Tuesday, March 11, 2014

कादंबरी वाचन… एक अनुभव…

कादंबरी वाचन… हल्ली दुर्मिळच होत चाललंय… आजच्या या धावत्या इंटरनेट च्या जगात एकाजागी निवांत बसून कादंबरी किंवा तसंच एखादं पुस्तक वाचणं होतंच नाही... ही परिस्थिती आहे… :(पण आजही तुम्हाला आवडतंच असेल ना पुस्तकं वाचायला...? P. C. च्या स्क्रीनवर डोळे ताणून वाचण्यापेक्षा… आपल्या एखाद्या फेवरेट जागेवर, मांडीवर ती कादंबरी घेऊन… तिच्यात पुरतं डुंबून जाऊन मग तिचं एक एक पान आपलंसं करीत जाण्यातच खरा आनंद आहे…
        मलाही आवडतात कादंबरी, कथा, पुस्तकं वाचायला... पण संसाराच्या नादात जमतंच नाही… अरे संसार संसार अशी काहीतरी परिस्थिती आहे… :) तरीही मी जमेल तसा पुस्तकं वाचायचा प्रयत्न करते… जित्याची खोड... काय करणार… ;) ऑफिसमधून घरी गेल्यावर टिंग्याशी दंगा मस्ती करत कामं आवरतात आणि रात्री १०-१०.३० च्या सुमाराला टिंग्याने मांडीवर ठेवलेल्या डोक्यावरून हात फिरवत माझं कादंबरी वाचन सुरु होतं… मग ते अवघं १०-१५ मिनिटांच का असेना तेवढंच मनाला समाधान…
       सध्या मी शिवाजी सावंत यांची छावा हि कादंबरी वाचायला घेतली आहे… तशी तिची साईझ पाहूनच महिनाभर तरी शुभ मुहूर्तच सापडत न्हवता... पण एकदाची सुरवात केली आहे आणि आता रोजची रात्र शिवकालीन घटनांमध्ये रमून जाते….
          इतिहास वाचायला सगळ्यांनाच आवडत असेल, मलाही आवडतं... अभ्यासाला आवडत न्हवता ही गोष्ट वेगळी… ;) त्यातली प्रत्येक व्यक्ती एक रंगरूप घेऊन तुमच्या समोर उभी असते… प्रत्येक व्यक्तीरेखा वेगळी… स्वतःच वेगळं अस्तित्व असणारी… प्रत्येक घटना अगदी समोर घडतेय इतकी स्पष्ट आणि जिवंत… अर्थात यात लेखकाचंच खरं कौशल्य आहे… पण वाचणार्यानेही  तितकंच एकरूप होऊन वाचणं गरजेचं आहे… 
         तर हा माझा अनुभव मला तुमच्याशी शेयर करावासा वाटला… कादंबरी वाचत असताना मीही कशी प्रत्येक प्रसंगाशी एकरूप होत गेले… ते सगळं सांगावंसं वाटलं… कदाचित एखादी कादंबरी तुम्हालाही आठवेल किंवा वाचावीशी वाटेल… :)

छत्रपती शिवाजी महाराज:
         शिवरायांचं नाव घेताच छाती कशी अभिमानाने फुलून येते… कणा आपोआप वक्र होऊन मन महाराजांना त्रिवार मुजरा करतं… वाचताना जेव्हा जेव्हा राजांचा उल्लेख होतो तेव्हा आधीच झडलेला असतो…. त्यांचं दरबारात आगमन होताच हजर असलेल्या सरदारांसोबत नकळत झुकून मुजरा केला जातो… सदरेवर एखाद्या कोपऱ्यात मन आधीच जाऊन बसलेलं असतं बैठकीवर बसलेल्या राजांना न्याहाळत… अगदी पापणीही न लवता… राजांचा प्रत्येक शब्द न शब्द कान देऊन ऐकत… प्रत्येक बैठक याच पावित्र्यात पार पडते… आजूबाजूच्या जगाचा आपसूक विसर पडतो… टिंग्याच्या डोक्यावरून फिरणारा हात कादंबरीतल्या प्रसंगानुरूप कधी हळू तर कधी जोरात फिरत राहतो… त्याच्या बालिश अंड कुतूहलाने भरलेल्या प्रश्नांना उत्तरं देत वाचन चालू असतं… अन त्याची झोप लागली आहे हेही कधी कधी आईला कळत नाही… :)
           महिनोंमहिने मोहिमेवर असलेल्या राजांच्या घोडदळासोबत दौडत मन कित्येक प्रदेश भटकून येतं… तर कधी कधी राजगडाच्या बुरुजावर उभं राहून राजांच्या वाटेकडे डोळे लावून बसतं… :)
खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुत्ररत्न झाल्यावर पुरता राजगड सोहळा साजरा करत असताना नकळत त्यात सामील व्हायला होतं… आजारी सई बाईंची सावळी मूर्ती डोळ्यासमोर तरळते तेव्हा काळजात चर्रर होतं… पुत्र प्राप्तीने आनंदी झालेले राजे सई बाईंच्या जाण्याने तितकेच दु:खी होतात… पण राजाला सुख-दुखं ते कुठले? काळीज चिरत जाणारा घाव बसला तरी राजाने तो तितक्याच हिमतीने परतवायचा असतो… आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजे… 

जगन्माता जिजाऊ:
          राजे म्हणजे निश्चयाचा महामेरू आणि त्या मेरूचा कणा म्हणजे जिजाऊ… रोज सकाळी राजे जेव्हा जिजाऊचा चरणस्पर्श करतात तेव्हा आपसूक त्या पावलांचा स्पर्श माझ्याही कपाळाला जाणवतो… अन शांततेची एक लहर अंगभर दौडून जाते… चित्त शांत शांत करून जाते… शंभू राजे आपल्या कोवळ्या हातांनी मासाहेबांच्या कमरेला मिठी मारतात तेव्हा त्यांच्या नेसुचा पवित्र गंध क्षणभर दरवळून जातो… जिजाऊ शंभूच्या कपाळावर शिवगंध रेखत असता तो ओलसर गंधाचा गारवा मला माझ्या कपाळावर जाणवतो… त्या मातेचे निर्धारी डोळे अन घरंदाजपणा मला माझ्याकडे पाहायला मजबूर करतात… आणि आपणही त्या नितळ पाण्यात क्षणभर हरवून जावंसं वाटतं… 
           अष्टभुजा जगदंबेसमोर बसलेल्या जिजाऊचं वर्णन वाचलं कि जगन्मातेसमोर दर्पण ठेवलंय कि काय असा भास होतो… त्या फरसबंदीवर राजे, शंभूराजे, जिजाऊ कोणीही मस्तक टेकलं कि त्याच क्षणी माझं मस्तक अंबाबाईच्या पायरीवर टेकल्याच समाधान मला मिळून जातं… तोच गारवा आणि तीच पवित्रता… 

शंभूराजे:
            राजे तसेच शंभूराजे… एक एक प्रसंग त्यांची नव्याने ओळख करून देतो… बाळराजे कोवळ्या वयात किती समजूतदारपणे वागले याचे दाखले वेळोवेळी मिळतात…. तेव्हा वाटतं माझा बाळही असाच कर्तुत्ववान व्हावा… :)
           औरंगजेबाच्या भेटीसाठी गेलेल्या शंभूराजांची करारी मुद्रा… वेळोवेळी होणारं त्यांच्या कवी मनाचं उत्कट दर्शन… आपल्या आबासाहेबांच्या बद्दल वाटणारा आदर प्रेम… आबांचे शब्द जीवाची बाजी लावून झेलणारा मुलगा बऱ्याचदा भेटतो… कधीही न पाहिलेल्या आपल्या आईसाहेब सईबाई यांच्या खुणा शोधणारं त्याचं धडपडणार मनही काळीज हेलावून टाकतं… मथुरेत बरेच महिने एका ब्राह्मण कुटुंबात राहून परतलेले शंभू बाळ राजांना धावत जाऊन बिलगतात त्या प्रसंगाने डोळ्यात पाणी उभं राहतं… एका उंटाच्या समोर गुढगे टेकून बादशहाची चाकरी स्वीकारताना त्या बालमनाची झालेली विचित्र तडफड जाणवते… एवढ्या लहान वयात इतकी हुशारी अन समजुतदारपण विरळाच… शंभूला प्रयाग स्थळी उभे राजे शिवपिंडीसारखे भासायचे… अन मला आता पिंडीचे दर्शन घेताच राजे समोर उभे राहतात… :)

