अंगणी तापित दुध… दुधावर पिवळी साई…
ये ग गौराबाई… एवढ जेउनि जाई…
आता काय जेऊ माय ग… दारी शंकर हाय ग…
शंकर सोळा, राजा भोळा… नगर सोडून जाय ग…
आठवतंय का? हे किंवा असंच एखाद गौरीचं गाण? श्रावणमास सुरु झाला रे झाला कि गौरी-गणपतीचे वेध लागतात आम्हा लेकुरवाळ्या पोरींना… अगदी पंचमी पासूनच आम्ही पोरी शाळेत फेर धरायचो…. बरीच गाणी गायचो… त्यातलंच हे एक…
पहिले सोमवार किती… बाई मी महादेवाला जाते…
हाती घ्या ग बेल पान… झिम्मा खेळू रानोमाळ….
माझं बालपण खेड्यात गेलं… अगदी बाळपण म्हणायला हरकत नाही… :) अगदी पहिलं पाऊल टाकायला लागल्यापासून आम्ही गौरीच्या खेळामध्ये रमायचो… आईलाही भारी हौस होती गौरीच्या खेळाची… तशी आईच्या घरी गौरी गणपती न्हवती बसत पण तिच्यासाठी तिच्या चिमण्या लेकीच गौराई होत्या आणि अजूनही आहेत… :) घरी गौरी न्हवत्या तरी आई त्यांचा सगळा स्वैपाक करायची अगदी शेपूची भाजी, वडी भाकरी आणि पुरणपोळी सुद्धा…आईकडे असताना आम्ही गौरीचा खेळ खूप खेळायचो… बाबांचीही फूल परमिशन असायची… रात्री २-३ वाजेपर्यंत अंगणात खेळ रंगायचा… कॉलनीतल्या बऱ्यापैकी जाडजूड काकू सुद्धा घागर घुमवायला कोणाला ऐकत नसत… झिम्मा फुगडी पिंगा छीय्याफू… कित्ती कित्ती खेळावं… अगदी बेधुंद होऊन… आणि तशीच सूर धरून म्हटलेली गाणी…
घागर घुमू दे घुमू… दे रामा पवा वाजू दे
घागर घुमू दे घुमू… देगवर माझी नाचू दे…
ठेव ग हंडा पाणी… गवर माझी न्हाऊ दे…
पिवळ पितांबरे… गवर माझी नेसू दे…
भाजी-भाकरी… गवर माझी खाऊ दे…
माळी दादाला हाक मारून सांगावं… गौराबाईचा ववसा भरायचा आहे उठ पाटाला पाणी सोड…
उठ उठ माळीदादा… बैल जूप राटाला…
बैल जूप राटाला… पाणी जाऊ दे पाटाला…
पाणी जाऊ दे पाटाला रे… वाळकीच्या देठाला…
एवढी वाळक कशाला…? गौराबाईच्या ववशाला…
गौराबाईचा ववसा ग… फुलांनी दरवळला ग… उदांनी परमळला…
गौरीचे लाड करताना हौसेन तिला विचारावं…
गौरी तुझे डोहाळे कशा ग वरी…?
हाय आंब्याच्या घसा ग वरी…
आंब्याचा घस त्यावरी बस… ताट करीत्या चौरंगी बाया…
या गौरीचं लेकरूही सोबत असायचं… गणोबा… सगळ्या पाहुणचारात गौरीचं लक्ष सगळ आपल्या चीमुरड्याकडे… आणि गणू मात्र मस्ती करायला पसार… तेव्हा गौरी म्हणे…
साती शंकर बनामध्ये… एकला गणू माझा वनामध्ये…
गणूच्या आईला सांगून धाडा… गणूने तोडं गमवलं…
गमवलं तर गमवू दे… गणूला घरला घेऊन ये…
ही आणि अशी कित्येक गाणी आजही जश्शीच्या तशी आठवतात… आणि आठवणी पुन्हा मनात पिंगा घालू लागतात…
पोरी पिंगा ग… पोरी पिंगा ग… पोरी पिंगा ग… पोरी पिंगा…
तुझ्या पिंग्याने मला बोलीवली… रात जागवली पोरी पिंगा….
