Thursday, July 21, 2016

भाग्यकारक घटना घडेल....

"सकाळ्च्यापरी राशींमध्ये रमणाऱ्या लोकांचं भविष्य नक्कीच चक्रात अडकू शकतं यात काही वाद नाही..." :)
पेपर मध्ये रोज न चुकता येणारी एखादी गोष्ट म्हणजे राशिभविष्य... अवघ्या दोन ओळीत आपल्या अक्ख्या दिवसाचं भविष्य सांगितलं जातं... प्रत्येक राशीची किमान २-३ करोड माणसं आणि त्या सगळ्यांच भविष्य ही लोकं किती confidently छापतात याचंच आश्चर्य वाटतं... कधी कधी वाटतं रोज ह्या राशीचं भविष्य त्या राशीला आणि त्या राशीचं आणखी कुठल्यातरी राशीला.... जाम कसरत करावी लागत असेल या मंडळींना... :)
कधीतरी तीन चार दिवसाचे पेपर गोळा करून बघा... किमान चार राशींचं तरी भविष्य डिट्टो सेम टू सेम सापडेल...
असो... तर हा वादाचा मुद्दा व्हायच्या आधी मेन विषयाला हात घातलेला बरा.... :)
तर माझा तसा काही राशिभविष्यावर वगैरे फारसा विश्वास नाहीये.... कसं आहे की "फारसा" म्हटलं की बरं असतं आपलं मधोमध Neutral... म्हणजे कधी वाटलंच तर इकडे किंवा तिकडे सरकत येतं... ;)
पण तरीही वाचतो आपलं कधी कधी पेपरातलं भविष्य... सन आणि मून साईन असं काहीतरी असतं म्हणे त्यात.... हे पेपरवाले कुठल्या बेसिसवर लिहितात भविष्य माहीत नाही... मग मी आपल्या दोन राशी हाताशी ठेवल्यात... ज्या दिवशी ज्या राशीचं भविष्य चांगलं असेल ती रास आपली... ज्या दिवशी दोन्ही चांगल्या असतील त्या दिवशी डबल आनंद... पण ज्या दिवशी दोन्हीचं भविष्य वाईट असेल त्या दिवशी मी पेपर वाचलाच नाही असं समजतो... :) उगीच कशाला डोक्याला शॉट लावून घ्यायचा... ;)

परवा असंच सकाळी सकाळी पेपर घेऊन बसलो होतो... वाचायला हो... उगीच भलते गैरसमज करून घेऊ नका.... दिवस तसा रोजच्या सारखाच नॉर्मल होता... पेपर वाचता वाचता राशी भविष्यवर येऊन पोचलो... आणि त्या दिवसाचं भविष्य होतं खालीलप्रमाणे....
"भाग्यकारक घटना घडेल.... "
आजवर बऱ्याचदा या आशयाचं किंवा अगदी हेच भविष्य आलं होतं... पण म्हटलं आज खरंच काहीतरी घडेल कदाचित... भाग्यकारक...
म्हटलं आजचा दिवस याच आशेने सुरू करू.... अधून मधून असं आशावादी झालेलं बरं असतं म्हणे.... 

दिवस जसा रोजच्यासारखा सुरू झाला तसाच पुढे सरकत होता... नेहमीप्रमाणे चहापाणी आटपून डबा घेऊन ऑफिसला निघालो... वाटलं होतं ही आज काहीतरी भारी वगैरे बनवेल डब्याला... पण साधी भाजी पोळीच पदरी पडली होती आजही...  मग म्हटलं ऑफिस जाताना किंवा पोचल्यावर काहीतरी भाग्यकारक घटना घडेल.... 
आणि गाडी घेऊन नेहमीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने थांबत थांबत निघालो.... मग तर काय या हल्लीच्या ट्राफिक मध्ये धावण्यापेक्षा थांबतच चालतात गाड्या... त्या मानाने ट्रॅफिक थोडं कमी होतं म्हणायला हरकत न्हवती... तेव्हा क्षणभर हीच का ती भाग्यकारक घटना असंही वाटून गेलं मनाला... :D 

आज कामही तसं हेमीसारखंच वाढून ठेवलेलं होतं... म्हटलं एखादा ऍप्रिसिएशन ईमेल किंवा प्रमोशन वगैरे होतंय की काय.... पण ते सुद्धा नाही... आणि चक्क तो ईमेल जोशाच्या मेलबॉक्स मध्ये जाऊन धडपडला होता... थोडी अजून जरा निराशा वाढत होती पण नेटाने बाजूला सारत मनाला धीर दिला... समजावलं स्वतःला या छोट्याशा घटनेचा IP ऍड्रेस चुकला असेल कदाचित... :)
दिवस मध्यावरून कधीच मागेसरकला होता आणि आता वेळ होती मिटिंग ची... आज पण बॉस नेहमीप्रमाणे लेक्चर कम शिव्या देणार हे माहीतच होतं... आणि तेच झालं... पण आज जरा कमी शिव्या मिळाल्या त्यामानाने.. चला... वाटलं घडली आणखी एक भाग्यकारक घटना... :)

