रत्येक प्रश्न दोघींनी मिळून सोडवला… किंवा सोडला असता…

    ReplyDelete