Wednesday, December 19, 2012

कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला एक टेबल...

कुणीतरी जाणून बुजून लक्ष द्यावं.. असा मी मुळीच नाही...
आणी सहसा तसं लक्ष कोणी देतही नाही...
सगळ्यांसाठी सारखाच...
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

सकाळी सकाळी ऑफिसच्या गडबडीत एखादा रोजचाच माणूस येतो....
तीच ती चहाची ऑर्डर पुन्हा एकदा मागवतो ....
चहाच्या घोटाबरोबर ४-५ बातम्या वाचतो....
तर कधी दिवसभराच्या कामाची यादी वाचून दाखवतो...
घरातली टेन्शन देखील कधी कधी नकळत बडबडतो...
सरकारला शिव्या घालत.. महागाईचे चटके सोसायला पुन्हा बाहेर पडतो...
त्याची कित्येक मूक आक्रंदन ऐकणारा....
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

भर दुपारी कॉलेजचा एक ग्रुप धाडकन आत शिरतो..
आणि क्षणार्धात माझा ताबा घेऊन टाकतो...
कधी ट्रीप.. कधी नाटक... रोज नवा प्लान ठरतो....
एक करतो कविता... तर दुसरा शिव्यांनी दाद देतो....
एखाद्याचं तुटलेलं दिल.. कोणीतरी जोडायला मदत करतो...
कधी शिवबाचा मावळा जणू ... लढायलाही एका पायावर तयार असतो.....
दंगा-मस्ती सोबत त्यांच्या करियरच प्लानींग देखील करणारा....
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

संध्याकाळी एखादा प्रियकर आपल्या प्रियेला घेऊन येतो...
तिचा हात हातात घेऊन... चार चौघांना जळवतो...
मुद्दामच दोघांत मिळून एकच चहा मागवतो....
तिच्या डोळ्यांत डोळे घालून भविष्याची स्वप्न रंगवतो...
तिच्यासाठी तो सर्वस्व आणि तिलाच तो आपलं जग मानतो....
त्याच्या मिठीतच तिला तिचा संसार गवसतो....
त्या दोघांसोबत त्यांच्या गोड आयुष्याचं स्वप्न रंगवणारा...
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

संध्याकाळच्या वेळी एखादा नातू आपल्या आजोबांसोबत येतो...
त्यांची काठी हातात घेऊन स्वतःच त्यांना आधार देतो...
शाळेतल्या सगळ्या गमती जमती नातू आजोबाला सांगतो....
नातवाच्या रुपाने आजोबा... पुन्हा एकदा बालपण जगतो....
थकलेल्या आजोबांच्या पावलांना.. नातू गती देतो....
जणू विशाल वटवृक्ष छोटयाशा रोपट्याच्या सावलीत विसावतो....
जुनं आणि नवं त्यांच्या नात्यात एकत्र अनुभवणारा...
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

असाच माझा दिवस या सगळ्यांच्या सहवासात जातो....
आंबट-गोड भावनांमध्ये नकळत  मीही गुंफला जातो.....
रात्र झाली तरीही मी नेहमीच कोणाचीतरी वात पाहतो....
भरकटलेला कोणीतरी वाट शोधत शोधत नक्कीच येतो....
रात्री उशिरा एखादा हॉटेलातला लहानगा माझच अंथरून करतो....
त्याला आणि त्याच्या अनंत स्वप्नांना मी रोजच सांभाळतो...
रात्रीच्या एकाकी काळोखात.. पुन्हा  नव्या  उद्याची वाट पाहणारा...
कोपऱ्यावरच्या हॉटेल मधला मी आहे एक टेबल...

- शिल्पा 
टॉपिक सिलेक्शन : My cubicle friends :)

No comments:

Post a Comment