दिवस संपला तरी त्या घटनेचा पत्ता न्हवता... शेवटी मीच आशा सोडून दिली... घरी आलो... मुलांचं खेळून झालं होतं आणि अभ्यास सुरू होता... हिने जेवण वाढलं, सगळे मिळून छान जेवलो... सगळं यावरून पलंगावर पाठ टेकून पडलो होतो... इतक्यात शेजारच्या टेबलवर सकाळच्या पेपर मधलं तेच भविष्याचं पण फडफडत होतं... आणि माझ्या डोक्यात तीच गोष्ट पुन्हा फडफडली... "भाग्यकारक घटना घडेल..."
स्वतःशीच आणि स्वतःवर थोडासा हसलो.. हिला विचारलं आज काही खास घडलं का ग? 
तर हिचं नेहमीचं उत्तर... "झोपा आता... बास झालं..." आणि तेवढ्यावर मी गप्प झालो.. ;)
पुन्हा एकदा ते पण दिसलं आणि थोडा सिरियसली विचार करावासा वाटला... 
खरंच काही भाग्यकारक घटना घडली का आज आपल्या आयुष्यात...? संपूर्ण दिवस पुन्हा एकदा डोळ्यांखालून काढला आणि कन्फर्म केलं आज कोणतीही भाग्यकारक घटना घडली नाही..... आणि निवांत झोपायला तयार झालो... इतक्यात माझाच आवाज मला कुठूनतरी ऐकू आला... 

"काय मिस्टर काळभोर...?? नाही ना घडलं काही भाग्यकारक आख्या दिवसात.... मग आता तुम्ही रिकामे भविष्य वगैरे सगळं खोटं असतं म्हणायला....!!!
मी जरा सांभाळूनच म्हटलं... "अगदी तसंच काही नाही.. पण खोटंच असतं ते..."
आणि चक्क माझा आवाज माझ्यावर ओरडू लागला... जरा घाबरलोच होतो पण म्हटलं ऐकूया तरी काय म्हणतोय ते... 
माझा आवाज पुढे बोलू लागला.... 

अरे वेड्या या जगात आजकाल कशाची श्वाश्वती आहे सांग... आज तू सकाळी उठलास हीच एक भाग्याची घटना नाही का? ऑफिसला जाताना तुझ्या गाडीचा ऍक्सीडेन्ट न होता तू सुखरूप पोचलास ही काय कमी भाग्याची गोष्ट आहे...? ऑफिस मधेही तुला नेहमी इतकंच काम करावं लागलं आणि तुझी नोकरी अजूनही शाबूत आहे किंबहुना त्यावर विसंबून असणारी तुझी सगळी स्वप्न अजूनही शाबूत आहेत हे काय कमी आहे?
तुझी पोरंबाळं आज व्यवस्थितपणे शाळेत जाऊन आलीत त्यांच्या तब्येती धडधाकट आहेत हे काय कमी भाग्याचं आहे का?  तुझी बायको दिवसभर राबून तुझी आणि तुझ्या घराची काळजी घेते आणि तीही आनंदी आहे हीच एक भाग्यकारक घटना नाही का म्हणता येणार??
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस आनंदात घालवून समाधानाची झोप घेतोस इथे हीच आहे कदाचित ती "भाग्यकारक" घटना... 

मेंदू क्षणभर गदागदा हलला.. काहीतरी उमगल्यासारखं वाटलं... 
आपण सगळंच हवंय म्हणून हट्ट धरून बसतो आणि आपल्याला हवं असलेलं काही घडलं नाही की नशिबाला दोष देऊन रिकामे होतो... पण नशिबाने आपल्याही नकळत जे काही चांगलं आपल्याला दिलेलं असतं ते आपण लक्षातही घेत नाही... रोज अशाच एखाद्या भाग्यकारक घटनेच्या शोधात आपण जगत असतो आणि या भाग्यकारक आयुष्याचा आनंद लुटायचाच राहून जातो... 

त्या दिवशी ठरवलं.... रोजचा दिवस भाग्याचा आहे... या सुंदर आयुष्यात एक नाव दिवस जगायला मिळणं हीच खरी भाग्यकारक घटना आहे.. आणि खरं सांगू? त्या दिवशीकधी न्हवे तो गाढ झोप लागली मला...  

दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपर वाचताना त्याच राशी भविष्यावर लक्ष गेलं... तर ते पान माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होतं... :)
आज माझ्या दुसऱ्या राशीत नेमकं तेच भविष्य सापडलं... "भाग्यकारक घटना घडेल....!!!!"
मग हसून म्हटलं ती घटना तर कधीच घडून गेली आहे.... जेव्हा मी या नव्या दिवसाची सुरुवात केली... आणि मुद्दामच तो पेपर सोबत घेऊन ऑफिसला निघालो... 

कुणीतरी म्हटलंच आहे... 
भविष्यात नक्की रमावं माणसानं पण राशिभविष्याच्या चक्रात न अडकता येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे स्वागत करत आनंदाने  जगावे.... 
कदाचित एखादी भाग्यकारक घटना नक्कीच घडेल.... :)

- टिंग्याची आई 

3 comments: