Monday, October 12, 2015

एक नात.... हरवलेल...

मनात नेहमी दाटणार पण ओठांवर कधीच न आलेलं असं काहीतरी….
अशी भावना जिला शब्द कधीच फुटू नयेत… :)
आठवणीतली एक जुनी कविता…. 
तिचा आवाज म्हणजे त्याच्यासाठी नुसतीच किरकिर होती….
तिने आपलं समजून सांगितलेलं म्हणजे न थांबवता येणारी बडबड होती….
तिचा सहज झालेला स्पर्श सुद्धा त्याला नकोस वाटायचा….
नको असलेल्या तिच्या मैत्रीमध्ये त्याचा जीव घुसमटायचा….

 
तिने मनापासून लिहिलेल्या कवितांमध्ये त्याला कुठलाच अर्थ सापडला नाही….
तिने मांडलेला नात्यांचा गुंता त्याला कधी आवडलाच नाही….
नकोच होती ती आयुष्यात पण स्पष्ट कधीच त्याने सांगितलं नाही….
तिच्या त्या मैत्रीला कधी मनापासून आपलं मानलंच नाही…. 


तिचे डबडबलेले डोळे पाहूनही त्याचं मन कोरड ते कोरडच राहायचं….
नको असलेलं हे असलं ओझं मग कुणी का बर वाहायचं….?
अगदीच नको झालं होतं मग एकदातरी सांगून बघायचं होतं….
निस्वार्थपणे मायाच करायची, निदान एकदा खरं वागून बघायचं होतं….
नसेलच झालं सगळं सहन म्हणून मनगटावरचा धागा त्याने स्वतःच तोडून टाकला….
आहे तशी तिला सोडून ती नसलेल्या जगाचा रस्ता धरला….

केवळ एकच प्रश्न तिचा…
तुला खरंच हे बंध तोडायचे आहेत…? 

आजवरचे सगळे क्षण कायमचे विसरायचे आहेत…?
एक अक्षरी उत्तर त्याचं…. "हो…"


ऐकून खरतर पायाखालची जमीनच सरकली….
पण जाणवत होत आजवर ते घडलं म्हणून ती स्वतःच सावरली….
त्यानंतर एकही प्रश्न तिने कधी केला नाही….
त्याच्या वाटेत येईल असा एकही रस्ता धरला नाही….

मागचं सगळ आठवून आजही आसवं गाळते इतकंच….
त्याच्यासाठी आपण म्हणजे एक बंधन होतो, हे ओझं मनावर वाहतेय इतकंच….

एकच मागणं मागते बाप्पाकडे….
तिच्याइतक वाईट माणूस पुन्हा कधीच त्याच्या आयुष्यात येऊ नये….
झालीच जर चुकून भेट… तर डोळ्यांत दाटलेलं आभाळ त्याच्यासमोर कोसळू नये….

खंत एकंच…
तिची हि मैत्री त्याला कधीच कळली नाही….
अन त्याची होणारी घुसमट तिला लक्षात आली नाही….

सुटलाय आता हात कायमचा….
दोघे आपापल्या घरी सुखी आहेत….
एक रिकामी जागा भरून काढायचा….
आजही प्रयत्न करत आहेत…

- टिंग्याची आई

No comments:

Post a Comment