Saturday, August 16, 2014

मी डोंगर बोलतोय….

मी डोंगर बोलतोय…. जरा ऐकाल का माझं..? 
खूप वर्ष झालं सांगायचा प्रयत्न करतोय.... 
निदान एकदातरी ऐकाल का माझं...?
ज्याच्या पायथ्याशी तुमचं गाव वसलं होतं... तोच मी डोंगर...
ज्याने कित्येक पिढ्या पहिल्यात या गावच्या... तोच मी डोंगर... 
अगदी लेकरावानी वाढताना... पाहिलंय मी या गावाला... 
एक एक घरट वाढत... मोठा गाव होताना न्याहाळलंय मी याला...

इथं माथ्यावरून मला... एक एक घरकुल दिसायचं... 
प्रत्येक घरातलं सुख... माझ्याकडं बघून हसायचं... 
गावाकडं बघून... लयी समाधान वाटायचं... 
दिवाळी अन दसऱ्याला... जवा सारं गाव नटायचं...

कुशीत घेऊन या गावाला... मी लेकरावाणी माया केली... 
सुखी राहू देत माझी पोरं बाळं... हीच देवाकडं प्रार्थना केली... 
झाडं-झुडुपं फळ-फुलं... अगदी माझी दगड माती सुद्धा तुम्हाला दिली...
पण जमीन, वाळू, दगड, शेती... यापायी तुम्ही फक्त माझी हानी केली...
जपून रे बाळांनो... कळवळून मी सांगत होतो... 
कुणीतरी ऐकेल माझं... म्हणून नुसतीच वाट बघत होतो... 
दगड माती खडीसाठी... तुम्ही मला पोखरून टाकलं... 
लाकूड फाट्याच्या हव्यासापोटी... एक एक झाड मुळासकट उखडलं...
उरल्या सुरल्या झाडांच्या आधारे... जमेल तसं पाणी मी अडवत होतो... 
धसणाऱ्या ओल्या मातीला... कसबसं घट्ट धरून ठेवत होतो... 
त्या दिवशीही खूप प्रयत्न केला... पण माझा नाईलाज झाला... 
लाडक्या लेकराला वाचवायला... हा बाप असमर्थ ठरला... 
एक एक करत हळू हळू... दगड माती ढासळत होती... 
साखरझोपेतल्या चिमुकल्यांचा... झोपेतच जीव घेत होती... 
पोराबाळांना वाचवायचा... म्हातारी उगा प्रयत्न करत होती... 
गळाभर चिखलात रुतलेली...ती नंतर बचावकर्त्यांना सापडली होती...
वरूण राजाचा कोप झाला... 
सारा गाव चिखलात गाडला गेला... 
डोळ्यांदेखत लेकरांचा काळ झाला... 
हा डोंगर नुसताच बघत राहिला...

विशाल डोंगर म्हणून मिरवायचो... मात्र आता माझं पठार झालंय... 
माझं लाडकं माळीण गाव... आज इतिहासजमा झालंय... 
म्हणून म्हणतो लेकरांनो... 
निदान आतातरी थोडा विचार करा... 
तुमचाही असा घात होण्याआधी... 
या पर्यावरणाचं रक्षण करा... 
तुमच्या या आई-बापाचं रक्षण करा…. 

माळीण गाव दुर्घटनेत बळी गेलेल्या जीवांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…
- टिंग्याची आई 

No comments:

Post a Comment