Friday, August 22, 2014

घर वाट बघतंय…

काही दिवसापूर्वी एका पेपर मध्ये एक वाक्य वाचलं 'घर म्हणजे भिंतीत दडलेल्या भावना' तेव्हाच सुचलेलं हे काहीतरी… घर म्हणजे खरंच घरातलं एक माणूस असतं…. 
घर वाट बघतंय… एक True Imagination...

घर म्हणजे भिंतीत दडलेल्या भावना… 
आपल्याच सुख-दुखांच्या सावल्या...
घर म्हणजे आपल्याच घरातलं एक माणूस… 
कुणी एकटं असेल तर सोबत करणारं... आणि कोणी नसताना घर सांभाळणार...

गेली २-३ वर्ष झाली तुझंही घर एकटंच आहे... 
ओट्याच्या कोपऱ्यात त्या कबुतराने मांडलेल्या घरकुलात 
तुझाच संसार शोधतं आहे… 
अगदी उंबरठ्यापासून ते परसदारापर्यंत... तुझ्याच आठवणींनी गच्च भरलंय... 
त्याच क्षणांच्या आधाराने... घराने स्वतःला कसबस सावरलंय... 

अगदी आकार सुद्धा न्हवता... अजून तेव्हापासून तू या घरावर प्रेम केलंस... 
प्रत्येक विटेसोबत... एक एक नवं स्वप्न रचलंस... 
दूरदेशी राहायला गेलीस... आज इतकी वर्षं झाली... 
तुला घराची अन घराला तुझी... अगदी प्रत्येक क्षणी आठवण झाली... 

तुझी कामाची रोजची धावपळ...
पिल्लूची ती निरागस लुड्बुड... 
तुझ्या अहोंच त्याच्यासोबत लहान होऊन खेळणं... 
तुझं हसणं तुझं रडणं एकांतात बसून कविता करणं... 
अन बऱ्याचदा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं... :)
असे कित्येक क्षण या घराने जपून ठेवलेत... 
अगदी तू या घराला जपायचीस तसच… 
न थकता घरात अखंड वावरणारी तुझी पावलं
अन सोबत पैजनाचा मंजुळ नाद... 
कधी प्रेमाने कधी रागाने घरातल्या माणसांनी तुला घातलेली साद… 

झालीये आता सवय त्या समोरच्या दारालाही...
तुझं हे दार कायमचं बंद पहायची... 
अन त्या घरातल्या चिमुरड्या पिल्लूला...
आपल्या सवंगड्याशिवाय खेळायची ...
आठवतेय ती भिंत तू specially रंगवून घेतली होतीस... 
अन खिडकीजवळची कोपऱ्यातली जागा मुद्दामून रिकामी ठेवली होतीस... 
त्याच खिडकीत उभं राहून कविता रचायला...
आवडायचं तुला सूर्याची किरण अंगावर झेलत...
किंवा एखाद्या चहाच्या कपात अखंड डुंबत... 
अजूनही सूर्यकिरणे रोज येतात...
त्या बंद खिडकीतून डोकावायचा प्रयत्न करत तुलाच शोधत असतात… 
Gallery तली ती  संध्याकाळच्या कॉफीची जागा... 
तिच्या वाफा तुझा चेहरा कुरवाळत असायच्या....
अन तू मात्र दूरवर घरट्याकडे परतणाऱ्या पक्षाकडे पाहत बसलेली… 
आता कॉफी नसते… तुही नसतेस… पण नेहमीसारखा तोच पक्षी घरट्याकडे परतताना… 
तुझं घर तुझ्या परतण्याची अगदी न चुकता वाट बघतंय 

शेवटचं घरातून निघताना... तुला हुंदका आवरत न्हवता... 
घराचा कोपरा न कोपरा तुला अडवू पाहत होता... 
काही केल्या तुझाही पाय घरातून निघायला तयार न्हवता... 
मनात नसताना शेवटी दाराला भलं मोठ्ठ टाळं लावताना तुला भरून आलं होतं...
अन त्याच क्षणी आत घर मात्र ढसाढसा रडलं होतं...

पिल्लाच्या मागे धावणारी आई... 
आपल्या सख्याची काळजी घेणारी सखी... 
आणि घर सांभाळणारी कारभारीण... 
अशी तुझी कितीतरी रूपं या घराने पाहिली आहेत... 
तुझ्याच बऱ्याचशा जुन्या कविता... भिंती आजही गुणगुणत आहेत... 

तसं तुझं घर कधीच एकटं न्हवतं… 
या तुझ्या आठवणी सोबत घेऊन ते रोज नव्याने जगतंय... 
हरवलेले सगळे क्षण... तुझ्यासाठी वेचून ठेवतंय... 
तुझ्यासारखच रोज न चुकता... आठवण सुद्धा काढतंय... 
तुझ्या इतकीच तुझ्या परतण्याची... तुझं लाडकं घर वाट बघतंय…. :)

- टिंग्याची आई 

1 comment:

  1. sakshidar..kabutarachya sansarachiAugust 22, 2014 at 11:09 PM

    kadachit ata jast wat nahi pahawi laganar...
    Ani ho ...wat pahanar ghar ata ekat nahi
    Pillawar abhalbhar maya karanara ladaka kaka ani " ye g tai parat lawkaq" mhananari kaki doghana gharawar jiv lawayach kam sopawalay

    ReplyDelete