Friday, December 25, 2015

बाप्पा निघाले…

"विनू…. आवरलं का रे तुझं ?? ऊशीर होतोय रे मला निघायला…"
देवाच्या खोलीतून येणारा हा वाट पाहणाऱ्या बाप्पाचा आवाज… (हो बाप्पाच बोलतोय :)
गेले दहा दिवस झाले बाप्पा कुलकर्णींच्या घरी आलेत… अगदी आपल्या घरी येतात तसेच हो… आणि आज अनंत चतुर्दशी… बाप्पा निघालेत त्यांच्या गावाला… त्यावेळचा हा प्रसंग… श्रीयुत कुलकर्णी म्हणजे विनूच्या घरचा….
कुटुंब तसं छोटंच… सुखाने संसार करणारे श्रीमान-श्रीमती, घरातला आनंद म्हणजे त्यांची लेक आणि डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणारी आई….
चला बघू काय होतंय पुढे….
"विनूची आई तुला सांगतो, हा आपला विनू असंच करतो दरवर्षी… मला लवकर पाठवायची इच्छा नसते ना त्याची म्हणून मुद्दाम असा उशीर करतो…."
आलाच बघ…
"बाप्पा… आलोच मी आवरून… सोवळं नेसायला थोडा उशीर लागतो ना मला…" विनू कसाबसा सोवळ सावरत आला….
बाप्पा मात्र विनूला डोळे भरून पाहत होते आणि नकळत आईला म्हणाले… "असं सोवळ्यात विनूला पाहिलं कि त्याच्या बाबांची  आठवण येते…." नेहमीसारखे बाप्पा आणि विनू फक्त हसले आणि आईच्या डोळ्यांत मात्र टचकन पाणीच आलं… दोघांनी मुद्दामच तिकडे लक्ष दिलं नाही… हो मुद्दामच… :)

"बर… चला आता छानशी आरती करून घ्या बरं माझी…"
सगळ्यांनी मग एका सुरात बाप्पाची आरती म्हटली…. अगदी टाळ आणि घंटेच्या गजरात… 
"आता कर्पूर आरती होऊ देत…" बाप्पा सांगत होते 
आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी घालीन लोटांगण चा ताल धरला… बाप्पाही अगदी छान रंगून गेले होते आरती मध्ये… 
आरती संपली आणि बाप्पा थोडं सावरून बसत बोलले… "बर विनू, आता सावकाश खाली घे मला…"
सोवळ सावरत विनू उठला आणि त्याने हलकेच बाप्पांना त्यांच्या जागेवरून खाली घेतलं आणि खालच्या पाटावर सांभाळून ठेवलं…. बाप्पाही अगदी निवांतपणे खाली उतरले… :)
"अग नभा… चल नैवेद्याचं ताट आण बर आता…" नभा म्हणजे सुनबाई बर का आमची… 
नभा लगबगीने नैवेद्य घेऊन आली… घरच्या या लक्ष्मीरूपी अन्नपूर्णेकडे बाप्पा फार कुतूहलाने बघत होते… एक न एक मोदक कसा अगदी रेखीव बनवला होता पोरीने… चैत्र गौरीचे पंचरंगी विडेही अशीच सुरेख बांधते बर का आमची नभा… बाप्पा खुश होत बोलले… 
"सोबत दहा बारा मोदक बांधून दे ग मला… प्रवासात बर पडतं…" यावर नभाही प्रेमाने हो म्हणाली… 
"विनू चल आता आणखी एक आरती करा माझी… निघण्यापुर्वीची… " 
हे ऐकून आईच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं… तिला समजावताना बाप्पा म्हणाले… "अग कशाला ऊगीच डोळ्यातून पाणी काढतेस… येणारच आहे कि मी पुन्हा पुढल्या वर्षी… आणि तुझ्या देव्हाऱ्यात तर आहेच कि मी अखंड…"
आईने पदराने डोळे टिपले आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी आरती म्हणून घेतली… 
"बर  विनू, आता नैवेद्य दाखव…" बाप्पा 
"हो दाखवतो…." विनू 
"अरे आधी पाण्याचं मंडळ आणि मग त्यावर नैवेद्य ठेव बाळ…" पुढे बाप्पा सांगतील तशी विनूने पूजा आटोपली… 
तसा पूजाअर्चा करण्याच्या बाबतीत आमचा विनू आळशीच म्हणायचा… पण हि पूजा अगदी व्यवस्थित लक्षात असूनही बाप्पाने सांगितल्याशिवाय तो काही करत नाही… :)
बाप्पा निघायला तयार झाले… 
"चला… निघतो मी आता…."
"बाप्पा असं हो काय… येतो म्हणा ना…" एव्हाना आईला गहिवरून आलं होतं… 
"हो ग विनूची आई… येतो मी परत… " बाप्पा 
विनुही तयार होऊन आला अन बाप्पाला उचलून विसर्जनासाठी निघाला… आधीच तयार असलेली पिशवी घेऊन नभाही निघाली सोबत… 
उंबऱ्याबाहेर पाऊल टाकताच बाप्पा म्हणाले… "अरे विनू, तीनदा मागे वळून दाखव रे बाबा मला आपलं घर… पुन्हा वर्षभर नाही दर्शन व्हायचे या मायेच्या सावलीचे…"
आता मात्र बाप्पा आणि विनू दोघांनाही भरून आलं होतं… कुणाच्याही नकळत नभानेहि आपले डोळे कोरडे करून घेतले… घरात आईचा बांध कधीच फुटला होता… एकसारखी धार लागली होती डोळ्यातून… 
"लवकर चल विनू, उशीर होतोय…" बाप्पाच बोलले… 
अन आपल्या लाडक्या नातीला बाय करून बाप्पा निघाले… 
परतीच्या वाटेवर बाप्पाही शांत होते आणि विनुही… 
बाप्पाच्या मूर्तीच विसर्जन करताना जसजशी हातातून मूर्ती सुटत होती तसं विनूला गलबलून आलं… 
बाप्पा प्रवासाला निघाले… पुढच्या वर्षी पुन्हा परत यायला… 
दाटलेला कंठ मोकळा करत विनूने जोरात साद घातली… "गणपती बाप्पा मोरया………"
अन जमलेल्या प्रत्येकाने त्याला मनमोकळा प्रतिसाद दिला… "पुढच्या वर्षी लवकर या……"
विनूला उगीचंच समाधान वाटलं… अन तो परत फिरला… 
बाप्पाच्या न दिसणाऱ्या मूर्तीला पुन्हा एकदा नमस्कार करून…. :)
गणपती बाप्पा मोरया… 
- टिंग्याची आई

No comments:

Post a Comment