राणीवसा:
राजांचा राणीवसा म्हटलं कि ठळकपणे समोर उभ्या राहतात त्या पुतळाबाई अन सोयराबाई… राजे आणि शंभूवर जीवापाड प्रेम करणाऱ्या केतकी वर्णाच्या निर्मळ मनाच्या पुतळाबाई… स्वामींच्या नावे कपाळभर लावलेल्या कुंकवाशी आणि शंभूच्या शिवगंधाशी तह करणाऱ्या पुतळाबाई… आणि दुसरीकडे आपल्या तिरकस नजरेने आणि बोलण्याने समोरच्याला कोड्यात टाकणाऱ्या सोयराबाई… नेहमीच काहीतरी गूढ मनात ठेऊन तोलून-मापून बोलणाऱ्या अन वागणाऱ्या सोयराबाई… यातल्या एकीवर प्रेम आणि दुसरीचा द्वेष करणं मीही कधीच सुरु केलंय… :)

धाराऊ:
धाराऊ म्हणजे शंभूची दुधाची आई… सईबाई नंतर हिनेच युवराजांना आपलं दुध पाजलं… आपल्या लेकरासारख किंबहुना त्याहून जास्त प्रेम तिने युव्रजांवर केलं… शंभूराजे चरणस्पर्श करत असताना धाराऊच्या मनाची नेहमीच होणारी चलबिचल खूपच निरागस वाटते… त्याच्या अंगावरून द्रीष्टेच कोंबडं उतरून टाकताना तीच धाराऊ आपली बोटं कडाकडा मोडते… बाळराजे मोहिमेवर जाताना तिचं मन गडाच्या बुरुजावर भगव्या जरीपटक्या सारखं फडफडत राहतं… तिच्या गोंदालेल्या हातावरची हिरवीगार नक्षी माझ्या मनावरही असेच काही क्षण गोंदून जाते… त्या माउलीची वेडी माया समर्पणाची वेगळी ओळख करून देते… 
गडकिल्ले आणि दरबारी हा एक अविभाज्य भाग आहे हिंदवी स्वराज्याचा… यातला प्रत्येकजण आणि गडापैकी विशेषतः रायगड आपली वेगळी छाप पडून जातो… 
One night at the museum या मूवी सारखं रोज रात्री मी कादंबरी हातात घेताच हि सगळी पात्रं जिवंत होतात… पानामागून पाने पलटत जातात आणि मी इतिहासासोबत धावत राहते… कधी अभिमानाने ऊर भरून येतो तर कधी मायेने कंठ दाटून येतो… कधी त्वेषाने तर कधी रागाने छातीचा भाता वरखाली होतो… कधी गर्वाने मान ताठ होते तर कधी तीच मान अदबीने राजांना, जीजाउंना आणि शंभूराजांना मानाचा मुजरा करते… 
          माझ्या टिंग्यालाही मग यातलीच एखादी गोष्ट मी आवर्जून सांगते… मला ठाऊक असलेले राजे त्याच्या चिमुकल्या शब्दांत बांधायचा प्रयत्न करते… 'छत्रपती शिवाजी महाराज कि…' एवढं म्हणायचं अवकाश कि टिंग्याही लगेच नरड्याच्या शिरा ताणून "जय" अशी ललकारी देतो तेव्हा ऊरभर समाधान मिळतं… :)
           २००-३०० पानांचा हा प्रवास आत्तापर्यंतचा… अजून बराच पल्ला गाठायचा आहे… हल्ली आम्ही महाराजांच्या राज्याभिशेकाच्या तयारीला लागलोय… खूप कामं पडली आहेत… रात्र वात पाहतेय माझी आणि शिवकालीन प्रवासाची… 

जय भवानी…. जय शिवाजी… 
हर हर महादेव…. 
माझा राजा देव न्हवता पण आज त्याच्यामुळे देवळात देव आहे… 
छत्रपती शिवाजी महाराज कि जय….
:)

- टिंग्याची आई

No comments:

Post a Comment