Monday, March 25, 2013

टिंग्या ऐक ना रे…… टिंग्याला बर न्हवत तेव्हा ….

लास्ट वीकेंड टिंग्याला खूप बर न्हवत (मार्च १६-१७)…. खूपच जास्त वीक झाला होता टिंग्या माझा… जास्त खाणे नाही पिणे नाही अगदी उठत देखील न्हवता अंथरुणावरून… इतकं शांत शांत आम्ही सगळे त्याला पहिल्यांदाच बघत होतो…प्रत्येकाचा आपापल्या परीने त्याला हसवायचा… दोन घास भरवायचा… आणि खेळवायचा प्रयत्न सुरु होता… पण टिंग्या काही उठायला तयारच न्हवता…. :(
आज टिंग्याला बर वाटतंय… खेळायला सुरुवात झालीये….
म्हणूनच हे सगळ लिहायचं धाडस केलंय टिंग्याच्या आईने…. :)

अरे टिंग्या… सकाळ पासून मामा येऊन बसलाय….
बघ येताना तुझ्यासाठी वडापाव घेऊन आलाय….
जरा उठून थोडासातरी वडापाव खा ना रे…
हळूच आपल्या मामाला पप्पू म्हणून हाक मार ना रे ….

अरे मेघा काकीचा सकाळपासून दहा वेळा फोन आलाय…
चिनू दादा बघ कसा… तुझ्याकडे यायला रुसलाय…
त्याला घेऊन काकांना एकदा इकडे यायला सांग ना रे.….
दादा कधीचा हाक मारतोय… एकदातरी ओ दे ना रे….

कोल्हापूरच्या आज्जीची…. कंबर खूप दुखतेय….
तरीसुद्धा तुला बघायला येणारच… असं म्हणतेय…
फक्त एकदाच तिच्याशी फोनवर गप्पा मार ना रे…
लवकरच छान बरा होईन…  अस तिला सांग ना रे…

शीतल मावशी पण तिकडे…. तुझीच काळजी करत आहे…
सार्थक दादा तुला आपली नवीन सायकल देणार आहे….
डॉली ला घेऊन सायकलवरून फिरायला जाऊया म्हण ना रे…
म्हातारी आणि भोपळ्याची गोष्ट तिला पण एकदा सांग ना रे….

apple, banana, strawberry… आजोबांनी कित्ती काय काय आणलंय…
खात नाहीस काहीच… म्हणूनच आज्जीने छान उप्पीट बनवलंय…
अजून काय आणायचं तुला… उठून आजोबांना सांग ना रे…
आज्जीच्या मागे दडून… आईशी लपाछपी खेळ ना रे…

सांगितलंय बाबांनी… परत तुला कधीच ओरडणार नाहीत…
हवा तेवढा दंगा कर…. गप्प बस म्हणायचे नाहीत…
आता तरी ऊठ…. अन थोडासा दंगा कर ना रे….
बाबांची सगळी पुस्तकं खाली काढून…. तूच त्यांचा अभ्यास कर ना रे…

पापण्यांच्या काठावर साचलेलं पाणी मागे सारून… बघ आई कशी बळेच हसते….
जेवत-बिवत नाही बिलकुल…. नुसतीच तुझ्याकडे बघत बसते….
आईच्या हातचा मऊ मऊ वरण भात… थोडासा तरी खा ना रे….
तुझ्यातलाच एक घास…. तूच तिला भरव ना रे….

समोरच्या आज्जीनी संध्याकाळी… तुझी चांगली दृष्ट काढली…
मल्हारच्या आईने छान रामरक्षा म्हणून दाखवली….
तुझ्या आईच्या हाकेला…. आज श्री राम खरंच धावला रे.…
थोडंस का होईना बर वाटून…. आईच्या कुशीतून कित्ती गोड हसलास रे…

तू हसलास… आणि आईने डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली…
खूप खूप पापी घेत… बघ कशी तुला घट्ट मिठी मारली….
पूस तिचे डोळे…. आणि पुन्हा एकदा तिला छान हसव ना रे….
आतुरलेत कान तिचे… फक्त एकदाच तिला मम्माई म्हणून हाक मार ना रे….

- टिंग्याची आई
देव बाप्पा परत कध्धी कध्धी माझ्या टिंग्याला असं आजारी पाडू नको ह… प्लीज… या वेळी संकष्टीला तुला एक मोदक जास्त देईन… :)

No comments:

Post a Comment