तसा फेर धरलाच नाही कधी पुण्यात राहायला आल्यापासून… हातातल्या जोडविच्या खणखणाटात घागर घुमली खरी पण उंबऱ्याच्या आतच… भानुरा वाजला खरा गौरीचे कान उघडायला पण फक्त चार भिंतीतच… कसा का असेना पण माझ्या गौरीसाठी मी फेर धरते, मग तो फक्त चार हातांचाच का असेना त्यात गौरीचे चार हात मिळाल्याशिवाय राहणार नाहीत… :) परवा परदेशात राहणारी एक मैत्रीण म्हणत होती वरलक्ष्मी पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या दिवशी वाटलंच नाही की आपण परदेशी आहोत… पण हल्ली इकडे तशी गोडी शिल्लक राहिलीये असं वाटत नाही… कधी कधी वाटत आपणच मग एखादा फेर धरावा ONLINE या सगळ्या मैत्रिणींना सोबत घेऊन… :)पण हि खंत माझ्या गौराईला वाटून कशी चालेल? म्हणूनच कंबर कसून मी तयार आहे… तिची हौस पुरवायला… तिच्यासाठी झिम्मा फुगडीच्या खेळाने रात्र जागवायला… :)
लहान असताना कळायचं नाही का असत हे सगळं… शेजारच्या काकूंकडे गौरी सजवायला आईचा पदर धरून मागे मागे जायचं… बोलक्या डोळ्यांची गौराई काहीतरी सांगून जायची… तेव्हा कळत न्हवत… या बायका गौरीचा एवढा पाहुणचार का बर करतात? तिला खाऊ-पिऊ घालतात… तिच्या आवडीची आरास मांडतात… तिचे लाड करतात… तिची दृष्ट काढतात… आणि ती निघताना अगदी लेक सासरी निघाल्यासारख रडतात देखील… या सगळ्याचा अर्थ कळला…. माझं लग्न झाल्यावर… :)
गौराईच्या रूपाने आईची लेक घरी येते… आई हौसेने तिचे सगळे लाड पुरवते… भाजी-भाकरी खाऊनच तिचं पोट भरत… पंचपक्वान नाही लागत तिला… माझही अगदी असंच होतं माहेरी गेल्यावर… कधी सहा तर कधी दहा महिन्यांनी माहेरी जावं… आईला कडकडून मिठी मारावी आणि आधीच तयार असलेली मेथीची भाजी-भाकरी पोटभर खाऊन घ्यावी… तिथेच समाधानाने पोट भरत माझं आणि आईचंही… :)
माझ्या सासरी गौरी-गणपती दोन्हीही आहे… अगदी यथेच्छ सजवते मी माझ्या लाडक्या गौराई आणि गणोबाला… माझा लाडका गणू बाळही असतोच कि सोबतीला सगळी आरास मांडायला… सासूबाईच्या रूपाने आईच मिळाली आहे पुन्हा… त्यांनाही भारी हौस आहे गौरीची आरास मांडायची… आज मी माझ्या गौरीचे लाड करते… तिला डोहाळे विचारते… तिला न्हाऊ घालते… खाऊ-पिऊ घालते… तिची हौस-मौज करते… आणि खरंच तिची दृष्ट सुद्धा काढते… :)
माझ्या घरची लेक म्हणावी कि माझी नणंद कि मी स्वतःच… पण तीन दिवस हळदी-कुंकवाच्या पावलांनी आलेली गौरी माझ्या घराचं नंदनवन करून टाकतात… पोरा-बाळांच्या पावलांनी आलेली गौराई माझ्या लेकराला निरोगी आयुष्याचा आशीर्वाद देऊन जाते… धन धान्याच्या पावलांनी आलेली गौराई माझ्या घरादाराला समधानाने भरून जाते… फेर धरला नसला तरी मन गौरीच्या अवती भवती गाणी गात नाचत राहतं… टींग्याशी खेळलेल्या फुगडी आणि झिम्म्याने घर गजबजून जाते… त्याच बोलक्या डोळ्यांनी आजही काहीतरी सांगून जाते… :)
तिसऱ्या दिवशी ती सगळी आरास काढताना अन मुकुट उतरवताना आता माझ्याही डोळ्यांत पाणी येतं… का कुणास ठाऊक…? फक्त एवढंच म्हणावसं वाटतं…
लवकर ये ग गौराबाई… :)



This is reallynicely written. And good to know that you had these many things to remember and carry with you. :-)
ReplyDeleteThank you so much... :)
DeleteYes it is really nice to have these moments with me all along my life... :)
http://prajaktapawar-patil.blogspot.sg/
ReplyDeleteplz delete this comment..it is by mistake...Multitasking effect..:(
Deleteag asu det g.... :)
DeleteI am proud to share your blog.... :)
किती छान ....तुझ्यामुळ सगळी गाणी पुन्हा आठवलीत ,अगदी चालीसाहित !
ReplyDeleteमस्तच लिहिला आहेस blog ....!
Thank you so much... :)
Delete